समर्थांची लेक भाग ३८

Story Of A Female Ghostbuster

समर्थांची लेक भाग ३८



मागील भागात आपण पाहिले कि अक्षता आणि मीत नर्मदा परिक्रमा करायला निघतात.. तिथे त्यांना एक शस्त्र मिळते.. पाहू पुढे काय होते ते..




" अक्षता मला ना आता तुझ्या आत्याचे एक वाक्य आठवते.."

" कोणते रे?"

"भुते अक्षताला शोधत येतात.."

" काहिही.. आत्या तुला हे बोलली?"

" हो.. खरे.."

" कधी?"

" आम्ही एकदा भेटलो होतो.."

"मला न समजू देता?" अक्षताने आश्चर्याने विचारले..

" हो.. आपण त्या वाड्यावर जाऊन आल्यानंतर आत्या एकदा मठात आल्या होत्या. तिथेच त्यांनी मला पाहिले.. तेव्हा त्यांना कळले.."

"मीत महाराजांनी तुला सगळ्यांपासून लांब ठेवले होते?"

" लांब असे नाही.. पण त्यांचा प्रयत्न असायचा कि माझे आणि मठाचे नाते उघड होऊ नये याचा.. म्हणून मग मठात कोणी आले कि मला माझ्या खोलीत थांबावे लागे. पण तरिही मी आत्यांच्या नजरेला पडलोच.." मीत सांगत होता..

" मग आत्याने मला का सांगितले नाही?"

" तू तरी कुठे काही कळू दिलेस कोणाला? ते मार्तंड शास्त्रींचे मीच सांगितले महाराजांना.."

"अरे देवा.. तू ?" अक्षताला काय बोलावे ते सुचेना.." पण तू आणि सुपर्णा तर बाहेर गेला होता ना?"

" नाही.. माझे पोट दुखते आहे असे सांगून मी परत आलो. सुपर्णाचे मला माहित नाही.. तसेही मला तुला एकटीला सोडायचे नव्हते.. "

" तुला एवढे माहित आहे. मग बाबा गेले तेव्हा तिथून मला घरी कोणी आणले ते ही तुला माहित असावे.." अक्षताने विचारले..

" हो.. मी आणि उद्धवकाका होतो.. तुझे बाबा घरून घाईघाईत निघाले खरे. पण त्यांनी एक संदेश पाठवला होता.. त्या आधीच महाराज एका ठिकाणी गेले होते.. मग काकांनी मलाही बोलावून घेतले.. पण आम्ही पोचेपर्यंत थोडा उशीरच झाला.."

" पण तुम्हाला बाबा कुठे आहेत, हे कसे कळले?"

" अक्षता.. आपण सांप्रदायिक पंथातले असलो तरी मोबाईल वापरतो.. मोबाईल तू विसरली होतीस. तुझे बाबा नाही.. आम्ही त्यांचा फोन ट्रेस करत होतो.. काकांनी मला बोलावून थोडी तयारी करेपर्यंत जो वेळ गेला.. त्यात आम्ही तुझ्या बाबांना नाही वाचवू शकलो.. आमची चाहूल लागताच ती माणसे पळाली.. तू बेशुद्ध झाली होतीस.. मग तुला तुझ्या घरी सोडले.. तोपर्यंत महाराजही तिथे आले होते.. महाराजांना तिथे गेल्यावर समजले होते कि ती त्या अमरचीच एक योजना होती.. त्याने एक असा मुहूर्त निवडला होता कि ज्या दिवशी तांत्रिक विशिष्ट होम करतात.. तो हि हे करणार आहे. असे त्याने सगळीकडे पसरवले होते. महाराज स्वतः तो होम यशस्वी होऊ नये या उद्देशाने तिथे गेले होते.. पण नंतर कळले कि त्या अमरला महाराज इथे नको होते म्हणून त्याने हि योजना केली होती. त्याला असे वाटते आहे कि तुमच्याकडे कोणतीतरी शक्ती आहे ज्याने अमरत्व मिळते.. ती त्याला तुझ्या बाबांकडून हवी होती.. "

" पण म्हणून त्याने बाबांना मारले?"

" हो.. कारण ते नसले तरी तू होतीस ना? "

" कोणी एवढे क्रूर कसे असू शकते?" अक्षता खिन्नपणे म्हणाली..

" तो आहे.."

" त्याच्या क्रूरतेला आळा घातलाच पाहिजे.. शक्ती हवी आहे ना त्याला आमच्या घरातली.. बघतेच मी कशी मिळते ती त्याला.. मीत आपली परिक्रमा झाली कि मी जाते माझ्या घरी.. तू येशील?"

" महाराजांना विचारू?"

"अक्षता,माझे झाले महाराजांशी बोलणे.. तुला आश्चर्य वाटेल कि ते ही येणार आहेत तुझ्या घरी.. पण त्यांचे म्हणणे आहे कि परिक्रमा झाल्यावर आधी आपण मठात जावे नंतर घरी जाऊ.."

      अक्षता आणि मीतची पुढची परिक्रमा छोट्या मोठ्या अडचणींवर मात करत पार पडली. दोघांनी ओमकारेश्वरला परत पूजा केली.. आणि दोघे मठात पोचले.. मठात प्रवेश करताच त्यांना तिथे अविरत दिसला. पण आधीसारखा भावहीन नाही.. दुःख आणि सुख याचे विचित्र मिश्रण त्याच्या चेहर्‍यावर दिसत होते.. अक्षताला त्याला पाहून तिच्या बाबांची खूप आठवण आली.. तिने न राहवून त्याला स्पर्श केला.. बहुतेक अविरतलाही तो स्पर्श जाणवला.. त्याच्या चेहर्‍यावरचे भाव बदलायला लागले. ते पाहून उद्धवमहाराज पुढे झाले. ते अविरतला आत घेऊन गेले.


"महाराज तो होईल बरा?" अक्षता फक्त एवढेच विचारू शकली.

" आम्ही खूप प्रयत्न करतो आहोत.. त्याने खूप त्रास सहन केला आहे.. त्याच्यावर सतत संमोहन करून करून त्याची मानसिक स्थिती फार नाजूक करून ठेवली आहे त्या नारायणाने.. त्या अमरने.." यांचे गोंधळलेले चेहरे पाहून महाराजांनी वाक्य पूर्ण केले.

"मग आता?" अक्षताने विचारले..

"मी सध्यातरी त्याचया कलाने घेतो आहे.. मुळात अमरने जी गोष्ट तुमचा बदला घेण्यासाठी केली होती तीच आपल्या फायद्याची ठरली आहे.."

" कोणती गोष्ट?"

" त्याने तुझ्या बाबांचा क्लोन बनवला.. पण हे बनवताना तो हे विसरला कि डीएनए फक्त बाह्यरूपाशी निगडित नसते ते तर पिढ्यान पिढ्या रुजलेले गुणही वाहून नेत असतात.. अविरत हा मुळीच वाईट नाहीये.. तुमच्याच रक्ताचा असल्याने जे संस्कार तुझ्या रक्तात आहेत तेच संस्कार त्याच्याही रक्तात आहेत.. त्यामुळेच अमरला त्याच्याकडून काम करून घेताना संमोहन वापरावे लागले.. पण आता अविरत त्यातून बाहेर येतो आहे.. त्याच्या मनाचा शोध घेताना मला दामोदर दिसला.. आता सगळ्यात आधी दामोदरला मुक्ती द्यायची आहे.. तो कितीतरी वर्षे तिथे अडकला आहे.. फार शोधले होते मी त्याला.. या अविरतमुळेच त्याचा शोध लागला.."

" महाराज पण त्यांना मुक्त कसे करणार तिथून? त्या अमरची माणसे तिथे असली तर अक्षताला धोका असेल ना?" मीतने विचारले.

" तुमचे ते भगवे वस्त्र कधी कामाला येणार?" महाराजांनी हसत विचारले.

" त्या वस्त्राने माणूस दिसेनासा होतो?" मीत आणि अक्षताने आश्चर्याने विचारले. 

" तुझी आत्या तुला दिसली होती?" 

" नाही.. तिचे वस्त्र घरंगळल्यानंतर ती मला दिसली.. म्हणजे त्या वस्त्राने माणूस अदृश्य होतो?"

" नाही ग.. त्या वस्त्रावर काही मंत्र लिहिलेले आहेत.. ज्यामुळे ते जेव्हा तुम्ही अंगावर ओढून घेता तेव्हा आत्म्यांना तुमचे अस्तित्व जाणवत नाही. पण त्याचबरोबर तुम्ही जेव्हा स्वतः ते मंत्र म्हणता तेव्हा समोरच्या व्यक्तीची नजरबंदी होऊन त्यांना तुम्ही दिसत नाही.. आता तेच वस्त्र घेऊन तुम्हाला त्या अमरच्या बंगल्यात जायचे आहे.. मी माझ्या माणसांकडून तिथे कोणी नाही याची खात्री बाळगीनच.. पण तरिही तुम्ही ते वस्त्र वापरा.."

" पण महाराज आमच्याकडे तर त्या राजकुमाराने दिलेले एकच वस्त्र आहे. ते कसे पुरेल दोघांना?" मीतने विचारले..

" तुझ्या आत्याने वापरलेले दुसरे वस्त्र आहे अक्षता.." महाराजांनी दोघांचा गोंधळ दूर केला.. दुसर्‍याच दिवशी दोघे निघाले.. मीतने गाडी घेतली होती.. ती गाडी त्यांनी बंगल्यापासून काही अंतरावर उभी केली. दोघांनीही ते वस्त्र अंगावर घेतले.. बंगल्यात प्रवेश केला.. त्यांनी बंगल्याचा दरवाजा उघडताच आत कुठेतरी छोटे कॅमेरे चालू झाले आणि या दोघांची हालचाल टिपायचा प्रयत्न करू लागले.. दोघे महाराजांनी सांगितलेली खुण शोधत होते.. आतल्या काही खोल्या शोधल्यानंतर त्यांना ते कपाट दिसले..अक्षताने ते कपाट उघडले.. कपाट पूर्ण रिकामे होते.. कपाटाच्या तळाशी चाचपल्यावर एक कळ लागली.. अक्षताने ती कळ दाबली.. कपाटाचे दोन भाग होऊन आतल्या तळघराचा दरवाजा दिसू लागला.. 


अमर हे सगळे स्क्रीनवर पहात होता.. त्याला कपाट उघडलेले दिसले पण ते कोण करते आहे ते मात्र त्याला दिसत नव्हते.. तो त्याच्या कोणत्याच माणसाला बंगल्यात पाठवू शकत नव्हता.. कारण दामोदरपंतांचे प्रेत सापडले असते तर त्याच्या बाजूचे कोणीच काही करू शकले नसते.. तो अस्वस्थ होऊन समोर चाललेले पहात होता..


     अक्षता आणि मीतने स्वतःला त्या वस्त्राने पूर्णपणे अवगंठून घेतले होते.. ते त्या दरवाजातून तळघरात शिरले.. खाली दामोदरपंतांचे प्रेत कसेही टाकले होते.. इतक्या वर्षांनंतर ते खराब झाले होते. ते बघून अक्षताच्या डोळ्यातून पाणी आले.. पण आता रडायलाही वेळ नव्हता. त्यामुळे मीतने आणि अक्षताने वेळ न दवडता ते प्रेत उचलले.. ते घेऊन ते बाहेर पडले.. अमरला हे सगळे दिसत होते.. त्याला अंदाज आला होता हे सगळे कोण करत आहे याचा.. पण त्याला त्या प्रेताचा काहीच फायदा नव्हता.. तो स्वतःशीच हसला.. "मी जर चुकत नसेन तर या पुढची तुझी पायरी असेल ती शक्ती शोधायची.. जा घेऊन जा त्या दामोदरला.. ती शक्ती मिळव.. मग मी बघतो ती तुझ्याकडून कशी परत घ्यायची ते.."


गाडीत बसल्यावर मीतने महाराजांना फोन करुन सगळे सांगितले.. महाराजांच्या सूचनेनुसार तो नदीकाठावर गेला. महाराज उद्धव आणि अविरतला घेऊन तिथे पोचले.. तिथे अक्षताच्या हस्ते सगळे विधी करण्यात आले.. अक्षताने अविरतचा हात धरून दामोदरपंतांना अग्नी दिला. तिच्या डोळ्यासमोर तिला झोपाळ्यावर बसून तिला स्तोत्र शिकवणारे आजी आजोबा येत होते.. आता ते परत कधीच दिसणार नाही हा विचार तिच्या मनात येत होता.. "तुला भेटल्याशिवाय ते नाही जाणार.." महाराजांनी तिच्या खांद्यावर थोपटून सांगितले.. 

सगळे तिथून निघाले..

" आता जाऊ समर्थांच्या गावाला.." महाराजांनी सांगितले.. उद्धव महाराज, अक्षता, मीत आणि अविरत यांना घेऊन महाराज निघाले समर्थांच्या मूळ गावी..




ती शक्ती मिळेल अक्षताला? आणि जरी मिळाली तरी अमर ती हिरावून घेऊ शकेल अक्षताकडून पाहू पुढील भागात..


कथा कशी वाटली नक्की सांगा.

हि कथा काल्पनिक असून मनोरंजनात्मक हेतूने लिहिण्यात येत आहे.. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात हेतू नाही.


सारिका कंदलगांवकर

 दादर मुंबई

🎭 Series Post

View all