समर्थांची लेक भाग ३२

Story Of A Female Ghostbuster

समर्थांची लेक भाग ३२



मागील भागात आपण पाहिले कि अक्षता राजकुमारी प्रियवंदेला मुक्त करते. तिच्यासोबत राजकुमारही मुक्त होतो. आता बघू ती त्या तांत्रिकाचे काय करते..



थकलेल्या अक्षताला घेऊन मीत अजितसिंगच्या घरी गेला. (संभाषण आपल्या सोयीसाठी मराठीत)

" अरे काय झाले मॅडमला?"

" मी सांगतो नंतर, मला एक सांगा इथे राहण्याची कुठे सोय होईल का?"

" लाजवताय का मला? राजासाबने मला तुमच्याबद्दल सांगितले आहे. तुम्ही काळजी नका करू. मी सगळी व्यवस्था करतो." अजितसिंगने लगेचच एक खोली तयार करून मीतला दिली. अक्षता खरेच खूप दमल्यासारखी वाटत होती. मीतने काहीतरी आठवल्यासारखे सॅकमधून गंगाजल काढले, त्यात थोडेसे भस्म टाकले. ते पाणी अक्षताला प्यायला दिले. अक्षताला थोडी हुशारी आली.

" बरी आहेस का आता?"

अक्षताने मान हलवली.

" आपण कुठे आलो आहोत?"

" तुझ्या भावाकडे." मीत हसत म्हणाला. "मी त्यांना पटकन काहीतरी खायला द्यायला सांगतो. म्हणजे थोडे बरे वाटेल." 

अजितसिंग स्वतः जेवणाच्या थाळ्या घेऊन खोलीत आले.

" तुम्हाला कसे धन्यवाद देऊ मी कळत नाही."

" का भाईसाब?"

" तुमच्यामुळे आमची राजकुमारी आणि राजकुमार मुक्त झाले. अजून काय पाहिजे?"

" तुम्हाला कसे कळले? मीत ?"

" नाही मॅडमजी. साब येण्याच्या आधीच ते कळले होते. राजासाबनी दिलेले एक फूल होते. कितीतरी वर्ष ते आमच्या देव्हार्यात ठेवले होते. त्या फुलातून आम्हाला राजासाबचा संदेश मिळायचा. आज त्या फुलाची माती झाली आणि चंदनाचा वास पसरला. आम्हाला कळले राजासाब आम्हाला सोडून गेले ते." अजितसिंग डोळे पुसत म्हणाला. "पण अजून ते राहणार तरी किती वर्ष. तुम्हाला जे हवे ते सांगा. मी खालीच आहे." 

दिवसभर थकलेल्या त्या दोघांनी जेवायला सुरुवात केली. 

"इथे नाही तू ती चाचणी केलीस?" मीतने मस्करी करत जेवता जेवता विचारले.

" मीत कधीतरी माणसे ओळखता येतात रे."

" तुला बोलताही येत नाहीये. तू जेव आणि झोप. मी बघतो बाकीचे."

अक्षता खरेच लगेचच झोपून गेली. मीतने खबरदारी म्हणून बेडच्या आसपास भस्माची रेघ आखली. तो सुद्धा थकला होता. दोघांच्याही स्वप्नात वीरेंद्रसिंह आले होते. 'आजची रात्र तुम्ही किल्ल्यावर टाकलेली भस्मरेखा नक्कीच पुरेशी आहे. पण उद्या काही झाले तरी त्या तांत्रिकापासून माझ्या प्रजेला मुक्त करा.' झोपेतच या दोघांनी होकार दिला. दूर कुठेतरी वादळ आल्यासारखे वाटत होते..

        झालेल्या विश्रांतीनंतर मीत आणि अक्षता दोघेही ताजेतवाने झाले होते. "मग मॅडम आजचा कार्यक्रम?"

" संध्याकाळी जाऊ किल्ल्यावर. "

" तुझी तयारी आहे?"

" जायला तर पाहिजे ना?"

" आत्याला विचारतेस?"

" नको. तिला टेन्शन येईल. बघू करूया काहीतरी. मी ध्यान करू का? मला थोडी ऊर्जा मिळेल. "

" तू कर. मी येतो खाली जाऊन."

मीत खाली उतरला. त्याची पावले किल्ल्याच्या दिशेने वळली.


" काय रे थकल्यासारखा वाटतो आहेस?"

" हो. एवढा वेळ बाहेर होतो ना. उन्ह खूप आहे ग."

" आता तू थोडावेळ आराम कर. उन्ह उतरल्यावर निघू आपण."

दोघे आज पूर्ण तयारीनिशी निघाले कारण राजकुमारीला मुक्त करायला राजकुमार असल्यामुळे तेवढा त्रास झाला नव्हता. पण आता गाठ होती कालकेय पंथाच्या तांत्रिकाशी..

" अक्षता, मला तुझ्या या गोष्टीतले जास्त काही कळत नाही, पण एक सांगू?" विचारमग्न मीतने विचारले.

" बोल ना."

" तू जेव्हा जेव्हा एखाद्या आत्म्याला मुक्त करतेस तेव्हा त्या आत्म्याच्या भावना समजून त्याला मुक्त करण्याचा प्रयत्न करतेस. पण मला असे वाटते कि यावेळेस तू हे टाळावेस."

"म्हणजे?"

" हे बघ, या किल्ल्यावर आपण रात्री कोणाच्या सांगण्यावरून रहात आहोत हे फक्त तुलाच माहित आहे. मी अजितसिंगला विनंती करून आपण वर राहू शकू याची सोय केली आहे. पण तिथे काय होऊ शकते आपल्याला माहीत नाही. मागे गेलेल्या वाड्यावर आत्या मदतीला होत्या. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आत्मे कोणत्याही बंधनात नव्हते. त्यामुळे जो काही धोका होता तो आपल्यालाच होता. इथे परिस्थिती वेगळी आहे. हा तांत्रिक त्याच्या प्रदेशात बंदिस्त आहे. तो जर चुकून बाहेर पडला आणि आपल्याला जर काही करायला जमले नाहीतर आपण सोड, बाकीचे लोक संकटात पडतील."

अक्षताला मीतचे म्हणणे पटले..

" तू म्हणतोस, त्यात तथ्य आहे रे. तो जर त्या पंथाच्या मुख्याकडून हाकलला गेला असेल, तर त्याची शक्ती नक्कीच जास्त असेल. पण तरिही उत्सुकता आहे रे, असे काय घडले असेल, ज्यामुळे एका राजकुमारीसाठी त्याने हे सगळे केले. त्याचीही काही बाजू असेलच ना?"

" माता अक्षतादेवी, सगळेच संतमहात्मा नसतात. त्या हॉटेलचा अनुभव आठवा आणि आपल्या उत्सुकतेला लगाम घाला. तुमचे नाही पण माझे ऑफिस माझी वाट पहात आहे."

ऑफिसचे नाव काढताच अक्षताला अमर आठवला. तो आपल्याशी नक्की काय वागतो आहे त्याचा अर्थ अजूनही तिला कळला नव्हता. पण नकोच त्या विचारांच्या जंजाळात फसायला. समोर जे आहे, त्यावर लक्ष केंद्रित करू. दोघेही किल्ल्यावर पोचले. अजितसिंगने दिलेले पत्र मीतने किल्ल्यावरील रखवालदाराला दाखवले. त्याने आश्चर्याने दोघांकडेही पाहिले.

" तुम्ही खरंच रात्री इथे राहणार आहात?"

" हो. पत्रात लिहिले आहे."

" ते पत्रात लिहिले असले तरी माझे ऐका , नका असे धाडस करू. माझी झोपडी किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. कालची रात्र एवढी भयानक गेली ना. रात्रभर असे वाटत होते काहीतरी विचित्र होणार आहे. गस्त घालणारे गावकरी फिरत होते म्हणून नाहीतर माझे काही खरे नव्हते."

" काळजी करू नका दादा. मला सांगा आज अशी भिती वाटली का तुम्हाला?" मीतने विचारले.

" नाही. पण मी सकाळी महालाच्या बाजूला गेलो होतो. तिथे काचांचा खच पडला होता. गेले दोन दिवस खूपच चालू आहे हे सगळे."

" थांबेल लवकरच." अक्षता आत्मविश्वासाने बोलली.

" देव तुम्हाला मदत करो. जा तुम्ही. मी सांगतो बाकीच्यांना तुम्हाला अडवू नका म्हणून. रात्री काही गरज लागली तर एक आवाज द्या. गावकरी गस्त घालतात. ते येतील मदतीला. तिथून येतो आवाज खाली."

"धन्यवाद दादा."

ते दोघे महालाजवळ पोचले. वेगळीच शांतता होती तिथे. अक्षताला थोडे आश्चर्य वाटले. 

" तू काय करणार? रात्रीपर्यंत थांबणार कि आत्ताच विधी सुरू करणार?" मीतने विचारले.

" मी सर्व मांडून ठेवते. पण आधी गडावरची माणसांची ये जा कमी होऊ दे. कोणी काही आक्षेप घ्यायला नको. आणि रात्र झाली कि विधींना सुरूवात करू."

"बघ कसे जमते ते.."

अक्षताने मांडणी केली. तिने यावेळेस उडीद वापरलेले पाहून मीतने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. एका क्षणी गडावरची वर्दळ पूर्ण थांबलेली दोघांनाही जाणवली. दोघे अंधार पडायची वाट पहात होते. एक प्रकारचा तणाव वातावरणात जाणवत होता. अक्षताने मंत्र म्हणायला सुरुवात केली. समोर एक कुपी ठेवली. आणि तिची अपेक्षा नसताना त्या तांत्रिकाचा आत्मा मंत्र पूर्ण होताच त्या कुपीत दिसायला लागला होता. अक्षताचा अजिबात विश्वास बसत नव्हता. तिने ती कुपी बंद केली. सॅकमध्ये व्यवस्थित ठेवली. आज खूप विचित्र जाणीव होत होती. 'एका महान शक्तीशाली तांत्रिकाचा आत्मा काही क्षणात मला शरण गेला?' विचाराने आणि या घटनांनी ती थकली होती. मीतने तिच्या खांद्यावर हात ठेवला.

"निघायचे?"

ते दोघे खाली उतरले. तो रखवालदार बिचारा यांना मदत लागेल म्हणून खाली थांबला होता. 

"दादा, आता तुमचा किल्ला सामान्य झाला आहे. आता रात्रीची भिती गेली." मीत त्याला बोलला.

अजितसिंग सुद्धा अस्वस्थपणे या दोघांची वाट पहात होते.

" काय झाले?"

" तुमचा किल्ला रिकामा झाला." अक्षता म्हणाली. पण तिचा स्वतःच्याच शब्दांवर विश्वास नव्हता.

अजितसिंगने देवाला हात जोडले. 

"तुमचे खूप खूप आभार."

" ऐका ना, आम्ही थोडा आराम करतो. उद्या सकाळीच आम्हाला परत जायचे आहे." अक्षता म्हणाली.

"मी सगळी तयारी करुन ठेवतो.."

" दादा, आम्ही जाईपर्यंत थोडी काळजी घेता येईल का?" मीतने विचारले.

अजितसिंगला ईशारा समजला. 

" मी आता गावातल्या तरूणांना बोलावून इथे लक्ष ठेवायला सांगतो."

" खूप आभार."

झोपण्यापूर्वी अक्षताने न विसरता त्या कुपीभोवती मंतरलेला धागा गुंडाळला. मीतने दुसर्‍या दिवशीचे विमानाचे तिकिट बुक केले. 

    सकाळी दोघेही निघाले.. अजितसिंग बहुतेक रात्रभर जागे होते.

" काय झाले भाईसाब? तुम्ही झोपलेले दिसत नाही."

" काय सांगू तुम्हाला? काल पहिल्यांदाच किल्ल्यावर नाही, पण गावात गोंधळ झाला होता. मोठी मारामारी झाली. गस्तीवर असलेले सगळेच गावकरी तिथे जायला निघाले. पण मी चारजणांना माझ्या मदतीसाठी थांबवून घेतले. देव कसा पाठिशी असतो ते पहा, काल कोणीतरी तुम्हाला दिलेल्या खोलीत घुसायचा प्रयत्न करत होते. त्यांना पकडणार तेवढ्यात ते पळाले."

मीत आणि अक्षताने चमकून एकमेकांकडे पाहिले. अक्षताने परत एकदा सॅक चपापली. 

" आजकाल ना मुलीपण चोऱ्या करायला लागल्या आहेत. मुलगी होती एक त्यांच्यामध्ये. आणि आताच कळले काल जी मारामारी झाली त्यात आमच्या गावचे कोणीच नव्हते. काय चालले आहे, काहीच कळत नाही. तुम्हाला धोका आहे, असे वाटते. तुम्ही लवकरात लवकर एखाद्या सुरक्षित जागी पोहचा. इथे काहीतरी चुकीचे चालले आहे. पोचलात कि कळवायला विसरू नका. "

अजितसिंगचा निरोप घेऊन अक्षता आणि मीत तिथून निघाले.




असे काय झाले असेल ज्यामुळे भैरोबाबासारखा शक्तीशाली आत्मा काही मंत्रातच अक्षताच्या ताब्यात आला. कोण असेल ती मुलगी? तिला काय हवे आहे अक्षताकडून? पाहू पुढच्या भागात..


हि कथा काल्पनिक असून मनोरंजनात्मक हेतूने लिहिण्यात येत आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात हेतू नाही.


सारिका कंदलगांवकर. 

दादर मुंबई.

🎭 Series Post

View all