संपदा.........(एक रहस्य)भाग - १
संपदा स्वभावाने साधीभोळी शांत मुलगी.आई वडिलांची सेवा करणारी. तिचा जन्मच मुळी अठराविश्वे दारिद्र्य असलेल्या घरात झाला होता.आई-वडील दुसऱ्याच्या शेतात कामासाठी जायचे, त्यामुळे आईला मदत व्हावी म्हणून लहानपणीच संपदा घरातील सगळी कामे शिकली होती. वडिलांनी तिला शाळेत घातले होते, तिची शिकण्याची इच्छा ही खूप होती आणि ती हुशार ही होती.बारावीपर्यंतचे शिक्षण तिचे गावाकडेच झाले,पण पुढचे शिक्षण घेणे तिला परवडण्यासारखे नसल्याने, तिने शिक्षणाचा विषय सोडून दिला. आईला मदत करू लागली. तीही त्या दोघांबरोबर शेतावर कामाला जाऊ लागली. त्या शेताचे मालक तात्याराव स्वभावाने सज्जन गृहस्थ होते. त्यांना संपदा च वागणं-बोलणं, कामाचा उरक, स्वभाव खूप आवडायचा, म्हणूनच त्यांनी आणखी एक जबाबदारी ही तिच्या वर सोपवली. शेतातल्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा हिशोब ठेवण्याची जबाबदारी. तर अशा रीतीने आत्ता कुठे संपदा व तिच्या आई-वडिलांना जरा सुखाचे दिवस येत होते.
एकेदिवशी संपदा चे वडील म्हणजेच, सखाराम शेतामध्ये लावलेल्या ऊसाला रात्री पाणी देण्यासाठी जाणार होते. म्हणून, संपदा ची व तिच्या आईची, म्हणजेच लक्ष्मीची स्वयंपाकाची घाई चालू होती. सखाराम जेवण उरकून, हातात बॅटरी घेऊन घराच्या बाहेर पडला. सखाराम शेतावर आला तेव्हा साधारण रात्रीचे साडे नऊ झाले होते. आज जवळ - जवळ गेली वीस वर्ष तो या शेतात राबत होता. घाम गाळत होता. कित्येक वेळा तो वस्तीला शेतामध्ये थांबला होता. भीतीने कधीही त्याच्या मनाला स्पर्श केला नव्हता. पण, का- कोणास ठाऊक आज त्याचं मन थारयावर नव्हतं. सारखं भिरभिरत होतं कधी एकदा काम उरकून घरी जातोय असं त्याला झालं होतं. त्याला कारण, पण तसच होतं...... गेले काही दिवस गावांमध्ये भुताखेताच्या अफवा फार जोराने पसरत चालल्या होत्या. शेजारच्या गावात हनमा पाटलाचा जीव या भुतानेच घेतला. असं सारे म्हणत होते. जो कोणी रात्री वस्तीला बाहेर पडतो त्याचं काही खरं नाही असं सगळे म्हणत होते. म्हणून रात्रीच्या आठ नंतर गावांमध्ये चिटपाखरू पण घराच्या बाहेर पडत नव्हते. सखाराम जेव्हा शेतात आला त्यावेळी सगळीकडे निरव शांतता होती .........आजूबाजूलाही कोणाच्या वस्तीच्या मागमूस नव्हता. थंडगार वारा सगळीकडे सुटला होता. त्या वाऱ्यामुळे शेतातील पिके आणि झाडेझुडपे हलत होती. पानांच्या सळसळीचा आवाज त्या नीरव शांततेचा भंग करत होता. भीतीची एक लहर सखारामच्या मनात येऊन, त्याच्या अंगावर सर्रकनऽऽऽ काटा उभा राहिला होता. तसाच तो थरथरत विहिरीजवळ गेला, त्याने विहिरीची मोटार चालू केली. पाण्याचा लोट पाटा मध्ये जसा बाहेर पडला तसा त्या पाण्याच्या आवाजाने आणि कामाची जाणीव झाल्याने सखाराम च्या मनातील भीती बाजूला सारली गेली. तो पटापट शेतातल्या पाटाचा बॅटरीच्या साह्याने अंदाज घेत उसाला पाणी देऊ लागला. पण त्याचा वेळेचा अंदाज चुकला. त्याला पूर्ण शेताला पाणी देईपर्यंत रात्रीचे बारा सव्वा बारा झाले होते. त्याच्या लक्षात ही गोष्ट येताच तो झपाझप काम उरकू लागला. त्याने मोटर बंद केली व हातात काठी आणि बॅटरी घेऊन तो विहिरीजवळून निघाला. पण, अचानक त्याची बॅटरी बंद पडली. त्याने कितीतरी वेळा ती चालू करण्याचा प्रयत्न केला. पण, व्यर्थ.. ती काही चालू झाली नाही. त्याने बॅटरीचा नाद सोडून दिला व तो चालू लागला. तेवढ्यात त्याला पलीकडच्या शेतात कशाची तरी चाहूल लागली. खरेतर अंधारामुळे त्याला काही अंदाजही बांधता येत नव्हता, त्यामुळे तसाच तो त्या शेजारच्या शेताच्या दिशेने निघाला. अंदाज घेत काठी टेकवत तो त्या शेतात पोहोचला. तर समोरचे दृश्य बघून त्याला मोठा धक्का बसला .........
सखारामला शेतामध्ये काय दिसतं.....? सखारामचं पुढे काय होतं.....? पाहुयात पुढील भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा