Jan 23, 2022
नारीवादी

समर्थांची लेक भाग ६

Read Later
समर्थांची लेक भाग ६
समर्थांची लेक भाग ६


मागील भागात आपण पाहिले कि दोन गृहस्थांचा आत्यंतिक भितीने मृत्यू झालेली घटना पंत पेपरमध्ये वाचतात. आणि त्याची चौकशी करतात. पुढे काय होते ते वाचूया इथे..      अविनाशच्या घरून आल्यानंतर पंतांचे दोन,तीन दिवस फार अस्वस्थ गेले. पण नंतर गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांनी स्वतःला साधनेत गुंतवून घेतले.एक दिवस अक्षता पंतांजवळ येऊन म्हणाली ," बाबा आपण कधीच खोटे बोलत नाही, बरोबर?"
"अगदी बरोबर ".
"तुम्ही जेव्हा बाहेर जाल तेव्हा मला नेणार ,असं म्हणाला होतात, आठवतय ना?"
पंतांची थोडी द्विधा मनस्थिती झाली होती, एका बाजूला दिलेला शब्द दुसरीकडे अविनाशच्या वडिलांचे शब्द तो चिडला कि त्याच्या सारखा वाईट तोच हे सतत टोचत होते. अक्षताला काही अपाय होऊ नये हि इच्छा होती. अक्षताच्या पाठी उभे असलेल्या दामोदरपंतांची मान होकारार्थी हलताना दिसली आणि पंत अक्षताला म्हणाले, " चालेल, चल तू माझ्यासोबत. पण एक काम करायचे," त्यांनी खिशातून एक लहान रुद्राक्षांची माळ काढली आणि तिच्या हातात देत म्हणाले," आजपासून रोज दिवेलागणीनंतर जे काही श्लोक म्हणशील ते म्हणताना हि माळ हातात ठेवायची. आणि जमेल तेवढा वेळ जपही कर. पण हे सगळे करताना शाळेचा अभ्यास बुडवायचा नाही. कळले." 
" हो बाबा, कळले" असे म्हणत अक्षता आतमध्ये पळाली सुद्धा.
पंतांना वाटले होते तिचा उत्साह काही दिवसांतच संपेल, पण असे नाही झाले. रोज संध्याकाळी ती देवासमोर बसून सगळे श्लोक व्यवस्थित म्हणत असे. कधीतरी एखादा नवीन असे पण तो कोणी शिकवला हे विचारणे पंतांनी सोडून दिले होते.
        शेवटी पंतांनी ठरवलेली रात्र आली. पंतांनी अक्षताला उगाचच विचारले ," बघ विचार कर, घरी थांबलीस तरी चालेल."
"नाही, मी येणार म्हणजे येणार ", अक्षताचे हे बोलणे ऐकून मालतीताई न बोलता देवासमोर जाऊन बसल्या. आणि हे दोघे निघाले..
       आज पहिल्यांदाच पंतांनी आपली चारचाकी या कामासाठी बाहेर काढली होती. त्या ठिकाणी पोचताच पंतांनी अक्षताला ताकीद दिली, "जर काही चुकीचे घडताना दिसले तर इथून निघून जायचे. थांबायचे नाही." 
      पंत गाडीतून उतरून चालायला लागले. अक्षताचे त्यांच्याकडे लक्ष होतेच. हातात जपाची माळ होती. तोंडाने जप चालला होता. अचानक पंतांना आणि तिला एक माणूस पडलेला दिसला. तिची खात्री होती कि एका क्षणापूर्वी तो तिथे नव्हताच. तिने गाडीचा दरवाजा उघडला. पंत खाली वाकले. अक्षताने हातात माळ धरून पंतांच्या दिशेला पळायला सुरुवात केली. पंतांनी त्याला सरळ केले. त्याने डोळे उघडले, तो पंतांना हात लावणार इतक्यात अक्षता तिथे पोचली आणि तिने हातातली माळ पंतांच्या हातात दिली. त्या व्यक्तीला आता पंतांना हात लावणेही अशक्य झाले. त्याचा चेहरा अत्यंत क्रूर झाला. " बघतोच, तुला कोण आणि कसे वाचवतो माझ्यापासून?" त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले.
"पण मला कशाला कोण वाचवेल, मी सांभाळू शकतो स्वतःला," पंत मंद हसत म्हणाले. अक्षता हे सगळे पहात होती.
"तू नाही जाऊ शकणार इथून," तो परत म्हणाला.
" हो पण माझ्या मुलीला तर जाऊ देशील ना?" पंत मुद्दाम मुलगी या शब्दावर जोर देऊन म्हणाले..
"हो, ही माझी मुलगी आहे, जशी तुझी लहान मुलगी आहे ना तशीच.."
"माझी मुलगी.. माझे बाळ... हो मी तिच्यासाठी दागिने घेऊन निघालो होतो. पण त्यांनी नाही पोहचू दिले मला तिच्यापर्यंत.. मी नाही, मी नाही सोडणार तुला...."
" अविनाश, पण अरे मी तुझे काहीच घेतले नाही, उलट मी तुला काहीतरी द्यायला आलो आहे."
" तुला.... तुला माझे नाव कसे माहित.. आणि तू काय देणार मला.."
" अविनाश, मला सगळेच माहित आहे. काही गोष्टी तुला कळल्या नाहीत.. तू जी मुलगी म्हणतो आहेस ती आता थोडी मोठी झाली आहे..तुझे आईवडील, बायको तिची काळजी घेत आहेत. तुला पाहायचे आहे का तिला?" पंतांनी विचारले.
"माझी मुलगी? तुम्ही कसे दाखवणार तिला?"
  पंतांनी खिशातला फोटो काढला, त्याला दाखवला. आपले आईवडील, बायकोमुलगी हे पाहून त्याला भरून आले..
"मला नाही कळत हे काय चालू आहे?" तो रडवेल्या आवाजात म्हणाला..
" तुझे तुझ्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. पण ज्यांनी तुला त्यांच्यापासून लांब केले त्यांच्याबद्दल तुझ्या मनात इतका राग आहे कि तुझी या जागेतून सुटकाच नाही झाली. त्या सूडापायी तू तुझ्यासारख्याच बाकीच्या निष्पाप जिवांना मारायला लागलास." हे ऐकून त्याच्या चेहर्‍यावर दुःखी भाव आले. "मला सोडवा यातून, मी दुष्ट नाही आहे. मला नाही कोणाला त्याच्या मुलापासून दूर करायला आवडत. पण माझी घटना आठवली कि माझा नाईलाज होतो. सोडवा मला यातून, मुक्ती द्या मला."
" नक्की?"
" हो, पण माझ्यानंतर माझ्या कुटुंबियांचे...." वाक्य अर्धवट टाकून तो खिन्न झाला.
" मी घेईन तुझ्या कुटुंबाची काळजी, तुझ्या मुलीला नीट सांभाळीन.. मग तर झाले."
" कसे उपकार मानू मी तुमचे? खरेच सोडवा मला या पाशातून ", तो हात जोडून म्हणाला.
 पंतांनी त्यांच्या पिशवीतून अभिमंत्रित तांदूळ आणि गंगाजल काढले आणि मंत्रपठण करीत त्याच्या अंगावर टाकले. पंतांना नमस्कार करत त्याची आकृती वर जाताना दोघांनाही दिसली..
   "चला आता , जायचे घरी? " पंतांनी अक्षताला विचारले. ती अजूनही ती आकृती गेली त्या दिशेने पहात होती.
" बाबा, तुम्ही खरेच त्या कुटुंबाला आपल्या घरी आणणार?" अक्षताने विचारले.
" बाळा, आपण कधीच दिलेला शब्द मोडत नाही. चला घरी जाऊ, खूप उशीर होतो आहे."
दोघेही घरी आले. मालतीताई देवाजवळ बसून होत्या. या दोघांना सुखरूप पाहून त्यांना हायसे वाटले.
" आई मी बाबांची मदत केली," अक्षता आईच्या गळ्यात हात टाकत म्हणाली.
"अंहं, आधी हातपाय धुवून घ्या, नंतर अंथरूणात पडून बोलू".
पण ह्या सगळ्या दगदगीने ती एवढी दमली होती कि अंथरुणावर पडल्या पडल्या तिला झोप लागली. ती झोपल्याचे पाहून पंतांनी मालतीताईंना झालेला प्रकार सांगितला."तुला चालेल का मी त्यांची शेतात काही सोय लावून दिली तर?"
" शेतात देण्यापेक्षा, आपल्या बाजूचे जे रिकामे घर आहे, तिथे बघा. ते इथे मंदिरात पण वरकाम करू शकतात आणि त्या बाईंची तयारी असेल तर तुम्ही त्यांच्यावर मंदिर, शेती यांचा जमाखर्च बघण्याचे काम पण सोपवू शकता. नाहीतरी गोविंदकाका मला जमत नाही , असे कितीतरी दिवस सांगत आहेच कि.."
" ठिक आहे. मी उद्याच पाटलांना विचारतो आणि बघतो."
    अशा प्रकारे अविनाशचे कुटुंब पंतांचे शेजारी झाले. अविनाशची बायको संगीता हि तर मालतीताईंना मोठ्या बहिणीसारखी वागवायची. अक्षताला नवीन आजीआजोबा आणि खेळायला छोट्या रियाचे खेळणे मिळाले.. 
       असेच दिवस जात गेले. पंतांची कामे वाढायला लागली. कधी कधी तर त्यांना बाहेरगावी सुद्धा जावे लागे. जिथे जिथे शक्य असेल तिथे ते अक्षताला नेहमीच नेत असत. काहीच वेगळे न शिकवता फक्त निरीक्षणातून तिचे प्रशिक्षण चालू होते.एका बाजूला तिची शाळा सुद्धा सुरू होती. त्यातच एकदा शाळेत नोटीस आली कि शाळेची सहल जाणार होती चार दिवस. ती हि एका ऐतिहासिक स्थळी. ऐतिहासिक स्थळे म्हणजे अक्षताची आवडती जागा. त्यामुळे घरी आल्या आल्या तिची या दोघांच्या पाठी भुणभुण सुरू झाली. 
" प्लीज, आमच्या वर्गातील सगळेच जण सहलीला जाणार आहेत. मलाही जाऊ द्या ना. मी अजिबात मस्ती करणार नाही. इथे तिथे भटकणार नाही."
 तिला परवानगी द्यायला तशी हरकत नव्हती. पण आजपर्यंत पंतांनी आणि मालतीताईंनी तिला कधीच एकटीला पाठवले नव्हते म्हणून थोडीशी काळजी वाटत होती.
" बरे, जा तू. पण जाताना तुझी जपाची माळ, गंगाजलाची छोटी बाटली, भस्म आणि थोडे तांदूळ न्यायला विसरू नकोस. ते नेहमीच तुझ्या जवळच ठेव."
"नक्की बाबा.. थॅंक यू दोघांनाही..."
      आणि अक्षता सहलीला निघाली. आपल्याच वयाची असणारी मुले, त्यांची बसमध्ये चालणारी धमाल हे सगळे ती मनात साठवून घेत होती. शेवटी एकदाचे ते सहलीच्या ठिकाणी पोचले. तिथे त्यांची सोय एका जुन्या वाड्यात केली होती. 
      अक्षताची सहल आपल्यासारख्या सामान्यजणांसारखी होणार कि तिच्या सारखी वेगळीच होणार...हे पाहूया पुढच्या भागात..


हि कथा पूर्ण पणे काल्पनिक आहे. निव्वळ मनोरंजन हाच हेतू आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात उद्देश नाही..

कथा कशी वाटली हे सांगायला अजिबात विसरू नका.
सारिका कंदलगांवकर 
दादर मुंबई
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now