चटपटीत सांभारवडी : पुडाची वडी

A tasty nutritious all time favourite snack : Sambharvadi, Kothimbir vadi, or Pudachi vadi.


हिवाळा सुरू झाला की पालेभाज्या छान मिळू लागतात. कोथिंबिरीच्या हिरव्या गार जुड्या मन मोहवायला लागतात. मग भाजी आणताना आपसूकच एखादी कोथिंबिरीची जुडी जास्तच आणली जाते. मग अशा या लहान पानांच्या हिरव्यागार गावरान कोथिंबीरीचे काही चटपटीत, चटकदार करता आले तर किती छान होईल ना ? मुलांसाठी आणि एकंदरीत घरातल्या सर्वांसाठीच, चविष्ट आणि पौष्टिक सुद्धा. असं सगळं एकत्र मिळालं तर गृहिणीसुद्धा खुश होणारच की नाही? चला तर मग, बघूया विदर्भाकडे प्रसिद्ध असलेली ही चटपटीत सांभार वडी कशी बनवायची ते.


सांभारवडीसाठी आवश्यक साहित्य

पारीसाठी:
बेसन एक कप ,
मैदा एक कप,
मीठ अर्धा चमचा किंवा चवीनुसार ,
हळद अर्धा छोटा चमचा ,
लाल तिखट अर्धा चमचा ,
ओवा अर्धा चमचा ,
तेल पाव कप कडकडीत गरम करून या पिठामध्ये घालायचे आहे. हे झाले पारी बनवण्याचे साहित्य .( यातील पिठाचे प्रमाण दीड कप बेसन एक कप मैदा किंवा थोडेसे तांदळाचे पीठ असे घेतले तरी चालते. )

आता सारण बनवण्याचे साहित्य बघू.
तेल एक चमचा ,
जिरे एक चमचा ,
आलं  एक इंच,
हिरव्या मिरच्या 2 ,
खसखस एक चमचा,
तीळ दोन चमचे ,
सुक्या खोबर्‍याचा कीस किंवा डेसिकेटेड खोबऱ्याचा कीस पाव कप ,
शेंगदाण्याचा जाडसर कूट पाव कप ,
धने पावडर एक छोटा चमचा,
लाल तिखट अर्धा चमचा किंवा चवीनुसार ,
जिरा पावडर अर्धा चमचा ,
गरम मसाला अर्धा चमचा ,
मीठ चवीनुसार ,
आमचूर पावडर साधारण पाऊण छोटा चमचा.,
साखर एक चमचा आणि
बारीक चिरलेली कोथिंबीर 100 ग्रॅम .
थोडेसे काजूचे तुकडे आणि किसमिस ( ऑप्शनल आहेत.)
तळण्यासाठी तेल.


सर्वप्रथम कोथिंबीर निवडून देठ वगैरे काढून नीट स्वच्छ धुवून घ्या मग ती पाणी निथळण्यासाठी ठेवून द्या आणि कापडावर टाकून कोरडी करून मग बारीक चिरून घ्या .

मिरची आणि आल्याची भरड करून घ्या. हवा असेल तर यात लसणाच्या काही पाकळ्या भरड करताना घालू शकता. पण नाही घातला तरी चालतो.

आता पारीसाठी पीठ मळून तयार करून घेऊ . त्यासाठी बेसन आणि मैदा एका मोठ्या बाउलमध्ये घेऊन एकत्र करावा. त्यात मीठ चवीनुसार, हळद , लाल तिखट टाका. ओवा हातावर थोडासा चोळून टाका. पाव कप तेल कडकडीत गरम करून ते या पिठामध्ये ओता आणि हे सगळं साहित्य आधी चमच्याने आणि नंतर हाताने नीट एकत्र करून घ्या. तेल पिठात सगळीकडे मिसळायला हवे. मुठीत थोडे पीठ घेऊन बघा. पिठाची मूठ बांधल्या गेली पाहिजे. आता थोडे थोडे पाणी टाकत याचा मऊ पण घट्टसरच गोळा बनवा.  गोळा पोळीच्या पिठापेक्षा घट्टच हवा. आता हा झाकून वीस मिनिटे बाजूला ठेवा.

तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊ. आता एका जाडसर बुडाच्या किंवा नॉनस्टिक कढईमध्ये मध्ये एक चमचा तेल घ्या . ते गरम झाल्यानंतर त्यात जिरे टाका, ते तडतडल्यावर त्यात आलं आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट टाका. ती परतून झाल्यानंतर त्यात खसखस टाका. एक मिनिट परतल्यानंतर तीळ टाका. तीळ भाजून होईपर्यंत परता.  हे कढईतले साहित्य चमच्याने सतत हलवत राहायचे आहे. आता त्यात सुक्या खोबऱ्याचा कीस टाका. याला एक दोन मिनिटं परतल्यानंतर त्यात शेंगदाण्याचा जाडसर कूट टाका. हे एकत्र केल्यावर त्यात मसाले टाकायचे आहेत, धने पावडर, लाल तिखट, जिरे पावडर, गरम मसाला, मीठ, आमचूर पावडर आणि साखर. काजूचे तुकडे आणि किसमिसही टाका. हे सगळे टाकत एका हाताने एकत्रही करत हलवत रहा, म्हणजे सारण बुडाला लागून करपणार नाही. आता यात कोथिंबीर टाका आणि एकत्र करा. कोथिंबीर मध्ये पाणी असायला नको . फक्त एक-दीड मिनटे परतायचे आहे. कोथिंबीर शिजवायची नाही. आता हे चटपटीत सारण तयार झाले हे थंड झाल्यानंतर सांभार वडी करायला घेऊ या.

पिठाचे छोटे छोटे गोळे करून झाकून ठेवा. त्यातील एक गोळा घेऊन त्याची पोळपाटावर पुरीपेक्षा पातळ आणि सगळीकडून एकसारखी पारी लाटून घ्या. आता त्यावर दोन चमचे तयार सारण मधोमध छोट्या, लांब आयताकृती आकारात ठेवा. दोन्ही बाजूंनी कडा दुमडून घ्या. पारीला सारणावर तिसऱ्या बाजूने दुमडून घेत, चौथ्या बाजूच्या शेवटच्या कडेला किंचीत पाण्याचा बोट लावून पुढे ती रोल करून घ्या. सगळीकडून कडा नीट व्यवस्थित दाबून बंद असल्याची खात्री करून घ्या . पोळपाटावर रोल हाताने थोडासा फिरवून सगळीकडून एकसारखा करून घ्या. अशाप्रकारे सर्व पाऱ्यांचा सारण भरून रोल तयार करून घ्यावा. हे भरलेले रोल झाले की तसतसे झाकून ठेवावे म्हणजे सुकणार नाहीत.

तळण्यासाठी कढईमध्ये तेल घेऊन ते मध्यम आचेवर मध्यम गरम करावे. छोटासा पिठाचा गोळा तेलात टाकून बघावा. आता यात एकावेळी मावतील तेवढे  रोल तळण्यासाठी टाकावे. सर्व बाजूंनी मंद आचेवर साधारण पाच-सहा मिनिटे तळल्यावर शेवटी एक दीड मिनिट गॅसची फ्लेम थोडीशी वाढवता येईल. अशा रितीने सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत हे रोल्स म्हणजेच सांभार वडी तळून घ्यावी. अशाच प्रकारे उर्वरित संभार वड्याही तळून घ्याव्या. ही झाली चटपटीत सांभार वडी खाण्यासाठी तयार.

ही सांभार वडी आपण दह्याच्या चटणीबरोबर खाऊ शकतो. सहसा ही दह्याच्या चटणीबरोबर दिली जाते. किंवा तळलेली मिरची, हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉसबरोबर सुद्धा देता येते. अगदी काही नसेल तरी नुसती सांभारवडी सुद्धा छान लागते. डब्यात देण्यासाठी किंवा दिवसाच्या कोणत्याही वेळी खाण्यासाठी चटपटीत तसेच पौष्टिक पदार्थ आहे. थंडीच्या दिवसांमध्ये विदर्भामध्ये आवर्जून तयार केला जाणारा हा पदार्थ . करून बघा, खाऊन बघा.

© स्वाती अमोल मुधोळकर.

सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.
फोटो, गूगल साभार.

रेसिपी शेअर करायची असल्यास लेखकाच्या नावासहित,  लिंक शेअर करावी.

ब्लॉग आवडल्यास लाईक, कमेंट नक्की करा.