समर्थांची लेक भाग ३४
मागील भागात आपण पाहिले कि सुपर्णा अमरला सामील असते.. आणि अमर अक्षताला मारायला एका व्यक्तीला सांगतो.. त्या व्यक्तीला पाहून अक्षता बाबा म्हणून ओरडते.. पाहू पुढे काय होते ते..
" बाबा.. नाही पण हे कसे शक्य आहे? बाबांचे अंत्यसंस्कार मी स्वतः केले होते.. नाही हे बाबा नाहीत.. हा तर.. हा तर माझ्या वयाचा आहे.. हे काय चालू आहे?" अक्षता डोके धरून बसली होती..
" असे म्हणतात कि मरताना आपल्या इच्छा अपूर्ण राहिल्या कि माणसाचा आत्मा फिरत राहतो.. पण मला तुझ्या आत्म्याची आवश्यकता नाही.. म्हणून सांगावेसे वाटते.." अमरला अक्षताच्या परिस्थितीवर हसायला येत होते.. सुपर्णा रागाने हे सगळे ऐकत होती.. आणि ज्या व्यक्तीविषयी हे सुरू होते.. त्याच्या चेहर्यावर काहीच भाव नव्हते..
" तर.. तुला माहितच असेल कि तुझा बाबा शिकायला शहरात होता काही वर्ष.. त्याला पाहून मला एक कल्पना सुचली. म्हणजे बघ हा.. तुझे आजोबा होते माझ्या मागावर आणि मी तुझ्या बाबाच्या.. मग मी काय केले ते ऐक. तो ज्या कॉलेजमध्ये शिकत होता तिथे मी माझ्या माणसांना वैद्यकीय कॅम्प घ्यायला सांगितले. तिकडच्या मुलांची वैद्यकीय चाचणी करून त्यातल्या तंदुरुस्त मुलांना निवडले.. ज्यात अर्थात श्रीरंगपण होता.. आणि मग त्यांना वीर्यदानाचे महत्त्व पटवून दिले.. त्यांना एका प्रयोगासाठी हे हवे आहे, हे हि सांगितले.. एका नवीन विचाराने भारावलेल्या त्या मुलांनी लगेच केलेही.. आणि त्याचेच फलित हा.. 'अविरत'.. मी बनवून घेतलेला तुझ्या बाबाचा क्लोन.. फार गर्व होता त्या महाराजाला तुमच्या कुटुंबावर.. बघ मी काय केले.. तुझ्याच बाबाच्या प्रतिकृतीकडून त्याचा खून करवला.. तुझा बाबा वीर्यदान करून विसरूनही गेला. पण मी नाही विसरू शकलो तुमच्या कुटुंबाला.." अमरचे डोळे आग ओकत होते.. अक्षताने त्या अविरतकडे परत पाहिले.. अमर एवढे काही बोलत होता.. त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता..
" तू खोटे बोलतो आहेस.. हा माणूस नाहीच.. तू मला फसवतो आहेस आधी फसवले तसेच.. याच्या चेहर्यावर काहीच भाव नाहीत.." अक्षता स्वतःचीच समजूत काढत होती..
" त्याचे चलनवलन सगळे माझ्या इच्छेनुसार होते.. संमोहनात आहे तो.. माझा एक ईशारा आणि तू....
अविरत लगेच.." कोणालाही कळले नाही काय होते आहे.. अविरतच्या हातातून एक बंदूक बाहेर आली.. त्याने ती अक्षतावर चालवली... इतक्यात आत्या अक्षताच्या समोर आली.. ती गोळी आत्याच्या पोटात शिरली.. आत्याच्या पायाशी एक भगवे वस्त्र घरंगळत पडले होते..
" महाराज...." आत्या जोरात ओरडली.. परिस्थिती बदलली आहे, हे अमरला पटकन जाणवले. सुपर्णा निघ.. अमर अविरतचा हात धरणार इतक्यात आत पोलीस आणि एक भगवे वस्त्रधारी व्यक्ती आत आली.. ते बघून अमर आणि सुपर्णा आत वळले. तिथून ते कुठे गेले ते अक्षताला कळले नाही.. "कोणीतरी प्लीज माझ्या आत्याला वाचवा.." अक्षता ओरडत होती.. पोलीस बंगल्याची झडती घेत होते.. ती भगवे वस्त्रधारी व्यक्ती आत्याजवळ आली. आत्याला उचलताना तिचे मुखावरील वस्त्र खाली सरकले.. 'तो मीत होता..' अक्षता बघतच राहिली.. पोलिसांनी अविरतला पकडले होते. अजूनही त्याच्या चेहर्यावर काहीच भाव नव्हते. "त्याला फक्त ताब्यात घ्या.. आणि मठात पोचवा.. मी आत्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो.. अक्षता चल माझ्यासोबत.." मीत म्हणाला.. काहीच तासात घडलेल्या या घडामोडींमुळे अक्षता बधिर झाली होती.. तिने सुन्नपणे सॅक उचलली. आत्याजवळ पडलेले ते वस्त्र हातात घेतले.. आणि ती मीतसोबत निघाली.. मीतने आत्याला गाडीत झोपवले.. अक्षता आत्याशेजारी बसली.. आत्या बेशुद्ध झाली होती.. मीतने पटापट दोनतीन फोन केले..
" मीत आत्या वाचेल ना?" अक्षताने विचारले..
" आपण लगेच पोहचू हॉस्पिटलमध्ये.."
" हि सगळी माझी चूक आहे.. माझ्यामुळेच झाले हे सगळे.. " अक्षताने रडायला सुरुवात केली..
" अक्षता.. प्लीज रडणे थांबव.. मी गाडी चालवू कि तुझ्याकडे पाहू.."
अक्षता रडे आवरण्याचा प्रयत्न करत होती.. आत्याच्या तोंडावरून हात फिरवत होती.. सकाळी आत्याशी झालेले बोलणे अक्षताला आठवत होते.. 'आपले आयुष्य ना सैनिकासारखे आहे. समोर मृत्यु दिसत असला तरी त्याला सामोरे जायचे असते.. ताठ मानेने..' अक्षताच्या अंगावर शहारा आला..
" आत्या, प्लीज.. तुला काही नाही होणार.. तुला बरे व्हायचे आहे.. आमच्यासाठी.." अक्षता रडत आत्याशी बोलत होती.. जणू ती ते ऐकते आहे.. दोघे हॉस्पिटलमध्ये पोचले.. मीतने केलेल्या फोनने काम केले होते.. हॉस्पिटलमध्ये येताच आत्याला लगेच ऑपरेशन थिएटर मध्ये नेले.. तोपर्यंत मालतीताईही आल्या होत्या.. "अक्षता काय झाले हे? ताई तर कामासाठी जाते म्हणून बाहेर पडल्या होत्या.. आता मी दाजींना आणि सुधीरला काय सांगू?"
" काकू शांत व्हा जरा.. आपण बोलू नंतर.."
" मीत तू या कपड्यांमध्ये?"
" काकू.. बोलतो नंतर.." यांचे बोलणे चालू असतानाच महाराज तिथे आले. दोघेही साध्या वेशात होते. त्यांनी मीतकडे पाहिले.. " आधी कपडे बदलून ये.." मीत त्यांना नमस्कार करून तिथून निघाला.. मालतीताईंनी महाराजांना नमस्कार केला.. " तुम्हीच आला होता ना, आमच्या घरी.. हे गेल्यावर?" महाराजांनी मान हलवली..
" ताई बर्या होतील ना?" मालतीताईंनी परत विचारले..
"ईश्वरेच्छा.."
डॉक्टर बाहेर आले..
" डॉक्टर, आत्या?" अक्षताने विचारले.
" आम्ही गोळी काढली आहे.. तुम्ही भेटून घ्या त्यांना.. वॉर्डमध्ये हलवल्यावर.."
महाराज, मीत, अक्षता, मालतीताई सगळे राधाताईंजवळ जमले होते.. त्या शुद्धीवर आल्या होत्या. महाराजांना बघून त्यांनी हात जोडायचा प्रयत्न केला.. महाराजांनी आत्याचा हात खाली केला.. कपाळावर भस्म लावले.. तोंडात कसलीशी पूड टाकली.. आत्याला वेदना कमी झाल्यासारखे वाटले..
" मला माहिती आहे.. माझ्याकडे जास्त वेळ नाहीये.." आत्या आत्ता बोलू शकत होती..
" आत्या प्लीज ना.. नको ना असे बोलूस.. माझ्या चुकीची शिक्षा तुला का?" अक्षता रडत होती..
" हि तुझ्या चुकीची शिक्षा नाही.. मी तुझ्या आईला वचन दिले होते.. तुला जपायचे.. ते मी पूर्ण केले.. तुला जे हवे आहे ते आपल्या वाड्यात शोध.."
" मला माफ करा ताई.. मी नको ते वचन मागितले तुमच्याकडे.." मालतीताईंनाही रडू आवरत नव्हते..
" ते विधिलिखित होते.. खरेतर श्रीरंगला तिथे पाहून मी थक्क झाले.. एवढी कि मी तिथे कशासाठी गेले होते तेच मला आठवले नाही.. गेलेला श्रीरंग असा चालताबोलता अचानक माझ्या समोर आला आणि लोकांना ज्ञान शिकवणारी मी आपण शत्रूच्या घरात आहोत ते विसरले.. यात तुझा दोष काहीच नाही.. पण मालती इतके दिवस मी तुमच्यासोबत राहिले तरी माझ्या घराकडे माझे लक्ष होते.. आता माझ्या लेकाला तुझ्या पदरात घे.. त्याची काळजी घे.."
मालतीताईंनी न बोलता मान हलवली आणि राधाताईंच्या हातावर हात ठेवला..
" मीत.. आतापर्यंत जशी अक्षताची काळजी घेतलीस तशीच यापुढेही घे.." अक्षताने चमकून मीतकडे पाहिले.
" आत्या..." मीतचे डोळे पण डबडबले होते..
" महाराज.." आत्याने महाराजांना साद घातली..
" काय बोलू मी? आधी दामोदर नंतर श्रीरंग आणि आता तू.. फार मोठे उपकार आहेत तुमचे सगळ्यांवर.. कधी कधी खरेच असे वाटते कि मृत्यूलेखही मला बदलता आला असता तर.."
" तुम्हाला आमच्याबद्दल हे जे काही वाटते तेच खूप आहे.. महाराज मुक्त करा आता मला.."
महाराजांनी डोळे मिटून मंत्र म्हणायला सुरुवात केली.. आत्याने हात जोडले.. एक ज्योत महाराजांमध्ये विलीन होताना सगळ्यांना दिसली..
अमर त्याच्या दुसर्या बंगल्यात अस्वस्थपणे फेऱ्या मारत होता.. "प्रत्येक वेळेस , प्रत्येक वेळेस माझे काम पूर्ण होत येते आणि शेवटच्या क्षणाला बिघडते.. त्याच्याही मर्यादा आहेत. का नाही मिळाला मला तेव्हा माझ्या रक्ताचा बळी? का?" अमर जोरात ओरडत होता.. तिथे उभी असलेली सुपर्णा त्याचा हा अवतार पाहून थोडी घाबरली होती..
" ती अक्षताची सॅक घेतलीस तू?" अमरने सुपर्णाला विचारले..
" नाही.. त्या आधीच अविरतने गोळी चालवली.. मग त्या घाईत राहून गेले.." सुपर्णा घाबरत म्हणाली..
" मूर्ख आहेस तू.. अविरत... अविरतही तिथेच राहिला.. एवढा पैसा ओतला आहे त्याच्यासाठी.. तो हि तिथेच राहिला.. आणि त्याच्यावरचे संमोहनही.. सगळा बट्ट्याबोळ झाला.. जेव्हा ती अक्षता सकाळी बंगल्यात आली , मला असे वाटले होते कि तो भैरोबाबा हाती येईल.. आणि सगळे माझ्या मनासारखे होईल.. पण नाही.. तो भैरोबाबाही नाही आला ना ती अक्षता मेली.."
" भैरोबाबाची काय आवश्यकता? तुमच्याकडे तो ताईता आहेच ना? तो तर भैरोबाबापेक्षा प्राचीन तांत्रिक आहे.." सुपर्णा म्हणाली.
" ज्या गोष्टीत आपल्याला काहि कळत नाही, तिथे माणसाने जास्त बोलू नये.. निघ आता इथून.. मला जरा विचार करू दे.." अमर सुपर्णावर खेकसला..
" निघते मी.."
" पण तू जाणार कुठे.. तुझे आईबाबातर मागच्या आऊटहाऊस मध्ये आहेत.."
" मी घरी जाऊन माझ्या राहिलेल्या वस्तू घेऊन येते.." सुपर्णा अमरकडे न बघता निघाली..
पुढील भागात पाहू अमरला भैरोबाबाच का हवा आहे.. सुपर्णा आईबाबांना न भेटता घरी का गेली.. अक्षताला काय सापडेल तिच्या वाड्यात..
हि कथा काल्पनिक असून मनोरंजनात्मक हेतूने लिहिण्यात येत आहे.. अंधश्रद्धा पसरविण्याचा अजिबात हेतू नाही..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा