समजूतदारपणा

माणसात समजूतदारपणा असला की कुठलचं नात तुटत नाही.


सावी सकाळी सकाळी आईकडे आली. दरवाजावरची  बेल जोर जोरात वाजवायला सुरुवात केली.आई आतून धावतच आली.

"कुणाचा जीव चाललाय एवढा? किती जोरात बेल वाजवली."

आईने दरवाजा उघडला, बाहेर सावी उभी दिसली. एका हातात बॅग आणि एका हातात पर्स. आई काही बोलणार त्या आधीच सावी आईशी काहीच न बोलता घरात आली, पर्स टेबलावर फेकली आणि बेडरुममधे गेली.

आई हे सगळं बघत होती, आईला कळून चुकलं होतं की तिचं तिच्या नवऱ्याशी म्हणजेच सुहासशी काहीतरी बिनसले. आई दरवाजा लावून घरात आली.


"सावी...अगं ऐ सावी काय झालं? एवढी रागात का आहेस? काय झालं काही सांगशील का नाही?"


"आई मला ना आता वेळ नाही, मला ऑफीसला  जायचं आहे, काही बनवलं असेल जेवण तर टिफीन भर नाहीतर कॅन्टीन मध्ये खाऊन घेईल."

"थांब भरते,आताच बाबा गेले ऑफिसला. तू घेऊन जा टिफीन मी माझ्यासाठी बनवून घेईल."

आईने टिफीन भरला आणि सावी ऑफिसला निघून गेली.


आईने सुहासला फोन केला.

"जावईबापू काय झालं? सावी अचानक सकाळी सकाळी निघून आली."

"आई काय होईल! नेहमी प्रमाणे तिचं ऐकल नाही , काही तिच्या मनाविरुद्ध झालं की ती सरळ घर सोडून जाते."

"मी तुम्हाला आधी पण सागितलं, तिचा जास्त लाड करू नका. मान्य आहे तुमचा प्रेम विवाह आहे आणि मी तिची आई असून सुद्धा हे सांगत आहे कारण आपण एकदा का कुणाचं ऐकत गेलो की त्या व्यक्तीला सवय होते त्या गोष्टीची आणि आपण कधीतरी त्याच्या विरुद्ध वागलं तर मग त्यांना राग येतो, चीड येते."

"हो...तुम्ही जे बोलत आहात ते सगळं बरोबर आहे पण.."

" बरं ... यावेळी काय झालं?"

" फारसं असं काही नाही. तिला या शनिवार रविवार फिरायला जायचं होतं. मी म्हटलं आपल्याला गावी जायचं आहे, आईने बोलावलं आणि यावरून आमची भांडण झाली."


"मग आता तुम्ही काय ठरवलं? जाणार असाल बाहेर."

"आई..मला खरचं कळत नाही काय करू?"

"तुम्ही खुशाल घेऊन जा  हिला तुमच्या आईवडिलांना भेटायला. दरवेळी तिचं ऐकलं पाहिजे असं काही नाही. पुढचं बघू आपण काय होते ते. तीन चार दिवस रुसून  बसेल मग होईल सरळ."


सुहास हसला...
"मला हे कळत नाही तुम्ही माझी आई की तिची?"

"मी जो बरोबर असेल त्याची बाजू घेईल मग तो जावई का असे ना..मला माहित आहे तिच्या बाबांनी तिला लाडावून ठेवली."

"चला मी पण जातो ऑफिसला आधीच खूप उशीर झाला आहे. उद्या निघेल मी दुपारी ,तिला सांगा तसं."

"हो...चालेल."

संध्याकाळ झाली सावीचे बाबा घरी परतले. घरी आल्या आल्या  त्यांना बॅग दिसली.

"अरे वा! सावी आली वाटतं. कुठे आहेस बाळा तू ."

"ओरडू नका. ती ऑफिसला गेली आहे, येईल एवढ्यात."

"बरं जावाईबापू कुठे बाहेरगावी गेलेत वाटत?"

"नाही इथेच आहेत, मॅडम भांडून आल्यात."

"अशी काय बोलते गं? जशी काय तीचीच चूक आहे."

" पुरे आता लेकीच कौतुक."

तेवढ्यात सावी आली...
"कुणाचं कौतुक चाललयं आई बाबा.."

"आलीस बाळा, बस दमली असशील."

आई हळूच.."हो नवऱ्याशी भांडून"

आईने पाणी दिलं आणि चहा दिला दोघांना.

"बाबा आज आपल्या आवडीच्या ठिकाणी जाऊ जेवायला बरेच दिवस झाले आपण नाही गेलो तिकडे जेवायला, आईला पण तेवढाचं आराम."


" हो चालेल...आवर मग आईला पण सांग लवकर आवरायला.."

तिघे तयार होऊन बाहेर पडले.
सावीने तिच्या आवडीचं पनीर मसाला मागवलं तर आईने झणझणीत कोल्हापुरी भाजी मागवली, बाबांना दोन्ही भाज्या आवडीच्या.

जेवतांना एक एक विषय निघत गेला. मस्त गप्पा रंगल्या मात्र आईच्या मनात काही वेगळचं चाललं होतं.

"अगं... उद्या सुहास जाणार आहे बरं का गावी."

"तुला सांगितलं वाटतं...तुला सांगायला वेळ आहे त्याला मात्र मला नाही."

"अगं त्याने नाही केला फोन, मीच केला त्याला. तेव्हा सांगितलं त्याने."


"अच्छा! मग सगळं सांगितलं असेल मी कशी चुकले , तो कसा बरोबर ."

"नाही मी काही विचारलं नाही आणि त्याने काही सांगीतलं नाही. फक्त एवढं बोलला मी गावी जाऊन येतोय आईबांबाची भेट घेऊन. बरेच दिवस झाले भेटलो नाही. सावीला पण तुम्हाला भेटायचं होतं म्हणून ती तुमच्याकडे आली. हा थोडं वाईट वाटेल आई बाबांना पण सांभाळून घेईल मी सगळं. सावी सांभाळून घेते मला नेहमी."

"आई तुला खरं सांगू का मला जायचं नव्हतं म्हणून मी भांडूण आले त्याच्याशी."

"अगं पण का भांडलीस त्याचं काय चुकीचं आहे? तो काय रोज जातो का गावी? आणि तुझं कर्तव्य आहे त्याच्या सोबत जाण. तुझे सासू सासरे आहेत ते. तो येतो ना तू म्हटलं तेव्हा. त्याचा समजूतदारपणा प्रत्येक गोष्टीत दिसतो. तू कधी समझदार होशील ? हा खूप मोठा प्रश्न आहे मला."

"अगं तू कशाला रागवत आहेस तिला?"

"अहो चुकलं तर आपण त्यांना समजून सांगायला हवं. जरुरी नाही की आपली मुलगी आहे म्हणून ती दरवेळी बरोबर असेल."

"आई मी चुकले, सॉरी. मी खरचं सकाळी खूप बोलून आले त्याला पण तो काहीच बोलला नाही. मी रागात निघून आले, मी आताच जाते घरी."

"अगदी बरोबर बोललीस तू. अगं भांडणं कुणाची होत नाही. पण दरवेळी ओढून नाही धरायचं. कधी कधी समजूतदारपणा दाखवावा माणसाने त्यांतच सगळं सुख आहे. जशी तुझे आई बाबा आहेत तसेच त्याचे पण आहेत."

"आई बाबा तुम्ही जा घरी, मी जाते माझ्या घरी."

"अगं उद्या सकाळी जा आता खूप रात्र झाली आहे. एकटी कशी जाशील? बॅग पण घरी आहे."

"उद्या घेऊन जाईल मी बॅग."

तेवढ्यात तिकडे सुहास आला.

"बाबा एकटी नाही ती ..मी पण आहे,"

सावी उठली आणि म्हणाली."
"तू इकडे कसा?"

"अगं माझ्या सासुबाईएवढी समझदार तू असती ना तर आपण आता सोबत जेवण केलं असतं इथे. उगाच मला एकट्याला जेवावं लागलं."

" आई तू!!!"

सावी आईला बिलगली.

"चलं आज खूप उशीर झाला आहे, तशीही तू रविवारी लवकर उठत नाही आणि उद्या तर आपल्याला गावी निघायचं आहे."

"जसा काही तू लवकर उठतो."
बाबांना वाटलं या दोघांचं अजून भांडण सुरू होईल म्हणून ते बोलले,...

"निघा आता उरलेलं घरी जाऊन भांडा."

सावी आणि सुहास त्यांच्या घरी निघून गेले तर आई आणि बाबा त्यांच्या घरी निघून गेले.

"खरंच माणसात समजूतदारपणा असेल तर कुठलचं नात तुटणार नाही ते अधिक घट्ट होत जाईलं. मग ते नात कुठलही असो."

समाप्त...
धन्यवाद!
©®कल्पना सावळे