Login

सनईच्या सुरात गुपित...भाग 15

आरशात काही धूसर प्रतिमा दिसायला लागल्या
सनईच्या सुरात गुपित...भाग 15

रिसॉर्टमधील त्या गूढ रात्रीनंतर सायली आणि अनिरुद्धने ठरवलं की आता त्यांना देशमुख वाड्याच्या संपूर्ण इतिहासाचा उलगडा करायचाच आहे. जिथे कधी काळी भव्य वाडा उभा होता तिथेच आज हा आलिशान रिसॉर्ट उभा आहे. पण त्याच्या भिंतींमध्ये अजूनही काही गुपितं दडली आहेत.

"आपल्याला या रिसॉर्टच्या इतिहासाची सखोल चौकशी करावी लागेल." अनिरुद्ध म्हणाला.
"हो आणि त्यासाठी कदाचित आपण थेट देशमुख कुटुंबाशी संबंधित कुणालातरी शोधावं लागेल." सायलीने सूचवलं.

दुसऱ्या दिवशी रिसॉर्टच्या जुन्या नोकरांपैकी एक वृद्ध माणूस बळवंत सायली आणि अनिरुद्धला भेटला.

"तुम्हाला खरंच देशमुख वाड्याचा इतिहास जाणून घ्यायचा आहे?" तो गंभीर स्वरात म्हणाला.
"हो काका, आम्हाला वाटतं की काहीतरी मोठं रहस्य या जागेत दडलंय." अनिरुद्ध म्हणाला.

बळवंतने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली.
"देशमुख कुटुंब या गावातलं सर्वांत मोठं आणि प्रतिष्ठित घराणं होतं. त्यांचा जमीनदारीचा मोठा व्यवसाय होता पण त्या वैभवाच्या मागे असंख्य कटकारस्थाने आणि रक्ताचे डाग होते."

सायली आणि अनिरुद्ध स्तब्ध होऊन ऐकत होते.

"तुम्हाला माहिती आहे का या वाड्यात एक अशी खोली होती जिथे कुणालाही प्रवेश नसायचा?"

"कशी खोली?" सायलीने विचारलं.

"ती खोली सुदर्शनराव देशमुख यांच्या काळात अस्तित्वात होती. काहीजण म्हणायचे की तिथे चोरीचं धन लपवलं जात होतं तर काही म्हणायचे की तिथे अशा लोकांना डांबून ठेवलं जायचं जे देशमुखांच्या वाटेत यायचे."

"म्हणजेच देशमुख वाडा हा केवळ एक आलिशान घर नव्हतं तर तिथे काळ्या धंद्यांचा अड्डा होता?" अनिरुद्धच्या डोक्यातील संशय अधिकच बळकट झाला.

सायली आणि अनिरुद्धने बळवंतच्या मदतीने काही जुने दस्तऐवज आणि वर्तमानपत्रं चाळली. त्यांना काही वर्षांपूर्वीची एक बातमी सापडली.

"गावातील रहस्यमय अपहरण प्रकरण: देशमुख वाड्यात गूढ हालचालींचा संशय"
त्या बातमीमध्ये सुदर्शन देशमुख यांचं नाव स्पष्टपणे नव्हतं, पण त्यांची संदिग्ध भूमिका नमूद केली होती.

सायलीने तो कागद वाचून अनिरुद्धकडे पाहिलं. "आपल्याला सुदर्शन देशमुख यांच्याबद्दल अजून माहिती मिळवावी लागेल."

सायली आणि अनिरुद्धने शोध घेतल्यावर त्यांना कळलं की सुदर्शनराव अजूनही जिवंत आहेत पण ते आता या गावात राहत नाहीत.
त्यांनी खूप शोध घेतला आणि शेवटी एका लहानशा गावी त्यांचा माग काढला. जेव्हा ते त्यांच्या समोर उभे राहिले तेव्हा सुदर्शनरावांनी एक दीर्घ सुस्कारा टाकला.

"तुम्ही आलातच... शेवटी कोणीतरी हे रहस्य उघड करणारच होतं."

अनिरुद्धने पुढे होऊन विचारलं,

"तुम्ही इतकी वर्षं का लपवून ठेवलं? आणि त्या गूढ खोलीत काय होतं?"

सुदर्शनरावांनी त्यांचा तोल सांभाळत सांगायला सुरुवात केली.
"ती खोली माझ्या वडिलांनी बनवली होती. तिथे केवळ सोनं-चांदी नाही तर काही लोकांचं आयुष्यही बंदिस्त केलं गेलं होतं. काहीजण विरोधात बोलले तर काहींना आपल्या डोळ्यांनी सत्य पाहिलं पण कुणीच बाहेर बोलू शकलं नाही."


सायलीच्या अंगावर काटा आला.
"म्हणजेच खून झाले होते तिथे?"

सुदर्शनरावांनी शांतपणे मान हलवली.
"हो आणि मी त्या सगळ्याचा साक्षीदार होतो."

या कबुलीजबाबानंतर,
अनिरुद्ध आणि सायलीने ठरवलं की हे सत्य लोकांसमोर आणायचं. त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना ही माहिती दिली आणि काही दिवसांत तपास सुरू झाला.

अखेर पुराव्यांच्या आधारे सुदर्शनरावांना अटक करण्यात आलं.

त्या दिवशी सायलीने अनिरुद्धकडे पाहत हळूच म्हणाली, "आता तरी या जागेतील आत्म्यांना शांती मिळेल."

अनिरुद्धने दूर दिसणाऱ्या त्या जुन्या वाड्याच्या भग्नावशेषांकडे पाहिलं.

"हो आणि या रिसॉर्टच्या भिंतींमधलं गूढ कायमचं मिटेल."

सुदर्शनरावांना अटक झाल्यानंतरही अनिरुद्ध आणि सायलीच्या मनात अनेक प्रश्न होते. खरंच देशमुख वाड्यातील आत्म्यांना शांती मिळाली का? आणि अनयचं काय?

रिसॉर्टमध्ये परत आल्यावर सायलीला अचानक काहीतरी जाणवलं. तिच्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती. खोली क्रमांक १०७ मध्ये परत जाताच तिला जाणवलं की आरसा पुन्हा धूसर होत आहे.

"अनिरुद्ध, काहीतरी अजून बाकी आहे."
त्यांनी आरशाकडे लक्ष केंद्रित केलं. हळूहळू त्यात एक अस्पष्ट प्रतिमा दिसू लागली. त्या प्रतिमेत एक स्त्री होती. तीच ती स्त्री जिची सावली त्यांनी आधी पाहिली होती. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलेलं होतं पण तिच्या डोळ्यांत वेदना होत्या.

तो आत्मा अजूनही मुक्त नव्हता. तिला शांतता हवी होती, पण त्यासाठी नेमकं काय करावं हे अनिरुद्ध आणि सायलीला समजत नव्हतं.
सायलीने त्या आरशाकडे पाहत विचारलं,

"तुला काय हवंय? तुझी कहाणी काय आहे?"

आरशावर पुन्हा हलकसं धुकं जमलं आणि त्यात काही शब्द उमटू लागले,

"अनय आणि मी... आम्ही इथे पुन्हा भेटू का? की हे आमचं शेवटचं घरटं ठरेल?"

अनिरुद्धने आणि सायलीने एकमेकांकडे पाहिलं.
हा संदेश आधीही त्यांनी वाचला होता.
याचा अर्थ काय असू शकतो?

क्रमशः

ऋतुजा वैरागडकर
सदर कथेचे लिखाण सुरु आहे, नियमित भाग वाचण्यासाठी पेजला फोल्लो नक्की करा.


🎭 Series Post

View all