समर्थांची लेक भाग २२

Story Of A Female Ghostbuster

समर्थांची लेक भाग २२



मागील भागात आपण पाहिले कि महाराज कुशला त्यांच्यासोबत घेऊन जातात.. दुसरीकडे हिमालयात अमर उर्फ नारायणची कालकेय पंथाशी ओळख होते.. तिथे त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होते.. त्याला ओढ आहे पुढच्या पायरीची.. आता पुढे..



तामसीबाबांना त्यांच्या गुरूची अमरला त्यांच्याकडे पाठविण्यासाठी परवानगी मिळताच अमरची तिथे जायची तयारी सुरू झाली.. जाण्यापूर्वी त्यांनी अमरला बोलावून घेतले.. त्याच्या हातात दोन गोष्टी ठेवल्या..

" हे काय आहे गुरूजी?"

" हा जो पहिला आहे तो स्फटिकाचा पांढरा गोलक.. ज्यामध्ये तू हा दिलेला मंत्र म्हणून एखाद्या जागेचे नाव घेतलेस कि ती जागा तुला यामध्ये दिसायला लागेल.."

" गुरूजी हे तर अद्भुत आहे.. पण हे तुम्ही मला का देत आहात?" अमरने आश्चर्याने विचारले..

" तुला माझे वय काय वाटते?" तामसीबाबांनी त्यालाच विचारले..

त्या असंबद्ध प्रश्नाचा रोख अमरला कळला नाही..

 "सत्तर.."

तामसीबाबा जोरात हसले.. 

" दिडशे"

अमरच्या चेहर्‍यावरचे आश्चर्य पाहून त्यांना मजा वाटत होती..

" एवढे वय?? पण कसे शक्य आहे?" अमरच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते..

" तू आता ज्या गुरूंकडे जाणार आहेस, त्यांचे वय माहित आहे?"

अमरने नकारार्थी मान हलवली..

" पाचशे नंतर त्यांनी मोजायचे सोडून दिले.. आता कोणालाच त्यांचे वय माहित नाही , कोणाला जाणून घ्यायची गरजही वाटत नाही.."

" पण एवढे वय? कसे शक्य आहे?"

" बेटा, या हिमालयातले वातावरण, इकडची काही जडीबुटी, योगसाधना अशा अनेक गोष्टी मृत्यु जवळ येऊ देत नाही.. आता मला कळत आहे कि माझा अंतिम काळ जवळ आला आहे. आणि या गोष्टीसाठी तुझ्यापेक्षा लायक दुसरा कोणी माझ्या नजरेत नाही. हा जो गोलक आहे , तो मी स्वतः सिद्ध केलेला आहे.. याची काळजी कशी घ्यायची याची सर्व माहिती एका भूर्जपत्रावर लिहून ठेवली आहे.. ती फक्त वेळोवेळी पाळ म्हणजे झाले.."

अमर मिळालेल्या या भेटीने एवढा खुश झाला कि हा परत बनवता येऊ शकेल का, हा प्रश्नच त्याला विचारावासा वाटला नाही.. तो पुढे काही बोलत नाही, हे पाहून गुरूजींनी बोलायला सुरूवात केली.. ती जी दुसरी पुडी आहे, त्यात उडीद आहेत. रस्त्याने चालताना जिथे फाटे फुटतात तिथे एक या रस्त्यावर तर दुसरा त्या रस्त्यावर टाकायचा.. जिथे गुरूदेव असतील त्या दिशेचा उडीद चमकत राहिल.. त्या दिशेने चालत रहायचे.."

" पण मग असे किती दिवस लागतील त्यांच्यापर्यंत पोहोचायला?"

" ते फक्त तेच सांगू शकतात.. त्यांची इच्छा असेल तर तू लगेच भेटू शकतोस. पण नाहीतर शोधत रहा.."

अमरची गुरूदेवांबद्दलची उत्सुकता वाढत चालली होती.. 

" पण ते राहतात कुठे? हे उडीद द्यायच्या ऐवजी त्यांचा पत्ता दिलात तर मी लवकर पोचेन ना त्यांच्यापर्यंत?"

" ते कुठे आहेत, हे खूपच कमी जणांना माहित असते.. हा त्यांनीच दिलेला उपाय आहे.. आणि काळ वेळ म्हणशील तर सध्या तू वेळेचा हिशोब करणे सोडून दे.. आमच्या वयावरून तुला अंदाज आलाच असेल ना कि वेळेची साधारण बंधन आपल्या सारख्यांसाठी नसते.. आता तू तुझ्या प्रवासाला निघू शकतोस.."

अमर तामसीबाबांना नमस्कार करून निघाला, त्यांनी दिलेल्या भेटीबद्दल चकार शब्दही न काढता तो गेला.. नाही म्हटले तरी तामसीबाबांना वाईट वाटले.. तितक्यात पुढे गेलेला अमर परत वळला, बाबांना वाटले त्याला बुद्धी झाली असेल.. वळलेल्या अमरने विचारले," पण त्या रस्त्यावर जेवायची सोय असेल ना.." बाबांनी होकारार्थी मान हलवली.. अमरच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली.. कधी कडाक्याचे उन्ह, कधी सोसाट्याचा वारा..कधी बर्फाचा पाऊस, तर कधी कडाक्याची थंडी.. या सगळ्यापासून बचाव झाला तर तिकडे असणारी जंगली श्वापदे.. खायला मिळाले तर मिळायचे नाहीतर आश्रमातून मिळालेल्या सुक्या खाऊवर गुजराण करायला लागायची.. पाणी दिसले तर अंघोळीची चैन असायची.. आश्रमातून निघताना घातलेला कपड्यांचा जोड फाटला.. तरिही त्याच्या तोंडून त्याविषयी काहीच तक्रार निघाली नाही. हे बघून कदाचित गुरूंना त्याची दया आली असावी.. एके दिवशी त्याच्याजवळचे सगळे उडीद संपून गेले.. ती एवढीशी पुरचुंडी एवढे दिवस पुरली कशी , या आश्चर्यात काल रात्रीपर्यंत उडीद असलेली पुडी अचानक संपली कशी ह्याची भर पडली.. आता पुढे कसे जायचे याच विवंचनेत तो होता.. आजूबाजूला विचारायला कोणी चिटपाखरूही दिसत नव्हते. आश्रम सोडून दिवस गेले, महिने गेले कि वर्ष हे ही कळत नव्हते.. पण इतके दिवस ते उडीद तरी होते रस्ता दाखवायला.. हि वाट कधी संपणार कि नाही हाच प्रश्न अमरला पडला होता.. विचार करत असतानाच पाठून त्याला एक आवाज आला..

" कोणता पत्ता शोधतो आहेस का?"

एक वृद्ध स्त्री तिथे उभी होती. ती कधी आली हे त्याला समजले नव्हते.. पण आता तो एवढा थकला होता कि जास्त विचार करायची त्याची इच्छा नव्हती.. आणि या उगाचच चौकशी करणाऱ्या म्हातारीला उत्तर द्यायची तर नाहीच नाही.. पण अशा या निर्जन स्थळी तो एकटाच होता.. पुढे कुठे जायचे हे माहित नसताना, जवळचे अन्न संपत असताना बाह्यजगाशी जोडून ठेवणारा धागाही तोडवत नव्हता..

" आजीबाई मी एक आश्रम शोधतो आहे.. इथे कुठे तुम्ही पाहिला आहे का?" अमरने कृत्रिम नम्रतेने विचारले.

" आश्रम?? नाही बाबा.. पण बरेच लोक इथे फिर फिर फिरताना पाहिले आहेत.. त्यातले काही मरतात, काही वेडे होतात.. काही दिसत पण नाहीत." अमर थोडा निराश झाला..

" मग इथे काही खायला मिळेल का? भूक लागली आहे.."

" मिळेल ना? पण त्या बदल्यात तू मला काय देणार?"

दिसते तशी साधी नाही हि..

" आता सध्या देण्यासारखे माझ्याकडे काहीच नाही. पण संधी मिळाली तर नक्की परत देईन.. पण आता काहीतरी हवे आहे.."

" नाही बाबा.. पैसे नाहीत, अन्न नाही.. असे प्रत्येकालाच मी जर फुकट देत बसले तर मी कसे जगायचे." असे म्हणत ती बाई वळली.. भुकेने आणि निराशेने वेडापिसा झालेल्या अमरने तिच्यावर झडप घातली.. "सध्या तुझे प्राणदान हि एकच गोष्ट मी तुला देऊ शकतो.." तो अजून काही बोलणार इतक्यात "सोड तिला" असा आवाज त्याला ऐकू आला.. त्याने इथेतिथे पाहिले पण कोणीच दिसले नाही.. " सोड तिला.. आणि तिच्या पाठोपाठ ये.." परत आवाज आला.. त्या म्हातारीने त्याला आपल्या पाठी येण्याची खूण केली.. कसलाही विचार न करता तो तिच्या पाठी जायला लागला.. थोडेच अंतर गेल्यानंतर त्याला समोर एक मोठा वाडा दिसला.. हा आपल्याला आधी कसा नाही दिसला? याचा विचार तो मनात करत असतानाच त्या वृद्धेने याच्या मनातले विचार ओळखून

उत्तर दिले.. " इथे सगळे अभिमंत्रित आहे.. गुरूदेवांच्या इच्छा असेल तरच हा दिसू शकतो तो हि त्यांना हवे त्यालाच.. मी तुला घ्यायला आले म्हणूनच तू इथपर्यंत पोहचू शकलास.. नाहीतर अजून काही वर्ष इथे फिरत राहिला असतास तरी तुला हे दिसले नसते.."

" मी हा इथेच फिरत होतो? पण मला तर एक जागा कधीच दुसर्‍या जागेसारखी दिसली नाही.."

" आमच्या जगात तुझे स्वागत आहे.. पहिला नियम डोळ्यासमोर जे दिसेल त्या सगळ्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे असे नाही.." ती वृद्धा म्हणाली..

ते दोघेही आत शिरले.. अतिशय प्रशस्त वाडा होता तो. मर्यादित सूर्यप्रकाश, मर्यादित वारा.. आतले तापमान सुद्धा ना जास्त ना कमी.. मधोमध रिकामे ठेवलेले रिंगण. आजूबाजूला बसायची असलेली सुंदर व्यवस्था. बाहेर एवढे निर्जन असलेल्या ठिकाणी एवढी चांगली व्यवस्था? अमर मनात विचार करत होता.. 

" तुला भूक लागली आहे म्हणाला होतास ना.. तुला तुझी रहायची व्यवस्था दाखवते.. अंघोळ कर.. सगळे आवर आणि स्वयंपाकघरात ये. त्या वृद्धेने अमरच्या खोलीच्या दिशेने जातानाच त्याला स्वयंपाकघर दाखवले.. एका वेळी शंभर माणसे जेवू शकतील एवढे मोठे होते ते.. त्या बाईंनी अमरची खोली दाखवली.. ती बघून अमर हैराण झाला.. याआधी जेव्हा तो तामसीबाबांच्या आश्रमात रहात होता, तेव्हा हे असे काहीच नव्हते.. सगळ्या विद्यार्थ्यांसाठी असलेली सामाईक खोली.. झोपायला घोंगडी.. पण इथे, त्याला स्वतःसाठी स्वतंत्र खोली.. त्या खोलीत स्वतंत्र न्हाणीघर.. तिथे कपाटही होते.. त्या कपाटात त्याच्या मापाचे कपडे होते.. पण त्याने विचार करायचा नाही हे आधीच ठरवले होते.. त्यामुळे तो त्या न्हाणीघरात गेला. खूप दिवसांनी मनसोक्त स्नान केले.. धुतलेले कपडे घातले.. स्वयंपाकघरात आला.. तिथे जेवणाची तयारी झालेली दिसत होती. वृद्धेने पानं मांडून ठेवले होते.. त्याने काहीही न विचारता जेवायला सुरुवात केली.. जेवण झाल्यावर त्याने समोर पाहिले तर एक वृद्ध त्याच्याकडे निरखून पहात होता.. 

" दमला आहेस.. आराम कर.. उद्या सकाळी भेटू.." तोच ऐकू आलेला आवाज.. अमरला कळले हेच ते गुरू ज्यांच्याकडून शिक्षण घेण्यासाठी तो एवढे श्रम घेऊन आला आहे.. तो उठायच्या आत ते तिथून निघून गेले होते....





ज्या गुरूंना भेटण्यासाठी अमरला एवढा खडतर प्रवास करावा लागला ,त्यांचे प्रशिक्षण सोपे असेल? पाहूया पुढील भागात..


कथा कशी वाटली सांगायला विसरू नका.. हि कथा काल्पनिक असून मनोरंजनात्मक हेतूने लिहिली आहे.. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात प्रयत्न नाही..


सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई

🎭 Series Post

View all