समुद्री मिशन (भाग -१०)

Finding the mystery of deep sea and islands.

समुद्री मिशन (भाग -१०)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
रुचिरा ने निधी ला सगळं नीट समजावून सांगितलं! कोणत्याही परिस्थितीत ही बातमी बाकी कोणाला कळू द्यायची नव्हती. इतर कोणी ऑफिस मध्ये येण्याआधीच रुचिरा तिथून निघाली आणि हॉस्टेल वर जाऊन रात्री मिशन वर जायची तयारी करू लागली. संकेत आणि गिरीश सुद्धा आपापल्या घरी रात्रीची तयारी करत होते! 

"हॅलो! ऑफिस मध्ये सगळं ठीक आहे ना?" संकेत ने रुचिरा ला फोन करून विचारलं. 

"हो! निधी ला लवकर बोलवून सगळं सांगून कोणी तिथे यायच्या आत मी हॉस्टेल वर पुन्हा आले सुद्धा! काळजी करू नकोस मी तिला सगळं नीट सांगितलं आहे." रुचिरा म्हणाली.

"बरं! मी पण आत्ता सगळी तयारी च करत होतो! काल बऱ्याच दिवसांनी शांत झोपलो त्यामुळे आज खूप प्रसन्न वाटतंय..." संकेत त्याच्या खिडकी पाशी उभं राहून बाहेर बघत म्हणाला. 

"हम्म! आता कसलं टेंशन नाही.... तिथे नक्की काय घडतंय हे लवकरच आपल्या समोर येईल तेव्हा अजून छान झोप लागेल बघ...." रुचिरा म्हणाली.

"हो! ते आहेच.... चल मग, रात्री भेटूच.... बाय.." संकेत म्हणाला.

रुचिरा ने सुद्धा त्याला बाय केलं आणि फोन ठेवला! 
***************************
इथे शंतनु डॉ. उर्मिला ला भेटायला जाण्यासाठी निघाला होता! 

"हॅलो! गिरीश सर! मी शंतनु...." शंतनु ने गिरीश ला फोन लावला. 

"हो बोल ना.." गिरीश म्हणाला.

"मी डॉ. उर्मिला ना फोन करतोच आहे पण, त्या आधी तुम्ही एकदा त्यांच्या कानावर घाला ना.. मी घरातून निघालो आहे साधारण अर्ध्या तासात जाईन तिथे...." शंतनु म्हणाला.

"बरं! मी तुला मेसेज करतो..." गिरीश म्हणाला आणि फोन ठेवला. 

गिरीश ने डॉ. उर्मिला शी बोलून घेतलं आणि शंतनु ला मेसेज केला. त्याचा मेसेज आल्यावर शंतनु ने सुद्धा डॉ. उर्मिला ना फोन लावला! 

"हॅलो! मी शंतनु.... तुम्हाला गिरीश सरांनी सांगितलं असेलच ना!" त्याने विचारलं.

"हो! हो! या तुम्ही लॅब मध्ये... मी तुम्हाला हवी ती सगळी माहिती देते..." डॉ. उर्मिला म्हणाली.

"ओके! थँक्यू मॅडम! मी अर्ध्या तासात तिथे पोहोचतोय..." संकेत म्हणाला आणि फोन ठेवला. 

अर्ध्या तासात शंतनु डॉ. उर्मिला च्या लॅब मध्ये पोहोचला. शंतनु आणि उर्मिला तिच्या केबिन मध्ये गेले! 

"बोला मिस्टर शंतनु! पुन्हा त्या बेटाचा विषय कसा निघाला?" डॉ. उर्मिला ने विचारलं. 

"तिकडे जे काही विचित्र प्रकार होतायत त्याचा छडा लावायचा आहे म्हणून... तिथे असणारा तो अक्राळ विक्राळ जीव, त्या विचित्र वनस्पती, अचानक येणारं धुकं, गुंगी येणं हे सगळं खूप विचित्र आहे... तिथे नक्की हे सगळं घडवून आणलं जातय असा आम्हाला संशय आहे..." संकेत ने सगळं स्पष्ट सांगितलं. 

"हम्म! सांगते मी तुम्हाला सगळं डिटेल मध्ये... बरं मला सांगा तुम्ही चहा घेणार की कॉफी?" डॉ. उर्मिला ने विचारलं.

"काही नको... घरून च आलोय मी..." शंतनु म्हणाला.

"ठीक आहे! आपण आपल्या मुद्द्यावर येऊ... साधारण चार ते पाच वर्षांपूर्वी गिरीश सर आणि  त्यांचे मित्र त्या बेटावर गेले होते! तेव्हाचे काही फोटो अजून आहेत माझ्याकडे! त्यामध्ये ज्या वनस्पती आणि झाडं आहेत ती अत्यंत विषारी आहेत! शिवाय ती आपल्या देशात आढळत नाहीत. त्या वनस्पतींची वाढ होण्यासाठी मृदा आणि त्यातले जे घटक आवश्यक असतात ते आपल्या देशात नाहीत! काही लॅब मध्ये टेक्नॉलॉजी चा वापर करून त्यांची थोड्या प्रमाणात वाढ केली जाते पण, अश्या वनस्पती खूप कमी दिवस जगतात." डॉ. उर्मिला म्हणाली.

"ओके! मी तुम्हाला आत्ता काही आठवड्यांपूर्वी चे फोटो दाखवतो ते बघून तुम्हाला काय वाटतंय ते सांगा!" शंतनु म्हणाला.

शंतनु ने त्याच्या लॅपटॉप ऑन केला आणि संकेत, रुचिरा जेव्हा तिथे गेले होते तेव्हा त्यांच्या कॅमेरा मध्ये जे काही कॅच झालं होतं ते डॉ. उर्मिला ना दाखवायला सुरुवात केली.

"हे फोटो बघून ही कोणत्याही लॅब मध्ये रिसर्च साठी वाढवलेली रोपं वाटत नाहीयेत! या सगळ्या वनस्पतींची झालेली वाढ बघता हे फोटो आपल्या देशातले वाटतच नाहीयेत!"डॉ. उर्मिला म्हणाली. 

"हे आपल्या इथलेच फोटो आहेत! कोणतं नवीन तंत्रज्ञान आलं आहे का ज्या मुळे या वनस्पतींची वाढ आधी पेक्षा जास्त होऊ लागली आहे?" शंतनु ने विचारलं.

"अजून तरी नाही... कोणीतरी यावर रिसर्च करत होतं पण, मी आधी सांगितल्या प्रमाणे या वनस्पती खूप विषारी आहेत! जिथे या आढळतात तिथे सुद्धा खूप दुर्मिळ आहेत! यांच्या अती वाढीमुळे खूपसे दुर्धर आजार निर्माण होऊ शकतात! त्या रिसर्च चा जर गैरवापर झाला असता तर अनेकांनी आपले प्राण गमावले असते म्हणून तो रिसर्च बंद केला गेला!" डॉ. उर्मिला म्हणाली. 

"कोण करत होतं तो रिसर्च?" शंतनु ने विचारलं.

"माहीत नाही! ते नाव कायम सिक्रेटच ठेवलं गेलं आहे.. जो कोणी हा रिसर्च करत होता त्याचं त्याला हे समजल्यामुळे बाकी कोणाला याबद्दल काही माहीत नाही." डॉ. उर्मिला म्हणाली.

"बरं! तिथे काही लोकांनी खूप प्रचंड अक्राळ विक्राळ जीव पाहिला आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? असा कोणता मासा खरंच आहे का?" शंतनु ने त्या जिवाचं नीट वर्णन करून विचारलं. 

"नाही! तुम्ही जसं वर्णन करताय तसा जीव आपल्या देशात काय या पृथ्वी वरच नाहीये..." डॉ. उर्मिला एकदम खात्रीने म्हणाली. 

"मग ज्या लोकांना तो जीव दिसला आहे त्याचं काय? भास झाला तर एक दोन जणांना होईल पण, इथे तर बरेच लोक त्या जीवाला पाहिलं आहे असा दावा करतात..." शंतनु म्हणाला. 

"म्हणत असतील लोक! पण, असा जीव अस्तित्वात नाही... आता लोकांना नसलेला जीव दिसणं हा कदाचित त्यांच्या मनात बसलेल्या भीतीचा परिणाम असू शकतो!" डॉ. उर्मिला म्हणाली. 

"अच्छा! मॅडम एक विचारायचं राहिलं! तुम्ही म्हणालात तिथे असणाऱ्या वनस्पती या खूप विषारी आहेत! त्यांच्या अती वाढीमुळे खूपसे दुर्धर आजार होऊ शकतात! मग, जर त्या बेटावर कोणी असेल तर त्याला आत्ता पर्यंत आजार झालेले असतील ना?" शंतनु ने विचारलं.

"नाही! जर तिथल्या लोकांना या वनस्पती कश्या पद्धतीने हाताळायच्या हे माहीत असेल तर काही होणार नाही! या वस्पतींच्या डायरेक्ट संपर्कात जर माणूस आला तर त्याच्यावर विषाचा प्रभाव व्हायला सुरुवात होते! त्या बेटावर अचानक येणारी गुंगी या वस्पतींमुळे असू शकते." डॉ. उर्मिला म्हणाली. 

शंतनु आणि डॉ. उर्मिला ने बराच वेळ यावर चर्चा केली. शंतनु ला पडत गेलेले प्रश्न तो तिला विचारत होता! डॉ. उर्मिला कडून बरीच माहिती मिळाल्यावर तो काल ठरल्या प्रमाणे काही महत्वाचं सामान आणायला गेला. सगळी खरेदी करून, सगळं प्लॅन प्रमाणे होतंय ना हे बघून पुन्हा एकदा सगळी खात्री करून घेऊन घेऊन तो रुचिरा च्या हॉस्टेल बाहेर आला. ही सगळी कामं होई पर्यंत दुपार सरत आली होती. त्याने रुचिरा ला फोन करून बाहेर बोलवून घेतलं! 

"तू आत्ता कसा इथे?" रुचिरा ने विचारलं.

"रात्री मला काही तुम्हाला भेटता येणार नाही! जर कोणाला चुकून जरी संशय आला तरी सगळा प्लॅन फिस्कटेल! म्हणून आत्ताच भेटायला आलो... ऑल द बेस्ट या मिशन साठी! कालच्या आपल्या यादी प्रमाणे सगळं सामान आधीच बोटीत पोहोचलेलं असेल! तुम्ही तिघं रात्री तिथे पोहोचल्यावर निळ्या रंगाची एक मोटार बोट तुम्हाला दिसेल त्यातून जावा..." शंतनु ने सगळं पटापट सांगितलं.

"अरे हो हो! जरा श्वास तरी घे...." रुचिरा म्हणाली.

"सॉरी! ते काही राहून जायला नको म्हणून सगळं पटकन सांगून टाकलं. चल, मी संकेत ला पण भेटून येतो..." शंतनु म्हणाला. 

"हो! पण, आधी त्या डॉ. उर्मिला काय म्हणाल्या ते तर सांग." रुचिरा म्हणाली.

शंतनु ने सगळं तिला नीट समजावून सांगितलं. त्याने जे काही सांगितलं त्यामुळे त्या बेटाच्या बाबतीत तिचा वाढत चाललेला संशय आता पूर्णपणे खात्रित बदलला! लवकरच आता तिथलं रहस्य जगासमोर येणार होतं याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकत होता! शंतनु ने तिला पुन्हा ऑल द बेस्ट केलं आणि तो तिथून निघाला. 
***************************
रात्री ठरलेल्या वेळी सगळे समुद्र किनाऱ्यावर पोहोचले! शंतनु ने सांगितल्या प्रमाणे तिथे असणाऱ्या निळ्या मोटार बोटीत त्यांचं सगळं सामान होतं! मनोमन देवाची प्रार्थना करून, लाईफ जॅकेट घालून तिघं बोटीत बसले. संकेत ने बोट सुरू केली. 

"ऑल द बेस्ट" सगळ्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

काहीही झालं तरी तिथे पोहोचल्यावर वेगळं व्हायचं नाही हे त्यांनी ठरवलं. काही कारणामुळे ते भरकटले तर पुन्हा एकत्र येण्यासाठी आणि एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी त्यांनी सोबत हॅम रेडिओ ठेवले होते! एवढ्या प्रवासात कोणी कोणाशी एक शब्दही बोललं नाही. थोड्याच वेळात ते समुद्राच्या मध्य भागी पोहोचले. आता फक्त चाळीस ते पन्नास मिनिटांनी ते त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचणार होते! सगळ्यांनी सेफ्टी टूल्स घालून घेतले आणि ऑक्सिजन सुद्धा लावून घेतला. 

क्रमशः.....
**************************
संकेत, रुचिरा आणि गिरीश मिशन वर निघाले आहेत! थोड्याच वेळात ते त्या बेटावर पोहोचतील तेव्हा काय होईल? ती व्यक्ती जी पत्रकारासोबत गेली आहे ती नक्की कोण असेल? काय घडत असेल तिथे? का त्या विषारी वनस्पती तिथे एवढ्या प्रमाणात वाढवल्या गेल्या असतील? पाहूया पुढच्या भागात. 

🎭 Series Post

View all