Login

समर्थांची लेक भाग ३३

Story Of The Female Ghostbusters

समर्थांची लेक भाग ३३


मागील भागात आपण पाहिले कि भैरोबाबाचा आत्मा अक्षता अगदी सहजगत्या बंदिस्त करते. कोणीतरी अक्षताच्या खोलीत शिरायचा प्रयत्न करत होते.. आता पाहू पुढे..


     अक्षता आणि मीतने विमानात एक क्षणही ती सॅक दृष्टिआड केली नाही.. ते विमानतळावर उतरले. तिथून अक्षताला तिच्या घरी सोडून मीत पुढे गेला.  

" काय ग हे अक्षता? अशी सुकल्यासारखी का दिसते आहेस?" घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या आत्याने विचारले..

" आत तर येऊ दे मला.." अक्षताने प्रवेश करताना ती सॅक मुद्दाम दरवाजात ठेवली आणि विचार करू लागली आत्यापासून हे कसे लपवायचे याचा.. विमानात आपल्या पाठी कोण आहे हा विचार इतका प्रबळ होता कि घरी आई आणि आत्याला तोंड द्यायचे आहे, हे ती विसरूनच गेली होती.. आत्या त्या दरवाज्यात ठेवलेल्या सॅककडे रोखून बघत होती. तेवढ्यात तिला कोणाचा तरी फोन आला. फोनवर बोलण्यासाठी म्हणून आत्या बाहेर गेली हे पाहून अक्षता आईकडे पळाली.. तिचे हातपाय धुवून होईपर्यंत आत्याचे फोनवरचे बोलणे झाले.. तोपर्यंत अक्षताने राजस्थानमध्ये काय झाले ते सांगायला सुरुवात केली. पहिले हॉटेल आणि तांत्रिकाला बंदिस्त केले हे सोडून बाकी सगळ्या घटना ती छान तिखटमीठ लावून सांगत होती.. आई आणि आत्या मन लावून ते ऐकत होत्या.. सगळे सांगून झाल्यावर तिने राजकुमाराने दिलेले वस्त्र दाखवले.. ते पाहूनच दोघींनी त्या वस्त्राला नमस्कार केला.  

"अग पण तुझी मोठी कपड्यांची बॅग कुठे आहे?" आईने विचारलेच..

" मी सांगितले नाही का? अग आम्हा दोघांच्या बॅगा विमानात हरवल्या.. तक्रार नोंदवली आहे." आईशी खोटे बोलताना अक्षताने मान खाली घातली होती..

" बॅग जाऊ दे. आपली लेक सुखरूप आली ते बघ.. तू तिला तीर्थ दे.. आणि अक्षता तू माझ्याजवळ बस.."

आत्याने थोडा वेळ ध्यान केले.. आणि अक्षताच्या भुवईच्यामध्ये आपला अंगठा टेकवला.. गेले दोन तीन दिवस जो शक्तीपात अक्षताला जाणवत होता तो अचानक भरून निघाला..

" आत्या मला हि शिकव ना हे.. मागे पण तू हे केल्यानंतर मला बरे वाटले होते.."

" अग फक्त दत्तगुरूंचे ध्यान करते.. आणि त्यांना सांगते कि या व्याधी जर जनकल्याणासाठी आम्ही घेतल्या असतील तर तुमची इच्छा असेल तर त्या दूर करा.. अजून काहीच नाही.. ते घेतात बरे आपली काळजी.."

" ते खरेच आपली काळजी घेतात मग त्यांनी बाबांना , आजोबांना का नाही ग वाचवले?" आज पहिल्यांदाच अक्षता तिच्या बाबांविषयी आत्याशी बोलत होती..

" असे नसते ग.. प्रत्येकाची जीवनरेखा असते तेवढेच आपण जगतो ना.. तुझा विश्वास बसो वा नसो.. तुझ्या आजोबांना आधीच कळले होते त्यांचे मरण.. "

" तरिही ते गेले?"

" बाळा, ते कामच आहे ना आपले.. एखादा सैनिक जसा मरण समोर असले तरी त्याला सामोरे जातो.. तसेच आपल्याला मरण समोर दिसले तरी आपल्याला पाठी फिरता येत नाही.."

" आत्या , बाबांना मरण वाचवता आले असते.."

" अक्षता..."

" हो आत्या, ती लोक कसलीतरी शक्ती मागत होते.. ती जर दिली असती तर आज बाबा आपल्यामध्ये असते.. आणि मी हि अशी कुठे फिरत राहिले नसते.. तुला माहित आहे त्या शक्तीबद्दल?"

" अक्षता, आपल्या जुन्या घरात काय काय आहे हे असे लगेच नाही ग सांगता येणार.." हे वाक्य ऐकून अक्षता थोडी निराश झाली. आत मालतीताई या दोघींचे बोलणे ऐकून रडत होत्या.. 

" अक्षता, ये माझ्या मांडीवर डोके ठेवून झोप आज.." अक्षताने आत्याचे ऐकले.. आत्याच्या आवाजातली ती करूणाष्टके ऐकून अक्षताच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले..


      " आई , आत्या मी निघते.."

" निघते म्हणू नकोस ग, येते म्हण.."

" हो ज आत्या.. तू कुठे बाहेर चालली आहेस? "

"हो थोडे काम आहे.."

"मी सोडू?"

" नको.. तू ऑफिसला जाणार असशील ना?"

" नाही.. थोडे काम आहे. ते करते मग ऑफिसला जाते.. आई येते ग.."

 सॅक घेऊन अक्षता अमरकडे जायला निघाली.. या हि वेळेस दरवाजाची घंटी वाजली नाही.. दरवाजा उघडेपर्यंत अक्षता मागच्या वेळेस दिसलेल्या कोळ्याचे जाळे दिसते का ते पहात होती.. तिला अनपेक्षितरीत्या ते दिसले.. कोणी ते झाडायची बहुतेक काळजी घेतली नसावी.. ती त्याला पहात होती तेवढ्यात एक सरड्याने पटकन त्यावर झडप घातली.. अचानक आलेल्या त्या सरड्याला पाहून अक्षता दचकली.. दरवाजा उघडला गेला..

" ये अक्षता. तुझीच वाट बघत होतो.. वेळेची अगदी पक्की आहेस.. "

" मी आले त्या किल्ल्यावर रात्रभर राहून.. "

" हो. माझा विश्वास आहे तुझ्यावर.."

" आता तुम्ही मला त्या शक्तीबद्दल सांगू शकता..

" काय घाई आहे? आधी तू तिथून माझ्यासाठी आणलेली भेट तर दे मला.."

" तुम्हाला हे हि माहित आहे? चुकले मी माहिती असेलच.. पण मग तुम्ही जर एवढे शक्तीशाली होता तर मग तुम्हीच का नाही आणलेत त्या तांत्रिकाला? तुमच्याकडे दुसरे कोणी नव्हते का?"

" होते की.. नसायला काय झाले? पण आधी म्हटले तसे हे आमच्या पंथात तुझे स्वागत करण्याची माझी पद्धत होती.."

" पण मी कुठे तुमचा पंथ स्विकारला आहे?"

" मागे सांगितले ना, जेव्हा तू त्या ताईताला बंदिस्त केलेस, तेव्हाच तू आमच्या पंथात समाविष्ट झालीस.. आता जास्त न बोलता गुपचूप ती कुपी मला दे.. असेही मी तुझे खूप ऐकून घेतले आहे.. "

" आधी त्या शक्तींची माहिती.. मगच कुपी.."

" तू अशी नाही ऐकणार तर? घ्या ती कुपी तिच्याकडून.."

आतला दरवाजा उघडला गेला.. आतून सुपर्णा बाहेर आली..

" सुपर्णा तू इथे? तुला या लोकांनी काही केले नाही ना? तू बरी आहेस ना?"

" अक्षता ती कुपी मला दे.."

" सुपर्णा तुला?"

" जास्त न बोलता ती कुपी तिच्या ताब्यात दे.."

" सुपर्णा तुला तर हे जग अनोळखी आहे ना.. मग तुला या कुपी मध्ये का एवढा रस? सुपर्णा बोल काहीतरी माझ्याशी.."

सुपर्णाने काही न बोलता सॅक मागितली.. अक्षताने सॅक हातात घट्ट धरून ठेवली.. अमर अक्षताची हि अवस्था पाहून हसत होती..

" तुला आश्चर्य वाटते आहे ना, सुपर्णा इथे कशी? चल तर मरण्याआधी तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊन टाकतो.. हि सुपर्णा आधीपासूनच आमच्यासोबत आहे. म्हणजे तुम्ही शाळेत भेटल्यापासून.. तुझ्यावर लक्ष ठेवायला मला कोणीतरी हवेच होते.. म्हणून या सुपर्णाला मी हे काम दिले.." अक्षता बधिर होऊन ऐकत होती.. तिचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता.. तिची सुपर्णा तिच्यावर लक्ष ठेवत होती.. तेही एका पंथासाठी.. अमर पुढे बोलतच होता..

" तुला तुझी शाळेची सहल आठवते? ती हि मीच ठरवली होती.. माझी खूप इच्छा होती, तुला आमच्या पंथात बोलवायची.. मग तो आमच्या योजनेचा पहिला भाग होता.. पण बहुतेक तुझ्या बापाच्या लक्षात आले कि तुझ्यात काहीतरी बदल झाला आहे ते.. त्याने तुझे एकटे बाहेर जाणे बंद केले.. आणि इतर वेळेस तो दुसरा मुलगा तुझ्यासोबत असायचाच.. पण मला तरी कुठे घाई होती.. मी वाट पहात होतो एका योग्य क्षणाची.. तुलाही तुझ्या बाबांसोबतच मुक्ती देणार होतो.. पण त्याने एक आडमुठेपणा केला.. त्याने मला ती शक्ती कुठे आहे ते सांगितलेच नाही..

" तू... तू.. माझ्या बाबांना मारले?" अक्षता संतापाने लाल झाली होती..

" नाही.. तुझ्या बाबाला मी नाही मारले.. पण मारायला नक्की सांगितले.. तुझे आजोबा, बाबा आणि आता तू.. तुझा बाबा मुक्त झाला पण तुझा आजोबा अजूनही वाट पाहतो आहे मुक्तीची..."

" तू खूप दुष्ट, नीच आहेस.." अक्षताच्या तोंडून शब्द फुटत नव्हते..

" नाही ग.. मी अजिबात दुष्ट नाही.. मी  स्वतः  कोणालाही अजिबात मारत नाही.. मी फक्त मारायला सांगतो.. तुला पहायचे तुझ्या बाबांना कोणी मारले ते? आणि तुला कोण मारणार ते?" अमर क्रूरपणे हसत म्हणाला..

"ये रे..."


" बाबा.. कसे शक्य आहे?" अक्षता विस्मयाने ओरडली...





अमर अक्षताला मारू शकेल? खरेच कोणती शक्ती आहे अक्षताच्या पूर्वजांकडे? बाबा अशी हाक अक्षताने कोणाला मारली असेल? पाहूया पुढील भागात..



हि कथा काल्पनिक असून मनोरंजनात्मक हेतूने लिहिण्यात येत आहे.. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात प्रयत्न नाही..


सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई

🎭 Series Post

View all