समर्थांची लेक भाग ९

Story Of A Lady Ghostbusters
समर्थांची लेक भाग ९



मागच्या भागात आपण पाहिले कि अक्षताने एका कालकेय पंथीयाला सोडवले पण त्या बदल्यात तिला मिळाल्या काही शक्ती....तिच्या आजोबांचा एकेकाळचा सहाध्यायी अमर उर्फ कली हा पोचला आहे त्या पंथाच्या सर्वोच्च उपाधीला.. आता पाहूया पुढे काय ते...





" अग, ऐकतेस का?"
" बोलाना.."
" वेळ आली आहे."
" ठिक आहे....मी पण तयार आहे."
"म्हणजे ?"
" जिथे तुम्ही तिथे मी.. राधा तिच्या संसारात सुखी आहे. श्रीरंगचे पण लग्न झाले आहे, मालती आहेच त्याच्या सोबत.. आणि अक्षताबद्दल तुम्हीच एवढे काय काय सांगता...त्यांना आपली उणीव भासली तरी ते काही लहान नाहीत.. स्वतःची काळजी ते घेऊ शकतात.. गरज तर तुम्हाला आहे माझी..."
"तुझे कसे आभार मानू तेच कळत नाही.."
" आभार कसले ? हि तर देवाने आपल्यावर टाकलेली जबाबदारी..."

         दामोदरपंतांनी तयारी सुरू केली. अमर जिथे तो विधी करणार होता त्या जागेची माहिती त्यांच्या माणसांनी त्यांना दिली होतीच.. फक्त त्यांना एकट्यालाच तिथे जायचे होते.. कोणालाही सोबत न घेता..तो विधी एका बंगल्याच्या तळघरात होणार आहे हे पंतांना कळले होते. .. अमरला बहुतेक स्वतःच्या ताकदीची खूपच खात्री असावी.. कारण त्या बंगल्याच्या आजूबाजूला कोणताच मानवी पहारा नव्हता. आपल्याला काहिच अटकाव होणार नाही असे पंतांना अजिबात वाटत नव्हते. फक्त त्याचे स्वरूप माहित नव्हते.. 
      बंगल्याच्या प्रवेशद्वारात येताचक्षणी त्यांना जाणीव झाली..एक बुजगावणे हलतडुलत त्यांच्या दिशेने येत होते.त्या निर्जीव बुजगावण्याला चालताना बघूनच एखाद्याच्या काळजाचा ठोका चुकला असता. पण पंत फक्त हसले, " एवढे सोपे स्वागत.. एका निर्बल आत्म्याला त्या बुजगावण्यात पाठवायचे?"
 पंतांनी मंत्र म्हणत हातातले गंगाजल त्यावर टाकताचक्षणी ते बुजगावणे निश्चल झाले. पण पंतांना थोडा शक्तीपात झाल्यासारखा वाटला. पंतांनी तिथेच स्वतःभोवती भस्माचे रिंगण केले आणि आत बसून ध्यान लावले. त्यानंतर त्यांना अमरची योजना कळून चुकली.. पंतच आले तर त्याचा डाव उधळायला येणार हे जाणूनच जणू त्याने हा उपाय केला होता. ते ज्या ज्या आत्म्याला सोडवतील तो आत्मा त्यांची जीवशक्ती शोषूनच मुक्त होऊ शकत होता. आपले मरण कसे आहे हे पंतांना कळून चुकले. पंतांनी क्षणभर आपले कुटुंबिय डोळ्यासमोर आणले, त्यांचे गुरूदेव स्वतः राधाच्या घरापासून, श्रीरंगासह सगळ्यांचे रक्षण करत होते. पंतांनी मनोमन त्यांना वंदन केले. आणि ते मृत्युच्या भेटीस निघाले.. अमरने जाणूनबुजून मध्येमध्ये अनेक रूपात आत्म्यांचा अडथळा ठेवला होता. त्या सगळ्यांना मुक्ती देऊन आत जाईपर्यंत पंतांचा प्रचंड शक्तीपात झाला होता. ते फक्त त्यांच्या मानसिक शक्तीनेच उभे होते..
        " मला वाटले नव्हते, तू इथपर्यंत पोहचू शकशील म्हणून.."अमर जणू त्यांची वाटच पहात होता.." पण तू आता काहीच करू शकणार नाहीस. माझी सगळी तयारी झाली आहे. काही क्षणातच योग्य वेळ येईल आणि ती येताच माझा विधी सुरू होईल.. आणि या भैरवनाथाच्या हातात सारी सत्ता येईल.."
    पंत काही बोलण्याच्या परिस्थितीत नव्हते. कसेबसे ते म्हणाले, " अमर अजूनही विचार कर. आपल्या श्रेष्ठ गुरूंना आठव, त्यांची शिकवण आठव आणि चांगल्या मार्गावर परत ये." पंतांना बोलताना कष्ट होत होते..
"गुरूंची शिकवण?" अमर जोरजोरात हसत म्हणाला, " गुरू? आपल्या प्रिय शिष्याला मरणाच्या दारात लोटणारे गुरू? गुरू हे असे असतात का? माझे गुरू बघ.. हो माझे गुरू अवनींद्रनाथ.. त्यांनी मला ,मला जी हवी ती विद्या शिकवली. मला शक्ती दिली.. आजही जो विधी तू बघणार आहेस ना आता मरणाआधी तो ही त्यांनीच शिकवला आहे मला. बारा वर्षातून एकदाच येणारी हि वेळ.. आणि मी होणार सर्वशक्तिमान... तुझ्याशी बोलण्यात मला माझा वेळ वाया घालवायचा नाही. तू बस... नाही मर इथेच.." असे म्हणून अमर स्नान करायला गेला. तिथे मोजकीच माणसे होती, पण कोणीही आपली जागा सोडत नव्हते , अमरची दहशत असावी, पंतांनी विचार केला.कोणीच पंतांकडे लक्ष देत नव्हते. प्रत्येक जण स्वतःसमोर ठेवलेल्या होमकुंडात काही काही वस्तू टाकत होते. त्याच्या वासावरून त्या रक्त, मांस, मद्य असावे असा पंतांनी अंदाज बांधला..कुठेतरी प्राण्यांच्या ओरडण्याचा आवाज येत होता. 'गुरूदेव दत्त' म्हणत पंतांनी डोळे मिटले आणि मिळालेल्या वेळात त्यांनी ध्यान करायला सुरुवात केली. अमरचा अंदाज बरोबर होता, पंतांच्या अंगात हलण्याचे सुद्धा त्राण नव्हते. ओलेत्याने येऊन अमरने विधीला सुरुवात केली. आजूबाजूला काळ्या सावल्या जमू लागल्या होत्या. सगळ्यांच्याच मंत्रोच्चाराने उच्च पातळी गाठली होती. अमरने एकदा पंतांकडे पाहिले, त्यांची काहीच हालचाल होत नाही हे पाहून गालात हसला. आता शेवटचे द्रव्य होमकुंडात टाकून प्राण्याचा बळी देणार इतक्यात पंतांनी डोळे उघडले आणि अंगातील सर्व शक्ती एकवटून आपल्या हातातील रूद्राक्षाची अंगठी काढली आणि नेम धरून अमर समोरील होमकुंडात टाकली. त्याबरोबर तिथे स्फोट होऊन सगळ उधळले गेले. पंतांनी मंत्र म्हणत उरलेले गंगाजल आणि अभिमंत्रित तांदूळ त्या काळ्या आकृत्यांवर टाकायला सुरुवात केली. जसजशा त्या आकृत्या नाहिशा होत होत्या , पंत अजूनच निष्प्रभ होत होते. हे सर्व पाहून अमर रागाने थयथयाट करायला लागला.
" काय मिळवलेस हे सगळे करून", असे म्हणत तो पंतांना मारायला गेला.
" नाही, तू तर आधीच मरायला टेकला आहेस, मी तुला नाही... तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या कुटुंबाला ठार करतो.. बघच तू.." 
अमरने तिथे असलेला एक पांढरा गोलक घेतला. त्याने काही मंत्र म्हटले, त्याबरोबर त्यात पंतांचे व राधेचे घर दिसायला लागले. क्रूरपणे हसत अमरने मंत्रोच्चार करायला सुरुवात केली त्याक्षणी तिथून एक वावटळ गेल्याचा भास झाला. डोळ्यात प्राण आणून पंत त्या गोलकाकडे पहात होते. अमरचे मंत्र सुरूच होते. पंतांच्या घराभोवती हळूहळू एक काळी छाया दिसायला लागली.. पंतांचा जीव खालीवर व्हायला लागला. ती छाया घरावर झेप घेणार इतक्यात तिथे गुरूदेवांचा 'अलख निरंजन' हा जाप ऐकू आला.. त्या गोलकात पंतांना आपले गुरूदेव दिसले ते त्या छायेला अडथळा निर्माण करत होते.. 
अमर आणि दामोदरपंत दोघेही ते द्वंद्व पहात होते.. एकाक्षणी असे वाटले कि ती छाया पंतांचे घर गिळंकृत करणार पण गुरूदेवांनी आपली झोळी उघडून त्या छायेला झोळीत बंदिस्त केले. त्याचक्षणी अमरचा गोलक फुटला आणि आपला हा हि वार वाया गेला हे अमरला जाणवले.." तू आणि तुझ्या गुरूने माझी एवढ्या वर्षांची मेहनत वाया घालवली.. मी सोडणार नाही तुम्हा कोणालाच.. सूड घेईन मी याचा.." अमर रागाने वेडापिसा झाला होता..
     पंतांच्या चेहर्‍यावर गुरूची आज्ञा पार पाडल्याचे समाधान होते त्याच समाधानात ते प्राण सोडणार इतक्यात अमरचे वाक्य त्यांच्या कानावर पडले, " तुझ्या घराण्याचा विनाश करीन.."
"गुरूदेव रक्षण करा माझ्या अक्षताचे.." हाच विचार करत पंतांचा प्राण गेला..
     अमरचा राग अजूनच वाढला होता.." मुक्ती देतोस ना आत्म्याला? बघू तुला कोण मुक्ती देतय ते.. तुझा देह असाच कसलेही अंत्यसंस्कार न करता असाच टाकून देणार.. मिळव मुक्ती.." अमरने पंतांचा मृतदेह त्या बंगल्यातल्या एका तळघरात ठेवायला सांगितला..
      इथे गुरूदेवांना दामोदरपंतांचे प्राण गेल्याचे कळले. पंतांच्या घराच्या आसपास सुरक्षिततेची सगळी व्यवस्था करून ते राधेकडे गेले. 'अलख निरंजन '
" गुरूदेव.." नमस्कार करत राधा म्हणाली.
" मी तुला आधीच कल्पना दिली होती. तुझे वडील आता या जगात नाही राहिले. हि बातमी तुलाच तुझ्या आईला आणि भावाला द्यायची आहे.."
"गुरूदेव तुम्ही नाही का असणार तिथे?" राधेने रडत रडत विचारले, "तेवढाच मला आणि आईला आधार मिळाला असता."
"नाही बेटा, अमरची योजना फिस्कटली आहे. मी त्याच्याकडे लक्ष ठेवणे जास्त गरजेचे आहे याक्षणी.. तुम्हा कोणालाच काही धोका नाही याची मला खात्री करून घ्यायची आहे. आणि हि परिस्थिती सांभाळण्यासाठी तू नक्कीच समर्थ आहेस.. जा तू आणि सगळे व्यवस्थित पार पाड... भगवान भला करे. " असे म्हणत पाणावलेल्या डोळ्यांनी गुरूदेव तिथून निघून गेले..
   आपल्या कुटुंबासहित राधा वडिलांची बातमी द्यायला माहेरी आली. जणू या बातमीची वाटच बघत असल्यासारखे तिच्या आईने प्राण सोडले. राधा आणि श्रीरंगपंत दोघांवरही दुःखाचा डोंगर कोसळला...




हि कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. फक्त मनोरंजनात्मक हेतूने लिहिण्यात आली आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात उद्देश नाही..

कथा कशी वाटली ते सांगायला विसरू नका...
 सारिका कंदलगांवकर 
दादर मुंबई

🎭 Series Post

View all