समर्थांची लेक भाग २६

Story Of A Female Ghostbuster

समर्थांची लेक भाग २६



मागील भागात आपण पाहिले कि अमर कमलाशी लग्न करून गुरूदेवांकडून शेवटच्या तीन विद्या शिकून घेतो. पण जर त्या भयानक आकाराकडून इच्छा पूर्ण करून घ्यायच्या असतील तर त्यासाठी स्वतःच्या रक्ताचा बळी देणे भाग आहे.. आता अमर काय करेल.. पाहूया आता..



" कमला, गुरूदेव मी अनेक वर्षे झाले माझ्या घरातल्यांना भेटलो नाही. तुमची अनुमती असेल तर घरी जाऊन येतो मी.." अमर काकुळतीने बोलत होता..

" मी पण येऊ?" कमलाने विचारले..

" तू कशी जाणार?" गुरूदेव म्हणाले.

"म्हणजे?" अमरने आश्चर्याने विचारले.

कमला फक्त लाजली..

" तू बाबा होणार आहेस आणि मी आजोबा.." गुरूदेव खूप खुश होते..

" खरेच?" 

" हो.."

" मग तर मला गेलेच पाहिजे.. मी जातो आणि घरातल्यांना आपल्या लग्नाची आणि होणाऱ्या बाळाबद्दल सांगतो. त्यांची प्रतिक्रिया पाहतो. नंतर तुला घेऊन जातो.. अशावेळेस तू दगदग करणे योग्य नाही.." अमर तिची समजूत काढत म्हणाला..

" बरोबर आहे त्याचे.. तू सध्या आराम कर. नाहीतरी तुला काही दिवसांनी तिथेच जाऊन रहायचे आहे." गुरूदेव कमलाला म्हणाले. पण हे शब्द ऐकून अमरच्या चेहर्‍यावरचा रंग उडाला होता.. पण तो या दोघांच्या लक्षात येण्याआधीच त्याने स्वतःला सावरले.. 

" मग मी येतो जाऊन.."

" लवकर ये.. आम्ही वाट पाहतो आहोत तुझी.." कमलाने त्याला निरोप दिला..  

अमर निघाला.. त्याच्या मनातल्या सुप्त इच्छांच्या पूर्ततेच्या दिशेने..


" कुश.. लवकर तयार हो.. वेळ आली आहे.." महाराज कुशला उठवत म्हणाले..

" कसली वेळ महाराज?" कुश डोळे चोळत म्हणाला..

" ती वेळ, ज्यासाठी तू हे सगळे संरक्षणाचे धडे घेतलेस.. आत्ताच्या आत्ता ऊठ आणि मी सांगतो अगदी तसाच वाग.. एकही आज्ञा मोडू नकोस. मी जर चुकत नसेन तर तुझी वहिनी बाळंतपणासाठी तिच्या माहेरी गेली आहे.. तिथून काहिही करून तिला इथे या मठात घेऊन ये.. तिच्या घरचे तुला चांगले ओळखतात.. काहिही कारण सांग.. कोणत्याही परिस्थितीत ती लवकरात लवकर इथे आलीच पाहिजे.. मी इथे असेनच.. आणि जर नसलो तर एक क्षणभरही तिला तुझ्या नजरेआड होऊ देऊ नकोस.. तुला कळते आहे का?" महाराज खूपच चिंतेत होते.

" हो.. मी लगेच निघतो. पण तुम्ही का एवढे चिंतित आहात ते कळेल का?"

" कुश, तो येतो आहे. काळ बनून.. तुमच्या घरादाराचा घास घेण्यासाठी.. आपण कोणाचे आयुष्य वाढवू शकत नाही किंवा लिखित बदलू शकत नाही. पण जिथे जे वाचवता येते ते वाचवलेच पाहिजे.. मन घट्ट करून ऐक.. नारायण तुझा काका येत आहे.. त्याला तुमच्या सगळ्यांचा बळी द्यायचा आहे.. त्या शक्तीसाठी. तो जर त्यात यशस्वी झाला तर तुझ्या घरातल्यांचे आत्मे कायमचे त्याचे गुलाम होऊन जातील.. आणि तुमचा वंश संपून जाईल ते वेगळे.. तू अजूनही त्याच्याशी लढण्याइतका तयार नाहीस. त्याची शक्ती नक्कीच तुझ्यापेक्षा जास्त आहे. पण तू संरक्षण करू शकशील , स्वतःचे आणि तुमच्या पुढील पिढीचे.. जा लवकर आणि अजून वेळ न घालवता तिला इथेच घेऊन ये. याच्यापेक्षा जास्त संरक्षित जागा तिच्यासाठी दुसरी कोणतीच नाही.."

"महाराज, मग माझ्या वडिलांना आणि बाकीच्यांना नाही का आणता येणार इथेच?" कुशने विचारले..

" आपण कोणाचे आयुष्य वाढवू शकत नाही. "महाराज खेदाने म्हणाले. " जा लवकर. "

कुश तिथून निघाला.. त्याच्या डोळ्यासमोर त्याचे आईवडील, आजोबा आणि भाऊ येत होते. हे परत आपल्याला दिसणार नाही या विचाराने त्याला रडू येत होते.. काळजावर दगड ठेवून तो चालला होता. त्याच्या समोर आता फक्त एकच ध्येय होते.. त्याच्या घराण्याच्या शेवटच्या अंकुराला वाचवायचे.. त्याच्या भावाची सासुरवाडी त्याला माहीत होती.. तो मिळेल त्या वाहनाने तिथे पोचला. त्याने दरवाजा वाजवला. वहिनीच्या भावाने दरवाजा उघडला.

कुशला बघून त्याला आश्चर्य वाटले. कारण इतरांप्रमाणेच त्यालाही तो कुठेतरी शिकायला आहे, एवढेच माहीत होते.. " ये ना, तू असा अचानक?" त्याने विचारले..

" वहिनी कुठे आहे? मला तिच्याशी बोलायचे आहे." कुशचे डोळे रडून लाल झाले होते..

" काही झाले आहे का? तू असा का दिसतो आहेस? बस तरी.. चहापाणी घे.. मी बोलावतोच तिला.." त्यांच्या बोलण्याच्या आवाजाने तोवर घरातले बाकिचे लोक पण जमा झाले होते.. ते सुद्धा कुशला पाहून आश्चर्यचकित झाले. त्याच्या वहिनीने तर त्याला लग्नानंतर पहिल्यांदाच पाहिले होते.. कुशला त्याच्या गरोदर वहिनीला पाहून भरून आले होते.. ' काय दोष आहे हिचा आणि त्या न जन्मलेल्या बालकाचा.. त्यांचाच काय पण माझ्या घरातल्यांचा तरी काय दोष आहे?' तो मनात रडत होता..

" वहिनी आपल्याला आत्ताच्या आत्ता निघायला पाहिजे.." कुश म्हणाला..

" आत्ता? अशा अवस्थेत?" वहिनीच्या आईने विचारले.. " अरे ती सात महिन्याची गरोदर आहे.. याचा तरी विचार कर.."

" वहिनी महाराजांची आज्ञा आहे.." त्याला अपेक्षित तेच झाले.. महाराजांचे नाव ऐकताच तिने कुशसोबत निघायची तयारी केली..

" आई मी यांच्यासोबत सुखरूप आहे. माझी काळजी करू नका.." तिने घरच्यांचा निरोप घेतला.

" कोणी वहिनीबद्दल विचारायला आले तर ती कुठे आहे माहीत नाही असेच सांगा.." कुशने जाताना सांगितले.. तिथून निघताना त्याने जबरदस्त संमोहन त्याच्या वहिनीच्या माहेरच्या मंडळींवर घातले.. ज्यामुळे ते कुश तिला घेऊन गेला.. हेच विसरले..

" भाऊजी, काय झाले, आपण कुठे चाललो आहोत, काही सांगाल का?"

" वहिनी आपण महाराजांच्या मठात चाललो आहोत. "

" हे सुद्धा आहेत का तिथे? ते का नाही मला घ्यायला आले?"

" वहिनी आपण तिथे जाऊन बोलूयात का?" कुश नजर चोरत म्हणाला..

पण वहिनीला काही अशुभ होणार असल्याचा अंदाज आला.. तिने डोळे बंद करून नामस्मरण करायला सुरुवात केली..


     अमर अनेक वर्षांनी आपल्या घरी चालला होता.. आजूबाजूला बरेचसे बदल झाले होते.. त्या बदलांमधून तो जुन्या खुणा शोधत होता.. शेवटी त्याला त्याचा वाडा दिसला.. अजिबात न बदललेला.. तो जाताना जसा होता अगदी तसाच.. अमरच्या चेहर्‍यावर हसू आले.. त्याने वाड्याच्या आत प्रवेश केला.. ओसरीवर केशवराव बसले होते. ते अमरला बघून दचकले. पण जरा निरखून पाहिल्यावर त्यांना ओळख पटली.."नारायण तू? कसा आहेस? राम, जान्हवी नारायण आला आहे रे.." त्या आवाजात आनंद कमी आणि दहशत जास्त जाणवली अमरला.. तो स्वतःशीच हसला..

" अरे अमर कसा आहेस? होतास कुठे इतकी वर्षे?" रामने विचारले..

" सांगतो नंतर.. काय घाई आहे? आणि मुले कुठे गेली? मोठी झाली असतील ना?"

" हो.. येतील आता.. जान्हवी तू जेवणाचे बघतेस का?" रामने सांगितले.. जान्हवी स्वयंपाकघरात गेली.. तिला महाराजांचे शब्द राहून राहून आठवत होते.. तिने पटकन हातातली रुद्राक्षाची अंगठी काढली.. ती थोडी निस्तेज वाटली.. जणू एक अशुभ सावट आले होते.. तिने कधी नव्हे ते ओसरीवर बसलेल्या रामला हाक मारली.. तो आल्यावर तिने त्याला त्याची अंगठी दाखवायला सांगितली.. " माझी अंगठी बघा निस्तेज पडली आहे कधी नव्हे ती.. नाहीतर नेहमी नव्यासारखी चमकत असते.. मला खूप भिती वाटते आहे.." 

" घाबरतेस कशाला? कशाची भिती? या नारायणाची? नको काळजी करू.. आणि अजून एक गोष्ट सूनबाई गरोदर आहे हे बोलू नयेस, असे मला वाटते.."

" हो.. जा बसा तुम्ही बाहेर.. मी स्वयंपाक झाला कि पाने वाढायला घेतेच.." जान्हवीचा स्वयंपाक होईपर्यंत लवही आला.. नमस्कार वगैरे झाल्यावर तो आईला मदत करायला म्हणून आत आला..

"आई अग माझी अंगठी बघ ना कशी झाली आहे.. बाहेर काका आहे म्हणून बाबांना काही बोललो नाही.. "

" निस्तेज झाली आहे ना?"

" तुला कसे कळले?"

" आमच्या दोघांच्याही झाल्या आहेत. माझी खात्री आहे मामंजींची पण झाली असेल. लव काहिही झाले तरी आज दक्ष रहा बरे.. खूप विचित्र काहीतरी वाटत आहे.."

जेवताना अमरने विचारलेच,

" कुश कुठे दिसत नाही ते?" ते ऐकून केशवरावांना ठसका लागला.. रामने त्यांना पाणी दिले.."त्याला शिकायला म्हणून बाहेर ठेवले आहे.. येऊन जाऊन असतो तो.. बदलत्या काळानुसार चालले पाहिजे ना?" राम म्हणाला..

" अच्छा.. कुठे असतो तो?"

" भाऊजी , भाजी आवडली का? तुम्हाला आवडायची म्हणून केली आहे." जान्हवीने विषय बदलायचा प्रयत्न केला..

" आणि या लवचे लग्न वगैरे काही केले कि नाही?" अमरच्या चौकशा थांबतच नव्हत्या.. सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिले.. शेवटी केशवराव म्हणाले, " हो त्याचे लग्न झाले आहे.. सूनबाई जरा माहेरी गेल्या आहेत.."

" अच्छा.."

" नारायणा एक प्रश्न विचारू?" रामने विचारले.

" बोल ना दादा.."

" कुठे होतास इतकी वर्षे? आणि आज अचानक कसा आलास?"

" होतो कुठेतरी.. आणि तुम्हा सर्वांना तिथेच न्यायला आलो आहे.."

महाराज ज्या जीवावरच्या संकटाबद्दल बोलत होते ते हेच आहे अशी त्या चौघांचीही अमरच्या बोलण्यावरून खात्री पटली.. पण महाराजांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी अंगठीचा वापर करायचे ठरवले.. तो कसा करायचा हे मात्र त्यांना माहीत नव्हते..



अमरला रक्ताचा बळी मिळेल का? पाहू पुढिल भागात..


कथा कशी वाटली सांगायला विसरू नका.. 

हि कथा काल्पनिक असून मनोरंजनात्मक हेतूने लिहिण्यात येत आहे.. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात प्रयत्न नाही..

सारिका कंदलगांवकर

 दादर मुंबई

🎭 Series Post

View all