समर्थांची लेक भाग ४०
मागील भागात आपण पाहिले कि ती शक्ती म्हणजे असते अमृत जे दामोदरपंतांनी लपवलेले असते.. त्याची जागा कुठे आहे हे कळणार तोच अमर तिथे येतो आणि अक्षताला गोळी लागते.. पाहू पुढे काय होते ते..
मालतीताई महाराजांना विनंती करत होत्या..
"महाराज कृपा करून माझ्या लेकीला वाचवा.. तिच्याशिवाय माझे कोणीच नाही.. वाटल्यास माझा जीव घ्या पण तिला वाचवा.. एवढे दान माझ्या पदरात टाका.."
मीतने डोळे पुसले.. तो लिफाफा उघडला.. त्यात दामोदरपंतांनी तो कुंभ कुठे ठेवला आहे ते लिहिले होते.. त्यात लिहिल्याप्रमाणे तो कुंभ देवघरातच होता.. त्यांनी हळूच देव्हारा उचलला.. त्याखाली एक खाच होती.. मीतने त्या खाचेत हात घातला.. एक छोटा दरवाजा उघडला.. आत एका पाटावर तो कुंभ ठेवला होता.. ते उघडल्या उघडल्या चंदनाचा मंद वास दरवळला.. मीतने नमस्कार करून तो कुंभ तिथून उचलला.. आणि महाराजांसमोर आणला. काहीच न बोलता त्याने तो त्यांच्यासमोर धरला.. महाराजांनी दोन क्षण ध्यान केले.. त्या कुंभाला नमस्कार करून तो हलकेच उघडला. मोजून दोन थेंब त्यांनी अक्षताच्या तोंडात घातले.. सगळेजण आशेने त्यांच्याकडे पहात होते.. महाराजांनी परत तो कुंभ बंद केला आणि मीतला जागेवर ठेवायला सांगितला. ते परत ध्यान लावून बसले.. बाकी सगळे तिथेच बसून राहिले. महाराजांनी डोळे उघडले.. तिकडचे भस्म घेतले. ते अक्षताजवळ गेले. तिच्या कपाळाला ते भस्म लावून म्हणाले.."ऊठ आता अक्षता.." अक्षताने डोळे उघडले.. "मी आता आजी आजोबा , आत्या आणि बाबा यांच्याशी बोलत होते.. कुठे गेले ते?"
" अक्षता शांत हो.. मीत गाडी काढ.. आपण इकडच्या इस्पितळात जाऊ."
सगळेच हॉस्पिटलमध्ये गेले. मालतीताईंना पाहून डॉक्टरांनी लगेच अक्षताला तपासले.. गोळी लागली असूनही ती कशी बोलू शकते याचे तिथे सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होते.. तिचे ऑपरेशन करून गोळी काढण्यात आली.. "तुम्ही नशीबवान म्हणून गोळी ह्रदयाला चाटून गेली." डॉक्टर म्हणाले.."तिला वाचवले खरे.. पण तिला आरामाची जास्त गरज आहे.." अक्षताला घरी आणले.. खरेतर या अनपेक्षित घटनेने सगळेच चक्रावले होते. पुढे काय आणि कसे करायचे हा प्रश्न पडला होता.. तो प्रश्न सोडवला अविरतने.. गेले काही दिवस या सगळ्यांची चाललेली चर्चा तो ऐकत होता..
"मी काही बोलू?"
" बोलना.."
" तुम्ही सगळे अमरला शोधता आहात.. मला माहित आहे तो कुठे असेल तो.."
" तुला? कसे काय?"
" इथे कधी अडचण आली किंवा त्याला काही जाणून घ्यायचे असेल तर तो नेहमीच तिथे जायचा.. त्याची मदत घ्यायला.."
" त्याची?"
"हो.. ते काय आहे मलाही माहित नाही.. पण ते खूप भयानक आहे.. तो एकदा मलाच त्या पिंजर्यात पाठवणार होता पण शेवटच्या क्षणी त्याने विचार बदलला.. "
" पण ते ठिकाण कुठे आहे? आणि आपण कसे जाणार?"
" त्या जागेवर कोणीही जाऊ शकत नाही.. त्या जागेवर इतके मंत्र आहेत कि शोधणारा बाजूने गेला तरी त्याला सापडणार नाही.. पण माझ्याकडे काही तांदूळ आहेत.. जे आपल्याला तिथे नेऊ शकतील?\"
" तुला ते कोणी दिले? " महाराजांनी आश्चर्याने विचारले..
" अमर मला त्या पिंजर्यात सोडणार होता ते मी तुम्हाला सांगितले ना.. माझ्याऐवजी त्याने एका प्राण्याचा बळी दिला.. ते बघून मी खूप घाबरलो होतो.. खूप रडत होतो.. पण अमरला त्या आकृतीला काहीतरी विचारायचे होते आणि ते मी ऐकू नये अशी त्याची इच्छा होती म्हणून त्याने मला बाजूच्या दालनात पाठवले.. आधी तिथे खूप किंचाळ्या ऐकू येत होत्या.. पण माझा रडण्याचा आवाज ऐकून त्या बंद झाल्या.. एका शांत आवाजाने मला बोलावले. मी ही रडणे थांबवले इतका तो आश्वासक आवाज होता.. त्याने मला बाहेरून तांदूळ आणायला सांगितले. ते कुठे असतील तेही सांगितले.. मग माझ्याकडून काही मंत्र म्हणून घेतले.. मला सांगितले कि जेव्हा तुला इथे यायचे असेल तेव्हा रस्त्यात एक दाणा टाकायचा आणि तो ज्या दिशेला चमकेल त्या दिशेला जायचे.. ते तांदूळ कधीच आपल्यापासून दूर करू नकोस. असेही सांगितले.."
"मग ते आहेत तरी कुठे?"
अविरतने त्याच्या शर्टची आतली बाजू दाखवली.. त्यात एक पिशवी शिवलेली होती..
" कितीही काही झाले तरी मी सकाळी ती पिशवी घालायच्या कपड्यांना आतल्या बाजूने शिवायचो.."
" मग निघूया? कधी त्या अमरशी दोन हात करतो आहे असे मला झाले आहे?" मीत म्हणाला..
" नाही.. हे काम मीच करणार.. तुझ्या घरातल्यांना त्याने मरणास प्रवृत्त केले.. पण माझ्या घरातल्यांचा त्याने जीव घेतला आहे.. मी नाही सोडणार त्याला.." अक्षता म्हणाली..
" पण अक्षता, तू अजून पूर्ण बरी नाही झालीस.." मीत काळजीने म्हणाला..
" बरी असो वा नसो.. तो अमर अजून काही पावले उचलायच्या आत आपल्यालाच काही करावे लागेल..: अक्षता ठामपणे म्हणाली..
सगळ्यांनाच ते पटले.. अक्षता, मीत, अविरत आणि महाराजांनी जाण्याचे ठरवले.. निघण्याआधी न विसरता अक्षताने त्या बियांची रोपे केली व त्यांच्या शेंगा सोबत घेतल्या. एक शेंग तिने देवघरात जपून ठेवली. उद्धवमहाराज तिथेच राहून मालतीताई आणि त्या शक्तीची राखण करणार होते.. त्या तांदळाच्या सहाय्याने ते सगळे त्या वाड्याजवळ येऊन पोचले.. आता तो वाडा कसा शोधायचा हाच प्रश्न होता..
" अविरत तुम्ही आत कसे जायचा?" महाराजांनी विचारले.
"मला खरेच नाही आठवत.."
" मला मदत करशील?"
" हो.. काय करायचे आहे?"
" तू इथे शांत बस.. आणि डोळ्यासमोर घडलेल्या घटना आणण्याचा प्रयत्न कर.. मी त्यातून काही करता येते का बघतो.."
महाराजांनी परत एकदा अविरतच्या मनात प्रवेश केला. यावेळेस अमर मंत्र म्हणताना त्यांना ऐकू आले.. महाराजांच्या चेहर्यावर हास्य आले.महाराजांनी ते मंत्र म्हणायला सुरुवात केली.. आणि समोर तो वाडा दिसायला लागला.. सगळ्यांना आश्चर्य वाटले. पण आता आश्चर्य करत बसायला वेळ नव्हता.. एक भगवे वस्त्र अक्षता आणि मीतने पांघरले तर दुसरे महाराज आणि अविरत याने.. अविरतला आतले सगळे माहित होते.. तो सगळ्यांना रस्ता दाखवत होता.. आतल्या दालनात अमर त्याच्या काही सहकाऱ्यांसह बसला होता. अमरचे लक्ष जाण्याआधी हे सगळे घुसले ते नेमके पुस्तकांच्या दालनात.. त्यांनी वस्त्र धारण केले असल्यामुळेच पुस्तकांनाही त्यांची चाहूल लागली नाही.. अविरतने महाराजांना ज्या पुस्तकातून आवाज आला तिथे नेले.. महाराजांनी ते पुस्तक उघडले.. तिथे एक वृद्ध संन्यासाचे चित्र रेखाटले होते. त्या चित्राने डोळे उघडले.. आधी त्याने काही मंत्र म्हटले..
" तुम्ही प्रकट होऊ शकता. आता तुम्हाला धोका नाही.." खबरदारी म्हणून फक्त महाराजांनी आपले वस्त्र दुर केले..
" आपण कोण?" महाराजांनी विचारले.
" मी... मी अवनींद्रनाथ.."
"म्हणजे नारायणचे गुरू?"
" हो.. तोच दुर्दैवी.. "
" मग तुमची हि अवस्था?"
" त्यानेच केली.. मी माझ्या मुलीला इथून जाऊ दिले म्हणून.."
" म्हणजे?"
" खरेतर भूत आणि भविष्य बघता येईल इतकी माझ्याकडे शक्ती नक्कीच होती.. पण मी तिचा कधी दुरूपयोग केला नाही.. म्हणून त्या अमरचे खरे रूप मी वेळेत ओळखू शकलो नाही.. ज्यावेळेस कळले तेव्हा मी फक्त माझ्या गरोदर मुलीला इथून सोडवू शकलो.. आणि स्वतः अडकलो."
" मग यातून मुक्त होण्याचा काही उपाय तर असेल ना? मला सांगा. मी करतो मदत.."
" उपाय एकच.."
" कोणता? "
" हे सगळे अग्नीला समर्पित करायचे."
" पण हा सगळा वारसा?"
"या अशा दुष्टांच्या हाती पडण्यापेक्षा तो नष्ट झालेला बरा.. आणि याही पेक्षा महत्त्वाचे तो बाजूच्या दालनातील पशू.. ती जर शक्ती कोणाच्या हाती पडली तर सर्वनाश नक्कीच.."
" पण अमर तर ती शक्ती वापरतो ना?" गुरूदेवांनी आश्चर्याने विचारले.
" हो.. पण ते पूर्ण शक्तीनिशी नाही वापरू शकत तो.. कारण त्यासाठी त्याला स्वतःच्या रक्ताचा बळी देता आला नाही.."
" मग त्या शक्तीचा वापर?"
" तो फक्त छोट्यामोठ्या गोष्टींसाठी करू शकतो.. त्या पलिकडे नाही.. "
" अच्छा.. तुम्ही एवढी माहिती सांगतच आहात तर एक विचारावेसे वाटते.. अमरने लग्न नाही का केले?"
" तो नाही करू शकला.. कारण त्याने मला इथे बंदिस्त करण्याआधीच मी त्याला शाप दिला होता कि कोणत्याही अगदी कोणत्याही पद्धतीने तुझा वंश अस्तित्वातच येणार नाही..."
" अरे व्वा.. छान गप्पा रंगल्या आहेत तुमच्या.. अजून काही माहिती हवी असेल तर मी देतो.." पाठून अमर येत म्हणाला..
"नाही तुझ्या माहितीची मला गरज नाही.." महाराज शांतपणे म्हणाले..
" पण आम्ही आल्याचे तुला कसे कळले याची उत्सुकता मात्र नक्कीच आहे.."
" त्यात काही नवल नाही.. मी प्रत्येक ठिकाणी कॅमेरे लावले आहेत.. आणि मगाशी तुम्ही आत येताना तो दरवाजा उघडला गेलेला पाहिला मी.. आता इथेच गप्पा मारणार कि बाहेर जायचे? आणि तुमच्या सोबत जे कोणी आले आहेत त्यांना पण सांगा चेहरे दाखवायला.. दोन अंदाज तर मी नक्कीच करू शकतो.."
हे सगळे बोलणे चालू असताना अक्षताने काही बिया तिथे टाकल्या.. त्या लहान बिया कोणालाही दिसणार नाही इतक्या लहान होत्या.. मीत, अविरत आणि अक्षताने ते वस्त्र दूर केले.. अविरतला बघून अमरच्या चेहर्यावर काही क्षण एक वेदना दिसली.. पण लगेच त्याने स्वतःला सावरले..
" कशासाठी आला आहात तुम्ही इथे? हे म्हणजे मृत्युच्या गुहेत चालत जाण्यासारखे आहे.. कौतुक वाटते मला तुमचे.."
" त्यात कौतुक करण्यासारखे काय? तू आमची शक्ती चोरायला आलास, आम्ही तुला उद्ध्वस्त करायला आलो आहोत.. " अक्षता चिडून म्हणाली..
" उद्ध्वस्त?" अमर हसत म्हणाला..
" सुपर्णा तो ताईता घेऊन ये.." अमरने सुपर्णाला हाक मारली.. "आता मी दाखवतो तुम्हाला आत्म्याची शक्ती.. तो भैरोबाबाचा आत्मा.. जर मिळाला असता तर आम्ही खूप काही करू शकलो असतो.."
" विसर ते अमर.. ते तर शक्यच नाही.." मीत पहिल्यांदाच बोलला..
" का?"
"कारण त्या आत्म्याला मी आधीच मुक्त केले आहे.."
" मग मी जे काही कुपीत ठेवले होते ते?" अक्षताने विचारले..
" ती फक्त एक छाया होती.. त्या राजकुमारीला आणतानाच तू एवढी थकली होतीस कि त्या शक्तीशाली आत्म्याचा सामना कितपत करू शकशील हे मला माहीत नव्हते.. आणि माझे गुपितही मला तुला कळून द्यायचे नव्हते. म्हणून महाराजांच्या आज्ञेनुसारच मी त्याला मुक्त केले.."
" मी सोडणार तर तुम्हाला कोणालाच नाही.. पण तुला तर वेगळ्याच पद्धतीने मारीन.." अमर रागाने म्हणाला.. "सुपर्णा...."
सुपर्णा ताईताची कुपी तिथे घेऊन आली.. ती अक्षताच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हती..
" ठेव ती इथे.. आणि बघ मी काय करतो ते? आणि इथे तुझी हालचाल नको अविरत.. माझी माणसे बाहेर आहेत.. तुझी एक हालचाल आणि...."
सुपर्णा तिथून बाहेर निघून गेली. अमरने मंत्र म्हणत ती कुपी उघडली. त्यातून ताईता बाहेर आला आणि अक्षतासमोर जाऊन म्हणाला," कधी मुक्त करणार तू मला?"
अमर चिडला आणि बाकीच्यांना खूप आश्चर्य वाटले..
" आता लगेच.. हि घे तुझ्या सुटकेची चावी.." अक्षताने ते पेंडण्ट खिशातून काढले.. ताईताने हसत त्या पेंडण्टवर हात ठेवला.. काही क्षणातच ताईता आणि ते पेंडण्ट तिथून नाहिसे झाले..
" तू सुद्धा??"
" मग काय? तुझ्यासारख्या अनोळखी लोकांसाठी मी माझा मार्ग सोडू? फक्त मला सुपर्णा तुझ्यासोबत आहे हे माहित नव्हते.. नाहीतर मी हि त्याला आधीच मुक्त केले असते.. आणि तू सुपर्णाच्या आडून आम्हाला फसवले नाहीस? मी जाऊन आले त्या म्युझियममध्ये परत.. आमच्या विनंतीवरून त्याने रेकॉर्ड दाखवले.. त्याच्यात जरी नुसता धुर दिसत असला तरी ते बघितल्यावर माझी खात्री पटली कि सुपर्णानेच ताईताचा रांजण फोडला असावा.."
" हो बरोबर आहे तुझे.." सुपर्णा आत येत म्हणाली.. पण यावेळेस ती अजिबात नजर चोरत नव्हती.. " मी ते केले कारण मला याची खात्री पटवून द्यायची होती.."
"म्हणजे?" अमरने विचारले..
"कमला आठवते?"
" कोण कमला?"
" तीच कमला.. जिच्या बाळाला तुला मारायचे होते.."
" तुला कसे माहीत? "
" कारण मी त्याच कमलाची मुलगी आहे.." आता तर सगळेच चाट पडले..
"पण तुझे आईवडील तर वेगळेच आहेत.. ते या पंथातीलच आहेत.. "
" तू हे विसरतो आहेस.. तुझ्याआधी माझे आजोबा इकडचे सर्वेसर्वा होते. आणि त्यांचे सगळेच शिष्य तुझ्यासारखे दुष्ट नव्हते.. आजोबांच्या सांगण्यावरून आईने तिथे आश्रय घेतला.. त्यांनी माझा मुलगी म्हणून स्वीकार केला.. पण माझी आई तो प्रेमभंग सहन करू शकली नाही.. माझा जन्म होईपर्यंत कसेबसे तिने आपले रूप आणि वय सांभाळले.. पण नंतर सगळेच सोडून दिले.. ज्यामुळे ती कायमची मला सोडून गेली.. फक्त तुझ्यामुळे मला हे आयुष्य जगायला लागले.. पण तिने हे सगळे मला समजावे म्हणून व्यवस्थित लिहून ठेवले होते.. आणि माझ्या आईबाबांनी ते मला वाचायला दिले ही.. तेव्हाच मी ठरवले कि तुझ्या जितके जवळ येता येईल तेवढे यायचे.. आणि तुझ्याच पद्धतीने तुझा विनाश करायचा..
" अच्छा.. तर आज माझे सगळे शत्रु माझ्या समोर आहेत.. त्यात एक माझीच मुलगी आहे.. तर दुसरा एक ज्याला मी मुलगा मानले.."
" तेवढेच नाही.. तू ज्या लवच्या मुलाला शोधत होतास तो ही तुझ्यासमोर आहे.."मीत म्हणाला.
"मग आज हि नाही तर ती शक्ती मी मिळवणारच.. रक्ताचा बळी द्यायची माझी इच्छा पूर्ण होणारच. आता आधी मी या मीतचा बळी देतो.. मग तुमच्याकडे बघतो.. आत या रे.." अमरच्या डोळ्यात आता वेडसर झाक दिसत होती..
" कोणी येणार नाही.." सुपर्णा म्हणाली.."तुझी सगळी माणसे बेशुद्ध झाली आहेत.. मी मगाशीच त्यांना सरबत देऊन आले आहे.."
" तू..?" अमर सुपर्णाच्या अंगावर धावून जात होता.. त्याला मीत आणि महाराजांनी पकडले..
"अक्षता निघ.." महाराजांनी सांगितले..
अक्षताने प्रत्येक दालनात त्या बिया टाकायला सुरुवात केली..
" महाराज त्या बेशुद्ध माणसांचे काय करायचे?" अविरतने विचारले..
" आपण हिंसा करत नाही.. तू त्यांना वाड्याबाहेर ने.. नंतर ते आणि त्यांचे नशीब.." सुपर्णाही अविरतच्या मदतीला गेली.. महाराज अमरवर संमोहन टाकत होते..
"अवनींद्रनाथ, आज्ञा असावी.." महाराजांनी त्या पुस्तकातल्या आकृतीला विचारले..
" शुभं भवतु.. " त्यांनी आशीर्वाद दिला.. सगळेजण बाहेर आले.. सुपर्णाने निघायच्या आधी अवनींद्रनाथांना नमस्कार केला.. "आजोबा तुम्ही नाही मुक्त होऊ शकत?"
" नाही ग पोरी.. खूप वर्षे जगलो.. आता या संसाराचा कंटाळा आला.. पण तू तुझ्या बापासारखी वाईट वागू नकोस.. आपल्या आईसारखी वाग.."
अक्षताने एक छोटीशी काडी पेटवली आणि त्या बी वर टाकली. एकाला एक अशा त्या बिया पेटत गेल्या. क्षणार्धात तो वाडा पवित्र अग्नीच्या स्वाधीन झाला.. अनेक चित्रविचित्र आकृती वर जाताना दिसत होत्या.. काही आशीर्वाद देत होत्या.. तर काही त्या आगीपासून वाचायचा प्रयत्न करत होत्या.. आग बघून अमरचा स्वतःवरचा ताबा सुटला.. त्याने मीत आणि महाराजांचा हात झटकून त्या आगीत उडी घेतली... आणि त्याला गिळून जणू त्या वाड्याचा सूड पूर्ण झाला..
सुपर्णाच्या डोळ्यात पाणी होते.. ती अक्षताला काही बोलणार इतक्यात तिने तिला मिठीत घेतले.. आणि सगळे निघाले परत.. ती शक्ती सुरक्षित ठेवायला....
समाप्त...
लेखिकेचे दोन शब्द..
कथालेखनाला सुरूवात केल्याच्या काही दिवसानंतरच नारीवादी स्पर्धेची घोषणा झाली.. विषय अनेक डोक्यात होते.. पण वेगळे काहीतरी हवे होते.. दोनच दिवस आधी ती आणि ती हि कथा लिहिली होती.. विचार आला तिलाच पुढे का नको वाढवायला.. आणि त्यातून जन्माला आली समर्थांची लेक.. चुकत माकत हि कथा लिहित होते.. त्या कथेला प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.. अलविदा म्हणणार नाही.. कारण परत भेटावेसे वाटते आहे याच पात्रांसोबत पुन्हा एकदा.. त्यामुळे भेटू लवकरच.. तुमच्या लाडक्या अक्षतासोबत.. तोपर्यंत असेच प्रेम राहू दे..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा