समुद्री मिशन (भाग -३)

Finding the mystery of deep sea and islands.

समुद्री मिशन (भाग -३)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
जशी निधी आणि रुचिरा बाहेर आल्या तसे सगळे पत्रकार एकदम पुढे सरसावले... 

"मॅडम! यावेळी तुम्ही पत्रकार परिषद घेतली नाहीत! काय झालं त्या मिशन वर?" एका ने विचारलं.

"तुम्हाला निधी ने सांगितलं होतं ना, हवामान बदलामुळे आम्ही इच्छित स्थळी पोहोचलो नाही... तेच मी पण सांगतेय...." रुचिरा म्हणाली. 

"नक्की? की तुम्हाला पण आधीच्या लोकांसारखे अनुभव आले म्हणून तुम्ही माहिती दडवताय? तुमचं हे पहिलं मिशन असेल जे फेल गेलं म्हणून तर तुम्ही?....." तो पत्रकार बोलत होता! 

त्याला मधेच तोडत रुचिरा म्हणाली; " एक मिनिट! सगळ्याच क्षेत्रात कुठे ना कुठे एकदा तरी अपयश येतच! त्यात लपवण्यासारखं काय आहे? आणि तुम्ही कोणत्या अनुभवाबद्दल बोलता आहात हे मला चांगलच कळतंय! पण, जर आम्हाला सुद्धा तसा अनुभव आला असता तर ते रहस्य सोडवून मगच आम्ही परतलो नसतो का? या मिशन साठी आम्ही किती तयारी, अभ्यास करत होतो हे विचारा एकदा या सगळ्यांना! पत्रकार आहात म्हणून मान राखला.... प्लीज आता या... आम्हाला आमचं काम करू दे..." 

सगळे पत्रकार कुजबुजत बाहेर पडले. इथे सगळे पुन्हा त्यांच्या रोजच्या कामाला लागले. 

"हॅलो! काही नीट उत्तरं मिळाली नाहीत... सॉरी, पण मला वाटतंय तो संकेत आणि रुचिरा तिथवर पोहोचलेच नाहीयेत!" त्या पत्रकाराने कोणाला तरी फोन करून सांगितलं. 

"नाही! हे अशक्य आहे.... ते दोघं तिथे गेले होते.... कदाचित पुन्हा जातील... तुम्ही नीट लक्ष ठेवा आणि सगळे अपडेट्स मला द्या! एकदा ते निघुदे त्या मिशन वर मग पुढे बघू काय करायचं ते...." समोरची व्यक्ती म्हणाली.

"ओके... पण, जरा खिसा गरम करायचं तेवढं बघा की..." पत्रकार म्हणाला.

"अकाउंट चेक करा! तुमचा खिसा आधीच गरम करून झालाय..." ती व्यक्ती म्हणाली. 

"ओके... थँक्यू! तुमचं काम होऊन जाईल... पुन्हा ते दोघं कधी तिथे जाणार आहेत, काय तयारी करणार आहेत सगळं तुम्हाला सांगतो.." पत्रकार म्हणाला. आणि फोन ठेवला. 
*************************
संकेत आता आधी या मिशन वर गेलेल्या गिरीश शी बोलायला त्याच्या घरी गेला... 

"टिंग टाँग!" त्याने बेल वाजवली. 

एक मिनिट भरात दार उघडलं गेलं! गिरीश कडे काम करणाऱ्या त्याच्या नोकराने दार उघडलं.

"कोण तुम्ही?" त्या व्यक्तीने विचारलं. 

"गिरीश सर आहेत का? मला त्यांच्याकडे काम होतं." संकेत म्हणाला. 

"हो आहेत! त्यांना काय सांगू? कोण आलंय?" त्याने विचारलं. 

"संकेत! मला खूप महत्वाचं काम आहे म्हणून सांगा... मी काय काम आहे त्यांनाच सांगेन.." संकेत म्हणाला. 

"बरं... बरं... या आत या... मी साहेबांना बोलवतो..." तो म्हणाला. 

संकेत आत गेला! सगळ्या घरात समुद्राचे फोटो, प्रमाणपत्र, मेडल्स, समुद्री जीवांचे फोटो असं खूप काही होतं! ते सगळं बघतच संकेत उभा होता.. एवढ्यात गिरीश बाहेर आला. 

"नमस्कार! मी संकेत... तुमच्या सारखाच मी सुद्धा अर्किओलोजिस्ट आहे! तुमची मदत मला हवी होती..." संकेत ने त्याची ओळख करून दिली. 

"ओके... ये आपण माझ्या स्टडी रूम मध्ये बसून बोलू... विठू! जा तू चहा पाण्याचं बघ..." गिरीश म्हणाला. 

ते दोघं स्टडी रुम मध्ये गेले... तिथे सुद्धा बरेच समुद्री नकाशे, जहाजांच्या लहान लहान  प्रतिकृती असं बरच काही होतं! ते बघत बघत च संकेत तिथल्या खुर्चीवर बसला. 

"बोल... मी काय मदत करू शकतो तुझी?" गिरीश ने विचारलं.

"सर, मला समुद्राच्या मध्य भागापासून साधारण ४० ते ५० मिनिटं पुढे उत्तर च्या दिशेने गेल्यावर जे बेट आहे त्याबद्दल माहिती हवी होती." संकेत म्हणाला. 

"हम्म आलं माझ्या लक्षात तुला कसली माहिती हवी आहे... साधारण पाच वर्षांपूर्वी मी तिथे गेलो होतो... खूप वर्षांपासून लोकांची समजूत होती तिथे प्रचंड संपत्ती आहे, तिथले बेट जादुई आहे आणि एक अक्राळ विक्राळ जीव त्या सगळ्याची रक्षा करतो... म्हणून मी तिथे जाऊन हे सगळं नक्की काय आहे याचा छडा लावायचा ठरवलं! या आधी तिथे कोणी गेलं नव्हतं! मी आणि माझ्या सोबत निशांत म्हणून होते... आम्ही दोघं तिथे गेलो खरं पण, जास्त काही हाती लागलं नाही..." गिरीश बोलता बोलता त्याच्या सगळे रेकॉर्ड ठेवलेल्या कपाटा जवळ गेला. 

"मग? तुम्हाला तिथे तसेच सगळे अनुभव आले का? म्हणजे तुम्हाला सुद्धा या सगळ्या दंत कथा खऱ्या वाटतायत का?" संकेत ने विचारलं. 

"नाही! मला इतर लोक जसा तो जीव आहे असं सांगत होते तसं काही तिथे दिसलं नाही.... त्या बेटावर आम्ही पोहोचलो तेव्हा काहीतरी विचित्र घडतंय असं सारखं वाटत होतं! सारखी झोप यायला लागली होती, काही विचित्र आकार, सावल्या दिसत होते नंतर आम्ही दोघं बेशुद्ध झालो.... जेव्हा शुद्ध आली तेव्हा समुद्र किनाऱ्यावर होतो! काही लोकांनी आम्हाला बाहेर काढलं होतं... त्यांच्या सांगण्यावरून त्यांना आम्ही समुद्राच्या मध्य भागी बोटीत निपचित पडलेलो दिसलो होतो म्हणून ते आम्हाला किनाऱ्यावर घेऊन आले." गिरीश कसल्या तरी फाईल काढत म्हणाला. 

"ओके.... मी आणि माझी मैत्रीण रुचिरा आम्ही सुद्धा काही दिवस आधी तिथे जाऊन आलो आहोत! आम्हाला तो जीव दिसला होता... बेट असं नीट आठवत नाहीये पण, त्या बेटावर धडकून आम्ही बेशुध्द झालो होतो... त्यांनतर पुन्हा बोटीत कसे आलो हे काही आठवत नाही." संकेत म्हणाला. 

"अच्छा.... हे बघ मी आणि निशांत ने तिथे झोपेत सुद्धा काही फोटो काढले आहेत... याचा तुला काही उपयोग झाला तर बघ..." गिरीश ती फाईल संकेत ला देत म्हणाला. 

संकेत ने ती फाईल घेतली आणि बघू लागला.... एवढ्यात विठू त्या दोघांना चहा घेऊन आला... तिथे चहा ठेवला आणि तो पुन्हा त्याच्या कामाला गेला. 

"सर, तुम्हाला काय वाटतंय इथे जर मानवी वस्ती असेल तर ते असे लपून का राहतात? कारण, तुम्ही मगाशी म्हणालात जेव्हा तुम्हाला शुद्ध आली तेव्हा तुम्ही किनाऱ्यावर होता आणि त्या किनाऱ्यावर असणाऱ्या लोकांना तुम्ही बोटीत सापडला होतात... कोणी ठेवलं असेल बोटीत तुम्हाला?" संकेत ने विचारलं. 

"तेच तर अजून समजत नाहीये.... नंतर आम्ही पुन्हा या मिशन वर जाण्यासाठी विचार करत होतो पण, निशांत ला अचानक काहीतरी त्रास सुरू झाला... सतत कसले भास होऊ लागले आणि त्या विचाराने त्याची स्थिती बिघडत गेली...." गिरीश ने सांगितलं. 

"तुम्हाला माहिती आहे का नक्की कसले भास होत होते? कारण मला सुद्धा तसं काहीतरी जाणवतं! दरवेळी मी बघितलं आहे दुपारी आणि रात्री १:३७ ला तेच बेट दिसतं! समोर नसणारी कोणी व्यक्ती दिसते असं वाटत असतं की आता आपला जीव जातो की काय..." संकेत ने सगळं स्पष्ट सांगितलं. 

"अशी ठराविक वेळ असं नाही.... पण, त्याला सतत तेच बेट दिसत होतं! तिथे कोणीतरी बोलवून घेतय असं वाटायचं त्याला.... म्हणून एका मानसोपचार तज्ञाला दाखवलं होतं! त्यांच्या मते सतत एकच विचार केल्याने, काही गोष्टी नीट न समजल्याने निशांत ने खूप विचार केला होता त्यामुळे त्याचा मेंदू जे नाहीये ते इमॅजिन करत होता! कालांतराने त्याला ड्युअल पर्सनॅलिटी चा सुद्धा त्रास सुरू झाला आणि आता काही महिन्यांपूर्वी च त्याचा देहांत झाला आहे." गिरीश ने सांगितलं. 

"अच्छा... मी ही फाईल माझ्यासोबत घेऊन गेलो तर चालेल का? मला आणि रुचिरा ला सतत असं वाटतंय तिथे असं काहीही नाहीये... नक्की काहीतरी वेगळं घडतंय तिथे! लोकांना त्या जागेपासून लांब ठेवण्याचे हे प्रयत्न आहेत असं वाटतंय... म्हणून आम्ही तिथे पुन्हा जाण्याचा विचार करतोय... तुमची हरकत नसेल तर तुम्ही सुद्धा येणार का आमच्या सोबत?" संकेत ने विचारलं. 

"हो चालेल! मला सुद्धा पुन्हा तिथे जाऊन पाहणी करायची होतीच पण, निशांत च हे असं झालं आणि माझ्या सगळ्या आशा मावळ्या! आता तुम्हा दोघांच्या सोबत हे अर्ध राहिलेलं मिशन नक्की पूर्ण करेन..." गिरीश म्हणाला. 

"ओके सर! मी तुम्हाला पुढचे अपडेट्स देतच राहीन... फक्त याबद्दल कोणाला कळू देऊ नका... आपण माझ्या घरी भेटत जाऊ... मी रुचिरा ला आज या सगळ्या बद्दल सांगणार आहे त्या नंतर आपण सगळ्या तयारीनिशी तिकडे जाऊ...." संकेत त्याला म्हणाला. 

नंतर त्याने त्याचा मोबाईल नंबर आणि पत्ता गिरीश ला दिला... गिरीश चा सुद्धा मोबाईल नंबर घेतला आणि ती फोटो असलेली फाईल घेऊन तो घरी जायला निघाला. संध्याकाळ चे चार वाजून गेले होते... एवढ्या दिवसा नंतर कुठे त्याचा निस्तेज झालेला चेहरा खुलला होता. थोड्याच वेळात तो घरी पोहोचला. रुचिरा येणार म्हणून कॉफी ची तयारी केली आणि गिरीश कडून आणलेल्या फाईल चा अभ्यास करत बसला. साधारण ५:१५ वाजता रुचिरा आली. 

"ये! मी तुझीच वाट बघत होतो. बस मी लगेच आपल्याला कॉफी आणतो... कॉफी पिता पिता बोलूया...." तो म्हणाला. 

रुचिरा तिथेच बसली... संकेत ने आणलेली फाईल आणि त्यातले फोटो तिथेच होते... रुचिरा ने एक एक फोटो घेऊन बघायला सुरुवात केली. घनदाट झाडी असलेलं ते बेट, दूरदूर मानवी वस्ती चा काही मागमूस सुद्धा नाही. एरवी कधी पाहण्यात नसलेली झाडं, फुलं असं खूप काही त्या फोटोत होतं! एवढ्यात संकेत दोघांना गरमा गरम कॉफी घेऊन आला... 

"मी आज गिरीश सरांना जाऊन भेटलो! त्यांच्याकडूनच हे फोटो मिळाले आहेत... त्या बेटावर जाणारे ते पहिले होते... आणि एक आनंदाची बातमी म्हणजे ते आपल्या सोबत येणार आहेत तिथे..." संकेत म्हणाला. 

"चला... काहीतरी चांगलं घडलं!" रुचिरा स्मित करत म्हणाली. 

"हो! उद्या पासून तू सुद्धा कामावर नको जाऊ... निधीला सगळी जबाबदारी दे... आपण इथेच रोज भेटणार आहोत! काय तयारी करायची, आपल्या नजरेतून काय सुटलं आहे हे सगळं आपण बघून पूर्ण तयारीनिशी यावेळी तिथे जायचं!" संकेत म्हणाला. 

"हो ते करू आपण... पण, तू मला काय सांगणार होतास ते तर सांग आधी! आणि गिरीश सरांकडून तुला त्या अक्राळ विक्राळ जीवाविषयी काही समजलं का?" तिने विचारलं. 

"नाही! त्यांना असा कोणताही जीव दिसला नव्हता. त्यांनी जेव्हा मला हे सांगितलं तेव्हाच मला संशय आला, नक्कीच या अफवेचा कोणीतरी फायदा घेत असणार!" संकेत म्हणाला. 

"पण, आपण तर बघितला तो जीव.... त्याचं काय?" रुचिरा म्हणाली. 

"हो गं! आपण बघितलं... पण, आजच्या काळात हे असं घडवणं किती सोपं आहे... तंत्रज्ञान किती विकसित झालं आहे... नक्कीच हा त्याचाच काहीतरी भाग आहे..." संकेत म्हणाला. 

"हम्म! असेल... बरं तू सकाळी मला काय विचारत होतास भास, स्वप्न काहीतरी.... तुला काही भास होतायत का? खरं सांग हा..." तिने विचारलं. 

क्रमशः..... 
*************************
तो पत्रकार कोणाला मिळालेला असेल? संकेत आणि रुचिरा पुन्हा त्या मिशन वर जाणार यात कोणाला आणि काय फायदा आहे? गिरीश ची या दोघांना आता कशी मदत होईल? तिथे जे काही रहस्य आहे ते हे दोघं सोडवू शकतील का? पाहूया पुढच्या भागात... 

🎭 Series Post

View all