समुद्री मिशन (भाग -२)

Finding the mystery of deep sea and islands.

समुद्री मिशन (भाग -२)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
संकेत त्या व्यक्तीच्या मागे जाऊन सुद्धा काही उपयोग झाला नाही. तो माणूस असा का बोलला असेल, त्याला ती जागा शापित का वाटत असेल, आता कोणाला या बद्दल विचारू? असा विचार करत तो तिथे उभा होता. एवढ्यात मागून कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला! त्याने दचकून एकदम मागे वळून पाहिलं! 

"तुम्ही??" संकेत ने त्या माणसाला न ओळखल्याने विचारलं.

"ते जाऊद्या! मी तुम्हाला हवी असलेली माहिती देऊ शकतो..." तो म्हणाला. 

"कोणती माहिती? कोण आहात तुम्ही?" संकेत ने पुन्हा विचारलं.

"मला त्या समुद्राच्या खास जागेची, तिथल्या बेटाची सगळी माहिती आहे..." तो म्हणाला. आणि हातानेच त्याच्या मागे येण्यासाठी इशारा केला. 

त्या व्यक्तीने स्वतः हा विषय काढल्यावर संकेत चे कान टवकारले गेले.... हा माणूस कोण, त्याला कसं समजलं आपण कोणत्या विषयावर बोलत होतो हा विचार करण्यासाठी त्याला जराही वेळ मिळाला नाही... तो हा कसलाच विचार न करता त्याच्या मागे चालू लागला. चालता चालता त्याचा पाय दगडाला लागला आणि त्याला ठेच लागली! अचानक झोपेतून जाग यावी तसा तो त्याच्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर आला. 

"हे... हे... मी कुठे आलोय? तो माणूस? तो कुठे गेला?" तो स्वतःशीच पुटपुटला.

समुद्र किनाऱ्यापासून थोडं दूर ओसाड जागेत तो उभा होता... आपण इथे कसे आलो? असा अचानक कुठे गायब झाला तो? याचा विचार करत तो आजूबाजूला कोणी दिसतंय का पाहत होता. त्या ओसाड जागी काही बंद पडलेली मासे साठवण्याची गोडाऊन आणि कचरा याशिवाय काहीही नव्हतं! सगळी कडे पाहत पाहत तो पुन्हा जिथे त्याला तो माणूस भेटला होता त्या ठिकाणी आला. तिथे असणारे काही लोक अगदी विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहत होते... त्याने घड्याळ पहिलं! दुपारचे १:३७ झाले होते! त्याच्या सोबत हे काय घडतंय हे त्याला काहीही समजत नव्हतं! कोणाला आणि काय विचारावं, काय सांगावं असा सगळा गोंधळ त्याच्या मनात सुरू होता. डोकं आता गरगरायला लागलं होतं! काही क्षणात तो तिथेच कोसळला! 

"ते पोरगं पडलं! अरे उचला उचला..." असे काहीसे उद्गार त्याने ऐकले आणि नंतर तो बेशुद्ध अवस्थेतच गेला. 

थोड्याच वेळात त्याला शुद्ध आली! एका लहानशा कौलारू घरात त्याला खाटेवर झोपवलेलं होतं! 

"मी कुठे आहे? काय झालं होतं मला?" त्याने गोंधळून उठून बसत विचारलं. 

"मी मंग्या! तू तिथं किनाऱ्यावर अचानक चक्कर येऊन पडलास म्हणून माझ्या घरी आणलं तुला! काय झालं होतं पोरा? दिसताना तर चांगल्या घरातला दिसतोस... कोणाशी बोलत होतास तू तिथं?" त्या माणसाने संकेत ला आधार देत बसवत विचारलं. 

"मी संकेत! तो माणूस कोण होता मला नाही माहित... पण, मला जी माहिती हवी होती ती तो देणार होता म्हणून मी त्याच्या मागे जात होतो... नंतर तो कुठे गायब झाला, मला कुठे घेऊन जात होता काही आठवत नाहीये..." संकेत ने सांगितलं. 

"लते जा पोराला लिंबू सरबत घेऊन ये... उन्हानं चक्कर आली असल..." मंग्या त्याच्या बायकोला म्हणाला. 

ती आत गेल्याची खात्री करून मंग्या ने पुन्हा संकेतशी बोलायला सुरुवात केली. 

"पोरा! मला मी तुला घाबरवत नाहीये पण, आम्ही तुला त्या गणप्याच्या मागे धावताना पाहिलं होतं! त्या नंतर तू म्हणतोय कोणीतरी माणूस तुझ्याशी बोलत होता पण, आम्हाला तर कोणी नाही दिसलं तिथे! तू एकटाच काहीतरी बडबडत होतास आणि अचानक एकटाच कुठेतरी चालत जायला लागला होतास... कोण दिसत होतं तुला?" मंग्या ने विचारलं. 

"काय? हे कसं शक्य आहे? आहो तो माणूस तुम्हाला खरचं नाही दिसला का? चांगला पाच साडेपाच फूट उंचीचा होता! ते सगळे बंद पडलेले गोडाऊन आहेत तिथे आम्ही गेलो आणि अचानक तो कुठे गेला काही कळतच नाहीये...." संकेत एकदम त्रस्त होऊन म्हणाला. 

"शांत हो... अगं लते किती वेळ.... आण की लवकर सरबत... पोराला त्रास होतोय..." मंग्याने संकेत ला शांत केलं. 

"झालंच..." असं म्हणत लता सरबत घेऊन आली. 

संकेत ने सरबत पिलं आणि त्यांचे आभार मानले. 

"आता बरं वाटतंय का?" लता ने विचारलं. 

"हो आता बरं आहे... थँक्यू तुम्ही माझी काळजी घेतलीत... मी निघतो आता!" संकेत म्हणाला. 

"मी जरा याला सोडून येतो..." मंग्या म्हणाला. 

ते दोघं बाहेर पडले आणि संकेतच्या बाईक जवळ आले... 

"बोल आता! तू त्या गणप्या च्या मागे का धावत होतास?" मंग्या ने विचारलं. 

"मी त्यांना समुद्राच्या मध्यानंतर साधारण ४० ते ५० मिनिटं पुढे कधी गेला आहात का? असं विचारलं होतं! ते ऐकून त्यांनी विषय च टाळला आणि पळून गेले... तुम्हाला काही माहिती आहे का त्या बद्दल?" संकेत ने विचारलं. 

"हो! बिचाऱ्या गणप्याला फार वाईट अनुभव आला होता! कसाबसा तो मरणाच्या दारातून परत आला आहे... तेव्हा पासून आम्ही तिथं जायचं सोडलं." मंग्या म्हणाला. 

आता संकेत ला एक आशेचा किरण दिसत होता... नक्की काहीतरी माहिती हाती लागणार म्हणून त्याला बरं वाटत होतं. 

"म्हणजे? नक्की काय घडलं होतं? तुम्हाला जर माहीत असेल तर मला सांगा ना!" संकेत म्हणाला. 

"हो... माहितेय मला... पण, तुला या गोष्टीत का रस आहे? अरे ती जागा शापित आहे असं म्हणतात... सामान्य आकारापेक्षा खूपच प्रचंड आकाराचे मासे जणू राक्षस आहे की काय असं वाटतं! कधी दिसणारे तर कधी अचानक गायब होणारे बेट असे बरेच प्रकार तिथे घडतात..." मंग्या सांगत होता. 

"म्हणजे त्या गणप्या दादांना हे सगळं दिसलं आहे का?" संकेत ने विचारलं. 

"ती रात्र तर बिचाऱ्यासाठी काळ रात्र च ठरली! पावसाच्या आधीचे काही दिवस होते.... आम्ही सगळे मिळून समुद्राच्या मध्यापर्यंत गेलो होतो... छान शांत होता समुद्र! गणप्याने अजून थोडं पुढे जाऊन मच्छी पकडू असं सांगितलं. आमच्या सगळ्यांच्या मिळून सहा सात बोटी  होत्या! आम्ही साधारण अर्ध्यातासाचा प्रवास करून पुढे गेलो! एवढा वेळ शांत असलेला समुद्र आता खवळला होता! जोरजोरात वारे वाहत होते आणि आता लवकरच खूप मोठं वादळ येतं की काय असं वाटू लागलं होतं! सगळ्यांनी गणप्याला पुन्हा किनाऱ्यावर जाऊ म्हणून सांगितलं पण, त्याने ऐकलं नाही... त्याने आम्हाला सगळ्यांना तुम्ही जा परत मी येणार नाही असच सांगितलं! त्याला खूप समजावलं आणि वातावरण खूप बिघडत चाललेलं पाहून आम्ही मागे आलो! आम्ही पुन्हा माघारी वळतोय हे पाहून तो आमच्या सोबत येईल असं वाटलं होतं आम्हाला! पण, तो मात्र पुढे गेला! आम्हाला परत येता येता सकाळ झाली होती.... बराच वेळ आम्ही त्याची किनाऱ्यावर वाट बघितली पण तो आला नाही... म्हणून, पुन्हा समुद्रात जायचं ठरलं! आम्ही सगळे आमच्या नेहमीच्या ठिकाणापर्यंत पोहोचलो तेव्हा गणप्याची बोट लाटेवर हेलकावे खाताना आम्हाला दिसली! आम्हाला सगळ्यांना काळजी वाटू लागली... तिथे जाऊन बघितलं तेव्हा तो आणि त्याचा साथीदार बोटीत बेशुद्ध होते! त्यांना सुखरूप किनाऱ्यावर आणल्यावर औषधोपचार झाले! इथल्या गावच्या इस्पितळात दोन दिवस त्यांना ठेवलं होतं!" मंग्या म्हणाला. 

"मग? त्यांनी काही सांगितलं का? ते असे बेशुद्ध कसे झाले होते?" संकेत ने विचारलं. 

"डॉक्टरांनी त्यांना विचारलं होतं! तेव्हा अचानक धुकं आलं आणि कोणत्यातरी अतिविशाल सापासारख्या दिसणाऱ्या, शार्क सारख्या मजबूत बॉडी असणाऱ्या जीवाने त्यांच्या बोटीवर हल्ला केला असं ते दोघं सांगत होते!" मंग्या म्हणाला. 

"असा कोणताही जीव अस्तित्वात नाहीये... आणि जरी असेल तरी बोटीवर हल्ला केल्यावर ते दोघं समुद्रात पडायला हवे होते, त्यांची बोट बुडायला हवी होती! असं तर काहीच झालं नाही ना?" संकेत म्हणाला. 

"हम्म... बरोबर आहे तुझं! पण, त्या दोघांचं नशीब बलवत्तर होतं! त्यानंतर ते दोघं पुन्हा बोटीत कसे आले, हे त्यांना सुद्धा आठवत नव्हतं! हा फक्त बेशुद्ध व्हायच्या आधी त्यांनी एक बेट बघितलं होतं जे त्या आधी तिथे कधी कोणी बघितलं नाहीये... ही घटना झाल्यापासून एवढं पुढे कोणी जात नाही... काही लोकांच्या मते तिथे खूप जुन्या काळापासून संपत्ती दबलेली आहे आणि त्याचं रक्षण करायची जबाबदारी त्या जीवावर आहे! तर काही जण त्याला शापित म्हणतात.... आता खरं खोटं तो देवच जाणे..." मंग्या म्हणाला.

"ओके... थँक्यू तुम्ही माझी मदत केलीत आणि मला एवढी माहिती सुद्धा सांगितली.... आता मी निघतो..." संकेत म्हणाला. 

"बरं! सांभाळून जा..." मंग्या म्हणाला. 

संकेत ने बाईक स्टार्ट केली आणि त्याने जी माहिती काढली होती त्या व्यक्तींना भेटायला म्हणून तो गेला. 
**************************
इथे ऑफिस मध्ये रुचिरा सुद्धा आता संकेत ने सांगितलेल्या गोष्टीचा विचार करत होती. तिथे दिसलेलं ते बेट, तो मोठा अक्राळ विक्राळ जीव, अचानक येणारं धुकं, क्षणात बदलणारं वातावरण हे नक्की काय असेल? त्यात संकेत सकाळी अचानक स्वप्न, भास असं काहीतरी बोलत होता! त्याला काही भास होत असतील का? मग मला का नाही तसं काही जाणवत? या विचारांच्या तंद्रीत ती बसली होती. एवढ्यात तिचा फोन वाजला आणि तिची तंद्री तुटली! 

"हॅलो! हा बोल संकेत..." ती म्हणाली. 

"अगं मी आत्ता एका गावात आलो होतो तिथून बरीच माहिती मिळाली आहे... आणि तुला सकाळी सांगितलं होतं ना काही माहिती काढायला मी जाणार आहे तिथे आता जातोय... संध्याकाळी पाच पर्यंत घरी ये... तुला अजुन काहीतरी सांगायचं आहे..." तो म्हणाला. 

"ओके... काळजी घे..." रुचिरा म्हणाली.

फोन झाल्यावर आता तिला जरा बरं वाटत होतं! संकेत एवढी माहिती काढतोय तर निदान तिथे ज्या विचित्र घटना घडल्या त्या तरी नीट लिहून घेऊ म्हणजे मुद्देसूद बोलता येईल असा विचार करून तिने डायरी आणि पेन घेतलं! 

१. अचानक आलेलं धुकं
२. वातावरणात झालेला बदल
३. तो अक्राळ विक्राळ जीव
४. अचानक दिसलेलं बेट 

असे सगळे मुद्दे तिने लिहिले... "नंतर? नंतर काय झालं होतं? मला काहीच आठवत का नाहीये... आम्ही पुन्हा बोटीत कसे आलो होतो? शी.... काहीच आठवत नाहीये... बरेच दिवस तर यातून सावरण्यात गेले होते... आता संकेत म्हणतोय तसं पुन्हा तिथे गेलंच पाहिजे!" असं ती स्वतःशीच मनात बोलत होती. 

"मे आय कम इन मॅडम?" निधी ने तिच्या केबिन वर नॉक करून विचारलं. 

रुचिरा ने पटकन ती डायरी पर्स मध्ये टाकली आणि तिला आत बोलावलं. 

"मॅडम! बाहेर मीडिया वाले आले आहेत! आपल्या त्या समुद्री मिशन बद्दल त्यांना माहिती हवी आहे..." निधी म्हणाली. 

"तू त्यांना सांगितलं नाहीस का? आम्ही तिथवर पोहोचलो नाही ते?" रुचिरा ने विचारलं. 

"सांगितलं! पण, ते ऐकायला तयार नाहीत... त्यांना तुमच्याशी किंवा संकेत सरांशीच बोलायचं आहे." निधी म्हणाली. 

"बरं चल..." रुचिरा म्हणाली आणि निधी सोबत गेली. 

क्रमशः.... 
**************************
जो माणूस फक्त संकेत ला दिसत होता तो कोण असेल? तो बाकी कोणाला का दिसला नसेल? आता पत्रकार रुचिरा ला काय काय विचारतील? ते दोघं पुन्हा कधी जातील या मिशन वर? पाहूया पुढच्या भागात... 

🎭 Series Post

View all