समर्थांची लेक भाग ३६
मागील भागात आपण पाहिले कि मालतीताई त्यांच्या गावातील घरी जातात.. अक्षता मीतसोबत मठात जाते.. तिथे महाराज तिला गाणगापूर, गिरनार अशी यात्रा करायला सांगतात.. पाहू पुढे काय होते ते..
" तू कधीपासून आहेस मठात?" अक्षताने मीतला विचारले.. दोघांनी हा प्रवास गाडीने करायचा ठरवले होते.
" मला जसे आठवते तसे.."
" तुझे आईबाबा?"
" महाराज सांगतात माझे बाबा जन्माआधीच गेले. आणि आई मला जन्म देताना.. पण इथे सगळेच माझी काळजी घेतात.. ते उद्धव महाराज तर खूप जपतात मला.. कोणाला सांगू नकोस.. पण आम्ही दोघेच असतो तेव्हा मी त्यांना काका म्हणतो.."
" छानच ना.. तुला बाकी कोणीच नाही का?"
" मला खरंच माहीत नाही.. मी लहानपणापासून आपल्या शाळेच्या जवळ असलेल्या वसतीगृहात रहायचो.. सुट्टी असली कि मठात जायचो.. प्रश्न खूप पडायचे.. पण कोणाला विचारायची तुझ्यासारखी हिंमत नव्हती.."
" मीत तूच त्या वाड्यात आला होतास ना?"
" लवकर समजले.."
" तू पण ना वाईट आहेस.. अजिबात कळू दिले नाहीस.. चेहरा तर किती भाबडा केला होतास.. कसला कसलेला अभिनेता आहेस रे.."
मीत हसत होता.. हसता हसता गंभीर होत म्हणाला..
"सगळ्यात मोठी अभिनेत्री तर सुपर्णा निघाली.. मला कधीच वाटले नव्हते ती चुकीच्या पंथात असेल म्हणून.."
"माझा तर अजूनही विश्वास बसत नाही कि सुपर्णाने माझा विश्वासघात केला.. तू तिच्या डोळ्यात पाहिलेस कधी? नेहमी एक वेदना जाणवायची.. कसली असावी? मला फसवण्याची?"
" कदाचित.."
" जाऊ दे नकोच तो विषय." अक्षताने विषय बदलला.."मग तू जे काम करतोस असे सांगितलेस ते तरी खरे आहे का?"
" हो ग बाई.. फक्त कंपनी आपलीच आहे.. म्हणजे मठात जे भक्त येतात त्यांनी मिळून उभी केली आहे.. म्हणूनच तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा तुमच्या सेवेसाठी हजर राहू शकत होतो.. बरे आता हॉटेलमध्ये एकच खोली घ्यायची कि दोन? म्हणजे कोणी तुझा पाठलाग वगैरे करत नसतील तर ?" मीत मिस्किलपणे म्हणाला.. अक्षता लाजली.. "एकच घेऊया.. आहे माझा विश्वास तुझ्यावर.." दोघेही गाणगापूरला पोचले.. तिथे दर्शन घेताना जणू आपल्यातला दुष्टअंश कमी होतो आहे असे अक्षताला वाटले.. दोघेही तिथून कारनेच गिरनारच्या दिशेने निघाले.. तिथे जाऊन थोडा आराम केल्यावर त्यांनी रात्रीच दत्तांना मनोमन विनवणी करून आणि हनुमानाचे दर्शन घेऊन गिरनार चढायला सुरुवात केली.. पहाटे पहाटे दोघे शिखरावर पोचले.. त्यांच्या सुदैवाने ते जेव्हा पोचले तेव्हा धुनी प्रज्वलित होणार होती.. तिथे पिंपळकाष्ठे रचून ठेवली होती.. सगळे साधू, भक्त भक्तिभावाने तिथे उभे होते.. आणि पापणी लवते न लवते तोच अचानक साधारण दोन पुरूष उंचीची एक अग्नीज्वाला तिथे प्रकट झाली..त्यात या दोघांनाही दत्तगुरूंचे दर्शन झाले. मीत आणि अक्षता ते बघून भारावून गेले होते..
" मीत.. "
" हो.. मलाही ते दिसले.." ते दोघे या क्षणाचा आनंद घेत असतानाच समोरून एक वृद्ध आला.. त्याने अक्षताकडे पाणी मागितले.. अक्षताने सॅक उघडली.. त्यात एकच घोट पाणी होते.. " हे घ्या बाबा.." त्या वृद्धाने ते पाणी घेतले.. ते पिताना तो म्हणाला.. "इथून असेच नर्मदा परिक्रमा करायला जा.. तिथेच तुम्हाला तुमच्या लढाईसाठी एक महत्वाचे अस्त्र मिळेल.." तो काय म्हणाला आहे हे कळेपर्यंत तो वृद्ध निघून गेला.. अक्षताने ती बाटली हातात घेतली तर रिकामी होण्याऐवजी ती भरलेली होती. या चमत्काराचा विचार करतच दोघे दर्शनाला गेले.. तिथे दत्तांचा हसरा चेहरा त्यांना त्या वृद्धासारखा भासला.. आणि काय झाले ते दोघांनाही उमगले.. दत्तमहाराजांची कृपा समजून दोघांनीही पर्वत उतरायला सुरुवात केली..
"मीत माझ्याहातून जी चूक झाली होती त्याबद्दल महाराजांनी मला माफ केले असेल का?" अक्षताने भारावलेल्या स्वरात विचारले..
" असावे बहुधा.. नाहीतर एकाच दिवशी दोनदा प्रचिती?"
दोघेही त्याच भारावलेल्या अवस्थेत खोलीवर आले. लागोपाठ चाललेल्या प्रवासाने दोघेही थकले होते.. त्यांनी आराम करायचा प्रयत्न केला.. पण डोळ्यासमोर तोच हसरा चेहरा येत होता.. "मीत तुला काय वाटते, आपण जायचे नर्मदा परिक्रमा करायला?"
" मी महाराजांना विचारतो. पण मला वाटते आपल्याला जायलाच पाहिजे.."
अपेक्षेप्रमाणेच महाराजांनी त्यांना परिक्रमेला जायला सांगितले.. पण हे पायी करणार नव्हते.. हे करणार होते गाडीने.. दोघेही ओमकारेश्वरला पोचले. तिथे विधीवत पूजा करून त्यांनी परिक्रमेला सुरुवात केली..
पहिल्याच दिवशी वेळ कसा जात होता त्यांना कळले नाही.. संध्याकाळ झालेली दिसताच त्यांनी थांबण्याचे ठरवले.. थोड्या अंतरावर अक्षताला एक घर दिसले. दोघांनी तिथे सोय होते का पहायचे ठरवले.. त्या घरात दोन गृहस्थ रहात होते.. या दोघांनी राहू का विचारल्यावर एकाच्या चेहर्यावर सुटका झाल्याचे तर दुसर्याच्या चेहर्यावर चिंतेचे भाव होते.. अक्षता आणि मीत इथे रहावे कि नाही या विचारात पडले.. पण दुसरा उपायही नव्हता.. अंधार होत आला होता आणि पुढे दुसरे घर दिसेल कि नाही याचीही खात्री नव्हती.. शेवटी महाराजांवर विश्वास ठेवून त्यांनी तिथे रहायचे ठरवले.. त्या दोघांनी यांना जेवायला वाढले. अक्षताने मनाला पटत नसताना पण त्या दोघांच्या नकळत अन्नाची परिक्षा केली. अन्न सुरक्षित आहे याची खात्री पटल्यावर दोघेही पोटभर जेवले. त्या घरमालकाने खोली दाखवली.. अक्षता आणि मीत झोपायला गेले. पण त्या दोघांच्या विचित्र वागण्यामुळे त्यांनी खोलीत भस्माची रेख आखून घेतली.. मध्यरात्री अचानक आरडाओरडा झाल्याने दोघेही दचकून उठले.. कोणीतरी दरवाजा वाजवत होते.. अक्षताने खिशात ठेवलेला चाकू परत एकदा चाचपला.. मीतच्या हातात एक छोटे पिस्तुल होते.. मीतने हलकेच दरवाजा उघडला.. घरमालकाचा सहकारी त्याला बोलवत होता..
" मदद करो.. जल्दी .."
दोघेही खाली आले.. घरमालक कोणीतरी गळा दाबत असल्यासारखा ओरडत होता.. त्याच्या वेदना बघवत नव्हत्या.. अक्षताने पटकन खिशातून अंगारा काढला.. त्याच्या अंगावर फुंकरला.. त्याचा आरडाओरडा कमी झाला.. तो घरमालक सुटका झाल्यासारखा शांत झाला.. अक्षताने त्याच्या सहकाऱ्याला पाणी आणायला सांगितले.. त्या पाण्यात किंचित अंगारा घालून त्याला प्यायला दिले.. त्या घरमालकाला हुशारी आल्यासारखी दिसली..
" धन्यवाद, तुमच्यामुळेच आज मी वाचलो.." ( तो हिंदीत बोलत होता. पण कथेत मराठी संवाद घेतला आहे.)
" हे काय होते,कळेल का?"
त्या घरमालकाने मान खाली घातली.
ते पाहून त्याचा सहकारी पुढे झाला..
" तुम्ही नाही सांगत , तर मी सांगतो.. आता इथे या घराच्या खऱ्या मालकाचा आत्मा आला होता.. तो बहुतेक तुम्हाला काही करू शकला नाही.. म्हणून त्याने याला मारायचा प्रयत्न केला.." तो अक्षताकडे बघत बोलला..
" मला काय करायचे होते?" अक्षताने आश्चर्याने विचारले. त्या दुसर्याची हिंमत बघून घरमालकाने सुरुवात केली..
" मला माफ कर ताई.. मी तुला इथे राहू द्यायलाच नको होते.. हे घर शापित आहे.. आणि आम्ही या घरात बंदिस्त झालो आहोत.. आम्हीसुद्धा नर्मदामातेचे परिक्रमावासी आहोत.. नाही होतो.. आधी मी एकटाच होतो.. नंतर हा आला.. मी ही असाच रात्री इथून चाललो होतो.. भूकही लागली होती.. अंधार पडला होता.. आणि तिथे हे घर लागले.. मी दार वाजवले. एक म्हाताऱ्या माणसाने दरवाजा उघडला.. काही न बोलता त्याने आत घेतले.. जेवायला दिले.. मी परिक्रमावासियांना रहिवासी मदत करतात ते ऐकले होते.. मला वाटले हे हि त्याच प्रकारचे असेल.. पण नाही.. तो एकटा रहात होता.. आणि जोपर्यंत इथे कोणी येत नाही तोपर्यंत त्याच्या नशिबात मृत्यूही नव्हता. म्हणून त्याने मला या घरात घेतले होते. मी आलो आणि दुसर्याच दिवशी तो मृतावस्थेत आढळला.. आणि मी इथे अडकलो.. त्याला मी अग्नी देऊन आलो. म्हटले रात्री थांबू आणि उद्या निघू.. पण त्याच रात्री तो घरमालक आला.. भूतयोनीतला.. तो दिवाण होता, इकडच्या सरदाराचा.. ती समोर दिसते , ती गढी आहे अजून त्या सरदाराची.. तो सरदार बाईबाज म्हणून प्रसिद्ध होता.. या दिवाणाचे काम त्याला आजूबाजूच्या परिसरातल्या मुली आणून पुरवायचे होते. अनेक मुलींना त्याने नासवले.. कित्येक जणींनी जीव दिले.. पण एक मात्र खमकी निघाली.. तिने या दिवाणाला हि मारले आणि त्या सरदारालाही.. आणि स्वतः हसत हसत मृत्यूला सामोरी गेली.. पण त्या दिवसापासून तो दिवाण आणि सरदार दोघे भूत बनून छळत आहेत.. सहसा इथे कोणी रहात नाही या घराचा इतिहास ऐकून. पण चुकून एखादी मुलगी राहिलीच तर तो दिवाण तिला त्या गढित घेऊन जातोच..इथे माणसे यावीत म्हणून तो आमचा वापर करतो. हा पपलूपण असाच येऊन इथे अडकला आहे.. आज त्या दिवाणाला तुम्ही दिसलात पण तो तुम्हाला हात लावू शकला नाही. म्हणून त्याने मला मारायचा प्रयत्न केला.."
" तुम्ही बाहेर जात नाही म्हणता, मग जेवणखाण?" मीतने विचारले..
" इथे त्या दिवाणाने ठेवलेले भरपूर पैसे आहेत.. आम्ही तेच वापरतो. आम्ही तुम्हाला पण घरात घेणार नव्हतो. पण तुम्हाला पाहून असे वाटले कि आता यातून आमची सुटका होईल. आणि तो तुम्हाला काही करू शकला नाही.. यावरून माझी खात्रीच पटली कि तुम्हीच सोडवणार आम्हाला यातून.. सोडवाल ना?" त्या घरमालकाने आशेने दोघांनाही विचारले..
कोणते नवीन अस्त्र अक्षता आणि मीतला मिळणार आहे? त्याचा या घराशी काही संबंध आहे का? बघू पुढील भागात..
हि कथा काल्पनिक असून मनोरंजनात्मक हेतूने लिहिण्यात येत आहे.. कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा हेतू नाही..
सारिका कंदलगांवकर
दादर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा