समर्थांची लेक भाग ८

Story Of A Lady Ghostbuster
समर्थांची लेक भाग ८


मागील भागात आपण पाहिले कि अक्षता एका ठिकाणी सहलीसाठी आली आहे आणि तिला तिथे कोणीतरी बोलवत असल्याचा भास होतो. पुढे बघूया काय होईल..


     अक्षताने हळूच दरवाजा ढकलला. किर्रर्र आवाज करत तो उघडला. आतमध्ये अंधार होता. अक्षताने मोबाईलचा टॉर्च चालू केला. तिथे एक मोठे तैलचित्र दिसत होते. तिथेच एका बाजूला एक कलश दिसत होता. कलशावर खूप गंडेदोरे बांधलेले दिसत होते. 
   "आलीस तू? सोडवशील का मला यातून?" परत एक आवाज आला.
     अक्षता धीटपणे म्हणाली, " हो मी नक्की प्रयत्न करीन. पण तुम्ही कोण आहात ते तर सांगाल कि नाही.."
    "मी?" कोणीतरी खिन्नपणे हसले, "कसे असते ना? आयुष्यभर स्वतःचे नाव प्रसिद्ध होण्यासाठी, मरणानंतर सुद्धा लोकांनी आपल्याला लक्षात ठेवावे अशी धडपड करणाऱ्याला त्याच्याच वाड्यात विचारले जात आहे , तुम्ही कोण? *मी मार्तंड... या वाड्याचा ..नाही या पंचक्रोशीतील प्रसिद्ध मांत्रिक* मृत्यू होऊ नये म्हणून मी अनेक विधी केले. तरिही मरण यायचे ते आलेच. आणि आता मी अडकून पडलो आहे असा या भूतयोनीत."
     " तुम्ही जर स्वतःच एवढे मोठे मांत्रिक आहात, मग माझ्या मदतीची तुम्हाला काय गरज?"
    परत एकदा खिन्नपणे हसण्याचा अक्षताला आवाज आला..." मोठा.. हा शब्द मोठा फसवा आहे.. याच मोठेपणाच्या हव्यासापोटी अनेक साधना केल्या. पण नशिबी काय आले..माझ्या समोर उभ रहायची हिंमत नसायची कोणाची. एवढा दरारा होता माझा."
    "ठिक आहे. मी प्रयत्न करीन तुम्हाला मदत करायचा. पण मी हे काहीच आधी एकटीने केले नाही. तुम्हाला माहीत असावे म्हणून. आणि तुम्हाला मी आल्याचे किंवा मीच तुम्हाला मदत करीन असे का वाटले."
    " हा जो वाडा आहे ना , तिथेच एकेकाळी माझी अर्चना चालायची. इथला कणनकण मी माझ्याशी बांधून घेतला आहे. ज्या क्षणी तुझ्या पायातील रक्त उंबरठ्याला लागले त्याच क्षणी ते माझ्यापर्यंत आले. तेव्हाच मला जाणीव झाली कि यातून मला सोडवणारे कोणीतरी आले आहे."
    "इतक्या वर्षात तुम्हाला कोणी सोडवायचा प्रयत्न नाही केला?"
   " आले ना काही जण..मूर्ख लेकाचे. 
पण त्यांना माझा कब्जा मिळवून माझ्या शक्ती हव्या होत्या. त्यासाठी मला गुलाम बनवायला निघाले होते. पण मी पण भैरवनाथांचा शिष्य आहे.. अशा कोणालाही त्या शक्ती देत नाही. पण तू इथे आलीस आणि आता वाटले तूच ती व्यक्ती. आहे तुझी तयारी त्या शक्ती घेण्याची?"
    अक्षता थोडी गोंधळली. जेमतेम १५,१६ वर्षांचे तिचे वय, त्यातूनही तिचे बाबा नसताना कोणताही आत्मा दिसण्याची तिची पहिलीच वेळ. आणि तो आत्माही शक्तीशाली मांत्रिकाचा, काही शक्ती देणारा.." पण त्या शक्ती तुम्ही मलाच का देणार? त्यातून तुम्हाला काय मिळणार?"
     " मला तुझ्याकडून काही नको. मी कालकेय पंथाचा आहे. या शक्ती तुला दिल्या कि मी आपोआप मुक्त होईन."
   " चालेल. मी तयार आहे त्या शक्ती घ्यायला. पण त्या काय आहेत ते तर सांगाल का?"
    " चालेल, म्हणाली आहेस.. आता काही झाले तरी त्या शक्ती तुझ्याकडे येणारच.. त्यातली पहिली शक्ती आहे, तू कोणत्याही आत्म्याला जेव्हा मदत करशील त्यातली काही शक्ती तुझ्यात येईल आणि दुसरी तुला जर कोणी पूर्ण जन्मवेळ सांगितली कि तुला त्याची मरणवेळ हि कळेल..आता सुरूवात कर माझ्या पाठून हे मंत्र म्हणायला.."
    अक्षताने थोड्या उत्सुकतेने त्या आवाजापाठोपाठ मंत्र म्हणायला सुरुवात केली.. एक वेगळीच ऊर्जा तिच्यामध्ये सळसळत असलेली तिला जाणवली..बाबांसोबत जेव्हा ती गेली होती तेव्हा आत्मा मुक्त होताना एखादी ज्योत आकाशात जाताना तिला दिसायची.. पण यावेळेस काहिशी काळसर पुसट ज्योत वरती जाताना आणि तशीच काहीशी आपल्या शरीरात गेल्यासारखी तिला जाणवली...
     अक्षताला वाटत होते कि तिथे ती एकटीच आहे.. पण मीत आणि सुपर्णा हे दोघेही लपून काय चालले आहे ते पहात होते..

       अक्षता घरी आली. पंत तिची वाटच बघत होते. तिला पाहिल्या पाहिल्या पंतांनी तिला विचारले, "बाळा झाले काम?
  यावेळेस पहिल्यांदाच अक्षता खाली मान घालून म्हणाली, " हो बाबा. मी केले."
  आणि पुढे एक शब्दही न बोलता घरात निघून गेली. ती ज्या दिशेने गेली त्या दिशेकडे पंत पहात राहिले. नकारार्थी मान हलवत स्वतःशीच पुटपुटले," असे नाही होऊ शकत. बाबांची भविष्यवाणी नाही चुकणार..."




   *भैरवनाथ* कालकेय पंथीयांची सर्वोच्च उपाधी... या पातळीपर्यंत पोचण्यासाठी खूप करावी लागणारी अर्चना, साधना आणि मेहनत.. त्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच तिथपर्यंत पोहचू शकत होते. असे असले तरिही त्यांचे समर्थक भरपूर होते. समाजातील सर्व थरांमध्ये ते पसरलेले होते. त्यांचे मुख्य पूजास्थान मात्र अजूनही काही निवडक लोकांनाच माहित होते. ते निवडक काही जण महिन्याच्या ठराविक दिवशी त्या जागी भेटून त्यांची तंत्रअर्चना करत असत. त्यांचे एक उद्दिष्ट होते, जगातील सर्व आत्म्यांना आपल्या ताब्यात घेऊन जगावर राज्य करणे.. त्या दृष्टीनेच त्यांची तयारी सुरू होती. सुरूवातीला फक्त एका विशिष्ट जागेपुरताच मर्यादित असलेला हा पंथ हळूहळू जगभर फोफावू लागला होता. त्यासाठी लागणारी सर्व आर्थिक मदत पंथाचे श्रीमंत समर्थक पुरवत होतेच. आणि सध्याच्या काळात प्रत्येकाला मोठे होण्यासाठी लागणारा शॉर्टकट हा पंथ पुरवत असल्याने पंथाची वाढ झपाट्याने होत होती. या पंथाचे मुख्य शत्रू होते श्रीरंगपंतांसारखी माणसे, जे त्या आत्म्यांना मुक्ती देत असत. त्यामुळे पंत कुटुंबिय आणि भैरवनाथ यांच्यामध्ये हाडवैर होते.  
         सध्याचा 'भैरवनाथ' होता 'कली' उर्फ 'अमर'.. त्याचे वय जरी सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान असले तरी दिसताना मात्र तो तीस ते चाळीसच्या दरम्यान असलेलाच वाटे..बाहेरच्या जगात तो एक प्रसिद्ध उद्योजक होता..पण त्याला खऱ्या रूपात ओळखणारे मात्र अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच होते...
        अमर आणि दामोदरपंत, अक्षताचे आजोबा हे दोघेही योगायोगाने एकाचवेळेस गुरुंकडे प्रशिक्षण घेत होते. दोघेही तोडीसतोड होते. त्यातही दामोदरपंतांचा ओढा भृगुसंहितेकडे होता तर अमरचा अथर्ववेदाकडे...
   "मुलांनो , प्रथमच दोघा शिष्यांना मी एकाच वेळेस प्रशिक्षण दिले आहे.. पण तुम्हा दोघांचीही तयारी पाहून मन खुश झाले.. दामोदर तुला तर तुझे काम माहितच आहे.. अमर तुला थोडे सांगायचे आहे.."
" आज्ञा गुरूदेव."
" आपला जो पंथ आहे, तो लोकांच्या कल्याणासाठीच आहे. अमर माझी इच्छा आहे कि तू सध्या दामोदरला मदत करावीस, नंतर तुला वेगळी जबाबदारी देण्यात येईल..."
"पण गुरूदेव, या आत्म्यांना मुक्तीच का द्यायची? त्यांच्या शक्तीचा वापर करून दुसरे काही नाही का करता येणार?"अमरने विचारले..
"अमर , काय बोलतो आहेस? अडचणीत सापडलेल्याला मदत करायची कि त्याचा गैरफायदा घ्यायचा? माफ करा गुरूदेव, मला राहावले नाही म्हणून मध्ये बोललो."
"चलता है... अमर तुला आता मी हे जे शिक्षण दिले आहे, ते एका उद्देशाने. त्याला अनुसरून तू वागावेस असे मला वाटते.."
"गुरूदेव, मला थोडा वेळ हवा आहे. माझी भारतभ्रमणाची इच्छा आहे. ती पूर्ण झाल्यावर मी दामोदरला मदत केली तर?"
" होनी को कौन टाल सकता है बेटा? जैसी महाराज कि इच्छा..."
गुरूदेवांची परवानगी घेऊन अमर विजयी मुद्रेने तिथून निघाला...
" दामोदर, तुझे काम आता वाढणार आहे."
" मी समजलो नाही गुरूदेव.."
" अमर तुला मदत करणे सोडच, पण तुला प्रत्येक ठिकाणी अडथळे निर्माण करण्याची शक्यता आहे.तुला याच्यावर जास्तीत जास्त लक्ष ठेवावे लागेल.. तुला चांगल्या लोकांना जवळ करावे लागेल.."
"जशी आज्ञा गुरूदेव.."


     त्या घटनेनंतर दामोदरपंतांचे काम दुहेरी वाढले. अमरची सतत खबर ठेवणे आणि आत्म्यांना मुक्ती देणे. काही वर्षे तर अमरचा काहीच पत्ता लागत नव्हता.. पण पंतांनी आशा सोडली नाही. त्यांची माणसे सतत त्याचा शोध घेतच होते. अचानक मध्येच त्याची माहिती कळली कि त्याने कालकेय पंथात सेवा करायला सुरुवात केली.. अमर वेगळा आहे, हा जरी त्यांना अंदाज आला होता, तरी तो विरूद्ध पंथात जाईल असे मात्र त्यांना वाटले नव्हते..त्याचवेळेस त्यांना कळले कि अमर एक मोठी अर्चना करणार आहे..ज्यात तो दुरात्म्यांना हाताशी धरून काही शक्ती प्राप्त करणार आहे. वेळही न दवडता पंत ध्यानाला बसले..
" बोल दामोदर.."
" गुरूजी तुम्हाला माहितच असेल, परत मी काय सांगणार. पण हे कसे थांबवू त्याचे तर तुम्ही मार्गदर्शन कराल का?"
" दामोदर, अमरला हे चांगलेच माहित आहे कि त्याचा प्रयत्न थोपविण्याची शक्ती सध्या फक्त तुझ्यातच आहे. त्यामुळे तो अनेक प्रकारे तुला अडकवण्याचा प्रयत्न करेल. तुझी तयारी आहे त्या सगळ्याला सामोरे जायची?"
" गुरूदेव, हा देह फक्त जनकल्याणासाठी आहे. तुम्ही म्हणाल तसे."
" तू तयारीला लाग. मी तुला वचन देतो, तुझ्या कुटुंबियांची काळजी घेण्याचे."
" गुरूदेव, हि आपली शेवटची भेट आहे?"
"असेच समज..."
 "मी श्रीरंगला काहीच सांगितले नाही, त्याला काहीच जास्त माहित नाही."
"ज्योतिषशास्त्र कोळून सुद्धा , एक गोष्ट तू विसरतोस दामोदर , आपण काहीच करत नाही, जे नियतीने लिहिलेले असते तेच होत असते.. तू किंवा मी ते बदलू शकत नाही.. आपण फक्त आपले कर्म करत राहायचे."
"जशी आज्ञा गुरूदेव..."




पुढील भागात आपण पाहू दामोदरपंत अमरची योजना उधळून लावतात कि अमर यशस्वी होतो ..


हि कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.. याचा उद्देश फक्त मनोरंजन हाच आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात हेतू नाही...


कथा कशी वाटली सांगायला विसरू नका...
सारिका कंदलगांवकर
 दादर मुंबई

🎭 Series Post

View all