समस्या प्रत्यक्षात असते त्यापेक्षा मोठी ती आपल्या डोक्यात असते

माणस तीच पण आलेल्या समस्येला सकारात्मकतेने सामोरे जात परिस्थिती हाताळली तर आनंदी आनंद गडे जि?

आज रेवाचे मन कशातच लागेना. कसल तरी अनामिक दडपण जाणवत होत . चित्त था-यावर नव्हते अजिबात. गौरी-गणपती साठी म्हणून ते दोघ लग्नानंतर सात महिन्यांनी भारतात घरी येत होते. लग्न झाल्यावर लगेचच ते दोघे परदेशात आले होते. सासरच्यांशी अजून नीट ओळखच झाली नव्हती, घसट तर लांबच. त्यात तिचे आंतरजातीय लग्न. तो मोठा अडसर होताच. अजून बरीच कवाडे उघडायची होती. भिंती ओलांडायच्या होत्या. लग्न झाल तरी तिची जात चिकटलीच होती तिला.
इकडे रेवाच्या सासुबाई पार दमून गेल्या होत्या, काम करुन नव्हे तर विचार करुन करुन. गणपती गौरी साठी गावातले सगळे  नातेवाईक येणार.  मुलगा सुन वेळेवर येणार. रेवाला केव्हा आणि कसं शिकवू सार? या आजकाल च्या पोरी नोकरी करणाऱ्या, स्वतःचे मत असणाऱ्या. रेवाला रस आहे का या सगळ्यात? नातेवाईक तर मायक्रोस्कोप हातातच घेऊन बसलेले. कस होणार? देवा, परमेश्वरा संभाळ रे बाबा.
रेवाच्या आईची तर झोपच उडाली रेवा येतेय हे कळल्यावर. 'कस होणार या बयेच" हे हजारदा म्हटलेल वाक्य परत परत तोंडातून निघत होत. या पोरीला ना घरकामात रस, ना स्वयंपाकघरात. सणवारांपासून तर ही कायम चार हात लांबच राहीली. रेवा  तिचा अभ्यास, खेळण, नंतर नोकरी यातच कायम बुडालेली. बर स्वभाव पण रोखठोक. कुणी अरे म्हटल की ही लगेच कारे म्हणणार. त्यात त्या लोकांच्या रीतीभाती वेगळ्या. 'कस होणार या पोरीच? देवा आता तुझ्यावरच रे भिस्त सगळी'. रेवाची आई पुटपुटली.
 रेवाच्या सासुबाईंना पहाटेच जाग आली.  आदल्या दिवशी जरा लेटच आली flight. जेटलॕग असणार त्यामुळे रेवा उशीराच उठेल याबाबत त्यांना खात्रीच होती. चहाच आधण ठेवायला त्या किचनमधे गेल्या आणि अंचबितच झाल्या. रेवा जरीकाठाची साडी नेसून, छान तयार होऊन ओटयाजवळ चहा करत उभी होती. रेवाने सासुबाईंना गरमागरम चहा दिला. दिवसाची सुरवातच इतकी प्रसन्न झाली. दिवसभर मग या आनंदाची कमान चढतीच राहीली.
रेवाला ओरिगामी यायच. तिने छान मखर बनवल गौरीसाठी. रेवाला रांगोळी काही येत नव्हती मग तिने ताजी फुल पान वापरुन छानशी रांगोळी काढली. सासुबाईंनी स्वयंपाकघरातली हलकीफुलकी काम तिला समजावली. दोघी सासासुना अस मिळून काम करताहेत बघून इतरांना खोडया काढायला जागाच उरली नाही.
रेवाला जाणवले किती छान आहेत या घरचे सगळे, मला पटकन सामावून घेतल. उगाच tension घेत होते मी. बाबा म्हणतात तेच खर, 'Problem असतो छोटा विचार करुन करुन आपण त्याला मोठा करतो.
रेवाच्या सासुबाई विचार करत होत्या. "किती अलगद मिसळली ही आपल्या घरात. उगीच बाऊ करीत होतो आपण'. त्यांना आईचे वाक्य आठवले,' समस्या असते लहानच विचार करुनकरुन ती आपल्या डोक्यात  वाढते'.
आता घरच्या ज्येष्ठा-कनिष्ठा आनंदात म्हटल्यावर सगळ घरच आनंदात न्हाऊन निघाल.