समुद्री मिशन (भाग -१२)

Finding the mystery of deep sea and islands.

समुद्री मिशन (भाग -१२)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
इथे गिरीश, रुचिरा आणि संकेत स्वतःला सोडवून घ्यायचा प्रयत्न करत होते! पण, एवढी झटापट करून काही उपयोग होत नव्हता! 

"सापळ्यात अडकलेलं कबुतर बघा कसं फडफड करतय!" तो पत्रकार हसत हसत म्हणाला. 

"ए! तू जो कोणी आहेस समोर येऊन बोल ना... लपून काय वार करतोयस?" संकेत चिडून म्हणाला. 

ते दोघं फक्त हसत होते... तिथेच कुठेतरी ते दोघं होते! त्यांच्या सावल्या दिसत होत्या पण ते कोण आहेत हे ओळखायची एकही खूण दिसत नव्हती! 

"चला! आपलं काम झालं.... आपल्या ' त्या ' डील सोबत हे पण डील करून टाकू! आपला डबल फायदा.... हा...हा...हा..." तो पत्रकार त्या व्यक्तीला म्हणाला. 

"हम्म! आधी या सगळ्यांकडून जे कॅमेरे आणि ट्रॅकर जप्त केले आहेत त्याची विल्हेवाट लावा!" ती व्यक्ती म्हणाली. 

"ते काम कधीच झालं बॉस! डोन्ट वरी...." तो पत्रकार म्हणाला. 

आता तिघांना समजलं होतं त्यांच्याकडे कोणताही पुरावा शिल्लक नाही आणि शंतनु सुद्धा त्यांना यापुढे ट्रॅक करू शकणार नाही... गिरीश आणि संकेत तर आता पूर्ण खचून गेले होते! त्यांच्या शंतनु बद्दल असणाऱ्या आशा सुद्धा मावळायला लागल्या होत्या! रुचिरा तेवढी शांत आणि व्यवस्थित होती... ते दोघं तिथेच कुठेतरी असल्यामुळे तिला संकेत आणि गिरीश ला शंतनु आपल्याला वाचवायला येतोय हे सांगता येत नव्हतं! 

"सर, संकेत! प्लीज तुम्ही आत्ता तुमची एनर्जी वाया घालवू नका! आपण इथून स्वतःहून जरी निसटू नाही शकलो तरी शंतनु येत असेल आपल्या मदतीला! थोडा धीर धरा.... मला खात्री आहे माझा सिक्रेट कोड शंतनु ने नक्की ओळखला असेल!" रुचिरा मनात म्हणाली.  
***************************
इथे निधी आणि शंतनु ने पटापट हालचाली करून त्या बेटावर जायची तयारी केली! शंतनु ने स्पेशल फोर्स च्या टीम ला कॉन्टॅक्ट करून डायरेक्ट समुद्र किनाऱ्यावर बोलावलं होतं! सगळ्या तयारीनिशी इथून हे सगळे जण त्या तिघांना वाचवायला निघाले! 

"मिस्टर शंतनु! तुम्हाला नक्की खात्री आहे ना आम्हाला तुम्ही जे काही सांगितलं ते तिथे आहे?" स्पेशल फोर्स सिनियर भाटिया म्हणाले. 

"हो सर! आपल्या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे! मी तिथे जे काही बघितलं आहे ते फार भयानक आहे.... संकेत, रुचिरा आणि गिरीश सर तिथे आता अडकलेत! त्यांना बांधून ठेवलं आहे.... बहुतेक तेव्हाच त्यांच्याकडे असणारे ट्रॅकर, कॅमेरे सगळं काढून घेतलं असावं!" शंतनु म्हणाला. 

"ठीक आहे! आपण बघूया.... त्यांचं लास्ट लोकेशन कुठे ट्रॅक झालं होतं?" भाटिया यांनी विचारलं. 

"आहे माझ्याकडे सेव्ह केलेलं! तिथे गेल्यावर ते फॉलो करत जाऊ आपण..." शंतनु त्याचा टॅब भटियांना दाखवत म्हणाला. 

"ओके! तिथे काहीही झटापट होऊ शकते... तुम्हाला दोघांना काही ईजा होऊ नये म्हणून हे शिल्ड घालून घ्या..." भटियांनी निधी आणि शंतनु ला शिल्ड दिलं! 

ते सगळं घालून होई पर्यंत सगळ्यांनी समुद्राचा मध्य पार केला होता.... आता अजून थोडं पुढे गेल्यावर ते धुकं येणार आणि वातावरण खराब होणार हे शंतनु ला माहीत होतं! 

"सर! आता काही वेळात वातावरण खराब होऊ लागेल आणि धुकं येईल.... हे ऑक्सिजन लावून घ्या! त्या धुक्यात नक्की काहीतरी आहे..." शंतनु म्हणाला. 

सगळ्यांनी ऑक्सिजन लावून घेतले! 
***************************
"बॉस! पार्टी आत्ता थोड्यावेळात इथे येतेय... सगळं रेडी आहे ना विचारलं आहे..." एक माणूस बाहेरून पळत पळत येऊन म्हणाला. 

"हो! येऊ दे... पार्टी ला इथेच आणा!" ती व्यक्ती म्हणाली. 

तो बाहेरून आलेला माणूस पुन्हा गेला! 

"चू..... चू.... चू..... बिचारे! यांच नशीबच बेकार आहे! उद्याचं मरण आजच आलं आहे...." पत्रकार म्हणाला. 

"ए! हिम्मत असेल तर ये ना समोर.... का लपून लपून बोलतोय.... आम्ही तिघे आज मरणार असं सांगतोय पण, बहुतेक तुलाच खात्री नाहीये.... म्हणून अजून स्वतःचा चेहरा दाखवत नाहीये...." गिरीश संतापून म्हणाला. 

"ए गप बस! नाहीतर रात्री पर्यंत पण जिवंत ठेवणार नाही...." तो पत्रकार म्हणाला. 

"तुला आम्ही कोण आहोत हे बघायचं आहे ना! ही इच्छा पण पूर्ण होईल.... एवढंच नाही तर आमचा प्लॅन सुद्धा सगळा तुम्हा तिघांना आम्ही सांगणार आणि मगच तुमची इथून मुक्ती! हा... हा...हा..." ती व्यक्ती म्हणाली. 

रुचिरा ने गिरीश आणि संकेत ला डोळ्यानेच शांत रहा म्हणून खूण केली! आता कोणी काही बोलत नव्हतं आणि कसली झटापट सुद्धा करत नव्हतं! 

"संपली वाटतं सगळी ताकद! चला आपण आपल्या तयारी ला लागू.... थोड्यावेळाने येऊन यांना आपले चेहरे आणि प्लॅन सगळं दाखवू..." ती व्यक्ती म्हणाली. 

ते दोघं तिथून गेले! रुचिरा ने ज्या अर्थी त्यांना शांत राहायला खुणावलं होतं त्या अर्थी नक्की काहीतरी घडणार होतं म्हणून आता ते दोघं सुद्धा शांत बसले होते! 
***************************
शंतनु, निधी आणि स्पेशल फोर्स ची माणसं आता बेटावर उतरली होती! तिथे पोहोचेपर्यंत संध्याकाळ होऊन गेली होती! कसलाही आवाज न करता बोटी झाडीत लपवून सगळे पुढे निघाले! 

"सावध रहा! कोणीतरी येतंय! सगळ्यांनी आपापल्या पोजिशन घ्या!" भाटिया म्हणाले. 

सगळे तिथे आसपास लपले! कोणीतरी माणूस किनाऱ्याच्या बाजूला जात होता! थोड्याच वेळात तिकडे अजून चार बोटी आल्या आणि त्या माणसाने त्यांचं स्वागत केलं! 

"आपल्याला आता यांचा पाठलाग करायचा आहे.... हे नक्की काय प्रकरण आहे तेव्हाच समजेल...." भाटिया म्हणाले. 

कोणाच्याही न कळत, अगदी कॅमेरा जरी असेल तरी त्यात आपण पकडले जाणार नाही याची काळजी घेऊन सगळे त्या माणसाचा पाठलाग करत होते! स्पेशल फोर्स ची अर्धी टीम रुचिरा, संकेत आणि गिरीश च लास्ट लोकेशन जिथे ट्रॅक झालं होतं तिथे गेली! या माणसाचा पाठलाग करता करता सगळे एखाद्या लॅब सारख्या दिसणाऱ्या बिल्डिंग बाहेर आले! पुढे सिक्युरिटी गार्ड असल्यामुळे शंतनु आणि बाकी सगळे तिथे लपून योग्य वेळेची वाट बघत होते!

"बॉस! आपले गेस्ट!" तो माणूस म्हणाला. 

"वेलकम... वेलकम...." ती व्यक्ती म्हणाली. 

"सब तैयार है ना? हमें आज के आज इधर से निकलना है |" त्या गेस्ट ने विचारलं. 

"हा! सब रेडी है! बस थोडी देर! आपको अपने डील के साथ और एक डील ऑफर करनी है | आप बस पाच मिनिट रुकीये...." ती व्यक्ती म्हणाली. 

पत्रकाराला सुद्धा त्या व्यक्तीने सोबत यायला खुणावलं! ते दोघं जिथे रुचिरा, संकेत आणि गिरीश ला बांधून ठेवलं होतं तिथे गेले! आता ते सरळ त्यांच्या समोर जाऊन उभे होते... 

"तू??" गिरीश म्हणाला. 

"हो! हो! मीच...." ती व्यक्ती म्हणाली. 

"पण तू तर...." गिरीश बोलत होता! 

"नाही.... मी कधी मेलो नव्हतो! आपण जेव्हा इथे आलो तेव्हा तू पूर्णपणे बेशुद्ध पडला होतास! मला इथे नक्की काय घडतं हे आधी पासून माहीत होतं! म्हणून मी पूर्णपणे तयारी केली होती.... तुझ्या सोबत मी सुद्धा झोप येतेय असं नाटक केलं! त्या वेळी तू इथे एकटा आला असता तर तेव्हाच आमचा पडदा फाश झाला असता! म्हणून मी तुझ्याबरोबर आलो होतो... पण, तेव्हा तुझं नशीब बलवत्तर होतं म्हणून तुला काही समजलं नाही.... मग मीच तुला पुन्हा बोटीत घातलं आणि त्या समुद्राच्या मध्य भागापर्यंत येऊन स्वतः सुद्धा झोपलो... त्यानंतर मुद्दाम मी नाटक केलं मला काहीतरी मानसिक आजार होतायत म्हणून.... मग, परदेशात जायच्या निमित्ताने मी इथे येऊन राहू लागलो!" निशांत म्हणाला.  

"एवढं मोठं कारस्थान? अरे पण का? तू तर माझा चांगला मित्र होतास...." गिरीश रागाने म्हणाला. 

"नुसतं मित्र असून काय? मला यातून खूप फायदा होता! मी तिथे पुरातत्व विभागात मुद्दाम काम करत होतो! माझं खरं काम तर नवीन अॅडव्हान्स तंत्रज्ञान विकसित करणं हे आहे... तो जो बाहेर तुम्ही अक्राळ विक्राळ जीव बघितला होता तो सुद्धा माझ्याच प्रयोगाचा भाग होता! आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चा वापर करून मी किती प्रगत आविष्कार केले आहेत माहितेय? हे सगळं काम सुरू करायच्या आधी सरकारला या सगळ्याची माहिती मी दिली होती! पण, त्यांनी फक्त माझ्या कामातल्या त्रुटी काढल्या! माझ्या या हत्यारांचे जे नंतर गंभीर परिणाम होणार आहेत हे त्यांना समजलं म्हणून माझ्या सगळ्या रिसर्च वर बॅन आणले! तेव्हाच ठरवलं आपलं स्वप्न अधुरं नाही ठेवायचं! मग मी काही दहशदवादी संघटनांशी हात मिळवणी केली आणि माझ्या या कामासाठी हे कृत्रिम बेट उभारलं! पाणबुडी सारखं समुद्राच्या आत जाऊन हे बेट दुसरीकडे स्थलांतरित करता येणं हा माझा पहिला प्रयत्न यशस्वी झाला! मग इथे लॅब, भुयारी रस्ते आणि खोल्या बनवल्या! माझ्या काही विषारी हत्यारांना जालीम विष लागणार होतं मग त्या वनस्पतींची वाढ केली... एवढं सगळं मी एक हाती सांभाळत होतो... तरीही तुला माझं कौतुक नाहीये?" निशांत म्हणाला. 

"अरे कसलं कौतुक? तू काही कौतुकास्पद केलं नाहीये..... हेच डोकं जर चांगल्या कामी लावलं असतंस ना तर नक्की तुझं कौतुक केलं असतं!" गिरीश संतापून म्हणाला. 

"तिथे अचानक वातावरण बदलत कसं होतं? धुकं यायचं ते पण खोटं होतं ना?" संकेत ने विचारलं.

"हो! ते सगळं सुद्धा तंत्रज्ञान वापरून केलं होतं! जे धुकं यायचं त्यामुळे सगळे बेशुद्ध पडायचे स्मोक बॉम्ब मध्ये क्लोरोफॉर्म गॅस मिक्स केला होता म्हणून कोणाला इथलं काही समजायचं नाही.... नंतर जे कोणी इथे येतील त्यांना ही सगळी भुताटकी वाटायची आणि बाहेर अफवा जायच्या ज्या माझ्यासाठी फार उपयोगी ठरल्या! म्हणून मी हेच पुढे चालू ठेवलं." निशांत म्हणाला. 

रुचिरा आणि संकेत आता पार गोंधळून गेले होते! थोडावेळ असाच शांत गेला! 

"हँड्स अप.... कोणीही आपल्या जागेवरून हलायच नाही...." भाटिया आत आले आणि त्यांच्या सगळ्या टीम ने तिथे असणाऱ्या सगळ्यांवर बंदूक रोखून धरली होती. 

शंतनु आणि निधी ने मिळून रुचिरा, संकेत आणि गिरीश ला तिथून सोडवलं! 

"तुमच्या कोणाकडेच आमच्या विरूद्ध पुरावा नाहीये.... आमचं काहीही होऊ शकत नाही.... हे बेट एका क्लिक वर उध्वस्त होईल मग कशाचाही मागमूस राहणार नाही.... हा....हा....हा...." निशांत म्हणाला. 

"तू तर काही बोलूच नकोस! ते आमचं आम्ही बघू.... ए घेऊन जा रे सगळ्यांना!" भाटियांनी ऑर्डर दिली. 

एवढ्यात त्या पत्रकाराच्या हातात निधी ने काहीतरी बघितलं! 

"सर... ते बघा...." ती एकदम ओरडली. 

संकेत ने त्याच्या पायात पाय घालून त्याला पाडलं आणि ट्रिगर शंतनु ने उचलला. स्पेशल फोर्स ची काही माणसं त्यांना घेऊन गेली... 

"मॅडम! सर! तुम्ही ठीक आहात ना?" निधी ने काळजीने विचारलं. 

"हो! पण, निधी मला एक सांग तुम्ही दोघं स्पेशल फोर्स ला कसे घेऊन आलात?" संकेत ने विचारलं. 

"मी सांगते! जेव्हा त्या लोकांनी आपला व्हिडिओ शूट केला होता तेव्हा मी जमिनीवर पाय हलवून माॅर्स कोड चा वापर करून सिक्युरिटी अलर्ट असा मेसेज दिला होता! त्यावरूनच शंतनु ला समजलं!" रुचिरा म्हणाली. 

"हो! निधी ने मला तो व्हिडिओ आणून दाखवला तेव्हाच मला समजलं इथे खूप मोठं काहीतरी घडलं आहे... तुमच्या कॅमेरा मध्ये जेव्हा तुम्ही त्या भुयारी मार्गात गेलात तेव्हा जे रेकॉर्ड होत होतं ते माझ्यापर्यंत पोहोचत नव्हतं! नंतर लोकेशन सुद्धा ट्रॅक होणं बंद झालं! तेव्हा मला संशय आलाच होताच! तेवढ्यात निधी ने तो व्हिडिओ दाखवला आणि आम्ही सगळे पटकन इथे आलो! संकेत तुला आठवतंय आपण कॉलेज मध्ये असताना जर कोणाबद्दल काही बोलायचं असेल तर मॉर्स कोड वापरायचो? पेन आपटून, डोळे मिचकावून आपण बोलायचो.... तेच आत्ता रुचिरा ने वापरलं." शंतनु म्हणाला. 

"हो! राईट! इतक्या वर्षांनी तर माझ्या लक्षात सुद्धा नाहीयेत ते कोड...." संकेत म्हणाला. 

"माझ्या होते... विचार केला, या माणसाला स्वतःच्या प्लॅन वर एवढा गर्व आहे ना कसलाच क्लू तो मागे ठेवत नव्हता मग आपणच शंतनु ला क्लू देऊ..." रुचिरा म्हणाली. 

"थँक्यू मॅडम! तुम्ही क्लू दिलात म्हणून एवढा मोठा अनर्थ टळला! त्यांनी कोणती कोणती शस्त्र बनवली आहेत त्याचा कसा वापर करणार होते याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का?" भाटियांनी विचारलं. 

"हो! त्यांचे सगळे काळे धंदे हिडन कॅमेरा मध्ये कैद आहेत!" संकेत म्हणाला आणि तो हिडन कॅमेरा शोधू लागला तर त्याच्याकडे कोणताही कॅमेरा नव्हता. 

"काय झालं सर?" निधी ने विचारलं. 

"कॅमेरा नाहीये...." संकेत काळजीने म्हणाला. 

"थांब! थांब!" रुचिरा म्हणाली आणि तिने तिच्या कुर्त्याला असलेला बटण कॅमेरा काढला आणि भाटिया यांच्या हातात दिला. 

"शंतनु ने मला हा जास्तीचा कॅमेरा देऊन ठेवला होता! हा कॅमेरा आहे हे लक्षात येऊ नये म्हणून त्या दिवशीच मी टेलर कडे जाऊन या कूर्त्याला ही अशी काळी टपोरी बटणं लावून घेतली." रुचिरा म्हणाली. 

"थँक्यू मॅडम! हे रेकॉर्डिंग कोर्टात कामी येईलच... इथे असणारी सगळी शस्त्र आपल्याला जप्त करावी लागतील... मग निघू आपण इथून..." भाटिया म्हणाले. 

रुचिरा, संकेत आणि गिरीश ने त्यांना त्या सगळ्या जागा दाखवल्या. विषारी मिसाईल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करून तयार केलेले ड्रोन, विषारी रसायने या सगळ्याचे सँपल घेऊन तिथे काही स्पेशल फोर्स ची माणसं तैनात करून हे सगळे निघाले. 

दुसऱ्या दिवशीची सकाळ त्यांच्यासाठी खूप छान झाली! समुद्र प्रवास करून पुन्हा शहरात पोहोचेपर्यंत ही बातमी मीडिया ला समजली होती. सगळ्या न्यूज चॅनल आणि पेपर मधे फक्त यांचं कौतुक होत होतं! 

"रुचिरा आणि संकेत यांनी पुन्हा एकदा त्यांच्या कामगिरीने समुद्रात असणाऱ्या जिवाचं रहस्य तर सोडवलं पण, यावेळी देशाची रक्षा सुद्धा केली..." सगळ्या चॅनल वर हेडलाईन्स गाजत होत्या! 

रुचिरा, संकेत, निधी, गिरीश आणि शंतनु यांच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसत होतं! तिथे घडणाऱ्या अनेक वाईट कामांना आता आळा बसला होता म्हणून सगळे प्रसन्न होते...

समाप्त.
****************************
मॉर्स कोड म्हणजे सांकेतिक खुणेतून बोलणे! समजा, security alert असं मॉर्स कोड मध्ये  बोलायचं असेल तर, 
'...' म्हणजे S 
'.' म्हणजे E 
'_ . _.' म्हणजे C 

असे असतात.... यात '.' म्हणजे लगेच क्रिया झाली पाहिजे.... आणि '_' म्हणजे थोडा वेळ घेऊन! म्हणजे, जेव्हा रुचिरा ने पायाने हा कोड वापरला असेल तेव्हा तीन वेळा लगेच लगेच पाय हलवला, थोडं थांबून लगेच एकदा पटकन  पाय हलवला मग पुन्हा थांबून हळू हळू पाय हलवून लगेच पुन्हा पटकन हलवला मग पुन्हा हळू मग पुन्हा पटकन! असं सगळ्या अक्षरांचे वापरून हा संदेश शंतनु पर्यंत पोहोचवला. या कोड ना आंतरराष्ट्रीय मान्यता असल्याने हे कोणत्याही देशात डिकोड करता येतात. 

काय मग कशी वाटली ही कथा? नक्की कमेंट करून सांगा.... तुम्हाला सुद्धा मॉर्स कोड बद्दल काही माहिती आहे का? की नव्याने माहिती मिळाली हे सुद्धा सांगा. 

🎭 Series Post

View all