समर्थांची लेक भाग २४

Story Of A Female Ghostbuster


समर्थांची लेक भाग २४


मागील भागात आपण पाहिले कि अमरला गुरूदेवांच्या वाड्यात असलेल्या बंद दालनांबद्दल उत्सुकता आहे.. काय आहे नक्की तिथे.. बघूया आजच्या भागात..


"ते बघितल्याशिवाय तुझे समाधान होणार नाही.. बरोबर?" गुरूदेवांनी विचारले.. अमरने होकारार्थी मान हलवली.. गुरूदेव त्याला घेऊन त्या दालनाच्या दिशेने जात होते.. एखादे अप्रिय काम करायला लागत आहे, असे भाव त्यांच्या चेहर्‍यावर होते.. अमर थोडा घाबरलेला, थोडा उत्सुक होता. गुरूदेवांनी एका दालनाचा दरवाजा आवाज न करता उघडला.. त्यांनी हळूवार पाऊल आत टाकले.. अमरला तसेच करायला खुणावले.. गुरूदेवांच्या गंभीरपणाची लागण अमरला सुद्धा झाली.. तो आत आला. आतमध्ये भिंतीला लागून मोठमोठी पुस्तकांनी भरलेली कपाटे होती.. या पुस्तकांना काय घाबरायचे असा विचार करून त्याने गुरूदेवांना विचारले," गुरूदेव इथे एवढी काळजी घेण्यासारखे काय आहे?" त्याचे वाक्य पूर्ण होते न होते तोच ते दालन किंकाळ्या, रडण्या, भेकण्याचे आवाज यांनी भरून गेला.. त्या कर्कश आणि कानठळ्या बसणाऱ्या आवाजात इतर काहीच ऐकू येत नव्हते. कानावर हात ठेवत अमरने गुरूदेवांकडे पाहिले.. ते त्या दालनाच्या मधोमध असलेल्या आसनावर जाऊन बसले होते.. ध्यान लावून त्यांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली होती.. हळूहळू तो आवाज कमी होत गेला.. आणि शेवटी बंद झाला.. पण या सगळ्या प्रकाराने अमर एवढा घाबरला कि तो बोलायलाच तयार नव्हता.. गुरूदेवांनी डोळे उघडले. घाबरलेल्या अमरला पाहून ते थोडे हसले.. ते अमरला अजिबात आवडले नाही. " आता तू बोलू शकतोस.." गुरूदेव म्हणाले..
" हे नक्की काय होते? कोणाचे आवाज होते हे?" अमरने विचारले..
" हे सगळे या पुस्तकांतून येणारे आवाज होते. हि सगळी पुस्तके महान अशा जादूने भरलेली आहेत.. आधीच्या मांत्रिकांनी काही आत्मे यातील काही पुस्तकात बंदिस्त करून ठेवले आहेत.. माणसांची चाहूल लागताच ते सुटकेसाठी विनवणी करायला सुरुवात करतात.. यासाठीच आधी ते मंत्र म्हणावे लागतात.. इथे अनेक पुस्तके आहेत. ज्यात अनेक प्राचीन मंत्र आहेत. पण ते योग्य रितीने शिकणे गरजेचे आहे.." गुरूदेव सांगत होते.
" तुम्ही ते सगळे मला शिकवाल ना?" अमरने विचारले..
" मी अजून तो विचारच केला नाही. हि दालने तुला दाखवतो आहे , कारण उत्सुकतेपोटी तू इथे येऊन काही चुकीचे घडू नये म्हणून.." गुरूदेव उत्तरले. "पुढच्या दालनात जाऊया?"
समोर मिठाई ठेवलेली आहे पण खाता येत नसलेल्या लहान मुलासारखी अमरची अवस्था झाली होती.. ज्याच्या शोधात तो इथपर्यंत आला होता.. ते समोर दिसत होते.. पण कसे घ्यायचे हे कळत नव्हते.. "येतो आहेस ना?" अमरला थबकलेला पाहून गुरूदेवांनी विचारले.. त्यांनी दुसर्‍या दालनाचा दरवाजा उघडला.. तिथे वेगवेगळे भयानक मुखवटे लावले होते. अनेक जनावरांचे मृतदेहही भुसा भरून तिथे ठेवले होते. "हे नक्की कशासाठी आहे गुरूदेव?" अमरने न राहवून विचारले.. "अनेक शक्ती एकाच वेळेस अनेक प्रकारे काम करत असतात.. कधी कधी त्या शक्तींशी लढायला आपली ताकद कमी पडते. अशावेळेस हे मदत करतात." अमरला या दालनात तेवढा रस वाटला नाही. त्याचा स्वतःच्याच शक्तीवर भरपूर विश्वास होता. कदाचित म्हणूनच..
"आता आपण जाणार आहोत, तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या दालनात.." गुरूदेव म्हणाले. अमरची उत्सुकता अजूनच ताणली गेली. हे तिसरे दालन आधीच्या दालनापेक्षा थोडे मोठे होते. पण रिकामे होते.
" इथे नक्की काय पाहायचे आहे गुरूदेव?" अमर पुढे जात म्हणाला..
" अजिबात जागेवरून हलू नकोस.." गुरूदेव ओरडले.. अमर होता तिथेच उभा राहिला.. एक दोन क्षण गेल्यानंतर त्याला मधोमध एक चांदीचा पिंजरा दिसू लागला.. अजून काही क्षणांनी एक भयानक आकार त्या पिंजर्‍यात साकार झाला.. अमर त्याच्यावरची नजर बाजूलाच करू शकत नव्हता.. "निघूया इथून.." गुरूदेव त्याला हलवत होते.. त्यांचा चेहरा खूपच गंभीर दिसत होता.. गाढ झोपेतून जागे झाल्यासारखे क्षणभर अमरला वाटले.. त्याने परत दालनाच्या मध्यभागी पाहिले.. तो आकार आणि पिंजरा दोन्ही नाहिसे झाले होते.. "इथे मगाशी मी काहीतरी पाहिले.." तो गुरूदेवांना सांगत होता.
" कळले मला.. निघ आधी इथून." गुरूदेवांच्या आवाजात एक आतापर्यंत कधीच न ऐकलेली तातडी जाणवत होती.. काहीच न बोलता अमर परत निघाला.. निघताना त्याने त्या मोकळ्या जागेकडे एक कटाक्ष टाकताच.. त्या पिंजर्‍यातला आकार त्याला बोलावतो आहे, असे त्याला वाटले.. तो काही बोलणार इतक्यात गुरूदेवांनी दालन बंद केले.. आपल्या भविष्याचे दरवाजे बंद झाल्यासारखे त्याला वाटले.. त्याची खात्री होती कि गुरूदेव परत हि दालने उघडणार नाहीत. त्याच्यासाठी तर नाहीच नाही. या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा याचाच विचार तो सतत करत असायचा.. आणि अचानक तो मार्ग त्याला दिसला. \"कमला , ती वृद्ध स्त्री\".
त्याने तिच्याशी बोलणे वाढवले. तशी ती हि अबोलच होती.. कामाव्यतिरिक्त एकही शब्द तिच्या तोंडून निघत नसे.. तिला नोकर समजून अमर आधी कधीच तिच्याशी बोलला नव्हता कि तिचे काम कमी करायचा प्रयत्न करत नव्हता.. पण त्या दालनात जाऊन आल्यापासून अमर खरेच आंतरबाह्य बदलला होता. पहिले आणि तिसरे दालन त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे होते. महाराजांकडे आत्म्यांना मुक्ती कशी द्यायची हे तो शिकला होता.. पण आता त्याच आत्म्यांना गुलाम करून जगावर राज्य करायचे स्वप्न त्याच्या मनात आकारास येत होते.. ते ही गुरूदेवांच्या मदतीने..
" मी तुम्हाला काही मदत करू का?" अमरने कमलाला विचारले..
" नको.." तिने मान वर न करता सांगितले..
" मला नेहमीच आश्चर्य वाटते कि तुम्ही एकट्या इतके काम कसे करता.. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे बाहेरच्या जगाशी संपर्क न साधता कशा राहू शकता..?" हे वाक्य ऐकून कसलीतरी वेदना जणू कमलाच्या चेहर्‍यावर उमटली.. अमरचे तिच्याकडे लक्ष होतेच.. आपला मार्ग आपल्याला सापडला, हे त्याला कळून चुकले. कमला काहीच बोलत नव्हती.
" म्हणजे बघा हा, मी इथे येऊन इतकी वर्षे झाली, पण आजपर्यंत आपल्या तिघांव्यतिरिक कोणालाच मी पाहिले नाही.. मला कधी कधी एकटेपणा वाटतो. तुम्हाला नाही वाटत. कोणाशी तरी बोलावे, मन मोकळे करावे.."
" ते तुला सांगायची मला गरज वाटत नाही.."
" बरे ते नका सांगू. पण मला गुरूदेवांबद्दल काही सांगाल कि ते ही नाही?"
" काय ऐकायचे आहे त्यांच्याबद्दल?"
" हेच म्हणजे त्यांचे कोणी कुटुंबिय वगैरे आहेत का? ते इथे किती वर्ष आहेत? ते नक्की काय करतात?"
" तुझ्या तापसीबाबांनी सांगितले नाही?"
" तुम्हाला ते माहित आहेत?"
" गुरूदेवांचे सगळे शिष्य माहित आहेत.." ती थोडी अभिमानाने बोलली..
" सांगा ना गुरूदेवांबद्दल.."
" अवनींद्रनाथ.. कालकेय पंथातले महान गुरू. महान याच्यासाठी, कारण या आधीच्या भैरवनाथांनी या शक्तींचा वापर फक्त चुकीच्या गोष्टींसाठी केला.. पण त्या चुकांचे त्यांना अत्यंत भयंकर फळ मिळाले. त्यांचेच शिष्य गुरूदेव.. त्यांच्या गुरूने केलेल्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी अजूनही भैरवनाथ हि उपाधी लावली नाही. भरकटलेल्या वाटेवरचे जे वाटसरू इथे येतात त्यांना सन्मार्गावर नेण्याचे काम गुरूदेव करत असतात. आणि मी फक्त त्यांना मदत करत असते.." बोलता बोलता कमलाच्या तोंडून निघून गेले..
"कसली मदत करता त्यांना?"
" हिच आपली त्यांना हवे ते देणे वगैरे. आता जा तू इथून.. मला माझी कामे करू दे.." कमला सावरत म्हणाली. त्याक्षणी अमरला कळाले कि ती कोणी साधी मदतनीस नसणार.. कोण आहे मग ही.. त्याने छडा लावायचा ठरवला.. रोज रात्री झोपण्याआधी कमला अमरला दूध प्यायला द्यायची.. ते पिऊन अमर क्षणात झोपी जायचा. इतके दिवस त्याला असे वाटायचे आपण दमल्यामुळे लवकर झोपतो.. पण गेले काही दिवस वेगळेच काहीतरी असावे असा त्याला दाट संशय होता. त्याने ते दूध न पिता ओतून दिले आणि रिकामा पेला नेहमीसारखा स्वयंपाकघरात नेऊन ठेवला.. कमलाने फक्त ते पाहिले. अमर त्याच्या खोलीत निघून गेला.. पण तो आज झोपला मात्र नाही.. काही वेळाने त्याला दरवाज्याबाहेर कोणाची तरी हालचाल जाणवली. पटकन पलंगावर जाऊन त्याने झोपायचे नाटक केले. त्या व्यक्तीने दरवाजा उघडला, आत अमर झोपला आहे हे पाहिले आणि ती व्यक्ती निघून गेली.. अमरने थोडा वेळ जाऊ दिला.. त्यानंतर तो हळूच उठला.. पायांचा आवाज होऊ नये म्हणून त्याने पायाला रुमाल बांधले.. बाहेर आला तर एक अतिशय सुंदर स्त्री तिथे वावरत होती..


कोण होती ती स्त्री? अमर त्या शक्ती मिळवण्यात यशस्वी होईल? पाहू पुढील भागात..

हि कथा काल्पनिक असून मनोरंजनात्मक हेतूने लिहिण्यात आली आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात हेतू नाही.

कथा कशी वाटली हे सांगायला विसरू नका..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all