विषय: तिचं आभाळ
उन्हाळ्याचे दिवस होते. हॉल मधला सिलिंग फॅन सुरु होता. अचानक चिमणी किचन मधून हॉल मध्ये आली. कुणास ठाऊक पण माझ्या मनाला वाटलं की पटकन पंखा बंद करायला हवा. नाही तर चिमणी त्याच्या पात्यात अडकुन धडकेल, पडेल. आणि मी पंखा बंद करायला उठलो. माझ्या हालचालीने चिमणी जास्तच घाबरली. अस्ताव्यस्त गिरक्या घ्यायला लागली. पंखा फिरतच होता. नको तेच झालं. चिमणी पंख्याला धडकली आणि झटकन मरून पडली. तिला छोटीशी जखम झाली होती. पाय ताणलेले, पंख फाटलेले,डोळे उघडे होते आणि उघड्या डोळ्यात आकाशाचं प्रतिबिंब पडलेलं होतं.
एका क्षणात हे घडलं आणि आम्ही सुन्न होऊन गेलो. एक प्रचंड अपराधाची भावना दाटून आली. चिमणा घरात नव्हता. पिल्लं आत घरट्यात होती. त्यांना माहित नव्हतं की त्यांची आई बाहेर मरून पडली आहे.
आम्हाला खूप टेन्शन आलं. आता या पिल्लांचं कसं होणार. त्यांना कोण खाऊ घालणार. त्यांना कोण उडायला शिकवणार. आई नसलेल्या या पिल्लांना आकाशाची ओळख कोण करून देणार. प्रश्नच प्रश्न. उत्तर नसलेले प्रश्न.
थोड्या वेळाने चिमणा आला. त्याला काहीच कल्पना नव्हती. चिमणीचा पत्ता नव्हता. पिल्लं आत चिवचिवत होती. तो बाहेर हॉल मध्ये आला. पडद्याच्या दांडीवर बसला. घरट बांधायच्या आधीही तो असाच बसला होता. पण आताच बसणं पूर्णपणे हरल्यासारखं होतं. खाली जमिनीवर त्याची सतत किलबिल करणारी सहचारिणी चोच वासून, अबोल होऊन डोळे उघडे ठेऊन निपचित पडलेली होती . जातांना त्याच्या खांद्यावर पाच पिल्लांच्या जबाबदारीच ओझं टाकून सोडून गेलेली होती. सगळं घरटंच विस्कटल्या सारखं झालं. प्रश्न एकच होता की या पिल्लाचं आता कसं होणार.
चिमण्याने क्षणभर चिमणी कडे बघितलं आणि थोड्यावेळाने उडून गेला.
एक तास झाला. दोन तास झाले. पिल्लांचा आक्रोश ऐकवला जातं नव्हता. आम्हीही सुन्न. न कळत या गोष्टीला आम्हीच जबाबदार होतो. अजून काही वेळ गेला तर पिल्लं अशीच आईविना आणि अन्न पाण्या शिवाय आक्रोश करत तडफडून मरून जातील.
आणि अचानक, खिडकी मध्ये चिमणा आलेला दिसला, पण या वेळी तो एकटा नव्हता. त्याच्या सोबत छोटीशी, छातीवर काळा डाग असलेली एक तरुण चिमणी होती. दोघांच्या तोंडात खाऊ होता. दोघेही घरट्यात पिल्लांकडे गेली. आता पिल्लांचा आक्रोश थांबलेला होता.
आज या गोष्टी ला खूप वर्ष झालीत. पण त्या चिमण्याने त्या नवीन चिमणीला सगळी घटना कशी सांगितली असेल आणि केवळ दोन तासाच्या आत ती चिमणी त्याच्या पिल्लांची जबाबदारी घ्यायला कशी तयार झाली असेल .हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही आणि कधी सुटेल असंही वाटतं नाही.
कधी कधी मनात विचार येतो असं जर माणसाच्या बाबतीत घडल तर इतक्या तातडीनं निर्णय घेऊन समाज हे जीवघेणे प्रश्न सोडवतो का. किंवा त्या पिल्लांसाठी तरी तातडीनं मदतीला धावून जातो का. प्रश्नाच्या उत्तराने मी खाली मान घातली होती.
पण एक गोष्ट मात्र खरी आहे की निसर्गातील माणूस सोडला तर सर्वच प्राणी पक्षी सहज पणे समायोजन करतात. आणि दुसरी गोष्ट की प्रेमाला आणि दुःखाला भाषाच नसते.
( समाप्त )
लेखक: दत्ता जोशी
लेखक: दत्ता जोशी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा