समुद्री मिशन (भाग -१)

Finding the mystery of deep sea and islands

समुद्री मिशन (भाग -१)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
"नाही...." संकेत एकदम ओरडला.... कपाळावरचा घाम पुसत तो बेड वर उठून बसला.... खोलीत एसी चालू असून सुध्दा तो पूर्णपणे घामाने भिजला होता.... भीतीने हात थरथरत होते.... दोन मिनिटं तसाच डोक्याला धरून तो बसला होता.... पूर्ण डोकं हलत होतं... आज जवळ जवळ पाचव्यांदा तेच त्याने पाहिलं! मागच्या एक दोन आठवड्यां पासून धड झोप मिळत नव्हती... कसाबसा तो भिंतीचा आधार घेत जागेवरून उठला आणि बाहेरच्या खोलीत येऊन दीड ग्लास पाणी पोटात ढकललं.... घड्याळ बघितलं तर तीच वेळ! बरोबर रात्रीचे १:३७! काय करावं हे त्याला सुचेना.... त्याच्या मनाने आता झोपेचा धसका च घेतला होता. तिथल्याच खुर्चीवर बसून कशी बशी रात्र ढकलली.... पहाटे चार च्या सुमारास त्याचा डोळा लागला. जाग आली ती सकाळी ६:३० वाजता दूध वाल्या दादांनी दार वाजवलं तेव्हाच! संकेत ने दार उघडलं... दूध घेतलं आणि आत जाऊन दूध तापत ठेवून फ्रेश व्हायला गेला! तोंडावर दोन तीन थंड पाण्याचे हबके मारले आणि दात घासून कॉफी केली! कॉफी पिता पिता सुद्धा सतत त्याच्या डोक्यात रात्रीचाच विचार घोळत होता. 
             संकेत! पुरातत्व विभागात काम करणारा एक ध्येय वेडा मुलगा! सतत कुठे ना कुठे जायचे आणि पुरातन काळातल्या गोष्टी शोधून काढायच्या या ध्येयाने त्याला झपाटलं होतं! ज्या ठिकाणी इतर लोक जायला घाबरायचे तिथे हा सगळ्यात आधी जायला तयार असायचा. जराही न डगमगता, न घाबरता त्याने बरीच रहस्य सोडवली होती.... शहरात त्याचं नाव होऊ लागलं होतं! अनेक रहस्यमय जागा, शापित वस्तू यांची सत्यता त्याने आणि त्याची खूप घनिष्ट मैत्रीण रुचिरा ने मिळून जगासमोर आणली होती! ते रहस्य कुठेही असो, अगदी डोंगराच्या माथ्यावर किंवा खोल समुद्रात! ही दोघं तिथे जायला एका पायावर तयार! पण, या वेळी काहीतरी वेगळं च घडलं! त्याला विश्वास बसत नव्हता असं काही घडू शकेल याचा! त्याच त्याच विचाराने त्याच्या डोक्याचा भुगा होत होता... कोणाशी आणि काय बोलावं हे त्याला कळतच नव्हतं! त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार तरी कोण हा प्रश्न त्याला पडला होता.... या मिशन वर आधी जे लोक गेले होते त्यांच्या बद्दल काही माहिती मिळाली तर बघू का? असं काहीसं स्वतः च्या मनाशीच त्याचं द्वंद्व सुरू होतं! त्याने त्याचा लॅपटॉप ओपन करून त्यावरून काहीतरी माहिती शोधायला सुरुवात केली! जी माहिती नावं महत्वाची वाटली ती सेव्ह करून तो ठेवत होता... एवढ्यात दारावरची बेल वाजली... संकेत ने जाऊन दार उघडलं आणि तो पुन्हा खुर्चीवर येऊन बसला.

"अरे काय हे? एरवी किती उत्साहात असतोस कुठे जाऊन आल्यावर! आता काय झालंय? आपण त्या समुद्राच्या मिशन वर काय गेलो तू तर पूर्ण बदलला आहेस!" रुचिरा त्याचा निस्तेज झालेला चेहरा पाहून म्हणाली.

"असं काही नाही... थोडा दमलोय! तू कशी आलीस अशी अचानक?" संकेत ने टाळाटाळ करत विषय बदलला.

"तू काही आजकाल नीट आधी सारखा कामावर येत नाहीये म्हणून म्हणलं बघून येऊ! पण, तू विषय न बदलता खरं सांग ना काय झालंय? मी तुला चांगलं ओळखते आपण किती ठिकाणी जाऊन रहस्य सोडवली आहेत! आधी तू असा विचित्र वागला नव्हतास! आत्ताच काय झालंय? तू आपण तिथे जे पाहिलं आहे त्याचा विचार करतोयस का? बघ माझ्यापासून काही लपवून ठेवू नकोस...." रुचिरा त्याला धीर देत त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली. 

"हो! पण ते अजून एक.... नाही नको... तू काही विश्वास नाही ठेवणार! जाऊदे... तू मला फक्त थोडा वेळ दे प्लीज! मी योग्य वेळ आली की तुला नक्की सांगतो..." संकेत म्हणाला. 

"ओके... मी काही तुला आग्रह नाही करणार! राहता राहिला प्रश्न विश्वास ठेवण्याचा तर, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे! आपण अगदी कॉलेज पासून चे बेस्ट फ्रेंड्स आहोत! मला माहितेय तुला ज्या गोष्टीचा त्रास होतोय त्या बद्दल तू स्वतः आधी धडपड करून मार्ग काढणार आणि अगदीच माझी गरज लागली तरच मला सांगणार! पण, मी एक सांगू? असा एकटाच नको त्रास करून घेऊ! बोल काहीतरी... काही प्रॉब्लेम असेल तर आपण मिळून त्यावर उपाय काढू,!" रुचिरा त्याला समजावत म्हणाली.

"हम्! सांगेन मी तुला... पण, आत्ता नाही... मला आधी खात्री करून घेऊ दे मग बोलू आपण...." संकेत म्हणाला.

"ओके बॉस! चल आता निदान कामाला तरी जाऊ... तुझं मन पण जरा दुसरीकडे लागेल तर बरं वाटेल." रुचिरा म्हणाली. 

"ऐक ना! खरचं मी आता ठीक आहे.... जरा दोन दिवस नाही येत मी कामाला. प्लीज तू सगळं हँडल कर ना! मी जरा दुसऱ्या कामासाठी बाहेर जायचा विचार करतोय... लवकर झालं ते काम तर येईन मी उद्या कामाला आणि तेव्हाच तुला पण सगळं सांगेन.... तसंही या सगळ्या प्रकरणात मला तुझी मदत लागणारच आहे." संकेत म्हणाला.

"ओके.... चल मग मी निघते... काही वाटलं तर फोन कर..." रुचिरा म्हणाली.

"हो... बरं! एक विचारायचं राहिलं, आपण ' त्या ' मिशन वर जाऊन आल्यापासून तुला काही गोष्टी विचित्र वैगरे वाटल्या आहेत का?" संकेत ने विचारलं.

"म्हणजे?" रुचिरा ने गोंधळून विचारलं.

"अगं म्हणजे, सतत एकच स्वप्न पडणे किंवा कसले भास असं काही?" संकेत म्हणाला.

"आपण ज्या रात्री परतलो होतो तेव्हा सतत ते एक बेट दिसत होतं! दोन दिवस दिसलं तसचं काहीसं... पण, नंतर काही नाही झालं... मला वाटलं सतत आपण त्या बद्दल च बोलत होतो, तिथेच गेलो होतो म्हणून हे असं झालं!" रुचिरा म्हणाली.

"ठीक आहे! मी सांगतो तुला नंतर सगळं... तू काळजी घे आणि आपण अजून एकदा पुन्हा तिथे जाऊ कदाचित पण, या बद्दल कोणालाही कळू देऊ नकोस.... शिवाय आपण तिथे काय पाहिलं याबद्दल सुद्धा बोलू नकोस..." संकेत म्हणाला.

"ओके... नाही सांगणार कोणाला. तू आज तुला जी काही माहिती काढायची आहे ती काढून ठेव... मी रात्री येते मग बोलू...." रुचिरा म्हणाली.

"ओके... पण, कोणाला सांगू नकोस या बद्दल आणि मीडिया ला तर अजिबात कळू देऊ नकोस.... मीडिया वाले आले तर सांग आम्ही आमच्या इच्छित स्थळी पोहोचलो नाही वातावरण खराब झाल्यामुळे माघारी यावं लागलं...." संकेत म्हणाला.

"हो! हो! आपण तिथे जे पाहिलं आहे त्यामुळे च तू अस्वस्थ असशील असं मला वाटलंच  होतं! फक्त तुझ्या तोंडून ऐकायचं होतं! असो... तू नको त्रास करून घेऊ आपण दोघं मिळून ते रहस्य सोडवू.." रुचिरा म्हणाली.

संकेत ने एक स्मित केलं आणि रुचिरा त्याला बाय करून कामाला गेली. त्या दोघांनी कॉलेज पासून च मेहनत करून स्वतःचे पुरातत्व डिपार्टमेंट सुरू केले होते... या दोघांच्या हाताखाली मोजकी माणसं कामाला होती... सगळ्या पुरातन जागांना भेट द्यायची, वस्तू, वास्तू यांचा अभ्यास करायचा आणि सगळी माहिती सरकार ला द्यायची हे त्यांचं काम! यावेळी समुद्राच्या मिशन वर जाण्यासाठी बऱ्याच प्रक्रिया करून, अभ्यास करून दोघं गेले होते.... समुद्राच्या पोटात दडलेली रहस्य आणि बेटांचा अभ्यास करण्यासाठी दोघं खूप आधी पासूनच प्रयत्नात होते... 
**************************
संकेत ने त्याचं बाकी आवरून घेतलं आणि जी माहिती काढली होती त्या आधारे त्याची शोध मोहीम सुरू झाली. काही नावं जी त्याने काढली होती त्या व्यक्तींना भेटून पुढची तयारी करायची असं मनाशी ठरवून तो घरातून निघाला. बाईक वर बसला आणि हेल्मेट घालून गाडी स्टार्ट केली. रस्त्याने जाता जाता सुद्धा त्याच्या डोक्यात तिथे घडलेल्या घटना डोळ्यासमोर येत होत्या! त्या नंतर पुन्हा घरी आल्यावर सतत पडणारी तीच तीच स्वप्न, तेच बेट त्याला दिसत होतं! नेमकं असं काय आहे त्या ठिकाणी? तिथे जे घडलं ते सत्य होतं की भास? लोक त्या ठिकाणा विषयी जे बोलतात ते असेल? छे छे... असं कसं शक्य आहे! जाऊदे.... स्वतः काहीतरी विचार करण्यापेक्षा आता या सगळ्याचा अनुभव त्या लोकांना सुद्धा आला आहे का बघूया... असं स्वतःशीच बोलत त्याने पुन्हा स्वतःला सावरलं. १५ ते २० मिनिटात तो समुद्र किनारी असणाऱ्या एका गावात पोहोचला. आपण ज्या व्यक्तींची माहिती काढली आहे त्यांना भेटण्याच्या आधी या गावकऱ्यांना विश्वासात घेऊन काही माहिती मिळते का असा काहीसा विचार करून तो तिथे गेला. 
***************************
इथे रुचिरा ऑफिस मध्ये पोहोचली. सगळ्यांनाच खूप उत्सुकता लागली होती या मिशन मध्ये नक्की काय हाती लागलं आणि कोणतं असं रहस्य सोडवलं असेल हे सगळ्यांना ऐकायचं होतं, पहायचं होतं! सगळ्यांच्या चेहऱ्यावर हा उत्साह ओसंडून वाहत होता. रुचिरा ने हे बरोबर हेरलं होतं! 

"मला तुम्हा सगळ्यांची उत्सुकता समजतेय... आम्ही दोघं बरेच दिवस आधीच मिशन वरून आलो आणि तरीही इथे आलो नाही! मी दोन तीन दिवस आधी पासूनच यायला सुरुवात केली पण, संकेत अजून येत नाहीये आणि आम्ही मिशन बद्दल सुद्धा काही बोललो नाही! या आधी असं कधी झालं नव्हतं! आपण मिशन झालं की लगेच चर्चा करायचो, रिपोर्ट्स काढायचो आणि सगळे ते मिशन यशस्वी झालं म्हणून आनंद करायचो! त्यामुळे तुम्हाला उत्सुकता आणि नवल वाटणं सुद्धा साहजिक आहे.... यावेळी आम्ही दोघं गेलो तेव्हा काही वातावरणातील बिघडांमुळे इच्छित स्थळी पोहोचू शकलो नाही.... आपलं हे पहिलं मिशन असेल जे अर्ध राहिलं!" रुचिरा म्हणाली. 

"मॅडम! मग आता पुन्हा जाणार का तुम्ही?" त्यांच्याच डिपार्टमेंट मध्ये काम करणाऱ्या निधी ने विचारलं.

"अजून तरी काही ठरलं नाहीये... बघू... बरं चला आपण आता आपल्या कामाला लागू... उर्मिला, अक्षय जरा माझ्या सोबत या... तुम्हाला जे काम सांगितलं होतं ते कुठवर आलं याचे सगळे डिटेल्स मला हवेत!" रुचिरा ने तो विषय टाळत रोजच्या कामाला सुरुवात केली. 
*****************************
संकेत आता गावकऱ्यांशी कुठून बोलायला सुरुवात करू याचा विचार करून तिथेच समुद्र किनारी बोटीची डागडुजी करत असणाऱ्या एका व्यक्ती जवळ गेला. 

"दादा! मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं!" संकेत त्या माणसाजवळ जाऊन म्हणाला.

"बोला की! पण, आत्ता बोट काही समुद्रात घेऊन जाणार नाही मी... जरा काम करतोय ओ... म्हणून..." तो म्हणाला.

"नाही! मला बोट नकोय.... दुसरं काम आहे..." संकेत म्हणाला. 

आता हा नक्की काय बोलतोय हे ऐकायला त्याने त्याचं काम बाजूला ठेवलं आणि प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं! हातानेच इशारा करून त्याने संकेत ला तिथे असणाऱ्या मोठ्या दगडावर बसायला सांगितलं आणि तो त्याच्या समोरच्या दगडावर बसला. 

"तुम्ही कधी समुद्राच्या मध्य भागापासून साधारण ४० ते ५० मिनिटं पुढे उत्तर च्या दिशेने गेला आहात का?" संकेत ने विचारलं. 

"शक्यतो एवढं पुढे आम्ही जात नाही बघा. तिथे काहीतरी विचित्र घटना घडतात.... आम्हाला आमची लेकरं, घर संसार आहे.... तुम्ही कशा बद्दल बोलतय आलंय माझ्या लक्षात.... जा तुम्ही इथून.... इथे तुम्हाला असा कोणताच माणूस नाही भेटणार...." तो माणूस जागेवरून उठून संकेत ला जवळ जवळ हकलण्याच्या स्वरात च म्हणाला. 

"अहो पण एकदा ऐकुन तर घ्या!..." संकेत त्याला समजावण्यासाठी म्हणाला.

"नाही! मला त्या विचित्र, शापित जागेबद्दल बोलायचं च नाहीये.... तुम्हाला पण सल्ला देतो, आज विचारलं आहे त्या बद्दल पण, तिथे जाण्याच्या विचार सुद्धा करू नका.... चला राम राम..." असं म्हणत तो तिथून निघून जाऊ लागला.

"ओ दादा... दादा... ऐका तरी..." संकेत त्याच्या मागे जात त्याला हाका मारत होता. 

क्रमशः......
*************************
संकेत ला नक्की कोणती माहिती जाणून घ्यायची असेल? तो आधी घाबरला असला तरी त्याला यात काहीतरी नक्की काळंबेरं आहे असं का वाटतंय? काय पाहिलं असेल त्याने तिथे? पाहूया पुढच्या भागात.... तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा.

तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 

🎭 Series Post

View all