समुद्री मिशन (भाग -८)

Finding the mystery of deep sea and islands.

समुद्री मिशन (भाग -८)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
रुचिरा, गिरीश आणि संकेत चं डोकं तर हे सगळं ऐकून सुन्न झालं होतं! कोणी एवढी प्लॅनिंग का करेल? निशांत सोबत सुद्धा कोणी असंच केलं नसेल ना या सगळ्या विचारात ते न कळत गुरफटले जात होते! 

"सर, संकेत सोबतच असं का झालं असेल? मी पण तर तिथे बेशुद्ध होते! माझ्यावर तसे प्रयोग का झाले नसतील?" रुचिरा ने तिची शंका बोलून दाखवली. 

"बरोबर आहे तुझं! प्रत्येकाचं माईंड वेगळं असतं! काही जण लगेच संमोहित होतात तर काहींना संमोहित व्हायला वेळ लागतो! तुला सुद्धा सुरुवातीला सतत ती स्वप्न पडत होती असं तू म्हणाली होतीस आठवतंय? कदाचित तुला सुद्धा संमोहित करायचा प्रयत्न झाला असेल पण, तू या सगळ्यातून वाचलीस..." डॉ. रवी म्हणाले. 

"मग आता संकेत? तो कसा नॉर्मल होणार?" रुचिरा ने विचारलं.

"डोन्ट वरी! मी बघतो.... संकेत चल!" डॉ. रवी पुन्हा त्याला घेऊन गेले. 

गिरीश आणि रुचिरा तिथेच वाट बघत बसले होते. एव्हाना दोन वाजून गेले होते! 

"सर, डॉ. उर्मिलांना कळवलं पाहिजे ना आपल्याला उशीर होतोय...." रुचिरा ने आठवण करून दिली.

"हो! मी करतो त्यांना फोन..." गिरीश म्हणाला.

गिरीश ने लगेच डॉ. उर्मिला ला फोन करून त्यांना यायला उशीर होतोय हे सांगितलं. अजून निदान एक तास तरी त्यांचा डॉ. रवींच्या क्लिनिक मध्ये जाणार होता! 
*************************
"हॅलो! अजूनही ती सगळी पलटण क्लिनिक मध्येच आहे." त्या पत्रकाराने फोन वर सांगितलं.

"असुदे! त्या संकेत ला जे काही भास होतायत त्या साठी ट्रीटमेंट सुरू असेल! तुम्ही लक्ष ठेवा! जोवर ते लोक पुन्हा बेटावर जाणार नाहीत याची खात्री होत नाही तोवर पाळत ठेवा." ती फोनवर ची व्यक्ती म्हणाली.

"त्यांना ते ट्रिगर सापडलं आणि त्या संकेत चा इलाज झाला तर?" पत्रकाराने विचारलं.

"होऊदे! काही फरक नाही पडणार! त्या सगळ्यांचा इथे जेवढा वेळ जाईल तेवढं चांगलं आहे...... आपलं तिथलं काम चार दिवसांत शेवटच्या टप्प्यात जाईल... मग काय होणार याची कल्पना आहे तुम्हाला... त्यामुळे इथेच ते लोक जितका वेळ लावतील तेवढं आपल्या साठी चांगलं आहे. 

"ओके!" पत्रकार म्हणाला आणि फोन ठेवला. 
***************************
संकेत आणि डॉ. रविंची वाट बघत असताना रुचिरा ने जे काही ऑफिस मध्ये घडलं, ती का तडकाफडकी निघून गेली होती हे सगळं तिने गिरीश ला सांगितलं. 

"तू जे सांगितलं त्या वरून अजूनही आपल्यावर कोणीतरी नजर ठेवून असू शकतं! मला वाटतंय की, आता आपण तिथे जाणार नाही आहोत अशी समज त्या पाळत ठेवणाऱ्या ची करून द्यायला हवी." गिरीश म्हणाला. 

"म्हणजे?" रुचिरा ने गोंधळून विचारलं. 

"म्हणजे, आपण डॉ. उर्मीलांना उद्या भेटू... मला खात्री आहे, तो व्हिडिओ बघून तू आणि संकेत घाबरून त्या मिशन वर जाण्याचा निर्णय बदलावा म्हणून हे सगळं घडवून आणलं असावं! जी लोकं एवढी प्लॅनिंग करू शकतात ती लोकं आपण तिथे जाणार नाही याची खात्री केल्या शिवाय आपला पीछा सोडणार नाहीत. वरवर आता आपण त्या धमकी ला घाबरलो आहोत असं भासावावं लागेल.... पुन्हा उभ्या आयुष्यात आपण त्या बेटाच्या इथे फिरकणार सुद्धा नाही असा विश्वास निर्माण करून द्यावा लागेल आणि लवकरात लवकर तिथे जायला लागेल. नक्कीच खूप काहीतरी मोठं घडणार असणार.." गिरीश म्हणाला.

"सर, तुमच्या बोलण्यावरून हे खूपच सिरियस आणि किचकट होत चाललं प्रकरण वाटतंय!" रुचिरा म्हणाली. 

"हम्म! माझ्या अनुभवावरून मला तरी असंच वाटतंय.... जिथे बेकायदेशीर कामं सुरू असतात अश्या ठिकाणांना नेहमी भूत, खेत, शापित असे टॅग लावले जातात.... जेणेकरून कोणी तिथे फिरकू नये आणि त्यांची सगळी काळी कामं व्यवस्थित व्हावी..." गिरीश म्हणाला. 

"हो सर! बरोबर आहे तुमचं! सामान्य जनतेला अंधश्रध्देच्या विळख्यात अडकवून ही असली कामं केली जातात..." रुचिरा म्हणाली. 

तिला आता गिरीश च म्हणणं पटत होतं! गिरीश ने डॉ. उर्मिला ला उद्या भेटता येईल का हे विचारून दुसरी वेळ मागून घेतली. त्यांच्या दिवस भराच्या आराखड्यात हा एक चेंज झाला होता. हे सगळं होई पर्यंत डॉ. रविंनि संकेत ची पूर्ण ट्रीटमेंट केली! 

"आता याला काही त्रास होणार नाही.... याच्या काना वाटे एक खूप कमी फ्रिकवेंसी असलेला बग याच्या शरीरात टाकला होता. यामधून दुपारी आणि रात्री दोन्ही वेळेला एक विशिष्ट आवाज यायचा तो आला की संकेत संमोहित होत होता आणि त्याच्या माईंड मध्ये तिथे बेशुद्ध अवस्थेत जे काही प्रोग्रामिंग केलं गेलं होतं ते दिसत होतं! पण, आता मी हे बग काढून टाकलं आहे.... आता त्याला काही त्रास होणार नाही." डॉ. रविंनीं सगळ्यांना ते बग दाखवलं आणि सगळं नीट सांगितलं. 

खूप लहान असणारं ते बग काय करू शकतं हे सगळ्यांनी पाहिलं होतं! एवढ्या लहान असणाऱ्या त्या बग मध्ये एखाद्याला स्वतःच्या तालावर नाचवायची ताकद होती. 

"थँक्यू सर! तुमच्यामुळे आज मी या त्रासातून मुक्त झालो." संकेत ने डॉ. रविंचे मनापासून आभार मानले. 

"इट्स माय प्लेजर! बाय द वे, तुम्ही निशांत बद्दल माहिती घ्यायला आला होतात ते अजून राहिलं की..." डॉ. रवींनी विषयाला हात घातला.

"हो! निशांत ला पण असंच बग शरीरात टाकून संमोहित केलं जात होतं का?" गिरीश ने विचारलं.

"नाही! त्याला खरंच काहीतरी त्रास होत होता. साधारण चार ते पाच वर्षांपूर्वी तुम्ही तिकडे गेला होतात.... तेव्हा एवढं हे तंत्रज्ञान विकसित नव्हतं! बहुदा त्याच्या मनाने तिथे जे काही पाहिलं असेल त्याचा धसका घेतला असावा म्हणून त्याला कालांतराने ड्युअल पर्सनॅलीटी चा सुद्धा त्रास झाला असावा..." डॉ. रवी म्हणाले.

"बरं! मला सांग, तो यातून बरा होत होता का? आत्ता काही आठवड्यांपूर्वी च त्याचा देहांत झाला! तो या कारणामुळे तर???" गिरीश ने विचारलं. 

"त्याने साधारण वर्ष भरापूर्वी ट्रीटमेंट घेणं सोडलं होतं! तो बरा होत होता.... शेवटच्या वेळी जेव्हा तो इथे आला तेव्हा त्याचे कोणी नातेवाईक त्याच्या सोबत आले होते! तुला त्यांच्याबद्दल माहितेय असं ते म्हणाले आणि निशांत ची ट्रीटमेंट आता परदेशात होईल म्हणून इथून त्याला घेऊन गेले होते." डॉ. रवींनी सांगितलं. 

"काय? मला याबद्दल काही माहीत नाहीये..." गिरीश आश्चर्यचकित होऊन म्हणाला. 

"मला चांगलं आठवतंय, त्यांनी माझ्या समोर तुला फोन लावून याबद्दल कल्पना दिली होती..." डॉ. रवी म्हणाले. 

त्यांच्या या बोलण्याने आता सगळे गोंधळून गेले होते. नक्कीच खूप काहीतरी मोठं रहस्य त्या बेटावर आहे हे सगळ्यांना कळून चुकलं. 

"सर, मला वाटतंय निशांत सर बरे होऊन त्यांनी आपल्याला काही सांगू नये म्हणून हा प्लॅन असावा.... नक्कीच परदेशात जाऊन त्यांच्यावर चुकीची ट्रीटमेंट करून त्यांना इथे आणलं गेलं असेल आणि म्हणून कदाचित ते आपल्यात नाहीत..." रुचिरा म्हणाली. 

"हे प्रकरण आता वाटतंय तितकं सोपं नाही.... या सगळ्याच्या मुळाशी आता जायचंच!" गिरीश च्या डोळ्यात आता एक वेगळीच चमक दिसत होती. मित्राच्या मृत्यूचा बदला सुद्धा घ्यायचा हे त्याच्या बोलण्यातून कळत होतं! 

"सर! प्लीज शांत व्हा! तुमची सध्याची स्थिती आम्हाला कळतेय पण, आपण मगाशी जे ठरवलं आहे तसं आपल्याला करावं लागणार आहे... प्लीज शांत व्हा." रुचिरा गिरीश ला म्हणाली. 

"हो..." गिरीश स्वतः ला सावरत म्हणाला. 

"काय ठरलं आहे? आपल्या प्लॅन मध्ये काही बदल झालेत का?" संकेत ने गोंधळून विचारलं.

"हो! खूप मोठे बदल झालेत..." रुचिरा म्हणाली. 

तिने आणि गिरीश ने मिळून संकेत ला नवीन प्लॅन सांगितला. ऑफिस मध्ये आलेली ती धमकी त्याबद्दल सुद्धा सांगितलं. सगळं नीट ठरवून झाल्यावर ते तिकडून निघाले... आणि क्लिनिक च्या बाहेरच्या दारापाशी आले...

"संकेत! रुचिरा! मला वाटतंय तुम्ही दोघं सुद्धा त्या ठिकाणी जाण्याचा विचार सोडून द्या! काही रहस्य असतात जी सोडवायची नसतात..  मानवी आकलन शक्तीच्या पलिकडे असतात ती! म्हणून सांगतोय..." गिरीश म्हणाला. 

"हो सर! हे एवढं सगळं अनुभवून आणि तुमच्या तोंडून हे ऐकुन खरंच असं वाटतंय की हे सगळं सोडून द्यावं... आम्ही नाही जाणार तिथे... या सगळ्यातून बाहेर पडायला आता मस्त कुठेतरी फिरायला जातो... जिथे समुद्र नसेल..." संकेत म्हणाला. 

रुचिरा ने सुद्धा त्यांना साथ दिली आणि सगळे आपापल्या वाटेने निघाले.... संकेत आणि गिरीश स्वतःच्या घरी गेले तर रुचिरा हॉस्टेल वर जायला निघाली... 
*************************
"हॅलो! आपल्या धमकी चा चांगला परिणाम झालाय... त्या दोघांनी तिथे यायचा विचार बदलला आहे... सगळे वेगवेगळ्या वाटेने स्वतःच्या घरी गेले.... मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे आणि कानांनी ऐकलं आहे." त्या पत्रकाराने फोन करून सांगितलं. 

"गुड! चला एक काटा निघाला... आता पाळत ठेवणं बंद करा आणि कामाला लागा... बेटावर जा... तिथे माणसांची गरज आहे.." त्या व्यक्तीने सांगितलं. 

पत्रकाराने हो म्हणून फोन ठेवला आणि तिथून सगळे नक्की स्वतःच्या च घरी गेले ना, वाटेत कुठे भेटले नाहीत ना याची पुन्हा खात्री केली आणि समुद्र किनाऱ्याच्या दिशेने निघाला. 
**************************
इथे सगळे स्वतःच्या घरी आले असले तरी त्यांचा वेगळा प्लॅन ठरलेला होता. एव्हाना संध्याकाळचे साडे चार वाजून गेले होते! पाच वाजता सगळ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स करायचं ठरवलं होतं! रुचिरा ने शंतनु ला सुद्धा या बद्दल सांगितलं होतं... उद्या डॉ. उर्मिला ला कधी भेटायचं, त्या मिशन वर कधी आणि कोणत्या तयारीनिशी जायचं हे सगळं ठरणार होतं! 

क्रमशः..... 
****************************
आता लवकरच गिरीश, संकेत आणि रुचिरा त्या मिशन वर जातील... तिथे असं काय वेगळं असेल म्हणून लोकांना त्या पासून दूर ठेवलं जातंय? निशांत ला कोणी परदेशात नेलं असेल? त्याला असं काय समजलं असेल म्हणून त्याने जीव गमावला? तो पत्रकार कोणाशी बोलत असेल? पाहूया पुढच्या भागात.. तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all