Login

समर्थांची लेक भाग २८

Story Of A Female Ghostbuster

समर्थांची लेक भाग २८



मागील भागात आपण पाहिले कि अमरला त्याच्या घरातल्यांचा बळी घेण्यात अपयश येते. मग त्याला आठवण येते स्वतःच्या बाळाची.. 


    अमर गुरूदेवांच्या वाड्यात आला. पण तिथे कमलाची किंवा गुरूदेवांची चाहूल लागे ना.. तो वाड्यात तिला शोधू लागला.. शेवटी एका दालनात त्याला गुरूदेव काहीतरी करताना दिसले.. "गुरूदेव, कमला कुठे आहे.. तुम्ही इथे काय करत आहात?"

" कमला, ती गेली.. गेली ती.. " गुरूदेव विचित्र हसत म्हणाले..

" कुठे गेली ती? अशी कशी गेली ती?" अमरने गुरूदेवांना गदागदा हलवत विचारले..

" तुला काय वाटले? मला कळत नाही. फक्त इतके दिवस मी ती शक्ती वापरणे टाळत होतो. पण जेव्हा तू लगबगीने तुझ्या घरी गेलास, तेव्हाच मला संशय आला.. मी माझ्या मुलीच्या आणि नातवंडाच्या आयुष्याशी कसा खेळू देईन तुला. जा तुला कमला यापुढे कधीच सापडणार नाही.. माझी आजपर्यंतची सगळी शक्ती वापरून मी तिला नाहिसे होण्यात मदत केली आहे."

" तू असे नाही करू शकत.." अमर आता खरेच रागाने वेडा झाला होता.. 

" तुला याची शिक्षा मिळणारच."

    अमरने मंत्र म्हणायला सुरुवात केली.. गुरूदेव आधीच एवढे थकले होते कि त्यांच्यामध्ये त्याला प्रतिकार करण्याची शक्तीच उरली नव्हती.. अमरने गुरूदेवांना त्यांच्याच दालनातल्या एका पुस्तकात बंदिस्त करून ठेवले..





      अमर वर्तमानकाळात परत आला.. 'गुरूदेव... माझ्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला.. म्हणून मी त्याला सोडले नाही.. आणि तो दामोदर आला.. मला अडवायला.. आता एकदा फक्त एकदाच इच्छा आहे त्या कुशला भेटायची.. आणि त्या लवच्या बाळाला भेटायची.. 



       अक्षता अमरच्या घरातून निघाली.. अमरने दिलेल्या राजस्थानच्या पत्त्याकडे ती बघत होती. विचाराच्या भरात ती कधी ऑफिसच्या इथे पोचली तिला कळले नाही.. तिथे मीत तिची वाट पहात उभी होता.. त्याला पाहून अचानक तिला हायसे वाटले.. 

" झाले तुझे काम?" मीतने विचारले.

" कोणते काम?" 

" तेच जे तू माझ्यापासून लपवते आहेस.."

" मीत, तसे काही नाही.. ऐक ना. एक नवीन काम आले आहे. राजस्थानला जायचे आहे. काय करू ते कळत नाहीये.." 

" तुझे काम आहे.. तू जा कि.. माझी काय गरज आहे?" मीत दुखावला होता.

" मीत चिडू नकोस रे, आधीच सुपर्णा आजारी आहे.. तू पण असा चिडतो आहेस.. नको ना प्लीज.."

" बरे नाही चिडत.. पण आत्या पाठवेल का?"

" तेच टेन्शन आले आहे. तुला जमेल का यायला माझ्यासोबत राजस्थानला?"

" बाई मला ऑफिस आहे, मला तिथे विचारावे लागेल.. आधीच कसे सांगू?"

" प्रयत्न तर कर.. मला खूप मदत होईल तुझी.."



" आई, आत्या मला ऑफिसच्या कामासाठी राजस्थानला जायला लागणार आहे.. पुढच्या आठवड्यात."

" राजस्थानला? एवढ्या लांब ? नाही म्हणून सांग बाई.." मालतीताई म्हणाल्या..

" आई, असे कसे नाही सांगणार ऑफिसला.. जायला तर लागेलच ग.. आणि मीतने कबूल केले आहे माझ्यासोबत यायचे.."

"सुपर्णा बरी आहे का आता?"

"असेल, जाते आता तिच्याकडेपण.."



" हाय सुपर्णा. बरी आहेस का आता?"

" मला काय झाले होते?"

" काही नाही फक्त एकाला तू आवडली होतीस.." अक्षता हसत म्हणाली. " मी आणि मीतना राजस्थानला जातोय.. तेच सांगायला आले आहे.."

" दोघेच जाताय? मला सोडून?"

" तू? आताच तर ताईता गेला आहे तुला सोडून.. लगेच तू येणार?"

" हो.. मला एका गोष्टीसाठी बाकी सगळे मिस नाही करायचे.."

" बरे.. मग आपण ठरवू पटापट.."


      एका बाजूला मीत आणि अक्षता मिळून राजस्थानच्या सहलीचे प्लॅनिंग करत होते. 

"आपण नक्की राजस्थानमध्ये कुठे जाणार आहोत?"

" हे बघ, इथे पत्ता दिला आहे.. कोणतातरी किल्ला आहे.."

" दे मला, आपण नेटवर सर्च करू."

" अक्षता.. कोणीतरी तुझ्या वाईटावर आहे.."

" का रे?"

" इथे वाच.. या किल्ल्यावर सूर्यास्त ते सूर्योदय कोणीच रहात नाही, जात नाही.. आणि तुला तिथे एक रात्र रहायचे आहे.."

अक्षता विचारात पडली. एका बाजूला अमर तिला आपल्या पंथात ये असे सांगत होता, दुसरीकडे या अशा ठिकाणी पाठवत होता.. हि जर त्याची कसोटी असेल तर तिला यात उत्तीर्ण व्हायचेच होते..

" अजून काही माहिती आहे तिकडची?"

"ऐक.. हि कथा आहे तिकडच्या राजकुमारीची.. तिचे नाव प्रियवंदा.. तिच्या सौंदर्याची किर्ती पूर्ण भारतभर पसरली होती.. तिची किर्ती ऐकून एक तांत्रिक तिच्या प्रेमात पडला होता. तिच्याशी लग्न करण्यासाठी तो तिच्या राज्यात आला.. पण तिच्या मनात आधीच एक राजपुत्र होता.. ते दोघेही योग्य वेळेची वाट पहात होते घरी सांगण्याची.. तेवढ्यात त्या तांत्रिकाने मध्ये लुडबुड करायला सुरुवात केली..

     त्याने सुरुवात केली तिकडच्या राजापासून. प्रियवंदेच्या वडिलांपासून.

राजाचे मन जिंकण्यासाठी त्याने एक योजना राबवायला सुरुवात केली.. राजाशी बोलून त्याच्या शत्रूंची यादी केली.. आपल्या तंत्रसाधनेच्या साहाय्याने त्याने त्या सर्व शत्रूंना निष्प्रभ केले.. एकाही सैन्याचा बळी न देता मिळालेला हा विजय राज्याला, राजाला सुखावून गेला.. सगळ्या राज्यात तांत्रिकाचे कौतुक सुरू झाले. राजाची त्यावर मर्जी बसली.. राजवाड्यात कुठेही जाण्याची त्याला परवानगी मिळाली. जर राणीची इच्छा असेल तर तो राणीवशातही जाऊ शकत होता.. पण त्या तांत्रिकाला फक्त एकाच ठिकाणी जायची परवानगी मिळत नव्हती.. ती म्हणजे राजकुमारीच्या महालात.. अनेक प्रयत्न करूनही प्रियवंदा त्याला एकट्याला भेटायला नकार देत होती. त्यामुळे त्याचे तिच्याबद्दलची आसक्ती वाढतच होती.. पण त्यानेही हट्ट सोडला नाही.. एक दिवस थेट राजाची परवानगी घेऊन तो राजकुमारीच्या महालात घुसलाच..

" माझ्या परवानगीशिवाय तुम्ही माझ्या अंतःपुरात प्रवेश कसा केलात?" प्रियवंदेने रागाने विचारले..

" मी तरी काय करू? किती वेळा प्रयत्न केला तुला भेटायचा?"

" मी राजकुमारी आहे.. मला सगळेच अहोजाहो करतात.. तुम्हीही तसेच संभाषण करावे.. जमत असेल तर इथे थांबा, नाहीतर तुम्ही जाऊ शकता.."

" मला माफ करा. *राजकुमारी* . आढेवेढे न घेता सरळच सांगतो, तुमच्याशी लग्न करायची माझी इच्छा आहे.. जे मी करणारच आहे. तू जर तयार झालीस तर तुझ्या मर्जीने. नाहीतर जबरदस्ती.. हेच सांगायचे होते.. येतो.. *राजकुमारी*.." तो तांत्रिक छद्मीपणे हसून गेला..

तो ज्या ठामपणे हे बोलला ते ऐकून राजकुमारी सुन्न झाली.. तिने लगेच राजपुत्राला पत्र लिहायला सुरुवात केली.. तिने दूताला पाठवले.. राजपुत्राचा संदेश येईपर्यंत वाट बघणे एवढेच ती करू शकत होती. पण तो तांत्रिक थांबला नाही.. त्याने राजाशी बोलून घेतले. राजावर तांत्रिकाने मिळवून दिलेल्या विजयाची भुरळ होती कि तांत्रिकाची ते कळेना.. राजाने लगेच लग्नाला होकार दिला.. त्याने राजकुमारीला न विचारताच लग्नाच्या तयारीला सुरुवातही केली.. आतातर राजकुमारी डोळ्यात प्राण आणून संदेशाची वाट पहात होती. दूत आला पण संदेश घेऊन कि राजपुत्र लढाईसाठी दुसर्‍या राज्यात गेला आहे.. हे ऐकून राजकुमारी निराश झाली.. तांत्रिकाशी लग्न करण्याऐवजी तिने तिथून पळून जायचा निर्णय घेतला.. तिची एकच विश्वासू दासी होती.. तिच्या मदतीने तिने जायचे ठरवले. ती योजना कुठून तरी फुटली आणि राजकुमारी पळून जाताना पकडली गेली. त्या तांत्रिकाच्या चेहर्‍यावरचे भाव पाहून तिने हातातल्या अंगठीतला हिरा खाऊन जीव दिला.. तोपर्यंत राजपुत्रही घोडदौड करून तिथे पोचला.. राजकुमारीचा मृतदेह पाहून तो वेडापिसा झाला.. त्याने त्या तांत्रिकावर तलवार चालवली.. मरण्याआधी त्या तांत्रिकाने सगळ्या राज्यालाच शाप दिला.. "तुम्ही सगळे इथून कधीच मुक्त होणार नाही.. मी कोणालाच इथे सुखी होऊ देणार नाही." 

    त्या तांत्रिकाने दिलेल्या शापाप्रमाणेच हळूहळू ते संपन्न राज्य नामशेष होत गेले.. तिथे राहणारे नागरिक ती जागा सोडून गेले.. तिथे राहणारी लोकं सांगायचे अजूनही राजकुमारी प्रियवंदेच्या महालातून विरहगीतांचे आवाज येतात.. तिच्या महालाच्या खाली तो तांत्रिक फिरताना दिसतो.. दिवसभर तो किल्ला तुम्ही पाहू शकता.. पण रात्री तो तांत्रिक कोणालाही राजकुमारीच्या आसपास येऊ देत नाही...




अक्षता आता या तांत्रिकाच्या शापातून राजकुमारीला सोडवू शकेल? पाहू पुढील भागात..


काही कारणास्तव भागाला उशीर झाला त्यासाठी क्षमस्व..


सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई

🎭 Series Post

View all