समुद्री मिशन (भाग -११)

Finding the mystery of the deep sea and islands.

समुद्री मिशन (भाग -११)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
सगळ्यांच्या हृदयाचे ठोके आता वाढले होते... त्यांची बोट बरोबर त्या जागी आली! अचानक वातावरणात बदल होऊ लागले, धुकं आलं आणि आता समोरच काही दिसत नव्हतं! संकेत, रुचिरा आणि गिरीश ने एकमेकांचे हात घट्ट धरून ठेवले होते! संकेत आणि रुचिरा च्या अंदाजाप्रमाणे आता काही क्षणांत तो अक्राळ विक्राळ जीव कुठूनही येणार होता! 

"सर, तुम्ही सावध रहा! तो जीव कुठूनही येऊ शकतो..." संकेत म्हणाला. 

त्या धुक्यातून दोन पावलं दूरवर सुद्धा दिसत नव्हतं तरी सगळे किलकिल्या डोळ्यांनी समोर पहायचा प्रयत्न करत होते! काही क्षण असेच गेले! अचानक त्यांच्या बोटीच्या मागून काहीतरी हालचाल सगळ्यांना जाणवली! 

"सर....." रुचिरा एकदम ओरडली! 

गिरीश च्या मागून तो जीव उंच उडी मारून त्यांच्या समोर आला! संकेत ने शंतनु नी त्याला आणून दिलेलं एक विशिष्ट प्रकार च इंजेक्शन बॅगेतून काढलं! अर्ध्या लिटर बाटली एवढी त्याची सिरिंज छोट्याश्या तोफेसारख्या एका यंत्रात त्याने अडकवली आणि त्या जीवावर निशाणा साधला! जसं ते इंजेक्शन त्याला लागलं तसं थोड्याच वेळात तो जीव कोलमडून पडला! रुचिरा ने त्याचे ब्लड सँपल घेतले आणि फोटो काढले! 

"तुम्ही दोघं ठीक आहात ना?" गिरीश ने विचारलं. 

"हो... तुम्ही? कुठे लागलं नाही ना तुम्हाला?" संकेत ने विचारलं. 

"नाही... मी ठीक आहे... पण, हा सगळा काय प्रकार आहे? असा जीव अस्तिवात कसा असू शकतो? शार्क सारखी बॉडी, सापासारखं लवचिक अंग, जेली फिश सारखी विषारी शेपूट! हा सगळा काय प्रकार असेल?" गिरीश ने गोंधळून विचारलं. 

"ते सगळं तर मुंबई ला पोहोचल्यावर समजेल... किंवा इथे कोणी हाती लागलं, याचा सूत्रधार कोण हे सगळं समजलं तरी या सगळ्याची उकल होईल... बघूया आता...." संकेत म्हणाला. 

आता थोडं थोडं धुकं कमी व्हायला लागलं होतं! समोरच अगदी स्पष्ट नाही पण आधी पेक्षा नीट दिसत होतं! 

"समोर बेट दिसतंय! बहुतेक आपण आपल्या इच्छित स्थळी पोहोचलो!" रुचिरा समोर बेट बघून म्हणाली. 

"हो! आता सगळ्यांनी अलर्ट रहा! शंतनु ने काय सांगितलं आहे लक्षात आहे ना? तिथे कोणत्याही वनस्पती ला हात लावायचा नाहीये.." संकेत म्हणाला. 

"हो! कोणाला ग्लानी येत नाहीये ना?" रुचिरा ने विचारलं. 

गिरीश आणि संकेत ने नकारार्थी मान हलवली. दोन मिनिटात ते त्या बेटावर पोहोचले! यावेळी पूर्ण शुद्धीत सगळे बेट बघत होते! सगळे जसे पुढे जात होते तश्या त्या वनस्पती विरळ होत चालल्या होत्या! पूर्णपणे सामसूम असलेल्या त्या बेटावर कधी कोणी आलंच नसावं असं वाटत होतं! खूप घनदाट झाडी, फक्त आणि फक्त समुद्राच्या लाटांचा आवाज! एकदम भकास एकही प्राणी, पक्षी नसलेलं ते बेट एवढं जीवघेणं असेल असं कोणाला वाटतंच नव्हतं! 

"संकेत! मला वाटतंय आपण आजची रात्र इथेच काढू.... थोड्याच वेळात सूर्योदय होईल तेव्हा पुढे जाऊया... आता त्या विषारी वनस्पती इथे आसपास दिसत नाहीयेत तर इथे आपण थांबू शकतो..." गिरीश म्हणाला. 

"ओके! तसंही आपल्याला आरामाची गरज सुद्धा आहेच!" संकेत म्हणाला. 

तिथेच असणाऱ्या एका नारळाच्या झाडाखाली सगळे विसावले! एवढ्या तासांचा समुद्र प्रवास आणि त्या नंतर अंधारात एवढं बेटावर चालणं यामुळे सगळे दमले होते... आपापल्या बॅग मधून सगळ्यांनी एनार्जी ड्रिंक पीलं आणि आळीपाळीने पहारा देत एक एक डुलकी काढली. सूर्याच्या पहिल्या किरणा पासून त्यांचा प्रवास पुन्हा पुढे सुरू झाला! सगळ्यात पुढे संकेत त्याच्या मागून रुचिरा आणि गिरीश चालत होते! 

"एक मिनिट! कसलाही आवाज करू नका... तिथे कोणीतरी आहे...." संकेत एकदम दबक्या आवाजात म्हणाला. 

तिथे असणाऱ्या झुडुपांच्या आडोशाला उभं राहून ते तिघं लक्ष ठेवून होते! एक माणूस तिथे सतत पहारा देत उभा होता! 

"इथे पहारा देण्यासारखं काय असेल? काही दिसत तर नाहीये...." रुचिरा दबक्या आवाजात म्हणाली. 

"मी पण तोच विचार करतोय.... नक्की पुढे काहीतरी असणार..." गिरीश म्हणाला. 

"शुsss.... बहुतेक कोणीतरी येतंय लपा लपा.." संकेत ने पटकन त्यांना सावध केलं. 

सगळे तिथेच पटकन लपले.... कोणीतरी येऊन त्या माणसाला काहीतरी सांगितलं आणि ते दोघं तिथून निघून गेले... आता तिथे कोणी नाही याची खात्री करून तिघे बाहेर आले.... 

"चला आता पुढे जाऊन बघूया इथे असं काय आहे ज्याला पहाऱ्याची गरज आहे!" संकेत म्हणाला. 

सगळे थोडं पुढे गेले.... दूरदूर पर्यंत काही दिसत नव्हतं! पण, तिथे कोणीतरी पहारा देतंय म्हणजे नक्की काहीतरी तिथे असणार हे त्यांना माहीत होतं! 

"आपण वेगवेगळ्या दिशांनी जाऊन बघू काय हाती लागतंय का! संपर्कासाठी हॅम रेडिओ आहेच!" रुचिरा म्हणाली.

"ओके... काही क्लू लागला तर ठीक नाहीतर  बरोबर दहा मिनिटांनी पुन्हा इथेच भेटू!" संकेत म्हणाला.

तिघे वेगवेगळ्या दिशांनी शोध घ्यायला निघाले. हॅम रेडिओ च्या माध्यमातून ते एकमेकांशी कनेक्टेड होतेच! 

"हॅलो! पश्चिमेला या! ओव्हर" रुचिरा म्हणाली.

तिचा हा मेसेज ऐकून गिरीश आणि संकेत लगेच पश्चिम दिशेला गेले! 

"काय झालं?" गिरीश ने विचारलं. 

"ही जमीन बघा! नक्कीच इथे काहीतरी गडबड आहे..." रुचिरा जमिनी वरची माती पायाने बाजूला सारत म्हणाली. 

"हो यार! इथे जमिनीच्या खाली काहीतरी आहे नक्की!" संकेत म्हणाला. 

तिघांनी मिळून तिथली माती बाजूला सारली तर एक लोखंडी दार तिथे होतं! 

"भुयारी रस्ता?" गिरीश म्हणाला. 

"हो सर! वाटतंय तरी तसचं! मी एक काम करतो आधी आत जाऊन बघतो काय आहे... जर सेफ वाटलं तर तुम्हाला दोघांना बोलवतो..." संकेत म्हणाला. 

"नाही नको... आपण सगळे एकत्र जाऊ..." रुचिरा काळजी ने म्हणाली. 

"नको! संकेत बरोबर बोलतोय... तो पहारा ठेवणारा माणूस परत आला तर आपण सगळेच पकडले जाऊ.... शिवाय आत कोणी माणसं आहेत का हे सुद्धा आपल्याला माहीत नाहीये... संकेत ला अंदाज घेऊन येऊ दे... आपण इथेच थांबून लक्ष ठेवूया..." गिरीश ने रुचिरा ला समजावलं. 

संकेत टॉर्च घेऊन खाली उतरला! गिरीश आणि रुचिरा बाहेर थांबून आजूबाजूला लक्ष ठेवत होते!
**************************
"हे सगळं काय आहे? तुम्ही म्हणाला होतात ती दोघं इथे येणार नाहीत... आता आली आहेत! आणि सोबत तो गिरीश पण आहे... आता काय करायचं? एक काम नीट करता येत नाही..." ती व्यक्ती म्हणाली. 

"मी सगळा बंदोबस्त केलाय... जेव्हा त्यांनी आपल्या पहिल्या त्या जीवावर हल्ला केला तेव्हा पासूनच मी त्यांच्यावर नजर ठेवून होतो! आत्ता आपल्या या माणसाला मुद्दाम परत बोलावून घेतलं आहे.... त्यांना काय करायचं ते करू दे... आपला फायदा आता जास्त होईल याची खात्री देतो मी...." तो खोटा पत्रकार म्हणाला. 

"ठीक आहे! जे करायचं ते लवकर करा! त्यांना आपल्या या कामाचा काही मागमूस जरी लागला तरी सगळं होत्याचं नव्हतं होईल..." ती व्यक्ती म्हणाली. 

"अजून थोडाच वेळ.... आता ते लोक आपल्या त्या भुयारी मार्गात गेलेत ना... पुढे जाऊदे... मग आपल्या वाट्याला फक्त फायदा अनिंत्यांच्या वाट्याला पश्चाताप!" पत्रकार म्हणाला. 

"काय? तिथे काय आहे हे माहितेय ना? मला विचारायचं तरी होतं आधी... स्वतः बॉस असल्या सारखे काय वागताय?" ती व्यक्ती चिडून म्हणाली. 

"सॉरी बॉस! पण, तुम्ही यासाठी कधी परवानगी दिली नसती म्हणून..... त्यांना सगळं सत्य कळल्यावर जेव्हा ते इतर कोणाला न सांगताच हे जग सोडून जातील तेव्हा त्यांचा तो त्रासलेला चेहरा बघायला फार मजा येईल.... म्हणून हे केलं!" पत्रकार म्हणाला. 

"वाह! शिकलात.... पण, यात काही चूक झाली आणि आपलं डील जर हातातून गेलं तर तुम्ही आहात आणि मी आहे...." ती व्यक्ती म्हणाली.

"डोन्ट वरी... तुम्ही फक्त मजा घ्या..." पत्रकार म्हणाला. 
*************************
दोन ते तीन मिनिटांत संकेत पुन्हा वर आला... 

"काय रे काय आहे तिथे?" गिरीश ने विचारलं. 

"आत कोणी नाहीये... आपल्याला खूप मोठा पुरावा मिळेल आत.... या तुम्ही पण..." संकेत म्हणाला. 

रुचिरा आणि गिरीश सुद्धा त्याच्या मागोमाग गेले! भुयारी रस्ता थोडा पार केल्यावर एका खोलीसारखं बांधकाम आत केलेलं होतं! काही वस्तू झाकून ठेवलेल्या होत्या.... कसल्यातरी ब्ल्यू प्रिंट, आराखडे असं काहीबाही तिथे पडलं होतं! जमिनीच्या आत हे सगळं असल्यामुळे शंतनु पर्यंत हे रेकॉर्डिंग जात नव्हतं! सॅटेलाईट सिग्नल तिथे पोहचत नव्हता! हिडन कॅमेरा मध्ये सगळं रेकॉर्डिंग होत होतंच! 

"संकेत! हे बघ.... हा खूप मोठा कट आहे.... हे सगळं सामान बघ..." रुचिरा तिथे असणाऱ्या टेबल कडे बोट दाखवून म्हणाली. 

सगळ्यांनी सेफ्टी ग्लोव्हज आणि सेफ्टी ग्लासेस घातले आणि त्या टेबलाजवळ गेले! तिथे असणारं सामान एक एक करून ते बघत होते! एक एक वस्तू बघता बघता काही कळायच्या आत अचानक तिघे खाली कोसळून पडले! जेव्हा ते शुद्धीत आले तेव्हा त्यांना एका बंदिस्त खोलीत खुर्चीला बांधून ठेवलं होतं! 

"सांगितलं होतं ना इथे यायचं नाही.... येऊन आता मोठी चूक केली आहे.... चू... चू... चू.... बिचारे! आमचं रहस्य उलगडायला गेले पण आता स्वतःच एक रहस्य होणार आहेत! हा... हा... हा..." ती व्यक्ती कुठेतरी आडोशाला उभी राहून त्यांना शुद्धीत आलेलं पाहून म्हणाली. 

"ए! तू किती मोठी चूक केली आहेस हे तुला माहित नाही.... आमचे सहकारी आम्हाला वाचवतील.... सगळे पुरावे आहेत आमच्याकडे...." गिरीश खुर्चीतून सुटायचा प्रयत्न करत म्हणाला. 

"बघूच या! तुमचे सहकारी कोण हे मला माहीत आहे.... चला आता आपण त्यांना तुमचा व्हिडिओ शूट करून लगेच पाठवू..." ती व्यक्ती म्हणाली. 

त्या व्यक्तीने लगेच त्यांचा व्हिडिओ शूट केला त्या व्हिडिओ मध्ये कोणी काही बोलणार नाही, बॅकग्राऊंड मध्ये काही क्लू लागणार नाही याची काळजी त्याने घेतली होती! नंतर त्या खोट्या पत्रकाराला त्याची सी.डी. बनवून लगेच निधी पर्यंत पोहोचवायला सांगितली. 

"आपलं काम झालं! आपल्या माणसांनी त्याची सी.डी. बनवून घेतली आहे ती हिच्या ऑफिस मध्ये पोहोचेल थोड्यावेळात!" तो म्हणाला. 
**************************
"मॅडम! तुमच्या नावाने एक बॉक्स आलं आहे... कोणीतरी बाहेर ठेवून गेलं होतं..." रुचिरा च्या ऑफिस बाहेर असणाऱ्या सिक्युरिटी गार्ड ने निधी ला सी. डी. असणारं बॉक्स दिलं! 

निधी ने ते बघितलं आणि लगेच शंतनु कडे गेली.... शंतनु ने काळजीपूर्वक तो व्हिडिओ चार ते पाच वेळा बघितला! 

"निधी! चल आपण तिथे जाऊ... खूप मोठं कारस्थान आहे या मागे.... आपल्यासोबत आपल्याला स्पेशल फोर्स चे लोक घेऊन जायला लागतील...." शंतनु घाई घाईत म्हणाला. 

"का? काय झालं? तुम्हाला कसं समजलं नक्की?" निधी ने विचारलं. 

"सांगतो नंतर.... तू चल... आज रात्री पर्यंत तिथे पोहोचलं पाहिजे..." शंतनु म्हणाला. 

क्रमशः.....
**************************
शंतनु ला असं काय समजलं असेल? तिथे नक्की काय घडत असेल? पाहूया पुढच्या भागात.... तोपर्यंत तुम्हाला काय वाटतंय काय असेल तिथे हे नक्की कमेंट करून सांगा. 

🎭 Series Post

View all