समुद्री मिशन (भाग -५)

Finding the mystery of deep sea and islands.

समुद्री मिशन (भाग -५)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
रुचिरा ने हॉस्टेल वर जाऊन पटापट आवरून घेतलं. सगळं आवरता आवरता आठ वाजून गेले होते! तिने निधी ला सुद्धा फोन करून काही दिवस ऑफिस सांभाळायची जबाबदारी दिली.  हॉस्टेल मधून निघताना आता कामामुळे येण्या जाण्याच्या वेळा बदलत राहतील असं सांगून सुद्धा ठेवलं आणि ती पुन्हा संकेत च्या घरी जायला निघाली. रस्त्याने भराभर पावलं टाकत सगळ्या दिवसभराचा आराखडा तिच्या डोक्यात सुरू होता. काही वेळातच ती त्याच्या घरी पोहोचली. संकेत ने सुद्धा सगळं आवरून घेऊन लॅपटॉप, नोटपॅड, पेन सगळं तयार ठेवलं होतं! त्याचं घर आत्ता छोटंसं ऑफिस भासत होतं. 

"तू गिरीश सरांना फोन केला होतास ना?" रुचिरा ने विचारलं.

"हो! येतच असतील ते.... ९ पर्यंत बोलावलं आहे मी त्यांना..." संकेत ने सांगितलं. 

"ओके... मी निधी ला कळवलं आहे काही दिवस तिला सगळं हॅण्डल करावं लागेल... तर, आता आपल्याला तिथलं काही टेंशन नाही राहणार...." रुचिरा ने सांगितलं. 
*************************
दुसरीकडे त्या पत्रकाराने रुचिरा ला संकेत च्या घरी जाताना पाहिलं होतं! तो तिच्यावर सतत नजर ठेवून होता! काल रात्री सुद्धा रुचिरा संकेत च्या घरी होती म्हणून त्याला ती दोघं नक्कीच काहीतरी वेगळं काम करण्याचा विचार करतायत असं वाटत होतं!

"हॅलो! तुमचा संशय खरा ठरणार वाटतंय! ती रुचिरा काल पण त्या संकेत च्या घरी थांबली होती आणि आत्ता सुद्धा लवकर आली आहे.." त्याने कोणाला तरी फोन करून सांगितलं.

"ठीक आहे! तुम्ही लक्ष ठेवा.... ते दोघं कुठे जातात, कोणाला भेटतात हे सगळं मला समजलं पाहिजे..... तिकडे ते दोघं पुन्हा फिरकता कामा नये! तरी, ते पुन्हा त्या ठिकाणी गेले तर पुढे काय करायचं हे माहितेय ना?" त्या व्यक्तीने विचारलं.

"हो! आपली माणसं कामाला लावली आहेत तिथे त्यांना जाण्यापासून आम्ही आडकाठी घालतोच आहोत! पण, तरी तिथे गेले तरी परत येणार नाहीत! शिवाय आपला फायदा कसा करून घेता येईल हे सुद्धा बघितलं आहे... आपल्या माणसांनी तशी तयारीच करून ठेवली आहे." तो पत्रकार म्हणाला.

"ओके.... लक्ष ठेवा. सध्या आपण आपलं तिथलं काम थांबवू शकत नाहीये.... त्यामुळे सावध रहा! त्या दोघांना तिकडे जाऊन काही समजलं तरी या कानाची खबर त्या कानाला लागता कामा नये.." ती व्यक्ती म्हणाली. 

पत्रकाराने हो म्हणून फोन ठेवला. तिथेच एका पानाच्या टपरी आडून तो सगळं बघत होता. थोड्याच वेळात गिरीश ने संकेत च्या बिल्डिंग मध्ये प्रवेश केला. गिरीश ला पाहून तो पटकन भिंती आड उभा राहिला. 
**************************
"या... या... सर... आम्ही तुमचीच वाट बघत होतो." संकेत दारात गिरीश ला पाहून म्हणाला.

गिरीश आत आला! रुचिरा ने त्याला पाणी दिलं आणि त्यांच्या कामाची सुरुवात झाली. 

"सर, ही रुचिरा! आम्ही दोघं गेलो होतो तिकडे..." संकेत ने रूचिराची ओळख करून दिली. 

"ओके... नाइस टू मीट यू..." गिरीश ने हात पुढे करत तिचं अभिवादन केलं. 

रुचिरा ने छान स्मित करत त्यांना हात मिळवला. सगळे आता कामावर लक्ष देत होते. 

"सर, आम्ही दोघांनी काल हे सगळे फोटो नीट पाहिले... यात ज्या वेगळ्या वनस्पती आहेत, फुलं आहेत या बद्दल तुम्हाला काही माहिती आहे का?" रुचिरा ने विचारलं. 

"नाही! या सगळ्या वनस्पती त्या बेटावर च कशा आढळून येतात, की अजून काही आहे जे आपल्याला दिसलं नाहीये माहीत नाही. मी आणि निशांत जेव्हा पहिल्यांदा तिथे गेलो होतो तेव्हा आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं! याआधी त्या बेटाचा शोध सुद्धा लागला नव्हता. लोक म्हणायचे तिथे बेट आहे, त्या बेटावर ज्या वनस्पती आहेत त्या सुद्धा खूप स्पेशल आहेत, तिथे संपत्ती दडलेली आहे वैगरे वैगरे.... पण, नकाशात सुद्धा या बेटाचा काही मागमूस नव्हता. म्हणून, आम्हाला दोघांना हे सगळं खोटं आहे असं वाटत होतं! या सगळ्याची शहानिशा करायची म्हणजे तिथे जावं लागणार! या हेतूने आम्ही तिथे गेलो... हे बेट तर तिथे होतं! पण, ज्या क्षणी आम्ही तिथे पाऊल टाकलं तेव्हा पासून खूप झोप यायला लागली... आत्ता गुंगी येऊन पडतो की काय असं वाटत होतं! पण, पुरावे म्हणून कसेबसे हे एवढे फोटो काढले." गिरीश म्हणाला. 

"सर, तुम्ही हे कोणत्या बायोलॉजिस्ट ला दाखवले नव्हते का? त्यांनी नक्कीच काहीतरी मदत केली असती..." संकेत ने विचारलं. 

"तिथून आल्यावर काही दिवसांत आम्ही डॉ. उर्मिला यांना भेटलो होतो... त्यांनी ते फोटो बघून सांगितलं होतं की, ही सगळी झाडं विषारी आहेत! भारतात ती आढळून येत नाहीत!" गिरीश ने सांगितलं. 

"काय? पण, आपण हे सगळं तर इथेच बघितलं आहे... डॉ. उर्मिला ना आपण भेटू शकतो का? या सगळ्या प्रकरणात त्यांची खूप मदत होईल." संकेत म्हणाला. 

"हो! माझ्याकडे आहे त्यांचा नंबर मी फोन करून घेतो..." गिरीश म्हणाला. 

त्याने लगेच डॉ. उर्मिला ला फोन लावला आणि डॉ. उर्मिला शी बोलून घेतलं. 

"त्यांनी दोन वाजता त्यांच्या लॅब मध्ये बोलवलं आहे." गिरीश ने सांगितलं. 

"ओके... अजून १०:३० च झाले आहेत... बराच वेळ आहे... मी पटकन सगळ्यांसाठी कॉफी आणते..." रुचिरा म्हणाली. 

सगळ्यांना कॉफी ची गरज होतीच! ज्या घटना घडत होत्या त्या सगळ्यांनी डोक्याचा पार भुगा केला होता. जे वाटत होतं, दिसत होतं त्यापेक्षा काहीतरी वेगळंच तिथे होतं! पण, नक्की काय? का त्या बेटाविषयी अफवा पसरल्या होत्या? तिथे दिसणारा तो जीव तो काय असेल या सगळ्या विचारांनी डोकं सुन्न झालं होतं. दोनच मिनिटात ती कॉफी घेऊन आली. सगळ्यांनी काम बाजूला ठेवून कॉफी पिली आणि थोडे रिलॅक्स झाले... त्यानंतर पुन्हा नव्या जोशात कामाला सुरुवात झाली!

"सर, निशांत सरांना तिकडून आल्यावर कसलेतरी भास होत होते म्हणून त्यांची ट्रीटमेंट चालू होती ना? तुम्हाला त्यांची ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टरांबद्दल काही माहिती आहे का?" रुचिरा ने विचारलं. 

"हो! माझा मित्रच आहे... डॉ. रवी!" गिरीश ने सांगितलं. 

"सर, आपल्याला त्यांची सुद्धा मदत लागणार आहे... तुम्हाला संकेत ने त्याला होणारे भास, स्वप्न याबद्दल सांगितलं असेलच ना!" रुचिरा म्हणाली. 

"हो! सर, तुम्ही डॉ. रवींशी सुद्धा बोलून घेता का? म्हणजे, माझं सुद्धा चेकप होईल आणि निशांत सरांच्या केस बद्दल अजुन माहिती सुद्धा मिळेल." संकेत म्हणाला. 

त्या दोघांच्या सांगण्यावरून गिरीश ने डॉ. रवी ला सुद्धा फोन करून अपॉइंटमेंट घेतली. 

"आपल्याला बारा वाजता डॉ. रवी ने बोलावलं आहे... साधारण एक तास जाईल आपला तिथे. मग आपण तिथून बाहेर पडल्यावर जवळच एक हॉटेल आहे तिथे जेवण करू आणि तसचं पुढे डॉ. उर्मिला कडे जाऊ.." गिरीश ने सगळा आराखडा सांगितला. 

संकेत आणि रुचिरा दोघं ओके म्हणाले. 

"मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे..." रुचिरा म्हणाली. 

"काय?" संकेत ने विचारलं. 

"हो! हो! एक मिनिट..." असं म्हणून तिने तिच्या लॅपटॉप मध्ये काहीतरी ओपन केलं. 

"हे बघा! सर, तुम्ही मगाशी म्हणालात ना ते बेट नकाशात नाही.... त्यावरून मला आत्ता क्लिक झालं मी काल अशी माहिती वाचली आहे... हे बघा! यात सुद्धा असंच काहीतरी आहे... हे कुठल्यातरी दुसऱ्या देशाचं आहे... पण, या आर्टिकल मध्ये लिहिलं आहे अशी काही बेटं आहेत जी मध्येच दिसतात तर मध्येच गायब होतात... अजूनही या सगळ्याचं रहस्य काय हे माहीत नाही.... इनफॅक्ट नक्की ही बेटं आहेत की भ्रम आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही." रुचिरा ने तिने काल काढलेली सगळी माहिती दोघांना दाखवली. 

संकेत आणि गिरीश ने ते आर्टिकल वाचलं. त्यात असलेले फोटो सुद्धा पाहिले! गिरीश आणि निशांत ने काढलेले फोटो आणि त्या लेखात असलेले फोटो यात बरंच साम्य होतं! एक एक कडी जोडत सगळ्यांना या रहस्याच्या मुळाशी जायचंच होतं! 

"चला आपण आता डॉ. रवींना भेटायला जाऊया.... नंतर जे हाती लागेल त्यावरून कधी पुन्हा त्या बेटावर जायचं हे ठरवू..." संकेत म्हणाला. 

सगळे आता डॉ. रवींना भेटायला निघाले. अजूनही तो पत्रकार तिथेच होता. त्याने सगळ्यांना बाहेर येताना पाहिलं. तिथेच आड जागी उभं राहून तो त्यांच्या हालचाली टिपत होता. त्या तिघांनी रिक्षा केली. तो पत्रकार सुद्धा त्याच्या स्कूटी ने त्या रिक्षेचा पाठलाग करत त्यांच्या मागे गेला... 

क्रमशः.... 
***********************
डॉ. रविंकडे जाऊन काही हाती लागेल का? डॉ. उर्मिला त्यांची कशा पद्धतीने मदत करेल? त्या पत्रकाराने ज्या कोणाला फोन केला होता ती व्यक्ती "सध्या आपलं काम थांबू शकत नाही" असं का म्हणाली असेल? पाहूया पुढच्या भागात... 

🎭 Series Post

View all