समर्थांची लेक भाग १६

Story Of A Lady Ghostbuster

समर्थांची लेक भाग १६




 मागील भागात आपण पाहिले कि अमर अक्षताला त्याच्यासाठी काम करशील का असे विचारतो.. सुपर्णा एका म्युझियमची सहल ठरवते. पुढे पाहूया काय होते?


 " आई, आत्या आम्ही आता म्युझियम मध्ये जाणार आहोत.."अक्षताने सकाळीच सांगितले.

"हे ग काय, एक दिवस सुट्टी असते तुला, ते ही तू बाहेर जाणार?" आईने विचारले.

" आई, दुपारपर्यंत येते.. मी नाहीच म्हणत होते. पण सुपर्णाने खूपच आग्रह केला. मीत पण आहे सोबत. आता निघतो,म्युझियम बघतो आणि जेवायला घरी..."

" नंतर कधी गेलीस तर नाही का चालणार?"

"अग आई, तिथे इजिप्शियन महोत्सव सुरू आहे. फक्त आठवडाभर.. प्लीज जाऊदे ना.."

" मालती, जाऊदे तिला.. अक्षता, जा पण लवकर ये.."

" पण ताई, तुमचे पारायण?"

" कसले पारायण?" अक्षताने विचारले.

" काही नाही. तू घरी आहेस म्हणून मी गुरूचरित्र वाचणार होते. पण तू ये जाऊन. असेही ते मीच वाचणार होते." आत्या म्हणाली..

" सॉरी आत्या.."

" अग सॉरी काय त्यात. पण बाहेर चालली आहेस तर सगळं साहित्य नीट घे. फक्त श्रीरंगाची अंगठी देशील का?"

" तुझा माझ्यावर विश्वास नाही का आत्या?"

"वेडाबाई, मला ती सिद्ध करायची आहे. त्यासाठीच हे पारायण आहे.. तू ती वापरतेस. शक्ती कमी होते अशा गोष्टींची. ती तुमच्या भाषेत परत रिचार्ज करायला लागते.."

" ओह्ह.. थँक यू सो मच आत्या.. मी येते लवकरच.."

बरोबर दहा वाजता मीत हजर होता.

" चलायचे?"

" हो, सुपर्णाला घेऊ.. मग थेट म्युझियम.."


" अक्षता, हा इथे काय करतो आहे?" सुपर्णाने चिडून विचारले.

" मी गाडी चालवतो आहे." आज मीत मस्करीच्या मूडमध्ये होता..

" तू आम्हाला एकटे सोडणारच नाहीस का कधी?" सुपर्णाने विचारले.

" विचार करीन.." मीत हसत म्हणाला.

" तुम्ही दोघे भांडण बंद कराल का? तुमच्याकडे पाहिले ना कि तुम्ही दोघे सवत असल्यासारखे वाटते मला.."अक्षता भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत म्हणाली..

" हो, आणि तू आमचा दादला.." यावेळेस दोघेही एकत्र बोलले..

" आपलेही एकमत होऊ शकते." मीत सुपर्णाला म्हणाला.. यावर ती फक्त हसली.. आणि शेवटी हे तिघे म्युझियममध्ये पोचले..


    ती म्युझियमची अवाढव्य बिल्डिंग पाहून मीत म्हणाला," सॉरी मुलींनो.. मी एवढे नाही फिरू शकत.. तुम्ही इजिप्शियन कक्षात गेलात कि मला फोन करा. मी तिथे येईन.."

" हो रे, खूपच मोठी आहे. मलाही पाहायला आवडले असते सगळे. पण मी घरी लवकर जाईन असे सांगून आले आहे आत्याला आणि आईला." अक्षता म्हणाली.

" मग मी काय एकटी फिरू हे सगळे? आपण इजिप्शियन कक्ष बघू आणि जाऊ. " सुपर्णा नाराज होत म्हणाली.

इजिप्शियन महोत्सवासाठी एक अख्खा मजला ठेवला होता. आणि त्याचे खास आकर्षण होते एक ममी.. खरीखुरी ममी.. नुकत्याच केलेल्या उत्खननात हि ममी सापडली होती. केंद्र सरकारने केलेल्या विनंतीवरून त्यांनी ती भारतात पाठवली होती. इजिप्तचा पर्यटन व्यवसाय वाढावा हा एक हेतू होताच.. पण सध्यातरी बरेच जण हि ममी पाहण्यासाठी येत होते.. ममीसोबत सापडलेल्या वस्तूही प्रदर्शनात मांडल्या होत्या. नवीन काहितरी पहात असल्यामुळे तिघेही थक्क होऊन ते पहात होते. तिथे त्यांनी इजिप्शियन वेशभूषेत फोटो काढून घेतले.. आणि नंतर तो खास ममी ठेवलेला छोटा कक्ष आला.. छोटासा आणि अंधारा.. ममीभोवती असलेला माफक उजेड, तो गारवा सगळे अनैसर्गिक वाटत होते. ममीभोवती काही भांडी ठेवलेली होती.. तिथे एक मोठा रांजण होता. त्या रांजणात काही तरी चमकत होते. बाजूलाच एक कर्मचारी या ममी बद्दलची माहिती देत होता.. अक्षता आणि मीत तिथे उत्सुकतेने गेले. पण सुपर्णा त्या रांजणाकडे बघत होती.. अचानक काहीतरी झाले आणि त्या दालनातले दिवे गेले. "कोणीच जागा सोडू नका." म्युझियमचा कर्मचारी सांगत होता. तेवढ्यात काही तरी फुटण्याचा आवाज आला आणि आवाजापाठोपाठ एक दुर्गंध आला.. त्या वासाने काहीजण चक्कर येऊन पडले. अक्षताने ताबडतोब हातात तिची जपाची माळ घेतली आणि जप सुरू केला.. हळूहळू तो दुर्गंध कमी झाला. त्या दालनातले दिवे परत आले. ममीशेजारचा मोठा रांजण फुटला होता. सुपर्णा तिथेच बेशुद्ध होऊन पडली होती. अक्षताने माळ नीट गळ्यात घातली आणि मीतला हाक मारली. "मीत , सुपर्णा बेशुद्ध झाली आहे.. मला मदत कर तिला उचलायला."

त्या दोघांनी मिळून तिला बाजूला घेतले. सगळीकडेच गोंधळ उडाला होता. अक्षताने बॅगमधून पाण्याची बाटली काढून सुपर्णाच्या तोंडावर शिंपडले..

" सुपर्णा, ऊठ..."

फायनली सुपर्णाने डोळे उघडले.. पण ती काहीच बोलत नव्हती.. 

 " काय ग बरी आहेस का?"

एक नाही कि दोन नाही..

"अक्षता आपण हिला डॉक्टरकडे घेऊन जाऊ या का?"

" अरे, आज रविवार आहे.. आणि असेही बहुतेक त्या वासाने तिला चक्कर आली असेल.. आपण घरी सोडू तिला.."

त्या दोघांनी तिला कसेतरी धरून गाडीत बसवले. पण सुपर्णा भानावर नव्हती.

" अक्षता, अग काय झाले हिला?"

सुपर्णाची आई घाबरली होती.

" काकू काही नाही. त्या म्युझियममध्ये अचानक दिवे गेले होते. नंतर पाहिले तर हि बेशुद्ध पडली होती.. तिला इथेच घेऊन आलो."

" बरे झाले. तुम्ही बसा ना.."

" नको काकू, आम्ही निघतो.. घरी आई वाट पहात असेल. काही लागले तर नक्की सांगा.."

मीत आणि अक्षता दोघेही गाडीत बसले.

" अक्षता, तुलाही तेच वाटते आहे का जे मला वाटते आहे?"

" मीत , प्लीज आता कोडी सोडवा, नको.. पटापट बोल."

" बरे, मला असे वाटते कि त्या दुर्गंधीचा आणि सुपर्णाच्या बेशुद्धीचा संबंध आहे. तो रांजण कसा फुटला असेल? सगळेच विचित्र आहे ना?"

"मी हि तोच विचार करते आहे. तो रांजण फुटणे, त्यातून तो वास येणे हे काही चांगले नाही."

" आता काय होईल अक्षता?"

" मला रे काय माहीत?"

" तू ते भूतांना सोडवतेस ना.. त्यातले हे नाही ना?"

" मला वेळच मिळाला नाही तो विचार करायला.. सुपर्णाला तसे बघून मी घाबरले होते. मैत्रीण आहे रे ती माझी.."

" हो हो.. मी तर तुला स्ट्राँग मुलगी समजत होतो.. तू तर रडकी निघालीस. "

" असे नाही रे. जवळच्या लोकांना गमवायची भिती वाटते.."

" काही नाही होत तिला.. चल मी तुला हि घरी सोडतो."

" थॅंक यू मीत.."

" कशासाठी?"

" असेच...."

मीतने फक्त अक्षताच्या हातावर हात ठेवला..

" काय ग काय झाले, चेहरा का तुझा असा उतरलेला?" अक्षताला पाहिल्या पाहिल्या आईने विचारले.

"सांगते..हातपाय तर धुवून येऊ दे.. तुमचे झाले का पारायण व्यवस्थित?"

" हो.. काहिही अडथळा न येता झाले.. हि बघ अंगठी.." आत्याने अक्षताला अंगठी दाखवली.. 'नुकतीच घडवल्यासारखी ती चमकत होती. आणि काल काळी पडली होती. पण तरिही ती नुसती बोटात घातली तरी बाबा सोबत असल्याचा भास होतो'. अक्षता स्वतःशी विचार करत होती..

" आता कसल्या विचारात बुडालीस?" आईने विचारले, " चला जेवायला बसू. थांबलो आहोत कधीच्या."

जेवताना अक्षताने न राहवून म्युझियममधे घडलेली घटना सांगितली. ती ऐकून दोघींच्याही हातातला घास तसाच राहिला.

" तुला नाही ना काही झाले?" आईने काळजीने विचारले.

" आई , माझ्याकडे माझी माळ नेहमीच असते.."

"अक्षता, नंतर माझ्यासोबत थोडी अर्चना कर.." आत्याने बजावले..

" हो आत्या.."

अक्षताच्या डोक्यातून सुपर्णाचा विचार जात नव्हता.. 'ती बरी असेल ना? तिला फोन करू या का? नको ती आराम करत असेल. उद्या सकाळी ऑफिसला निघतानाच बोलूया तिच्याशी..'

पण ती वेळच नाही आली.. अक्षता ऑफिसला निघतानाच सुपर्णाच्या आईचा फोन आला.." अक्षता, बाळा तुला इथे यायला जमेल का? हि सुपर्णा बघ ना कशी करते आहे.." 




सुपर्णाला नक्की काय झाले असेल, पाहू पुढच्या भागात...


हि कथा काल्पनिक असून फक्त मनोरंजन करण्यासाठी आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात हेतू नाही..


सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई

🎭 Series Post

View all