समर्थांची लेक भाग १५

Story Of A Female Ghostbuster

समर्थांची लेक भाग १५



मागील भागात आपण पाहिले कि अक्षता , मीत आणि सुपर्णाला तिच्या वडिलांचा मृत्यू कसा झाला हे सांगते. अक्षताला एक निनावी फोन येतो. कोणाचा फोन असेल तो?





" काय ग , कोणाचा फोन आहे?" सुपर्णा अक्षताला विचारत होती.

" असाच एक होता. ऐक ना मला नाही वाटत आज माझे काही काम होईल म्हणून. मी जाते घरी. तू प्लीज सरांना सांगशील का?"

" काही प्राॅब्लेम?"

" नाही. तो बाबांचा विषय झाला ना.. थोडे डोक दुखायला लागले आहे."


अक्षता घरी आली.. बाबांच्या मृत्यूची आठवण आणि तो फोन तिचे खरेच डोके दुखायला लागले होते. घरी येताच हातपाय धुवून ती आईच्या कुशीत शिरली..

" काय ग, काय झाले अचानक?" मालतीताईंनी विचारले. कारण आजकाल अक्षताचे हे वागणे कमी झाले होते..

" बरं नाही का वाटत?" आत्याने काळजीने विचारले..

" हो थोडेसे."

" अशी जरा माझ्यासमोर बस." आत्याने अक्षताला समोर बसवून आपल्या उजव्या हाताचा अंगठा तिच्या भुवईच्या मध्ये दाबला.." आता वाटते का बरे?"

" खूप शांत वाटतंय..thank you आत्या.."

" मी एक सांगू अक्षता..."

" बोल ना आत्या.."

" जरा आमच्याशी बोल ना.."

" बोलते तर आहे, अजून काय वेगळे बोलायचे?"

" तुझ्या मनात असलेले. तुलाही माहीत आहे आणि आम्हाला पण.. श्रीरंग गेल्यापासून तू धड बोलत नाहीस. बोलून तर बघ आमच्याशी."

" आई, आत्या मला एक नवीन ऑफर आली आहे.त्यासाठी संध्याकाळी मला बाहेर जायचे आहे.. मी थोडा आराम करू का?"

"हो करना . आम्ही जातो बाहेर.."


आई आणि आत्या बाहेर गेल्या, पण अक्षताला आत्याचे बोलणे ऐकू आलेच..

" मालती पोरगी खूप काही लपवते आहे."


      संध्याकाळी दिलेल्या वेळेच्या आधीच अक्षता घरातून निघाली. निघताना जपाची माळ तिने खिशात ठेवली. आज तिने तिच्या बाबांची रूद्राक्षाची अंगठीही घातली.. पत्ता तिच्या मोबाईलवर आलाच होता. थोडा लांबचा होता. तिने आपली स्कूटी काढली आणि निघाली. आपला पाठलाग होत आहे, असे सतत तिला वाटत होते, पण दिसत तर कोणीच नव्हते. तिनेही मग तो नाद सोडला.. तो पत्ता एका बंगल्याचा होता. 'अच्छा म्हणून लांब आहे का?' तिने स्वतःशीच विचार केला. बाहेर कोणीच दिसत नव्हते. तिने कंबरेचा पट्टा चाचपला. तिथे चाकू वगैरे व्यवस्थित आहेत याची तिने खात्री करून घेतली. श्रीरंगपंत गेल्यापासून अनोळखी ठिकाणी जाताना तिने अशा गोष्टी सुद्धा सोबत ठेवायला सुरुवात केली होती. 

" कोणी आहे का घरात?" तिने जोरात दरवाजा ठोठावत विचारले. बेल वगैरे अशा गोष्टींवर बहुतेक मालकाचा विश्वास नसावा. कोणीतरी आपल्यावर नजर ठेवून आहे याची परत एकदा अक्षताला जाणीव झाली.

ती पाठी वळून पाहणार इतक्यात समोरचा दरवाजा उघडला.. तिच्या बाबांच्या वयाचा एक माणूस समोर उभा होता.

"माफ करा ,मला यायला जरा उशीर झाला. "

" it's ok.."

" आत या ना, तुम्ही अक्षता श्रीरंग समर्थ. बरोबर?"

" हो मीच."

" बसा इथे. बसून बोलू."

"मला फोन तुम्हीच केला होता का?"

" किती ती घाई? आधी मला सांगा काय घेणार तुम्ही? मी अरेतुरे केले तर चालेल का?"

" हो चालेल.. मला चहा, पाणी काही नको. मी इथे कामासाठी आले आहे. आपण कामाचे बोलू, नाहीतर मी निघते."

" अच्छा.. ठिक आहे. मी असे ऐकले कि तू आत्म्यांना मुक्ती वगैरे देतेस." त्या व्यक्तीने अक्षताला विचारले.

" त्याचा तुमच्याशी संबंध?"

" मला हवे आहे कि तू ते काम माझ्यासाठी करावेस".

" तुमच्यासाठी आत्म्यांना मुक्ती द्यायची? नाही कळले मला.."अक्षता थोडी गोंधळली होती.

" मुक्ती नाही. त्यांना बंदिस्त करायचे. माझ्यासाठी. आणि इथे आणून द्यायचे."

" का? कशासाठी?"

" पहिला नियम, मला प्रश्न विचारायचे नाहीत."

" माझा नियम, मी माझे समाधान झाल्याशिवाय पुढे जात नाही.."

अक्षताचे उत्तर ऐकून तो माणूस चमकला. आतापर्यंत त्याने हुकूम सोडायचा आणि बाकीच्यांनी ऐकायचे अशी त्याची पद्धत होती..हे पाणी थोडे वेगळे आहे हे त्याला माहीत होते. पण किती त्याचा अंदाज येत चालला होता..

" ते आत्मे कशासाठी हे मी नक्की सांगीन तुला, पण आता नाही योग्य वेळ आल्यावर. "

" मी हे काम तुमच्यासाठी का करायचे?" अक्षताने विचारले.

" कारण मी तुला त्या शक्तीपर्यंत नेऊ शकतो.." तो माणूस अक्षताकडे बघत बोलला..

अक्षता तीनताड उडाली.

" कोणती शक्ती?" 

" तीच जिच्यासाठी तुझ्या वडिलांचा जीव गेला.."

" तुम्हाला कसे हे माहित?"

" मला बर्‍याच गोष्टी माहित असतात. आता तुला माझ्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही.."

" मला विचार करायला थोडा वेळ लागेल. मी अनोळखी व्यक्तींसोबत काम करणे टाळते. "

" तू खरेच स्मार्ट आहेस. मला तुझ्यासोबत काम करायला खूप आवडेल.. माझे नाव *अमर* आहे. तू जर नेटवर शोधलेस तर माझी माहिती तुला मिळेल.. अजून काही ?"

" सध्यातरी काही नाही.."

" मग तू काम करणार हे नक्की समजू का?"

" मी म्हटले ना मला विचार करावा लागेल. "

"ते म्हटलेस म्हणूनच खात्री वाटते कि तू मला मदत करशील.. एकदा तू सुरुवात केलीस कि हळूहळू तुला एकेक गोष्टी समजतील.. तुला एक कार्ड देतो , त्यावर एक फोन नंबर आहे. कधिही काहिही अडचण आली कि त्या नंबरवर फोन कर. तुझी मदत केली जाईल.."

" पण मला आत्म्याला मुक्ती द्यायचे मंत्र माहीत आहेत.. बंदिस्त करायचे नाही.."

" मार्तंड आठवतो ना तुला" *अमरने* जोरजोरात हसत विचारले.

" हो, त्यांना कसे विसरून चालेल.."

"मग ध्यान करताना त्याचा विचार कर सगळे मंत्र आपोआप येतील."

" अच्छा , तर तुम्ही सुद्धा कालकेय पंथीय आहात तर.."

" हो.. पण सध्या तुझ्यासाठी एवढेच पुरेसे आहे. "

 हा आपल्याला निघण्याचा इशारा आहे हे समजून अक्षता तिथून निघाली. पूर्ण रस्त्यात ती याचा विचार करत होती. कोणाशीच या विषयावर काहीच बोलता येणार नव्हते.पण मनोमन तिने हे काम स्वीकारायचे ठरवले होते. ती गाडीवरून उतरली. याचीच जणू वाट पहात असल्यासारखा तिचा मोबाईल वाजला.. 

" हाय अक्षता , उद्याचा काय कार्यक्रम?"

" सुपर्णा , मी अजून काहीच ठरवले नाही."

" अशी कशी ग तू.. उद्या रविवार आहे. मस्त बाहेर फिरू, जेवू , पिक्चर पाहू आणि घरी जाऊ.."

" नाही ग , एवढा पूर्ण दिवसाचा प्लॅन जमणार. आधीच कामानिमित्त दिवसभर बाहेर असते त्यामुळे आई आणि आत्या ओरडत असतात.."

" असं का.. मग आपले सिटी म्युझियम आहे ना, तिथे इजिप्शियन फेस्टिव्हल चालू आहे. सकाळी तो बघू, मग घरी जाऊ.. चालेल? "

"म्युझियम ? ओके चालेल.. मी येते उद्या सकाळी तुला घ्यायला.. तयार रहा" असे बोलून अक्षताने फोन ठेवला..

" कुठे जायचा विचार चालू आहे?" मीत तिच्या गाडीच्या पाठीच उभा होता..

" हे राम, तू आणि सुपर्णा सतत माझ्या मागावर असता काय? गाडीवरून उतरल्या उतरल्या तिचा फोन. तो ठेवते न ठेवते तू समोर".

" अग , घरी चाललो होतो. तू दिसलीस म्हणून उतरलो. चिडणार असशील तर जाऊ का?"

" चिडत नाही रे.. जरा विचारात होते म्हणून. उद्या म्युझियम मध्ये जाणार आहोत. तू येणार का?"

" म्हणजे काय? इतिहास माझा आवडता विषय आहे. वेळ सांग. मी पोचतो." 

" उद्या सकाळी दहा वाजता.."

" डन"


हि कथा काल्पनिक असून फक्त मनोरंजनात्मक आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात हेतू नाही..


सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई

🎭 Series Post

View all