Login

समर्थांची लेक भाग ३७

Story Of A Female Ghostbuster


समर्थांची लेक भाग ३७


मागील भागात आपण पाहिले कि गिरनार पर्वतावर अक्षता आणि मीतला दत्तमहाराजांची प्रचिती येते.. तिथेच त्यांना नर्मदेला जाण्याचा आदेश मिळतो.. त्याप्रमाणे ते दोघेही निघतात.. तिथे ते एका झपाटलेल्या घरात आश्रय घेतात.. पाहू आता पुढे काय होते..


" आपण आत्ता आराम करू.. उद्या सकाळी बघू काय करता येईल.." अक्षता उठत म्हणाली..
" आणि ते भूत परत आले तर?" त्या मालकाने घाबरून विचारले.. अक्षताने राजकुमाराने दिलेले भस्म काढले.. त्यातले चिमूटभर दोघांनाही कपाळाला लावायला दिले..
"आता काही नाही होणार.. विश्वास ठेवा.." रात्र सुखरूप गेल्यावर सकाळी मीत आणि अक्षता बाहेर निघाले.. घरमालकाच्या चेहर्‍यावर खूप आदर दिसत होता.. तो त्याच्या परीने यांचे आदरातिथ्य करत होता.. हे दोघे सॅक घेऊन निघाल्यावर त्याचा चेहरा उतरला.. "तुम्ही निघालात ?"
" हो.. पण येतो परत.. काळजी नका करू.." दोघांनी ते भगवे वस्त्र हातात घेतले आणि काहिही त्रास न होता ते घराबाहेर पडले.. दोघेही गढीच्या दिशेने गेले.. तिथे फेरफटका मारत असताना गढीपासून थोड्याच अंतरावर एक साध्वी तप करताना दिसली.. दोघेही तिच्याजवळ गेले.. ते जवळ येताच तिने डोळे उघडले..
" बोला, काय काम होते?" तिने विचारले..
" काम काहीच नाही.. आम्ही फक्त हि गढी बघायला आलो होतो.." मीतने उत्तर दिले..
"हि भुताटकीची गढी बघण्यासारखी नाही मुला.. मला फसवतोस?"
" आम्हाला काल रात्री एक अनुभव आला. म्हणून खात्री करुन घ्यायला इथे आलो आहोत.." अक्षताने सांगितले..
" खात्री? कसली खात्री? "
" तेच, याला आम्ही मुक्त करू शकतो कि नाही याची.."
" तुला याला मुक्त करायचे आहे? पण का?"
" अडकलेल्या जिवांना मुक्त करणे माझे कर्तव्य आहे.."
" तुम्ही तर परिक्रमावासी दिसता.. कशाला अडकता या कटकटीत? परिक्रमा करा , पुण्य कमवा.. जा आपल्या घरी.. कशाला सुखाचा जीव धोक्यात घालता आहात?"
"कारण काल जी परिस्थिती त्या माणसावर ओढवली ती दुसर्‍या कोणावर ओढवू नये म्हणून.. त्या दोन जिवंत माणसांना तिथून मुक्त करणे आम्ही कर्तव्य मानतो.." मीत म्हणाला.
" अच्छा.. एक उपाय आहे माझ्याकडे.. करणार?"
" सांगून बघा.. पटले तर ठरवू.." दोघेही एकदम बोलले..
" यात बिया आहेत.. हि शेंग उघडायची.. त्यातल्या बिया घ्यायच्या आणि मोजून एक एक त्या गढीच्या आत टाकायची.. एक छोटीशी ठिणगी पेटवायची.. आणि हि गढी उद्ध्वस्त होईल.. त्याशिवाय तो सरदार इथून मुक्त होऊ शकणार नाही.. त्याचा जीव इकडच्या अणुरेणूत अडकला आहे.. आहे तयारी?" त्या साध्वीने विचारले.
" हो.. मी जातो आत.." मीत म्हणाला.
" तू? मीत नको.. मी जाते.. मला सवय आहे.." अक्षता म्हणाली..
" अक्षता, त्यादिवशी तू गेलीस. मी काही म्हणालो? नाही ना.. आपल्याला अजून खूप काही करायचे आहे.. दोघांनी मिळून करूया का?"
" आत जाताना तुला खूप सावध रहावे लागेल.. अजूनही त्या सरदाराची शक्ती गढीमध्ये प्रबळ आहे.. " त्या साध्वीने इशारा दिला.
" हो.. आम्ही काळजी घेऊच.. तुम्ही आशीर्वाद द्या.."
"मीत हे वस्त्र पांघरून घे.." मीतने ते वस्त्र पांघरले.. हातात ती शेंग घेतली.. तो आत निघाला.. अक्षताचा जीव खालीवर होत होता.. त्या साध्वीने डोळे बंद करुन घेतले होते. एक एक क्षण अक्षताला वर्षासारखा वाटू लागला.. तिने न राहवून गढीच्या दिशेने पाऊल उचलले.. तोच आवाज आला..
" तो आला,यशस्वी होऊन आला.. ते बघ.. " अक्षताने त्या साध्वीच्या बोटाच्या दिशेने पाहिले.. गढीच्या मागच्या बाजूस आग लागली होती.. मीत ते वस्त्र हातात घेऊन कोणीतरी पाठी लागल्यासारखे पळत येत होता.. पळता पळता तो कशालातरी धडपडला. ते वस्त्र खाली पडले.. कोणीतरी मीतवर झेप घेते आहे, असा अक्षताला भास झाला.. तिने पुढे येऊन भस्म काढले.. तर राजकुमाराने दिलेली पुडी हातात आली.. \"हि इथे कशी आली?\" अक्षताच्या मनात विचार आला. पण हि वेळ नव्हती विचार करायची.. तिने ते भस्म मीतवर टाकले.. त्यावर झेप घेणारी आकृती अंगावर ॲसिड पडल्यासारखी मागे झाली. मीतने पटकन शेंगेतली शेवटची बी पाठी टाकली. त्याबरोबर ते टरफलही पडले.. त्याने पटकन माचीसने आग लावली.. त्याचक्षणी एक मोठा स्फोट होऊन ती गढी कोसळून पडली.. तिथे आग भडकली होती.. एक काळी आकृती वर जाताना दिसू लागली.. ती त्या आगीपासून वाचायचा प्रयत्न करत होती.. पण तिला जमत नव्हते.. कुठून तरी खेचल्यासारखी अजून एक कृष्णछाया त्या आगीत आली.. आणि दोन्ही आकृत्या अग्नीत नष्ट होऊ लागल्या..
मीत आणि अक्षता त्या साध्वीकडे वळले.. " आज तुमच्यामुळेच हे आम्ही करू शकलो.. धन्यवाद.. आता आम्ही निघतो.."
" जरूर.. पण जाण्याआधी हे *शस्त्र* तर घेऊन जा.."
"काय?" मीत आणि अक्षता जोरात ओरडले..
" बरोबर बोलले मी.. शस्त्र.. तुम्हाला या सरदाराबद्दल काय माहिती आहे मला माहीत नाही.. पण मीच याचा आणि त्या दिवाणाचा खून केला होता.. त्यानंतर मी ही नदीत उडी घेऊन हा देह नष्ट करायचा प्रयत्न केला.. पण मला माझ्या गुरूंनी वाचवले.. त्यांनी मला ही पुडी दिली ज्यात एक शेंग होती. त्यांनी मला सांगितले एकतर तू या आत्म्याला नष्ट कर किंवा या अशा एका व्यक्तीच्या स्वाधीन कर जो त्याला नष्ट करू शकतो..एकदा प्रयत्न केला. पण त्या दुष्टात्म्याचा नाही प्रतिकार करू शकले.. मग परत जायची माझी नाही हिंमत झाली.. नंतरही मी खूप जणांची वाट पाहिली.. काहीजण आले.. पण कोणीच आत जाऊ शकले नाही.. आज तुम्ही त्यालाच नाही तर मलाही सोडवले आहे.. आता हा देह मी नर्मदेत अर्पण करायला मोकळी.. जाण्याआधी या बिया तुम्हाला देते.. जेव्हा गरज असेल तेव्हा आणि फक्त तेव्हाच तुळशीतली माती घ्या.. एक बी टाका.. तीर्थ शिंपडा.. त्यातून दोनेक तासात रोपे उगवतील.. बिया काढून घ्या.. वापरा.. उरलेल्या जपून ठेवा.. निरोप द्या आता मला.." ती साध्वी उठली आणि क्षणात समोरच्या नर्मदेमध्ये शिरली.. आणि क्षणार्धात दिसेनाशी झाली.. गढीत आग धुमसतच होती.. ते दोघे वळले.. समोर घरमालक आणि त्याचा पपलू होता.. दोघांनीही अक्षता आणि मीतचे पाय धरले.. " तुमच्यामुळे आम्ही तिथून सुटलो.. धन्यवाद.. काय करू तुमच्यासाठी?"
"आमच्यासाठी काही नको.. पण यापुढे अडल्या नडल्यांना मदत करायला विसरू नका.." अक्षता म्हणाली.. दोघे बाकीचे सामान घ्यायला खोलीकडे वळले..
"मग अक्षता, आता शस्त्र मिळाले तरिही परिक्रमा करायची?" मीतने विचारले..
" हे काय विचारणे झाले? परिक्रमा तर पूर्ण करायलाच पाहिजे.. "


महाराज अविरतला घेऊन दत्तमहाराजांच्या समोर बसले होते.. त्याच्या चेहर्‍यावर अजूनही काहीच भाव नव्हते.. फक्त देह धर्म तो पाळत होता.. जणू बाकी कसलीच जाणीव त्याला होत नव्हती.. महाराजांना त्याच्या मनावरचे संमोहन काढायचे होते.. त्याआधी त्यांनी त्याच्या मनात शिरायचे ठरवले होते.. महाराजांनी ध्यान लावले. बाजुला उद्धव महाराज अविरतकडे लक्ष देत होते. महाराजांना तो बंगला दिसला.. जिथून त्यांनी अक्षताला सोडवले होते.. ते त्याच्या मनात अजून शोध घेत होते.. अचानक त्यांना एक अंधुकसे तळघर दिसले. त्यात दामोदरपंतांचा मृतदेह दिसला.. कितीतरी वर्ष दहनाची वाट पाहणारा.. मुक्तीची वाट पाहणारा.. थोडा अजून शोध घेतल्यावर त्यांना एक वेगळीच जागा दिसली.. मोठाच्या मोठा वाडा.. त्यात असणारी मोठमोठी दालने, त्यातल्या एका दालनात असलेली पुस्तकांची कपाटे.. तिथे येत असलेल्या किंकाळ्यांचा आवाज. \"तुझा विनाश होईल.. फक्त विनाश.\" अमरचे गडगडाटी हास्य.. दुसरे दालन जिथे दिसत असलेला चांदीचा पिंजरा.. त्यात असलेला एक आकार.. आणि समोर ऐकू येत होता एका मूक जीवाचा जीवघेणा आक्रोश.. त्यासोबत हुंदके देत रडणार्‍या मुलाचा आक्रोश आणि परत हसणार्‍या अमरचा आवाज. एक क्षणभरच महाराजांची नजर त्या पिंजर्‍यातल्या आकृतीवर पडली.. महाराजांच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले.. \"नारायणला कळते आहे का, तो कशाशी खेळतो आहे? त्याला कशी त्याची मदत मिळते आहे? हि जागा आहे तरी नक्की कुठे?\" महाराजांचे ध्यान अमरवर केंद्रित झाले.. त्यांचे अविरतकडे दुर्लक्ष झाले. मेंदूत झालेला हा हस्तक्षेप सहन न झाल्याने अविरत खाली पडला.. उद्धवमहाराज त्याला उचलायला गेले. आणि पहिल्यांदाच त्याच्या चेहर्‍यावर भाव दिसला वेदनेचा..


"सुपर्णा , तो ताईता कुठे आहे?"
" त्याला मी जपून ठेवले आहे.. माझ्या कपाटात.."
" त्याला इथे घेऊन ये.. बहुतेक आपण एका नवीन जागी जाणार आहोत.. तु येणार का?"
" नवीन जागी? मग आधीचा बंगला?"
" तो सध्यातरी काही उपयोगाचा नाही. ती राधा मेली ना तिथे.. पोलिसांचा पहारा आहे.. मी माझी ओळख वापरतो आहेच.. पण जशी माझी माणसे तिथे आहेत तशी त्यांची पण आहेतच.. मला खबरदारी घेतलीच पाहिजे.. जा तयारी करायला घे.."


कुठे जाणार असेल अमर आता? दामोदरपंतांना मुक्ती मिळेल? पाहू पुढील भागात..

कथा कशी वाटली ते सांगायला विसरू नका..

हि कथा काल्पनिक असून मनोरंजनात्मक हेतूने लिहिण्यात येत आहे.. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा हेतू नाही..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all