Login

समर्थांची लेक भाग ३१

Story Of A Female Ghostbuster


समर्थांची लेक भाग ३१


मागील भागात आपण पाहिले कि राजस्थानमध्ये भेटलेला तो वृद्ध राजकुमारी प्रियवंदेचा होणारा नवरा वीरेंद्रसिंह असतो. भैरोबाबा असे म्हणवणाऱ्या तांत्रिकाने आपल्या शक्तीचा गैरवापर करत राजकुमारीशी लग्न करण्याचा प्रयत्न केला. त्यात राजकुमारीने आत्महत्या केली तर त्याचा जीव राजपुत्राने घेतला.. पुढे पाहू अक्षता यात काय करू शकते..


" सांगा राजकुमार, या सगळ्यामध्ये मी काय आणि कशी मदत करणार तुमची?" अक्षताने परत विचारले..
" तू जर माझ्या राजकुमारीला तुझ्या शरीरात प्रवेश करू दिलास.. तर आणि तरच ती यातून मुक्त होऊ शकते.."
" तुम्ही ठिक आहात ना? त्या राजकुमारीच्या मुक्तीसाठी मी अक्षताचा जीव धोक्यात नाही घालू शकत. " मीत काळजीने म्हणाला.
" तो जीव तर आधीच धोक्यात आहे."
अक्षता आणि मीत राजकुमाराकडे आश्चर्याने पहायला लागले..
" यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे.. मी या राज्याचा होणारा जावई होतो. त्यांच्या राजकुमारीवर त्यांचे जीवापाड प्रेम होते. तसेच प्रेम ते माझ्यावर पण करत होते. त्यातलेच एक कुटुंब आहे अजितसिंगचे.. तुम्ही जिथे जेवलात त्याचा मालक.. त्याचे बापजादा इकडचे दिवाण होते. राजघराण्यावर त्यांची निष्ठा होती. तीच ते पाळत आहेत.. त्याने मला सांगितले , तुम्ही कुठे उतरला आहात ते.."
इथे काय चालू आहे, ते अक्षता आणि मीतला अजिबात समजत नव्हते. सगळ्याच गोष्टी एकमेकांत गुंतत चालल्या होत्या.. आणि आता तर त्या गळ्याशी आल्या होत्या. म्हणजे आत्म्याला मुक्ती देणे इथपर्यंत ठीक आहे.. पण त्याला स्वतःच्या शरीरात प्रवेश करू देणे..

" पण यात माझ्या जीवाला धोका कसा आहे?" अक्षताने विचारले..
"मला सांग, तुम्ही तिथे काही खाल्ले का?"
" नाही.. का?"
" कारण , माझा अंदाज आहे कि त्या लोकांची तुमच्यावर पाळत आहे. बहुतेक त्या लोकांपैकी कोणीतरी तुम्हाला काल माझ्याशी बोलताना पाहिले असावे.. आणि हि त्यांची जुनी पद्धत आहे. त्यांना थोडा जरी संशय आला तरी ते त्या व्यक्तीला त्यांच्या पद्धतीने शिक्षा देतात.. जर माझे ज्ञान मला दगा देत नसेल तर माझा असा अंदाज आहे कि त्यांना या मुलीकडून काही तरी काम करून घ्यायचे आहे. म्हणून ते हिला शारीरिक हानी करणार नाही.. पण त्याच वेळेस त्यांची , तुमची आणि माझी भेट होऊ नये अशी इच्छा असावी.. म्हणून ते दुसरे उपाय करत असावेत.. त्यातलाच एक , अन्नात त्यांचे औषध मिसळले कि व्यक्ती त्यांच्या मनाप्रमाणे वागतो. त्या भैरोबाबाने पूर्ण राज्याला तसेच संमोहित केले होते. तीच पद्धत ते अजूनही वापरत आहेत.."
" तसा धोका का?"
" हो.."
" मग तसा धोका तर आम्ही पिढ्यान पिढ्या पत्करत आलो आहोत. " पाणावलेल्या डोळ्यांनी अक्षता म्हणाली. " तुम्ही मला सांगा काय करायचे आहे मला, मी तयार आहे."

"त्याआधी एक विचारू राजकुमार?" मीतने विचारले.
" बोल ना.."
" इथे सगळ्या दुकानात लावलेला फोटो तुमचा आहे?"
" हो.." असे म्हणत वीरेंद्रसिंह हसले.
" म्हणजे तुम्ही त्यांचे रक्षण करता.."
" हो.."
" मग तरिही रात्री इथे कोणीच का राहू शकत नाही?"
" कारण रात्री त्याची शक्ती वाढते.. मी एकटा पुरेसा नसतो त्याला थोपवायला.."
" मग त्याचे इतर तांत्रिक नाही येऊ शकत?"
" नाही. तुम्ही इथे पाहुणे आहात, म्हणून तुम्हाला माहीत नाही.. इकडचा प्रत्येक माणूस डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून असतो कोण वर येते आणि कोण नाही याकडे. आताही खाली गावकरी पहारा करत असतील.. त्यामुळे अजून तरी त्याची शक्ती वाढलेली नाही."
" आपण सुरू करूया का आपल्या कामाला ? कारण आपण कितीही बोललो तरी या गोष्टी संपणार नाहीत.. मीत विश्वास ठेव माझ्यावर.. मला काहीच होणार नाही.." अक्षताने ठामपणे सांगितले. यावर मीतने फक्त खांदे उडवले.. राजकुमारानी सांगायला सुरुवात केली.
"अक्षता , तो महाल दिसतो आहे. त्या महालाच्या पायथ्याशी तो तांत्रिक असतो.. आणि महालात अडकली आहे माझी प्रियवंदा.. तू हे वस्त्र घेऊन आत प्रवेश कर.. म्हणजे त्या तांत्रिकाला तुझे अस्तित्व जाणवणार नाही.." राजकुमाराने त्याच्या पोतडीतून अतिशय तलम असे भगव्या रंगाचे वस्त्र काढले.. अक्षता आणि मीत त्याकडे बघतच राहिले. आतून उर्मी आल्यासारखे त्यांनी त्या वस्त्राला नमस्कार केला..
" हे??"
" माझ्या गुरूंनी दिलेले वस्त्र आहे. त्यांनी मला सांगितले होते, योग्य वेळी याचा वापर करायला. बहुतेक ती वेळ आली आहे. मी जन्माने आणि कर्माने राजा होतो.. त्यामुळे फक्त रक्षण करणे हेच मला चांगले जमत होते. हे जे काही मंत्र मला शिकवले गेले ते फक्त इकडच्या प्रजेचे रक्षण करण्या इतपतच असावेत. पण तुम्ही दोघे या किल्ल्याला नक्की मुक्त कराल असे मला वाटते.."
" पण मीतला यातले काहीच माहित नाही.." अक्षता विस्मयाने म्हणाली.
राजकुमार परत हसले, "चला रात्र व्हायच्या आधी कामाला लागू."
" मी तिला एकटीला आत जाऊ देणार नाही. मी पण तिच्यासोबत जाणार." मीत म्हणाला.
" नाही , तुझी गरज मला बाहेर लागणार आहे. अक्षता तू हे वस्त्र पांघरून आत जा.. महालाच्या आत सगळे प्रियवंदेचेच राज्य आहे.. माझे नाव घे फक्त, ती तुला सगळी मदत करेल."
अक्षताने निश्चयाने ते वस्त्र पांघरले, राजकुमाराला नमस्कार केला..
" फक्त त्या तांत्रिकाच्या आत्म्याला मी बंदिस्त करणार,चालेल तुम्हाला?"

राजकुमाराकडे हो म्हणण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.. अक्षता निघाली. न विसरता तिने तिची सॅकसोबत ठेवली होती. महालाजवळ येताच तिला त्या तांत्रिकाचे अस्तित्व जाणवायला लागले.. अमर सोबत बोलताना जे वातावरण असायचे ते असल्यासारखे तिला वाटू लागले. पण आधी मिशन राजकुमारी असे म्हणत ती पुढे जात राहिली.. महालात प्रवेश करताच समोर एक मोठे चित्र टांगलेले होते.. \"एवढे अप्रतिम सौंदर्य , का नाही तो राजकुमार तिची वर्षानुवर्ष वाट पाहणार?\" अक्षताच्या मनात विचार आला. अक्षता अजून पुढे आली.. तिथे एक स्त्री उदास अशी खिडकीत बसली होती.. \"हिच राजकुमारी असावी बहुतेक,\" अक्षताने तर्क केला. अक्षता तिच्या शेजारी जाऊन उभी राहिली. तरिही त्या स्त्रीला त्याची जाणीव नव्हती. ती कुठे पाहते आहे, हे अक्षताने पाहिले.. तिला समोर अस्वस्थपणे फेऱ्या मारणारा मीत आणि काही तरी मांडणी करत असलेले राजकुमार दिसले.. अक्षताने हळूच ते वस्त्र काढून व्यवस्थित ठेवून दिले..
" कोण?" त्या राजकुमारीला बहुतेक अक्षताची हालचाल जाणवली..
" मी अक्षता.. मला राजकुमार वीरेंद्रसिंहने पाठवले आहे.." ते नाव ऐकून त्या स्त्रीने अक्षताकडे मान वळवली. मगासच्या चित्रातले सौंदर्य फिके पडेल इतकी सुंदरता, त्यावर खानदानी शालीनता पण या सर्वांवर मात करणारी एक उदासीनता..
" राजकुमारांनी पाठवले आहे? ते आले युद्धावरून? तेच का नाही आले आम्हाला न्यायला? आणि तू इथे येऊ तरी कशी शकलीस? त्या तांत्रिकाच्या तावडीतून बरी बचावलीस? तू तर खूपच धाडसी दिसते आहेस.." राजकुमारीच्या चेहर्‍यावरचे औदासीन्य जाऊन उत्सुकता येत होती.
" मी इथे कशी आले, का आले हे नंतर थोडक्यात सांगते. आता महत्त्वाचे आहे इथून बाहेर पडणे.. थोडी घाई करा. संध्याकाळ होत आली आहे.." अक्षता बाहेर बघत म्हणाली.. आज अक्षतासाठी वेळ नुसता पळत होता.. सकाळी हॉटेलमध्ये झालेली घटना खूप वर्षांपूर्वी झाल्यासारखे वाटत होते..
" आपण बाहेर जायचे? कसे? त्या तांत्रिकामुळे तर मी महालाच्या बाहेरही पाऊल ठेवू शकत नाही.." राजकुमारी खिन्नपणे म्हणाली.
" तुम्ही काळजी करू नका.. मी सांगितल्यावर तुम्ही माझ्या शरीरात प्रवेश करा. इथून निघताना हे वस्त्र अंगावर ठेवा, म्हणजे त्या तांत्रिकाला आपण जात असल्याचे जाणवणार नाही.." राजकुमारीने मान डोलावली.
अक्षताने ते वस्त्र काळजीपूर्वक समोर ठेवले.. तिने पद्मासन घातले. बाबांचे, आजी आजोबांचे स्मरण करून तिने मंत्र म्हणायला सुरुवात केली.. मंत्र म्हणून झाल्यावर तिने त्याच अवस्थेत राजकुमारीला खुणावले.. राजकुमारीने अक्षताच्या शरीरात प्रवेश केला.. करताना ती म्हणाली,"धन्यवाद अक्षता. तुझ्या उपकारांची परतफेड करणे तर शक्य नाही. पण जर माझे काही पुण्य असेल तर त्याने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या.. हाच आशीर्वाद."
अक्षता फक्त हसली.. राजकुमारीने अक्षताच्या शरीरात प्रवेश केला.. आतमध्ये काही घडामोडी सुरू झाल्याचे त्या तांत्रिकाला जाणवले बहुतेक.. जोरजोरात खिडक्या दरवाजे वाजू लागले.. बाहेरच्या वस्तू खाली पडू लागल्या.अक्षतारूपी राजकुमारीने त्याकडे दुर्लक्ष करीत ते वस्त्र अंगावर पांघरले. एक भयावह आकृती महालाच्या बाहेर फिरत होती.. ती ना महालाच्या आत प्रवेश करू शकत होती ना बाहेर.. जणू त्या मर्यादित प्रदेशात वादळ सुरू होते.. त्याच झंझावातातून कशीबशी अक्षता बाहेर आली.. तिला बघताच मीत आणि राजकुमार दोघांच्याही चेहर्‍यावर हास्य फुलले.. मीत अक्षताकडे जाणार तोच ती राजकुमाराकडे गेली.. तिने त्याला मिठी मारली.. दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वहात होते..
" शेवटी आपण भेटलोच.." दोघेही एकदम म्हणाले..
" आता तिचे शरीर तिला परत देऊया?"
" हो.."
राजकुमाराने अक्षताला मगाशी जे काही मांडून ठेवले होते तिथे नेले.. त्याने स्वतःच्या पोतडीतून काही वस्तू काढल्या.. ते गंगाजल अक्षताच्या अंगावर शिंपडून काही मंत्र म्हटले.. राजकुमारी अक्षताच्या शरीरातून मुक्त झाली.
" तू खूप उपकार केलेस आमच्यावर.. चांदीची तारच जशी विद्युतप्रवाह नेऊ शकते. तशी तू आणि फक्त तूच हिला मुक्त करू शकत होतीस.. जास्त तर काही नाही देऊ शकत आम्ही तुला.. पण हे वस्त्र तुलाच ठेव.." राजकुमार म्हणाला.." अजून एक.. तो तांत्रिक चिडला आहे, असे दिसते आहे.. यात भस्माच्या काही पुड्या सुद्धा आहेत ज्या तुम्हाला मदत करतील.. आता आम्हाला जाऊ दे.."
" म्हणजे महाराज, तुम्ही?" मीतने विचारले..
" मी आता जाणार माझ्या राजकुमारीसोबत.. " त्याने राजकुमारीचा हात धरला.. आधी ते वृद्ध शरीर खाली पडले. त्यातून ती तसबिरीत दिसणारी व्यक्ती बाहेर पडली.. राजकुमार आणि राजकुमारी वर जाताना मीत आणि अक्षताला दिसले.. दोघेही त्या दोघांचे प्रेम बघून भारावले होते.. राजकुमाराच्या मृतदेहाला अग्नी द्यावा म्हणून ते तिथे वळले तर त्या जागेवर मातीचा ढिगारा दिसत होता.. त्या दोघांनीही त्याला नमस्कार केला..
" आता या तांत्रिकाचे काय करायचे?" मीतने विचारले..
" आपण उद्या बघूया? मी आता खरेच खूप दमले आहे.. कोणतेही भूत शरीरात येणे हा चांगला अनुभव नसतो.. " अक्षता थकलेल्या आवाजात म्हणाली..
" तू इथेच बस.. मी आलोच.. " मीतने भस्म आणि गंगाजल हातात घेतले.. त्या महालाभोवती त्याचे रिंगण केले आणि तो परत आला. " राजकुमारांचे आजचे काम केले.."


पुढील भागात पाहू, त्या तांत्रिकाचे काय होते ते.. तो मुक्त होतो कि नाही? अवनींद्रनाथांनी त्याला पंथाबाहेर का काढले होते..


हि कथा काल्पनिक असून मनोरंजनात्मक हेतूने लिहिण्यात आली आहे.. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात प्रयत्न नाही..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all