समर्थांची लेक भाग २५
मागील भागात आपण पाहिले कि एक सुंदर स्त्री गुरूदेवांच्या वाड्यात रात्री फिरत असते.. पाहूया कोण आहे ती..
त्या स्त्रीला पाहून अमर चकित झाला.. हे असे सौंदर्य त्याला इथे अशा वेळेस अजिबात अपेक्षित नव्हते.. भान विसरून तो तिच्यासमोर गेला. त्याला पाहून ती दचकली..
"तू झोपला नाहीस?" तो आवाज ऐकून अमर चक्रावला.. कारण तो आवाज होता कमलाचा.. त्या वृद्धेचा.
" तू... आपलं तुम्ही? हे कसे शक्य आहे?"
" तुला कळलेच का शेवटी.. खूप प्रयत्न केला होता तुझ्यापासून हे लपविण्याचा.."
" पण का? कशासाठी?"
"बसून बोलूयात?" असे म्हणत ती वाड्याबाहेर पडली.. तिथे असलेल्या एका बाकावर बसली. अमरलासुद्धा तिने खुणावले..
"मी कमला.. मी खूप लहान असतानाच गुरूदेवांना या वाड्याबाहेर सापडले.. माझी आई कोण कुठली? मला सोडून का गेली? हे मला कधीच कळले नाही.. सर्वसंग त्यागलेल्या गुरूदेवांनी मग माझे संगोपन केले.. मी इथेच लहानाची मोठी झाले.. तेव्हा हे काहीच अभिमंत्रित नव्हते.. हा वाडा सगळ्यांनाच दिसू शकत होता.. आत जरी फार कमी लोक येत असले तरी इथून बरेच जण जायचे.. तेव्हाच माझ्याकडून एक चूक झाली.. मी वयात आले होते. एक मुलगा रोज इथे यायचा आणि मी त्याच्यावर तारुण्यसुलभ प्रेम करू लागले.. रोज त्याची वाट पहायचे. पण एक दिवस तो आलाच नाही.. नंतर कळले, मी अनाथ आहे हे त्याला बाहेरून समजले होते , त्याची मला तोंडावर नाही म्हणायची हिंमत झाली नाही म्हणून तो सोडून गेला. पहिल्याच प्रेमाच्या कटू अनुभवाने मी एवढी पोळली गेले कि प्रेम हि भावनाच आपल्यासाठी नाही हे समजून महाराजांना शरण गेले.. त्यांच्याकडून अनेक विद्या शिकले.. त्या सहाय्याने दिवसा रूप बदलायचे आणि रात्री मूळ रूपात यायचे.. बाकी कोणाशीही बोलताना तेच रूप असायचे.. कधी कोणालाच संशय आला नाही.. तूच पहिला आहेस.."
"पण मग तू कुठे गेलीस , असे बाकीच्या शिष्यांनी नाही विचारले?"
" आधीपासूनच इथे येणारे शिष्य फार कमी असतात.. आणि जे यायचे ते त्यांच्या शिक्षणासाठी एवढे उत्सुक असायचे कि त्यांना माझ्याकडे लक्ष देण्यासाठी वेळही नसायचा.."
" स्त्रियांचे वय विचारू नये असे म्हणतात.. तुझे विचारू का?"
यावर ती फक्त हसली.. काही झाले तरी अमर खूप वर्षांनी त्याच्या वयाच्या दिसणार्या एका स्त्रीला बघत होता.. त्यामुळे त्याला तिच्यावरून नजर बाजूला करणे कठिण जात होते..
" तू उद्यापासून याच रूपात वावरशील?" अमरने तिला विचारले..
तिने त्याच्याकडे पाहिले. त्याच्या नजरेत तिला आपले हरवलेले पहिले प्रेम दिसले..
"गुरूदेवांना विचारते.." असे म्हणून ती आत निघून गेली.. कितीतरी वेळ अमर तिथे विचार करत बसला होता..
कमला गुरूदेवांना दूध-फळे द्यायला आपल्या मूळ स्वरूपात गेली. ते बघून गुरूदेव आश्चर्यचकित झाले. त्यांना त्या मागचे कारण समजले.. "कमला तुला आठवते, तू अमरला आणायला गेली होतीस तेव्हा काय झाले होते?"
" हो बाबा.. त्याचे काय इथे?"
"तुला मी त्याची एक परिक्षा घ्यायला सांगितली होती.."
" हो, आणि त्यासाठी त्याने माझा गळा पकडला होता.."
" तेव्हाच तो माझ्या परिक्षेत नापास झाला होता.. तुला माहित आहे कि हि विद्या जरी काळी आहे, असे लोक म्हणत असले तरी मी ती कोणालाही देत नाही.. मी प्रत्येक वेळी परिक्षा घेतो. अमरची हि विद्या शिकण्याची पात्रता असली.. तरी नैतिक दृष्ट्या त्याला ती पूर्ण द्यावी असे मनाला वाटत नाही.. तू लहान आहेस, अल्लड आहेस असे मी म्हणणार नाही. पण भावनेच्या भरात वाहून जाऊ नकोस.. जे होणार आहे ते कोणीच बदलू शकत नाही.. पण आपण सावध नक्कीच राहू शकतो.. जा तू.."
कमला गुरूदेवांच्या बोलण्याचा विचार करतच बाहेर आली.. पण एक नवीन उत्साह तिच्यामध्ये आला होता.. आणि त्यात गुरूदेवांचे शब्द निघून गेले.. कमलाचे आणि अमरचे प्रेम फुलायला लागले होते.. या प्रेमाच्या भरात कमला अनेक गोष्टी भरभरून अमरशी बोलत होती.. तिथल्या अनेक त्याला माहीत नसलेल्या गोष्टींची त्याला माहिती करून देत होती.. तो ही ती माहिती साठवून घेत होता. होत असलेल्या प्रेमाच्या आणाभाकांत त्याने तिला लग्नासाठी विचारले.. कमलाला आकाश ठेंगणे झाले.. तिने गुरूदेवांना विचारले,
"बाबा मी अमरशी लग्न करू?"
" तुला त्याची खात्री वाटते आहे?"
" हो.. मला आता संसारात रमावेसे वाटते.." गुरूदेवांनी अनिच्छेने का होईना परवानगी दिली.. आणि अमरचे कमलाशी लग्न झाले.. लग्नानंतर कमलाचे हसरे रूप पाहून गुरूदेवांनाही घेतलेला निर्णय योग्य आहे असे वाटू लागले.. आपल्या चांगल्या वागणुकीने त्याने गुरूदेवांचे मन जिंकून घेतले आणि त्यांच्या मनातला उरला, सुरला संशयही निघून गेला.. दिवस जात होते..गुरूदेव निश्चिंत होत होते. अशाच एका क्षणी अमरने गुरूदेवांना त्या दालनातील शक्तींवर कसा ताबा मिळवायचा हे विचारले.. गुरूदेवांनी क्षणभर विचार केला.. ते अमरला पहिल्या दालनात घेऊन गेले.. आधी प्रमाणेच त्या पुस्तकांचा आवाज सुरू झाला.. त्या तसल्या आवाजात गुरूदेवांनी त्याला मंत्रपठण करायला लावले..सुरूवातीचे काही दिवस त्याला जमायचे नाही.. त्या दालनातून बाहेर आल्यावरही आवाजाने डोके दुखत असायचे. पण तरिही त्याने प्रयत्न सोडले नाही.. एक दिवस त्याला त्या पुस्तकांना शांत करणे जमले.. त्यानंतर गुरूदेवांनी त्याला आत्मे पुस्तकात बंदिस्त करायचे मंत्र शिकवले.. त्यातही तो पारंगत झाल्यानंतर वेळ होती दुसर्या दालनात जायची.. तिथे वाट पहात होते जंगली जनावरांचे आणि अजून कसले कसले मुखवटे.. एका विशिष्ट मंत्रानंतर ते मुखवटे सजीव होऊन हवे ते काम करत. अर्थात त्यांचा मोबदला घेऊनच... त्या शक्तींना फक्त जिवंत करून चालायचे नाही.. त्यांना ताब्यात ठेवता येणे हे सगळ्यात महत्वाचे आणि धोकादायक काम होते.. अमरला तेही जमायला लागले.. पण त्याला सगळ्यात जास्त रस होता तो तिसऱ्या दालनात आणि गुरूदेव अजूनही तेवढे उत्साही नव्हते..
" तिथे जाण्यापूर्वी परत एकदा विचार कर अमर. कारण एकदा तिथे गेलो कि परतीचा रस्ता नाही.." त्यांनी परत एकदा अमरला सावध केले..
" काही झाले तरी मला ते जाणून घ्यायचेच आहे.."
" चल तर मग.."
त्या तिसर्या दालनात गेल्यावर परत अमरला तो पिंजरा आणि तो भयानक आकार दिसला..
" तुला ते दिसले?" गुरूदेवांनी विचारले.
" हो."
" त्याचे तोंड कसे आहे?"
अमरला प्रश्नाचा रोख कळला नाही..
"म्हणजे?"
"त्याचे तोंड बंद आहे कि उघडे? तुला काय दिसते आहे?"
" तोंड उघडे आहे, तो जिभल्या चाटत आहे.."
" पटकन बाहेर चल.."
" पण गुरूदेव, तुम्ही मला काहीतरी शिकवणार होता ना?" अमर विरोध करत म्हणाला..
" हि वेळ नाहिये.. बाहेर चल.."
" काय झाले? याचा अर्थ काय होतो?" अमरचा आवाज चढला होता..
" मूर्ख माणसा गप्प बस.. जी गोष्ट आपल्याला समजत नाही, तिथे अक्कल पाजळू नये.." गुरूदेव खूप चिडले होते.
" मला माफ करा.. पण कृपा करुन मला सांगा, त्याचा अर्थ काय होतो.." गुरूदेव पण थोडे शांत झाले होते. या ओरडण्याच्या आवाजाने कमलापण बाहेर आली होती.. तिला बघून अमरने परत सांगण्याचा हट्ट धरला.
गुरूदेवांनी नकारार्थी मान हलवत बोलणे सुरू केले.." तो आकार काय आहे , कुठून आला आहे? कोणालाच माहीत नाही. या पंथाचा जेवढा ज्ञात इतिहास आहे, तेव्हापासून हा इथेच आहे.. अनेक भैरवनाथांनी त्याचा उपयोग स्वतःच्या हितासाठी करून घेतला.. पण मी मात्र कधीही तो विचारही मनात आणला नाही.. त्यामुळेच मला कधीही तो आकार दिसला कि त्याचे तोंड बंद असते.. उघडे तोंड म्हणजे त्याला बळी हवा आहे.. आणि त्याला हे माहित आहे कि तो तुझ्याकडूनच मिळणार.. मी तुला तिथे न्यायलाच नको होते.."
" ते काय काम करते? कसे करते ते तर सांगा.."
" आधीच्या नोंदीनुसार म्हणजे आधीच्या भैरवनाथांनी सांगितल्याप्रमाणे ते तुला भविष्यकालीन घटना सांगू शकते.. तुझ्या शत्रूंचा काटा काढू शकते.. पण त्याचा पहिला घास हा खूप वाईट असतो.."
" काय असतो तो?"
" त्याला हवा असतो, तुमच्या रक्ताचा बळी.." हे ऐकून अमरच्या चेहर्यावर एक क्रूर हास्य आले.. जे पाहून कमला आणि गुरूदेव दोघांच्याही काळजाचा ठोका चुकला...
बळी हा शब्द ऐकून अमरच्या डोक्यात काय आले आहे? त्याला तो बळी मिळणार का? पाहू पुढील भागात..
कथा कशी वाटली सांगायला विसरू नका..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा