समायोजन ( भाग एक )

निसर्गात एक माणूस सोडला तर सर्वच प्राणी, पक्षी समायोजन करतात. कारण प्रेमाला आणि दुःखाला भाषाच नसते.
समायोजन ( भाग पहिला )

विषय: तिचं आभाळ

तुमच्या घरात कधी काळी चिमणीने घरट बांधलं आहे का ? किंवा आता तुम्ही राहता ते घर स्वतःच आहे का ? बांधलेलं असेल तर  तुम्हाला ही गोष्ट नक्की पटेल. असं म्हणतात की मुंबईत जागा घेणं या जन्मात तरी शक्य गोष्ट नाही. मराठी माणसाला तर नाहीच नाही. पण लहान पणासून कथा कवितेत आपल्याला भेटतं असलेल्या चिमणीला मात्र आपल्या घरात सहज जागा मिळते. ईतर पक्षांप्रमाणे ती झाडावर घरटे बांधत नाही. पणं चिमणी मात्र सरळ आपल्या घरातच  आश्रय घेते. त्या मुळे तात्पुरता आसरा घेऊन नंतर घर न सोडणाऱ्या मुजोर भाडेकऱ्या सारखं तिचं वर्तन असत.  किंबहुना आपलं घर तिला आवडलं हा तिनेच आपला बहुमान केला आहे असं तिचं उपकार केल्या सारखं वर्तन असत. पण का कुणास ठाऊक माणूस कितीही निष्ठूर असू द्या , चिमणीच घरट काढून टाकायला कोणाचं मन देखील होत नाही.

कावळाही लहान पणीच भेटतो पणं बिचाऱ्याच्या नशिबी जन्मा पासूनच उपेक्षा आलेली असते. जेवढ्या हक्काने चिमणी आपल्या घरात येते तितक्या हक्काने कावळा कधीच जवळ येत नाही. इतकच काय पण आपण जिवंत असेपर्यंत आपल्या आसपासही कधी फिरकत नाही. पण तोच कावळा , आपल्या पिंडाला शिवावा,  म्हणून त्याला आपण हात जोडून विनंती करतो . असं आहे आपलं आणि पक्षांचं साहचर्य.
         
म्हणून जेंव्हा एक चिमणा आणि एक चिमणी  घरातल्या पडद्याच्या दांडी वर येवून बसली . सगळ्या खोल्यांमध्ये फिरून, घराचं सगळ्या बाजूने निरीक्षण करू लागली. त्याच क्षणी मला त्यांचा विचार समजला. त्यांना घरट बांधायचं होतं.

माणसा प्रमाणेच घर निवडण्याची जबाबदारी चिमणी वरचं असते. शेवटी तिला घर सांभाळायचं असत. त्या दृष्टीनं ती त्या घरट्याची गृहलक्ष्मीच की. तिचा मान तिला मिळायलाच हवा.

चिमणी ज्या वेळी घर तपासत होती त्या वेळी चिमणा त्याची काळ्या ठिपका असलेली ,ईवलिशी  टिचभर छाती काढून मान वेळावून कधी चिमणी कडे तर कधी आमच्या कडे पाहात होता. पडद्याच्या दांडीवरून सारखा इकडून तिकडे फेऱ्या मारत होता.जणू तो सांगत होता ,

" बुरी नजर वाले तेरा मुह काला. बच्चमजी चिमणीला एकटं समजू नका. इथं मी  तिचं संरक्षण करायला आहे. "

चिमणीने तर आमच्या कडे पूर्णपणे दुर्लक्ष सगळ्या खोल्यांची पाहणी केली. शेवटी माळावर  इन्व्हर्टर जवळची जागा तिला पसंत पडली असावी असं मला वाटलं. कारण नंतर दोघेही उडून गेली होती .

घर बांधणं माणसांसाठी असो वा पक्षांसाठी, त्या साठीच्या दगदगी, धडपडी आणि स्वप्नं सगळ्यांची सारखीच. अगदी जागा पाहण्या पासून सुरवात करावी लागते. त्या नंतर  सोय आणि सुरक्षितता असली तर  मग घराचं नक्की करून  मग पुढच्या तयारीला लागावं लागतं .मनुष्य आणि पक्षी यांच्यात एकच फरक असतो की  जर पिल्लं जन्माला येणार असतील तर , छोट्याशा का होईना पण स्वतःच्या  घरात यावीत या विचारावर  पक्षी जास्त ठाम असतात.

पक्षी घरट बांधतो. माणूस घर बांधतो. काय बरं फरक असावा घर आणि घरट्यात ? मी विचार करायला लागलो. मग समजल की आपण घर विकत घेतो. बांधत नाही. त्या मुळे त्याची ओढ पक्ष्या सारखी आपल्याला लागत नाही. त्याच्या कडे आपण इनव्हेस्टमेंट म्हणून बघतो. प्रॉपर्टी म्हणून गुंतून पडतो. पक्षी मात्र घरट्याला स्वतःला हवं तस स्वतः काडी काडी आणून बांधतात. त्या घरट्याला आकाशाशी जोडणारा दुवा म्हणून बघतात. त्यांची स्वप्न आकाशात भरारी घेण्याची असतात. आकाश त्यांना खुणावत असतं. म्हणून ती अशा घरट्यात गुंतून पडत नाही.

काहीही असो पणं आमचं घर चिमणीला आवडलं होतं. पण याचं घरातून दिसणाऱ्या आभाळाला आपण लवकरच पारख होणार आहे याची तिला अजिबात कल्पना नव्हती.

( क्रमशः)
लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all