समर्थांची लेक भाग 30
मागील भागात आपण पाहिले कि राजस्थानच्या किल्ल्यावर एक वृद्ध व्यक्ती अक्षता आणि मीतला दुसर्या दिवशी भेटायला सांगते. तिथल्याच एका खाणावळीचा मालक त्या दोघांना राजाबद्दल सांगतो, जो त्यांची रक्षा करत असतो.. आता पाहू पुढे..
" आणि काय रे शहाण्या, डायरेक्ट सांगितलेस तिथे मी तुझी घरवाली म्हणून?" अक्षताने विचारले..
" मॅडम आपण राजस्थानमध्ये आहोत. अजूनही इकडची लोक तेवढी पुढारलेली नाहीत.. त्यामुळे सांगावे लागले.. पण माहिती मिळाली ना पटापट.." मीत उत्तरला..
" ते हि आहेच रे.. पण मीत हे हॉटेल कोणाचे असेल? आणि आता मला खरेच असे वाटते आहे कि मी माझ्यासोबत तुझेही प्राण धोक्यात टाकते आहे.." अक्षता गंभीरपणे बोलत होती..
" वेडी आहेस का? आपण ना एक काम करू उद्या सकाळी आपले जेवढे बसेल तेवढे महत्त्वाचे सामान आपल्या सॅकमध्ये भरू.. उरलेले सामान तिथेच ठेवू.. कारण मला पण थोडा त्या हॉटेलचा संशय येतो आहे. म्हणजे बाहेर इतर हॉटेलमध्ये गर्दी नसताना इथे असणारी मोजकी लोकं. तेही त्यांचे दर सामान्य असताना.. सामान गेले तरी चालेल.. जीव महत्त्वाचा.."
ते दोघे हॉटेलवर आले.. तिकडचा मॅनेजर त्यांना पाहून पुढे आला..
" काय पाहिला का किल्ला?"
" तुम्ही मराठी आहात?" मीत आणि अक्षताने आश्चर्याने विचारले.
" नाही, पण मी अनेक भाषा शिकलो आहे. तुम्ही मराठीत एकमेकांशी बोलताना पाहिले म्हणून मी पण बोललो.."
" अच्छा,बरे वाटले तुमच्याशी बोलून. आम्ही ना जरा दमलो आहोत. जाऊ का आराम करायला..?"
" हो.. नक्की.. मी फक्त एवढेच सांगायला आलो कि उद्याचा नाश्ता तुम्हाला हॉटेलतर्फे कॉम्प्लिमेन्टरी आहे."
" किती छान.. थँक यू.."
मीत आणि अक्षता दोघेही आधी कोणी बघत नाही हे बघून पटकन मीतच्या रूममध्ये शिरले..
" अक्षता, कोणीतरी माझ्या रूमची तपासणी केली आहे?" मीत गंभीरपणे म्हणाला..
" कशावरून?"
" हे बघ, मी कोणाला दिसेल न दिसेल अशी हळद इथे पसरून ठेवली होती.. जिथे तिथे हळदीचे डाग दिसत आहेत बघ.."
" मग आता?"
" तुझ्या खोलीत बघू.. तू आवरत असताना मी तुझ्याही खोलीत हळद भुरभुरली होती.. चल जाऊ.. पण जायच्या आधी एक काम करू.."
दोघांनीही मिळून बेडवर उशांच्या सहाय्याने माणूस झोपला आहे, असे दाखवले. त्यावर पांघरूण घातले. अक्षताने खोलीच्या बाहेर कोणी नाही हे पाहिले. ते अक्षताच्या खोलीत जाणार तेवढ्यात कोणी तरी लांबून जाताना दिसले.
" मीत ती सुपर्णा होती का?"
" आधी खोलीत चल. आणि सुपर्णा इथे कशाला येईल?"
आपल्याला भ्रम झाला असावा असे समजून अक्षता खोलीत गेली.. तिथे मीतने बघितले. बहुतेक अक्षताच्या खोलीला हात लावला नव्हता.
" खूप दमलो बाई, पाणी दे जरा प्यायला." मीत म्हणाला.."सोड.. इथे हॉटेलने ठेवलेले पाणी आहे तेच पितो."
"थांब जरा मीत." अक्षताने सॅकमधून आत्याने दिलेली एक छोटीशी बाटली काढली. त्याचा अगदी एक थेंब त्या पाण्यात टाकला.. त्याचा रंग अगदी काही सेकंदांसाठी बदलला..
" मीत हे पाणी आपल्यासाठी सुरक्षित नाही.."
" मग आता काय प्यायचे?" मीतला खूपच पाणी पाणी होत होते. त्यांच्याजवळ दुपारी किल्ल्यावर घेतलेली पाण्याची बाटली होती. अक्षताने त्यात थोडे गंगाजल आणि अंगारा टाकला.
" आता पी.."
" अक्षता मी त्या खुर्चीवर झोपतो.."
"गप्प बस.. तू बेडच्या त्या कोपर्यात, मी या.." अक्षताने सुरक्षितता म्हणून बेडच्या चहूबाजूंनी अंगारा ओढून घेतला..आणि दोघेही झोपायला गेले.
गजर लावल्यासारखी दोघांनाही सकाळी लवकर जाग आली..
" चला, आवरा.. आपल्याला त्या माणसाला भेटायला जायचे आहे.." मीत अक्षताला म्हणाला..
" हो पण त्याच्या आधी माझ्या भावाकडे जाऊन काहीतरी खाऊ या.."
" तुझा भाऊ?"
" हो.. अजितसिंग.. कालचा मालक.."
" ओहो.. मजा आहे बाबा एका माणसाची. इथे आल्याबरोबर एक नवरा, एक भाऊ मिळाले आहेत.. काकूंना आणि आत्याला जर कळले ना तर धक्काच बसेल.." मीत हसत म्हणाला..
" जातोस का आता?"
" हो जातो, पण घरवाली मै आऊंगा वापस.." मीत आज टोटल मस्करीच्या मूडमध्ये होता.. तो गेला आहे हे पाहून अक्षताने बॅगेतले उरलेले सामान सॅकमध्ये ठेवायला सुरुवात केली. दरवाजावर टकटक झाली.. त्यापाठोपाठ एक वेटर नाश्ता घेऊन आला..
"साब का नाश्ता कहां लगाना है?"
" यहींपे लगा दिजीए.. एक बात पूछनी थी.."
" जी मेमसाब.."
" कल रात यहां कोई मेरे उमरकी लडकी थी क्या?"
तो वेटर चुळबुळ करायला लागला..
" वो.. मै कल रात यहां नही था.. रात को दुसरा आदमी रहता है.. उसको पुछता हूं.." असे म्हणत तो पटकन तिथून गेला..
" काय ग , काय विचारत होतीस त्याला?" मीतने विचारले..
" काही नाही.."
" नाश्ता आपण इथे करायचा कि बाहेर?"
" एक परिक्षा घेऊन ठरवू.." अक्षताने परत कालची बाटली काढली. त्यातले काही थेंब त्या अन्नावर टाकले.. त्याचा रंग परत बदलला.. दोघांनी एकमेकांकडे पाहिले..
" याचे काय करायचे मग?" मीतने विचारले.. अक्षताने बाथरूमच्या दिशेने बोट केले..
दोघे आपापल्या बॅगा घेऊन निघाले. कालचा मॅनेजर परत आला.
" कसा होता नाश्ता?"
" खूपच मस्त.. नंतर रेसिपी सांगा हा." अक्षता म्हणाली..
" का नाही? मला सांगा दुपारी जेवायला काय आवडेल? तेच करायला सांगतो.."
"आम्ही आत्ता किल्ल्यावर जातोय.. यायला किती वाजतील माहित नाही."
त्या मॅनेजरचे तोंड उतरल्यासारखे वाटले.. पण तरिही त्याने विचारले,
" रात्री तरी याल ना जेवायला? "
" कसे सांगणार आत्ताच? काल पण आम्ही बाहेरच जेवलो.. बघू नंतरचे नंतर.." मीत म्हणाला.. दोघेही त्या हॉटेलच्या बाहेर पडले..
" चल पटकन तुझ्या भावाकडे जाऊन नाश्ता करू आणि तिथेच एखादी खोली बघू.."
मीत आणि अक्षता खाणेपिणे आटपून पटापट किल्ल्याच्या दिशेने निघाले.. विचारत विचारत किल्ल्याच्या पाठच्या दरवाजाकडे आले.. जाताना त्यांना जाणवले कि जी काही गर्दी आहे ती फक्त किल्ल्याच्या पुढच्या भागात.. ते जसेजसे पुढे जात होते तसतशी माणसे कमी होत होती.. शेवटी जेव्हा ते तिथे पोचले तेव्हा तिथे फक्त ते दोघेच होते आणि समोरच्या तप्त दगडावर बसलेला तो वृद्ध..
(या पुढचे त्यांचे संभाषण हिंदीत झाले पण आपण मराठीत वाचू.)
" या.. कधीची वाट पाहतो आहे तुमची."
" पण बाबा, आमचीच का?" अक्षताने विचारले..
" कारण तुझ्यातच ती शक्ती आहे.."
" कसली शक्ती?"
" माझ्या राजकुमारीला सोडवण्याची"
" तुमची राजकुमारी?" दोघेही एकदम बोलले..
" हो माझी राजकुमारी.. राजकुमारी प्रियवंदा.."
"पण तुम्ही आहात तरी कोण?"
" मी.. मी राजपुत्र वीरेंद्रसिंह."
अक्षता आणि मीत दोघांचाही दगड झाला होता.. त्यांना चुकूनही हि व्यक्ती राजकुमार असेल असे वाटले नव्हते.. म्हणजे हे भूत आहेत कि माणूस?
"पण कसे शक्य आहे? राजकुमारी तर जवळपास पाचशे वर्षांपूर्वी होत्या ना?" मीतने घाबरत विचारले.. तो वृद्ध तिथून उठला आणि या दोघांजवळ आला..
"हो, त्या गोष्टीला पाचशे वर्ष झाली.. पण जोपर्यंत प्रियवंदा मुक्त होत नाही, तोपर्यंत ना मी जिवंत राहू शकतो ना मरू शकतो.. "
" तुम्ही आत्मा आहात का?" अक्षताने विचारले. तो वृद्ध हसला..
" मला हात लावून बघ.. म्हणजे कळेल.."
" नको.. आमचा तुमच्यावर विश्वास आहे.." हे दोघेही एकत्र बोलले..
" पण मी कशी मदत करणार? आणि तुम्ही इतके वर्ष जिवंत कसे मग?" अक्षताने विचारले..
" सांगतो, सगळे सांगतो.. त्याशिवाय तू माझी मदत कशी करणार?"
" इथे सगळीकडे फक्त अर्धवट गोष्ट माहिती आहे. तो तांत्रिक होता. त्याला प्रियवंदेसोबत लग्न करायचे होते. तिने हिरा खाऊन जीव दिला.. बरोबर?"
या दोघांनीही मान हलवली..
" खरी गोष्ट मी सांगतो.. आमचे लग्न ठरले होते. आमच्या घराण्याच्या पद्धतीनुसार मी आमच्या महाराजांचा आशीर्वाद घ्यायला गिरनारवर गेलो होतो.." तो वृद्ध दोघांकडेही बघून हसला.. "पण तो कली तोपर्यंत इथे येऊन पोचला होता.."
"कोणता कली?" अक्षताने मध्येच विचारले.
"भैरोबाबा, असे तो स्वतःला म्हणून घ्यायचा.. कालकेय नावाच्या पंथाचा तो उपासक होता." अक्षताने चमकून वर पाहिले. "पण त्याला तिकडचा भैरवनाथ होता आले नाही. शक्तीचा गैरवापर केला म्हणून अवनींद्रनाथ नावाच्या त्यांच्या उच्चपदस्थाने त्याला हाकलले होते. तेव्हाच त्याच्या कानावर प्रियवंदेचे नाव आले.. म्हणून तो या राज्यात आला.. त्याने संमोहन विद्येने सगळ्यांनाच भ्रमित केले होते. यातून वाचली होती ती फक्त माझी राजकुमारी.. ती त्याला तिच्या महालात येऊ देत नसे म्हणूनच तो तिला संमोहित करू शकला नव्हता. तिने मला पाठवलेले पत्र त्याने काढून घेतले आणि मी दूर लढाईवर गेलो आहे असे खोटे सांगितले. आपल्या विद्येचा कधीच गैरवापर न करणाऱ्या माझ्या गुरूंनी त्यावेळेस मात्र मला लगेच प्रियवंदेकडे जाण्यास सांगितले. पण काही क्षणांचाच फरक पडला आणि तिने आत्महत्या केली.. त्या दुष्टाने वेळ न दडवता तिच्या आत्म्याला गुलाम करायचा प्रयत्न केला.. पण मी येऊन त्याला ठार केले. त्या मिळालेल्या कमी क्षणात त्याने या राज्याला शाप दिला.. हे सगळे राज्य विराण झाले.. ते पाहून मी आत्महत्या करणार होतो पण माझ्या गुरूंनी येऊन मला थांबवले.. काही विद्या शिकवली.. तेव्हापासून मी इथेच राहतो आहे.. माझ्या विद्येमुळे ना तो तांत्रिक इथून बाहेर जाऊ शकतो ना त्याचा कोणी चेला इथे येऊ शकतो.."
" तुम्हाला जर हि विद्या माहित आहे तर या सगळ्यात राजकुमार मी कशी मदत करणार?" अक्षताने विचारले..
तुम्हाला काय वाटते, अक्षता कशी मदत करेल राजकुमार वीरेंद्रसिंहला.. पाहू पुढच्या भागात..
हा भाग कसा वाटला नक्की सांगा..
हि कथा काल्पनिक असून मनोरंजनात्मक हेतूने लिहिण्यात येत आहे.. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात प्रयत्न नाही..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा