समुद्री मिशन (भाग -४)

Finding the mystery of deep sea and islands.

समुद्री मिशन (भाग -४)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
रुचिरा च्या चेहऱ्यावर आता उत्सुकता आणि चिंता दोन्ही दिसत होतं! तिला संकेत ची सतत काळजी वाटत होती... त्याला कसले भास होत असतील, कसली स्वप्न पडत असतील याचाच विचार तिने दिवसभर केला होता! 

"मी तुला सकाळी असं विचारलं होतं कारण, मला आपण तिथून आल्यापासून रोज दुपारी आणि रात्री बरोबर १:३७ ला कसले तरी भास होतायत... जर मी जागा असेन तर कोणीतरी सतत दिसतंय!" संकेत काळजीच्या स्वरात म्हणाला. 

"म्हणजे? नीट सांग ना काय झालं?" रुचिरा ने विचारलं.

संकेत ने तिला समुद्र किनाऱ्यावर दुपारी त्याला दिसलेला पण इतरांना न दिसलेला माणूस, गणप्या आणि मंग्या बद्दल सगळं सांगितलं. त्यानंतर गिरीश ने निशांत बद्दल जे सांगितलं होतं ते सुद्धा सांगितलं. 

"काय? एवढं सगळं घडलं आणि तू मला हे आत्ता सांगतोय?" रुचिरा त्याला रागावून म्हणाली. 

"तू काळजी करत राहशील म्हणूनच सांगितलं नव्हतं! आता उद्या आपण निशांत सर ज्या मानसोपचार तज्ज्ञाकडे जायचे तिथे जाऊया... माझं सुद्धा चेकअप होईल आणि आपल्याला असं का घडतंय याची माहिती सुद्धा मिळेल." संकेत म्हणाला. 

"हो तर आपण जाऊया! पण, आजच्या रात्रीचं काय? तुला आज सुद्धा त्रास होईल ना... मला भीती वाटतेय रे! काही भलतचं नको घडायला." ती काळजीत म्हणाली. 

"अगं खरंच नको काळजी करू.... आज मला तसं काही होणार नाही... माझा एक मित्र मनोवैज्ञानिक मित्र आहे! त्याला विचारून मी एक गोळी घेऊन आलो आहे.... त्याने मला शांत झोप लागेल आणि कसली स्वप्न सुद्धा पडणार नाहीत..." तो तिला शांत करत म्हणाला.

"ओके... पण, तरी रिस्क कशाला घ्यायची? मी आज इथेच थांबते! असं काही झालं तर तुला निदान सावरता येईल मला..." ती म्हणाली. 

"अरे! खरचं नको... काही नाही होणार मला..." तो तिला समजावत म्हणाला. 

"तू गप बस! तुला मी विचारलं नाहीये... सांगितलं आहे... मी हॉस्टेल मध्ये फोन करून कळवते आज मी येत नाहीये..." ती त्याला रागावून म्हणाली आणि हॉस्टेल मध्ये फोन केला. 

"हम्म! झालं का समाधान? आता पुढचं बोलूया की अजून मला रागवायच बाकी आहे?" तो तिला चिडवत म्हणाला. 

तिने फक्त एक तिरका कटाक्ष टाकला. आता जर आपण अजून मस्करी केली तर काही खरं नाही हे त्याला कळून चुकलं होतं! त्याने लगेच सिरियस चेहरा केला आणि कामावर लक्ष द्यायला सुरुवात केली. 

"हा फोटो बघ! यात बऱ्याच वनस्पती आहेत ज्या वेगळ्या आहेत! मला वाटतंय आपण आपल्या या मिशन मध्ये जीव वैज्ञानिकांची सुद्धा मदत घेऊया! त्यांच्याकडून आपल्याला त्या अक्राळ विक्राळ जीवाची सुद्धा माहिती मिळेल! म्हणजे जर तसा जीव अस्तिवात असेल तर त्याला काय म्हणतात तो भारता सारख्या देशात आढळतो का? हे सगळं विचारून घेता येईल." रुचिरा म्हणाली. 

"हा! चालेल... मी बघतो आपल्याला यात कोण मदत करू शकेल... माझे काही कॉन्टॅक्ट आहेत त्यांना विचारून घेतो..." संकेत म्हणाला. 

"ओके... हे बघ आता! मी दुपारी ऑफिस मध्ये ही यादी बनवली आहे.... आपण तिथे गेल्यावर कोणत्या घटना घडत गेल्या हे सगळं लिहिलं आहे यात! आपण यावर विचार करून पुढच्या तयारी ला लागुया...." रुचिरा ती डायरी त्याला देत म्हणाली.

संकेत ने ते सगळे पॉइंट्स वाचले... तो सतत ते वाचत होता! त्या सगळ्या घटनांमध्ये नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे... पण काय? याचा तो विचार करत होता. या सगळ्यात ८:३० वाजून गेले होते... 

"मी जेवण ऑर्डर करते.... तू काय खाणार सांग..." रुचिरा घड्याळ बघून म्हणाली. 

"काहीही चालेल... तुला जे आवडेल ते मागव..." तो म्हणाला. 

तिने लगेच एका महिला खानावळीतून दोन माणसांसाठी घरगुती डबा मागवला आणि ते दोघं पुन्हा कामाला लागले. थोड्याच वेळात डबा आला. दोघांनी पोटभर जेवून घेतलं! आता पोटात थंडावा झाला तसं त्यांचं डोकं सुद्धा चालू लागलं! 

"रुची! हे बघ, तू हे सगळं लिहिलं आहेस ते बरोबर आहे... पण, आपण एक गोष्ट विसरलो... जेव्हा पण कोणी तिथे जातो तेव्हा तो आपोआप बोटीत येतो बरोबर? मग ती बोट इथे तिथे कुठेही भरकटत न जाता बरोबर त्या समुद्राच्या मध्यभागी च कशी येते? जर, असंच नुसतं बोटीत त्या माणसांना घालून सोडून दिलं जात असेल तर पाण्याच्या प्रवाहाबरोबर ती बोट पुढे जायला हवी, दिशा चुकायला हवी! पण, तसं तर काहीही घडलं नाही..." संकेत म्हणाला.

"हो रे! आपण याचा विचार तर केलाच नाही! म्हणजे नक्की हे सगळं कोणीतरी मुद्दाम घडवून आणतंय! आपला संशय आता दिवसेंदिवस खात्रीत बदलत चाललाय..." रुचिरा म्हणाली.

"हम्म! मी पण आता उद्याची वाट बघतोय... गिरीश सरांना मी इथेच बोलावलं आहे त्यांच्या सोबत सगळं डिस्कस करून, उद्याच निशांत सरांची ट्रीटमेंट केलेल्या सायकोलोजिस्ट कडे आणि नंतर त्या फोटोतल्या वनस्पती, तो विचित्र जीव यांची माहिती घ्यायला सुद्धा बायोलोजिस्ट कडे जाऊया... आता मला कधी एकदा पुन्हा त्या मिशन वर जातोय असं झालंय." संकेत उत्साहात म्हणाला. 

"हो मला पण.... चल आता तू कोणती गोळी घेऊन आला आहेस ती घे आणि जाऊन झोप... मी आहे इथेच! काही लागलं तर हाक मार..." रुचिरा म्हणाली. 

"असं नको... तू बेडरूम मध्ये जाऊन झोप... मी इथे सोफ्यावर झोपतो..." संकेत म्हणाला. 

"अजिबात नाही! तुला अचानक काही त्रास झाला, तू झोपेत कुठे चालू लागलास तर मला कसं समजणार... आणि आता काही बोलू नकोस जा शिस्तीत गोळी घे आणि झोप!" रुचिरा जवळ जवळ त्याला धमकावत म्हणाली. 

"हो! हो! तुझ्यापेक्षा एखादा गुंड परवडला..." तो हसत हसत तिची मस्करी करत म्हणाला. 

तिने त्याच्या दंडावर एक फटका मारला आणि त्याला ग्लास मध्ये पाणी आणून दिलं. संकेत ने गोळी घेतली, रूचिराला उशी आणि पांघरूण आणून दिलं आणि तो झोपायला गेला. रुचिरा इथे जागीच होती... मध्ये मध्ये त्याला शांत झोप लागली आहे का बघत होती... एव्हाना रात्रीचा १ वाजून गेला होता.... अजून थोडावेळ तरी तिला जागं राहणं भाग होतं! या वेळात सुद्धा ती सतत ते फोटो बघत होती, मोबाईल वर काहीतरी शोधत होती! दिवसभराच्या कामानंतर आता तिच्या डोळ्यावर सुद्धा झापड यायला लागली होती... तिने घड्याळ बघितलं! 

"दीड वाजला! आता सावध राहिलं पाहिजे..." असं स्वतःशीच बोलली. 

तिने ते सगळे फोटो पुन्हा फाईल मध्ये घालून ठेवले आणि संकेतच्या बेडरूम जवळ जाऊन उभी राहिली... जसा वेळ पुढे सरकत होता तशी तिच्या हृदयाची धडधड वाढत होती! आता एक मिनिट भरात काय पाहायला मिळेल, काही अघटीत घडणार नाही ना या काळजीत ती तिथे उभी राहून त्याच्यावर लक्ष ठेवत होती. १:३७ झाले! संकेत ने त्याची कुस बदलली. त्याची हालचाल झाली तशी रुचिरा एकदम सावध झाली. पण, तो शांत झोपला होता... फक्त मध्येच त्याचे डोळे एकदम घट्ट बंद व्हायचे, कुस बदलली जायची आणि तो एकदम घट्ट पांघरूण पडकायचा! हे सगळं पाहून रुचिरा आत गेली... 

"मी आहे इथेच! तू शांत झोप... काहीही नाही होणार...." असं त्याच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाली. 

तसा तो शांत झाला... १:४० झाले होते! आता अजून थोडावेळ इथेच थांबू असा विचार करून रुचिरा तिथल्या खुर्चीवर बसली! संकेत आता नीट शांत झोपला आहे हे पाहून दोन वाजता ती हॉल मध्ये आली आणि झोपली. त्या गोळीने खरंच काम केलं होतं! संकेत नेहमी सारखा ओरडत झोपेतून उठला नव्हता. सकाळी साधारण ५:३० वाजता रुचिरा उठली. संकेत अजून झोपलेला होता! ती फ्रेश होऊन आली आणि चहा ठेवला. तेवढ्यात संकेत उठला! 

"तू कधी उठलीस? बस ना मी आणतो चहा..." तो तिला किचन मध्ये बघून म्हणाला. 

"कशाला उगाच फॉरमॅलिटी! जा तू फ्रेश होऊन घे... तोवर चहा होतोच आहे! आपण चहा घेऊ मग मी हॉस्टेल वर जाऊन परत येते...." रुचिरा म्हणाली. 

"ओके... पाच मिनिटात आलो..." संकेत म्हणाला. 

संकेत येई पर्यंत रुचिरा ने चहा सोबत नाश्त्याला गरमा गरम उपमा केला. दोघांनी नाश्ता करून घेतला आणि रुचिरा हॉस्टेल ला जायला निघाली.. 

"लवकर ये... मी गिरीश सरांना सुद्धा नऊ पर्यंत यायला सांगतो..." संकेत म्हणाला. 

"हो! तासा दीड तासात येतेय... निधी ला सुद्धा नंतर फोन करून सगळं हॅण्डल कर म्हणून सांगायचं आहे..." रुचिरा म्हणाली. 

"हम्म! बरं, काल मी झोपेतून जागा झालो होतो का?" संकेत ने विचारलं. 

"नाही... पण, तुला काहीतरी स्वप्न पडलं होतं बहुतेक... कारण, ' त्या ' वेळेत तू एकदम शांत झोपला नव्हतास...." रुचिरा ने जे घडलं होतं ते सांगितलं. 

"हम्म! काहीतरी स्वप्न पडत होतं पण, नेमकं आठवत नाहीये आता... बरं! तू ये हॉस्टेल वर जाऊन मग बोलू.... तसंही आपण आज  सायकोलॉजिस्ट चा सल्ला घेणारच आहोत..." संकेत म्हणाला. 

"हा! चालेल मग... मी येते पटकन... तू गिरीश सरांना फोन करून ठेव..." रुचिरा म्हणाली. 

संकेत हो म्हणाला आणि रुचिरा हॉस्टेल वर जायला निघाली. आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप महत्वाचा होता शिवाय खूप कामात जाणार होता. 

क्रमशः....  
************************
आज दिवसभर आता त्यांना काही हाती लागेल का? संकेत ला असे भास होण्यामागे काय कारण असेल? हे सगळे मिशन वर कधी  जाणार ही बातमी त्या पत्रकाराला समजली तर या मिशन च्या आधी काही संकट तर येणार नाही ना? पाहूया पुढच्या भागात... 

🎭 Series Post

View all