Sep 23, 2023
मराठी बोधकथा

समयसुचकता

Read Later
समयसुचकता

मराठी बोधकथा

आशिष हा बुद्धिमान, प्रामाणिक, कष्टाळू आणि कुणाच्याही मदतीला सदैव तत्पर असलेला मुलगा होता. नुकतेच त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केले  व तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. दररोज सकाळी तो नित्यनेमाने मित्रांबरोबर फिरायला जायचा.

एक दिवस सर्व मित्र रेल्वे रुळाच्या कडे कडेने फिरायला निघाले. तेवढ्यात त्याला रेल्वेच्या रुळाखाली पडलेले भगदाड दिसले. कुणीतरी काँक्रीट फोडून रेल्वेचे रूळ वेडेवाकडे केले होते. अगदी क्षणात  त्याला मोठ्या घातपाताची कल्पना आली.

रेल्वेचा मोठा अपघात घडवून आणण्याचे कुणाचे तरी कटकारस्थान त्याच्या लक्षात आले. शेकडो लोक मरण पावतील, हजारो लोक जखमी होतील, समाजाची प्रचंड हानी होईल, या जाणिवेने त्याचा जीव घाबरला. अपघात टाळलाच पाहिजे असे त्याला तीव्रतेने वाटले.

अगदी क्षणाचा ही विलंब न करता,मित्रांकडे लक्ष न देता आशिषने स्टेशन कडे धाव घेतली. स्टेशन मास्तरांना भेटला. संकटाची संपूर्ण कल्पना दिली. सुरुवातीला स्टेशन मास्तरांचा त्याच्यावर विश्वास बसेना पण त्याचे कळकळीचे बोलणे ऐकून स्टेशन मास्तरांनीही धोका टाळण्यासाठी पाहणी केली. किती भयंकर अपघात घडला असता याची त्यांना कल्पना आली. त्याचवेळी रुळावरून येणारी गाडी थांबवण्यात आली.

जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस, पोलीस अधीक्षक वगैरे सर्व अधिकारी दाखल झाले आणि त्वरेने पुढील कारवाई केली गेली. अशा प्रकारे आशिषच्या समय सूचकतेमुळे एक भयानक अपघात टळला होता. या त्याच्या कृतीची दखल घेऊन पुढे सर्वांच्या वतीने त्याचा मोठा सत्कार सुद्धा झाला.

तात्पर्य - उत्तम संस्कार लाभले तर एक चांगली व्यक्ती कशी घडू शकते याचेच हे उदाहरण. समाजात राहत असताना समाजाचे  आपल्याला काही देणे आहे याचा विचारही आपण केला पाहिजे. रस्त्याने जात असताना एखादा मोठा दगड रस्त्यावर पडलेला असेल किंवा अनकुचीदार वस्तू पडलेली असेल तर दिसत असूनही त्याच्या बाजूने जाणारेही असतात. पण ती वस्तू वेळेस उचलली गेली तर मागून येणाऱ्याचे नुकसान टळू शकते.रस्ताने एखादा अपघात झालेला दिसला तर आपण गाडी थांबवून वेळीच त्याला मदत केली तर त्या व्यक्तीचे प्राण देखील आपण वाचवू शकतो.

शिक्षणाचे उद्दिष्ट " विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवणे " हे असते. आशिष सारख्या कर्तव्यदक्ष, प्रामाणिक युवापिढीची खरोखरचं समाजाला गरज आहे.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप: