Login

समर्थांची लेक भाग २७

Story Of A Female Ghostbuster
समर्थांची लेक भाग २७


मागील भागात आपण पाहिले कि अमर त्याच्या घरी गेला आहे. महाराजांनी लवच्या गरोदर बायकोला आपल्या मठात आसरा दिला आहे.. पुढे बघू काय होते..


मी तुम्हाला घेऊन जायला आलो आहे, हे वाक्य ऐकताच सगळ्यांनी एकमेकांकडे चमकून पाहिले..
" आणि नाही आलो तर?" लवने धीटपणे विचारले..
अमर हसला. त्याचे हसणे ऐकून सगळ्यांचा थरकाप उडाला..
" विरोध करून तर बघ.. मला त्या कुशचा पत्ता हवा आहे. आणि तुझ्या बायकोचाही. दचकू नकोस. मी तुझ्या हातात साखरपुड्याची अंगठी पाहिली आहे. आता नाहीतर नंतर तो पत्ता तुम्ही देणारच. खात्री आहे माझी."
" अरे कोणत्या जन्माचा बदला घेतो आहेस? " केशवराव चिडून म्हणाले..
" याच जन्माचा.. तुमचा आणि तुमच्या दत्ताचा. बघू कोण वाचवणार तुम्हाला माझ्यापासून? जेवण झाले कि आवरायला घ्या.. मला ओळख करून द्यायची आहे तुम्हा सर्वांची माझ्या बायकोशी." अमर बोलत असतानाच दरवाजा वाजला आणि आवाज ऐकू आला..
" अलख निरंजन " 
तो आवाज ऐकून अमरच्या चेहर्‍यावरचा रंग उडाला पण बाकीच्यांच्या जीवात जीव आला. लवने लगबगीने जाऊन दरवाजा उघडला. महाराज दरवाजात उभे होते.
" तू इथे काहीच करू शकणार नाहीस. आलास तसा परत जा." अमर मग्रूरपणे बोलला..
त्याचे बोलणे ऐकून केशवरावांनी डोळे आणि कान घट्ट मिटून घेतले. 
" महाराज माफ करा, मला यासाठी." ते पुटपुटले.
" मी इथे जाण्यासाठी आलेलो नाही." महाराज शांतपणे म्हणाले.
" तू असा जाणार नाहीस. थांब मीच हाकलतो तुला." असे म्हणत अमर महाराजांच्या अंगावर धावून गेला. ते पाहताच केशवराव, राम, लव पटकन त्यांच्या बाजूला गेले. जान्हवीने डोळे घट्ट मिटून घेतले.. पण डोळे लवते न लवते तोच एक प्रखर प्रकाश पडला. आणि काळ जणू जिथल्या तिथे थांबला.. जान्हवीने डोळे उघडले तर अमर मारायच्या आविर्भावात होता. पूर्ण जग थांबले होते. कसलाच आवाज येत नव्हता. जणू पूर्ण जगात फक्त हे चौघे आणि महाराज होते. सगळे महाराजांसमोर हात जोडून बसले होते. महाराजांनी बोलायला सुरुवात केली ," आपल्याकडे वेळ फार कमी आहे. मी काळ एका कालावधीनंतर असाच नाही थोपवू शकणार. तुमच्याकडे दोनच पर्याय आहेत. एक त्याच्यासोबत जाऊन आपल्या आत्म्याचा सौदा करणे किंवा तुमची अंगठी समोर ठेवून प्राणत्याग करणे.." हे बोलताना महाराजांना होणारे दुःख त्यांच्या शब्दातून जाणवत होते..
" महाराज आमचे जाऊ द्या, पण या लवला नाही वाचवता येणार? त्याची बायको गरोदर आहे.. तो लहान आहे अजून.." जान्हवी रडत बोलत होती.
" तुला असे वाटते का , कि मला तुम्हाला वाचवणे शक्य असूनही मी ते करत नाही? तुझी सून माझ्या मठात सुरक्षित आहे. कुशही तिच्यासोबत आहे. मला जेवढे शक्य आहे तेवढे मी तुमच्यासाठी नक्कीच करतो आहे." महाराज दुखावलेल्या स्वरात म्हणाले.
लव शांतपणे पुढे झाला. त्याने महाराजांना नमस्कार केला आणि म्हणाला," माझ्या बायकोची आणि बाळाची काळजी घ्या. कुश आहेच. पण तुम्हीसुद्धा लक्ष ठेवा." त्याने आईवडिलांना, आजोबांना नमस्कार केला.. आसन घातले, अंगठी समोर ठेवली, आसन घातले.. आणि प्राणत्याग केला.. ते बघून जान्हवीने हंबरडा फोडला. पण केशवराव उठले. त्यांनी महाराजांना नमस्कार करून काहीच न बोलता प्राणत्याग केला.. 
" आवर स्वतःला जान्हवी.. वेळ कमी आहे आपल्याकडे." राम जान्हवीची समजूत काढत म्हणाला. दोघांनी स्वतःला सावरले. महाराजांना नमस्कार केला.. आणि प्राणत्याग केला. विषण्ण मनाने महाराजांनी त्या चार अंगठ्यांना नमस्कार केला. त्या आपल्या झोळीत टाकल्या. तिथून बाहेर पडले. घराबाहेर आल्यावर त्यांनी मंत्र म्हणून परत सगळी रहाटी सुरू केली.. आणि झपाझप चालत ते तिथून दिसेनासे झाले.
    अमरसुद्धा चल सृष्टीत परत आला. समोर चार मृतदेह पाहून आपली योजना अयशस्वी झाली हे त्याला कळले. तो रागाने वेडापिसा झाला.. आता पुढे काय? हा प्रश्न त्याच्या डोक्यात थैमान घालत होता. त्याने स्वतःला शांत केले. घराच्या बाहेर आला. दरवाजा ओढून घेतला. चेहरा ठिकठाक करून त्याने शेजाऱ्यांचा दरवाजा ठोठावला. 
" मी नारायण. ओळखलत का मला. केशवरावांचा मुलगा."
" हो , ओळखले ना.. तू कसा काय इथे? बाहेर होतास ना कुठेतरी?" त्यांनी अमरला आत घेतले नाही, हे त्याला कळले होते. पण आता हि वेळ शांत राहण्याची होती..
" मी आत्ताच आलो.. पण घरी कोणी नाही म्हणून विचारायला आलो, तुम्हाला माहित आहे का?"
"नाही. असे कसे घरी कोणीच नाही. तुमचे घर तर कधीच बंद नसते. चल बघूया."
" मी आत्ताच जाऊन आलो. तुम्हाला कुश कुठे असतो माहित आहे का? "
शेजारी जरा संशयाने बघायला लागले.
" नाही, तो कुठेतरी शिकायला गेला आहे, एवढेच माहीत आहे.. बाकी काही नाही.."
" मग , लवच्या सासरी गेले असतील का?"
" अरे, हो. बहुतेक ती बाळंत झाली असेल. म्हणून घाईघाईत गेले असतील.. पण आम्हाला न सांगता जाणार नाहीत.."
" मग, मला त्यांचा पत्ता देता का? मी तिथे जाऊन त्यांना आश्चर्याचा धक्का देतो. मी नव्हतो ना लवच्या लग्नात" अमर स्पष्टीकरण देत स्वतःशीच हसत म्हणाला.
हि पिडा लगेच जावी, म्हणून त्यांनी लगेच पत्ता समजावून सांगितला. 'इथे यश नाही मिळाले म्हणून काय झाले? तिथे नक्की मिळेल..' अमर स्वतःशीच बोलत चालला होता. 
अमर लवच्या सासरी पोचला. त्याने दरवाजा वाजवला. दरवाजा उघडला गेला.. " मी लवचा काका आहे. सूनबाई गरोदर आहे , हे ऐकले म्हणून भेटायला आलो आहे." अमर बोलला.. दरवाजा एका पुरूषाने उघडला होता. त्या पुरुषाने प्रश्नार्थक नजरेने पाहिले..
" तुम्हाला नक्की कोण हवे आहे? आमच्या इथे कोणीही गरोदर नाही."

" तुम्ही केशवरावांना ओळखताना?"
" त्यांना कोण नाही ओळखत? अख्खी पंचक्रोशी ओळखते. "
" मग त्यांच्या नातवाची हि सासुरवाडी आहे ना?"
" तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. इथे कोणीच तसे रहात नाही." तो दरवाजा बंद करायला गेला.. "एक मिनिट " अमर भुरळ घालणाऱ्या आवाजात म्हणाला..
"एकदा फक्त माझ्याकडे बघून सांगाल का?" अमरने त्याचे संमोहन सुरू केले होते.. " पण त्या तरूणाकडून काहीच हवा तो प्रतिसाद येत नाही म्हटल्याबरोबर त्याने त्याला घरातल्या बाकीच्या व्यक्तींनासुद्धा बोलवायची आज्ञा दिली.. सगळेच त्याला बघून घाबरले होते.. पण अमरने सशक्त संमोहनाचा वापर केला आणि त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली.. पण अपेक्षित उत्तर येईना. त्याची उरलीसुरली आशाही मावळून गेली.. तो तिथून निघणार तेवढ्यात त्याला समोरच्या भिंतीवर असलेला फोटो दिसला.. ज्यामध्ये लव होता. याचा अर्थ शेजाऱ्यांनी सांगितलेले सगळे खरे होते.. मग यांना का नाही आठवत? त्याला महाराज आठवले आणि यामागचा कर्ताकरवता कोण हे कळले.. पण आता काय करावे ते मात्र सुचेना.. घरातल्यांचा अंतिम संस्कार करण्यासाठी तरी कुश घरी येईल या विचाराने तो घरी परतला. पण समोर त्याचा अख्खा वाडा जळत होता.. आजूबाजूची लोकं आग विझवायचा प्रयत्न करत होते. अमरने संतापाने त्या जळक्या वाड्याकडे पाहिले.. समोर मंदिरातली दत्तमूर्ती त्याच्याकडे पाहून स्मितहास्य करत होती..
       अमर मजलदरमजल करत परत गुरूदेवांच्या आश्रमात निघाला होता. जाताना जो हुरूप होता तो सगळा मावळून गेला होता. तो स्वतःच्याच तंद्रीत चालला होता.. स्वतःच्या रक्ताचा बळी आता कुठून आणायचा? हाच एक विचार चालू होता.. त्याला आठवले गुरूदेवांचे शब्द, 'तू बाबा होणार आहेस आणि मी आजोबा..' 
म्हणजे फक्त काही महिने थांबायचे आणि मग ती शक्ती माझी आणि फक्त माझीच.. तो पटापट चालू लागला.. त्याने स्वतःच्या शक्तीच्या जोरावर गुरूदेवांचा वाडा शोधून काढला.. आत प्रवेश केला.." कमला, कमला मी आलो आहे.."



अमरला ती शक्ती मिळेल? गुरूदेव ती मिळू देतील? लवच्या बाळाचे आणि बायकोचे पुढे काय झाले? पाहूया पुढील भागात..
 
हा भाग कसा वाटला, नक्की सांगा..
हि कथा काल्पनिक असून मनोरंजनात्मक हेतूने लिहिण्यात येत आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात हेतू नाही..
सारिका कंदलगांवकर 
दादर मुंबई

🎭 Series Post

View all