Login

समर्थांची लेक भाग ३५

Story Of A Female Ghostbuster

समर्थांची लेक भाग ३५



मागील भागात आपण पाहिले कि अविरत हा अमरने श्रीरंगपंतांचा बनवलेला क्लोन असतो.. ज्याचा वापर करून त्याने श्रीरंगपंतांचा खून केलेला असतो.. तो अक्षताला मारणार इतक्यात आत्या मध्ये येते.. आणि आत्याची प्राणज्योत महाराजांमध्ये विलीन होते .. आता पाहू पुढे काय?



         आत्या गेल्याचा तसेच सुपर्णाने केलेल्या विश्वासघाताचा फार मोठा धक्का बसला होता.. आत्याचे विधी करायला तिचे यजमान आणि तिची दोन्ही मुले श्रीपाद आणि सुधीर आले होता.. त्यांना मदत करायला मीत होताच.. आणि सगळ्या गोष्टींवर महाराज स्वतः लक्ष ठेवत होते.. सर्व विधी झाल्यावर ते निघाले..

" मालती, यापुढे मी आणि सुधीर तिथे नाही राहू शकत.. आम्ही आमच्या घरी जातो आता.."

" हो मामी.. खूप दिवस आई, बाबा आणि सुधीर तिथे राहिले.. आता आई नाही तर निदान यांना तरी माझ्यासोबत असू दे.."

" अरे पण.." मालतीताईंनी बोलायचा प्रयत्न केला..

" मी तुमच्यामध्ये बोललो तर चालेल का?" महाराजांनी विचारले..

" असे का म्हणता? तुमचा अधिकार आम्ही सगळे जाणून आहोत.." आत्याचे यजमान म्हणाले..

" तुम्ही जा वाटल्यास तुमच्या घरी. पण सुधीरला मालतीसोबत गावच्या घरी राहू दे.. मी काही दिवस अक्षताला माझ्यासोबत ठेवीन म्हणतो.. चालेल का मालती आणि अक्षता?"

मालतीताईंनी होकारार्थी मान हलवली. मनातील काही प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत तरी इथे राहूया असे अक्षतालाही वाटत होतेच त्यामुळे तिनेही होकार दिला.. मालतीताई सुधीरसोबत घरी गेल्या..

" अक्षता, महाराजांचा आपल्यावर वरदहस्त आहे. ते जे करतात ते आपल्या भल्यासाठी.. असा आपल्या घरात सगळ्यांनाच विश्वास होता.. तू त्यांना काही उलट बोलू नकोस.." अक्षताच्या मनातील वादळाची कल्पना असलेल्या मालतीताई तिला जाताना सांगून गेल्या.. रिकामे झालेले घर अक्षताला खायला उठले.. तिला आठवत होते.. आई आणि आत्याचे सतत तिच्यापाठी लागणे.. आत्याची सतत दत्तासमोर बसलेली मूर्ती.. तिच्यासाठी तिने केलेले पारायण.. तिने सिद्ध करून दिलेली अंगठी.. राजस्थानला जाताना तर मीतलाही दिली होती.. 'मीत.. त्यानेही फसवले मला.. कोणीच नाही का इथे ज्यावर मी विश्वास ठेवू शकते..' अक्षताच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या.. ' हि शिक्षा आहे मला, मी माझ्या घरातल्यांपासून गोष्टी लपवल्या त्याची.. पण मला तर माझ्या बाबांचा बदला घ्यायचा होता.. माझ्या आजोबांना मुक्त करायचे होते.. मग मी वाईट कशी? मान्य मी त्या मार्तंड शास्त्रींकडून ती विद्या घेतली.. पण किती लहान होते मी तेव्हा.. आताही हा जो अमर आला त्याला तरी मी कुठे मदत केली.. मी तर त्या शक्तीच्या शोधात होते.. आता काही झाले तरी मला ती शक्ती शोधावीच लागेल.. एकटीलाच..' अक्षता मनाशी निश्चय करून उठली.. तिने बॅग उचलली.. पाठी वळली. तर समोर मीत उभा होता.

" काही काम आहे का तुझे?" अक्षताला त्या हसणार्‍या मीतचा राग येत होता..

"मी काय इथे फक्त कामासाठीच येतो का?" मीतने दुखावलेल्या स्वरात म्हटले..

"सॉरी. तू माझ्यावर लक्ष ठेवायला येतोस.. बरोबर ना?"

" तू आता चिडली आहेस.. काही बोलून फायदा नाही.. बरे मी तुला न्यायला आलो आहे.. आवरून तर तुझे झाले आहे.. चल लवकर.."

" कुठे न्यायला आलो आहे? मी काय लहान बाळ आहे का? चॉकलेट देतो म्हटल्यावर पाठी यायला? आजकाल ते पण विश्वास ठेवत नाही.." 

" अक्षता, चिडू नकोस.. ऐक महाराजांनी तुला घेऊन यायला सांगितले आहे.. तू एकटी इथे राहणे धोकादायक आहे.. मी तुला बोललो नाही पण आत्या गेल्या त्याच दिवशी संध्याकाळी मठात पोलीस आले होते. त्या अविरतला शोधायला. तो ही खूप पोचलेला आहे. नशीब महाराजांनी त्याला लगोलग दुसरीकडे हलवले म्हणून.. तो अमर आताही तुझ्या मागावर असेलच.. इतके दिवस तुझ्यासोबत कोणी ना कोणी असायचे म्हणून त्याने हिंमत केली नसेल. पण आता तू एकटी आहेस आणि तुझ्याकडे तो भैरोबाबाचा आत्मा आहे हे विसरू नकोस.."

" येऊ देत त्या अमरला.. जे व्हायचे ते होऊन जाईल एकदाचे.. सुटेन तरी या सगळ्यापासून.. आधी बाबा गेले आणि आता आत्यासुद्धा.. ते ही माझ्यामुळेच.. "

" तू सुटशील.. मग माझे काय?"

" तुझे मी काय सांगू? तू कुठे मला काय सांगितलेस कधी? "

" अक्षता तुला खरेच समजत नाही कि तू समजून न समजण्याचे नाटक करते आहेस?"

" मीत, माझे ना डोके खराब झाले आहे. कोडी सोडवायला अजिबात वेळ नाही माझ्याकडे.."

" बरे मग ऐक आत्ताच.." मीतने अक्षताचे दोन्ही हात हातात घेतले.. तो गुडघ्यावर खाली बसला.. "अक्षता माझे तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे.. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय.. आणि तुला जे वाटते कि मी तुझ्यापासून खूप काही लपवले आहे.. त्या सगळ्याची उत्तरे तुला मठात मिळतील.."

" मीत हे सगळे काय चालवले आहेस. प्लीज ऊठ.. हे सगळे करायला माझ्याकडे वेळ नाही.." अक्षता चिडून बोलत होती पण गालावर गुलाब फुलले होते..

" हे तुझे उत्तर समजू?"

" मीत मला समजून घे.. मला खूप काही साध्य करायचे आहे.. आता माझ्याकडे प्रेम वगैरे करायला वेळ नाहीये.. "

" मी कुठे जबरदस्ती करतो आहे. तूच म्हणालीस ना सगळे सोडून द्यावेसे वाटते.. कोणावर विश्वास ठेवावा हे कळत नाही म्हणून मी आज बोललो.. नाहीतर इतके दिवस तुला काही जाणवले का?"

" मीत??"

" हो.. मी ठरवले होते.. तू जेव्हा शांत असशील तेव्हा सांगायचे.. पण बघावे तेव्हा तू मोहिमेवर.. असो तुला हवे तेव्हा सांग.. आता मठात जायचे?"

" हो.. मी फक्त सगळे सामान ठेवले आहे का ते परत एकदा चेक करते.."

त्या घराला शेवटचा रामराम करून अक्षता निघाली.. दोघे मठात पोचले.. मठ अक्षताला वाटला होता तसा अजिबात नव्हता.. एक दुमजली इमारत होती.. अतिशय साधी.. 

" हा मठ?" अक्षताने आश्चर्याने विचारले.. मीतने मान हलवली.. अक्षताने आत प्रवेश केला. दरवाजात पाऊल ठेवताचक्षणी तिला जाणवला फुलांचा मंद वास.. तिथे असलेली स्वच्छता. ती खेचल्यासारखी आतमध्ये ओढली गेली.. हॉलमध्ये मध्यभागी दत्तगुरूंची एक सुंदर मूर्ती होती.. त्या मूर्तीसमोर महाराज ध्यान करत होते.. त्यांच्याच बाजूला त्यांच्यासारखे कपडे घातलेली एक मध्यमवयीन व्यक्ती बसली होती. त्यांच्या ध्यानात व्यत्यय नको म्हणून अक्षता तिथेच थबकली..

"अक्षता, ये इथे.. बस आमच्यासमोर." महाराजांचा आवाज आला.. " ये आज बर्‍याच प्रश्नांची उत्तरे मिळतील तुला.." खूप काही बोलायचे असलेल्या अक्षताच्या तोंडून आता मात्र शब्द फुटत नव्हता.. 

"मीत".. कसेबसे ती म्हणाली..

" हो. हा मीतसुद्धा तुझ्यासारखाच आहे. आम्हाला माहीत आहे तुझा सध्या कोणावरच विश्वास नाही. पण मीतची ओळख लपवणे आमच्यासाठी खूपच गरजेचे होते.. म्हणूनच त्याने अनेकदा विचारूनही आम्ही त्याला परवानगी दिली नाही.." अक्षताने मीतकडे पाहिले..

" हो. त्याने अनेकदा फक्त तुला सांगू द्या अशी विनंती केली.. पण आम्हाला माहीत होते नारायणची तुझ्यावर नजर असणारच.. म्हणून मी त्याला नकार दिला.."

" नारायण?" अक्षताने आश्चर्याने विचारले..

" तुमचा अमर.. जो माझा एकेकाळी शिष्य होता.. तुझ्या आजोबांबरोबर माझ्याकडे शिकायला होता.."

" मग महाराज तुम्ही तेव्हाच का नाही हे थांबवले?"

"अक्षता, महाभारत माहित आहे तुला?"

" हो"

"त्यातली शिशुपालाची गोष्ट?"

" हो.. त्याचा इथे काय संबंध?"

" सांगतो.. हा जो शिशुपाल होता ना त्याला जन्मतः चार हात होते.. आणि त्याच्या जन्माच्यावेळेस एक भविष्यवाणी झाली होती. ज्याच्या मांडीवर त्याचे जास्तीचे दोन हात गळून पडतील तोच त्याचा वध करेल.. कृष्णाच्या मांडीवर त्याचे ते दोन हात गळून पडले.. तुला काय वाटते कृष्ण त्याला तेव्हा मारू शकत नव्हता. पण मग तो एका बालकाचा वध झाला असता. त्यामुळेच त्याचे शंभर अपराध भरेपर्यंत कृष्णालाही वाट पहावी लागली. तो साक्षात देवाचा अवतार असून काही करू शकला नाही मग आपण तर सामान्य माणसे.. म्हणूनच तुला असे वाटले असेल कि तुझ्या घरची माणसे मृत्युमुखी पडत होती आणि आम्ही फक्त बघत होतो तर हा समज दूर कर बाळा. प्रत्येक गोष्ट ठरलेल्या वेळीच घडते आणि त्यात कोणीच काही करू शकत नाही.."

" मग मी काय करू आता, असे तुम्हाला वाटते?"

" तू आणि मीतने प्रशिक्षण घ्यावे असे मला वाटते.. तुमचे दोघांचेही राहिले आहेच.. पण त्याआधी तू गाणगापूर, गिरनार अशी यात्रा करून यावेस असे मला वाटते.. कारण प्रशिक्षणासाठी कोरे मन असलेले चांगले.. सध्या तुझ्यावर खूप ताण आहे.. तू हे करून ये मग बाकीच्या गोष्टी ठरवू.."

" आणि त्या मार्तंडाची थोडी शक्ती माझ्याकडे आहे त्याचे काय?"

" ती शक्ती तुझ्याकडे येण्यामागे त्याचा एक हेतू होता.. त्याला तुझा माग काढणे सोपे जावे.. कारण ती सुपर्णाजरी होती तरी ती लहान मुलगी होती.." सुपर्णाचे नाव ऐकून अक्षताचा चेहरा परत पडला.. 

" पण मग आता त्याला माग नाही लागणार?"

" नाही.. आता तू ती शक्ती तुझ्या सोयीनुसार वापर.. तो कुठे आहे, त्याला नक्की काय करायचे आहे हे आम्हाला सोप्यारितीने कळावे म्हणून आम्हीसुद्धा तेव्हा तुझ्याबाबतीत काही केले नाही.. पण आता त्याला तुझी गरज आहे. तुझी म्हणण्यापेक्षा त्या आत्म्याची.. त्यामुळे आता काही केले तरी तो तुला शोधणारच.. तो लपून राहणारच नाही.. जी काही आत्मिक शक्ती तुला हवी आहे त्यासाठी तुझा प्रवास तू सुरू कर.."

" महाराज, अक्षताला एकटीला प्रवासाला पाठवायचे?" मीतने विचारले.

"काय हरकत आहे? ती आजची स्त्री आहे.. नक्कीच एकटी जाऊ शकते.." 

" पण त्या अमरने काही केले तर?"

" असे म्हणतोस? मग आपण असे करूया, उद्धव..." ते दुसरे गृहस्थ पुढे आले.. " तू जातोस का अक्षतासोबत? तू असशील तर मला तिची काहीच चिंता राहणार नाही.." मीतचा उतरलेला चेहरा पाहून उद्धव म्हणाले..

" नको महाराज, यावेळेस मीतला जाऊ दे.. पुढच्या वेळेस तुमची आज्ञा असेल तर मी जाईन.." ते मिश्किलपणे हसत म्हणाले.. 

" आणि अवितरचे काय?" अचानक अक्षताला आठवले..

" त्याच्यावर तीव्र संमोहन आहे.. ते काढायला हवे.. तुम्ही गेलात कि तेच काम आम्ही करणार आहोत.. निघा आता तुम्ही.." महाराज अचानक गंभीर झाले..




पुढील भागात पाहू.. गिरनारला अक्षताला काय अनुभव येतो..


हि काल्पनिक कथा असून मनोरंजनात्मक हेतूने लिहिण्यात येत आहे.. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात हेतू नाही..


सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई

🎭 Series Post

View all