Jan 26, 2022
नारीवादी

समर्थांची लेक भाग ५

Read Later
समर्थांची लेक भाग ५
समर्थांची लेक भाग ५

मागच्या भागात आपण पाहिली समर्थांनी मुंजा आणि सुभानरावाला दिलेली मुक्ती. आता पुढे पाहू अक्षताला ते सोबत नेतात कि नाही.अंधारी रात्र, सुनसान रस्ता आणि रस्त्याने चालणारे ते दोघे.खरेतर रोज स्टेशनवरून घरी जाताना रिक्षा तरी मिळते. आज एकही रिक्षा नव्हती.. सगळे कसे शांत शांत होते. तसे पाहिले तर हा बर्‍यापैकी रहदारीचा रस्ता. पण एकही वाहन नव्हते. आजूबाजूची झाडी जी इतर वेळेस निसर्ग सौंदर्य म्हणून पाहायला मजा यायची आज तिथे कसले कसले गूढ आकार दिसत होते. त्या दोघांचाही अनामिक भितीने थरकाप उडत होता. पण एकमेकांकडे कबूल करायची लाज वाटत होती. असेच थोडे अंतर गेले कि आलेच आपले घर. दोघेही एकाच सोसायटीत राहणारे, ऑफिस पण एकाच भागात, वेळ पण पुढे मागे असणारी. त्यामुळे येताजाता झालेल्या सोबतीची सवय. त्यातून आज दोघांच्याही ग्रुपने मिळून ठेवलेली छोटीशी पार्टी.
यांनी जास्त नाही पण थोडी घेतलीच होती. त्यातच कोणाच्या तरी घरून फोन आला होता. आज घरी यायला उशीर करू नका. आज अमावस्या आहे. तेव्हा हि गोष्ट हसण्यावारी नेली. पण आता जेव्हा रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते तेव्हा प्रकर्षाने जाणवत होती. अशीच काही पाउले गेल्यावर त्यांना \"तो\" तिथे पडलेला दिसला. तो अशाप्रकारे पडला होता कि मनात संशय येत होता तो एकतर दारू पिऊन पडला आहे किंवा त्याला मदतीची गरज आहे.
"काय करायचे?"
"एक काम करू, जवळ जाऊ, दारूचा वास आला तर सोडून देऊ. नाहीतर पोलिसांना फोन करुन सांगू."
" पण आपल्याला वास येईल का?" पहिल्याची शंका.
दुसर्‍याने त्याला टपली मारली "आपण चढेपर्यंत नाही घेतली" असे म्हणून तो त्याच्याजवळ गेला. त्याने त्याला सरळ केले," तुम्हाला काही मदत हवी आहे का?" असे विचारले.
तो काहीच बोलेना हे पाहून पहिला पण त्याच्याजवळ आला. ते आपल्या सॅकमधून पाणी काढणार इतक्यात त्याने डोळे उघडले आणि क्रूरपणे हसला. ते दोघे ते बघून पळायला सुरुवात करणार इतक्यात त्याने त्यांचा हात धरला. त्या थंडगार स्पर्शाने दोघांचीही बोबडी वळली.....
काही वेळाने गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या गाडीला रस्त्यावर पडलेले दोन मृतदेह दिसले. आत्यंतिक भितीने मृत्यू झाल्याचे निदान झाले. पण त्या रस्त्यावर भयदायक काय होते हे कोणालाच सांगता आले नाही.

झोपाळ्यावर बसलेल्या पंतांनी वर्तमानपत्र बंद केले. मनाशी थोडा विचार केला आणि बाजूला ठेवलेली काही जुनी वर्तमानपत्र काढली. त्यात हवी असलेली बातमी शोधायला लागले. गेल्या वर्षभरात त्याच रस्त्यावर महिन्यातून एक दोन तरी बळी जात होते. काय कारण असावे या मागचे, पंत विचार करत होते. मृत्यूचे निदानही सारखेच , आत्यंतिक भितीने. इथे लवकरात लवकर काहीतरी केलेच पाहिजे पंतांनी मनाशी ठरवले. याचाच एक भाग म्हणून पंत त्या विभागातील पोलीस ठाण्यात गेले. दत्तमंदिरामुळे पंत बरेचसे प्रसिद्ध होते त्यामुळेच त्यांचे अगदी स्वागत झाले नाही तरिही त्यांना काय हवे नको ते पाहायला एक हवालदार पुढे आले.
" नमस्कार पंत, आज अचानक इथे येणे केलेत?"
" मला थोडी मदत हवी होती."
" बोला ना , जी हवी ती मदत करू".
"मला काल झालेल्या त्या दोन मृतदेहांची माहिती हवी होती."
"पंत त्या बद्दल मी जास्त नाही सांगू शकत, तुम्ही साहेबांशी बोलून घ्याल का? मी आत्ता विचारून येतो त्यांच्याकडे वेळ आहे का?"
"ठिक आहे. मी थांबतो इथे."
थोड्याच वेळात हवालदार पंतांना घेऊन जायला आले.
" बसा ना तुम्ही."
" धन्यवाद ", पंत खाली बसत म्हणाले.
" हवालदार म्हणाले, तुम्हाला कालच्या मृत्यूबद्दल माहिती हवी होती. पण आम्हाला अशी माहिती कोणालाही देता येत नाही. हे तुम्हाला माहीत असेलच. "
" हो, पण जर तुम्हाला ते सांगता आले तर फार बरे होईल. " पंत त्यांच्या डोळ्यात पहात म्हणाले. त्यांच्या स्वरातला सच्चेपणा बहुतेक त्या साहेबांच्या मनाला भिडला असावा..
" विचारा तुम्ही. कायद्याच्या चौकटीत राहून जेवढी जमेल तेवढी मदत मी करीन."
"मी वर्तमानपत्रात त्याच ठिकाणी काही मृत्यु झाले आहेत असे वाचले. त्याची माहिती मिळू शकेल का? तिथेच आधी कोणाचा खून वगैरे झाला होता का?" पंतांनी विचारले.
"हो, मला नीट आठवत आहे. मी नुकताच इथे बदलून आलो होतो आणि त्या तरूणाच्या खुनाची केस आली होती. त्याची बायको अगदी दोन महिन्याच्या मुलीला घेऊन रोज पोलीस ठाण्यात येत होती म्हणून मला ती खूप ठळकपणे आठवते."
"त्याचा मृत्यु कसा झाला सांगू शकाल?
" एका साध्या लूटमारीत त्याचा खून झाला. बहुतेक ते लुटारू त्याला लुटायचा प्रयत्न करत होते. त्या झटापटीत त्याचा मृत्यु झाला. आणि आश्चर्याची गोष्ट ही कि हि जी काही मृत्युंची मालिका सुरू झाली ती त्यानंतरच.. आणि पहिले बळी होते ते संशयित आरोपी. पुराव्यांअभावी आम्ही त्यांना अटक करू शकलो नव्हतो."
"तुम्ही त्या तरूणाचा पत्ता देऊ शकाल का?"
" हो का नाही. हे घ्या. तुम्ही वयाने माझ्या एवढेच दिसत आहात. पण तरिही तुम्हाला मनापासून नमस्कार करण्याची इच्छा होत आहे. या गणवेषाची मर्यादा नसती तर नक्कीच केला असता. यापुढे कसलीही मदत लागली तर निसंकोचपणे सरळ माझ्याकडे या. हे माझे कार्ड घ्या.."
कार्ड हातात घेत पंत हसले आणि \"गुरूदेव दत्त \"म्हणत त्या अज्ञात तरूणाच्या घरी निघाले. पत्ता जवळचाच होता. ते ही मुद्दामच
चालत निघाले कोणतीही गोष्ट नजरेआड होऊ नये म्हणून.
काही मिनिटातच त्यांना तो पत्ता सापडला. त्या घराचा दरवाजा बंद होता. पंतांनी दार वाजवले.
"कोण आहे?",आतून एक क्षीणसा आवाज आला.
"मी श्रीरंगपंत, आत येऊ का?"
" दरवाजा लोटलेलाच आहे. या आत."
आत जाताच पंतांना दिसले, एक वृद्ध जोडपे. त्यांच्या बाजूला एक कृश मुलगी होती. तो वृद्ध तिला खेळवत होता आणि ती वृद्धा तिला काहीतरी भरवत होती.
" हे अविनाशचेच घर आहे ना? पंतांनी विचारले.
ते नाव ऐकताच त्या वृद्धेला हुंदका फुटला.
"हो त्याचेच घर आहे. पण तो कधीचाच आम्हाला सोडून गेला. आता तुमचे त्याच्याकडे काय काम होते?" थरथरत्या आवाजात तो वृद्ध म्हणाला.
" मला तो कसा होता हे जाणून घ्यायचे होते. त्याचा स्वभाव, सगळे काही."
" तसा तो खूप चांगला होता, खूप प्रेम करायचा आमच्या सगळ्यांवर. पण चिडला कि त्याच्या सारखा वाईट तोच. पण आमचे सगळे छान चालले होते. नुकतीच ही पोर जन्माला आली होती. काय करू काय नको, असे झाले होते त्याला. तिच्याचसाठी चांदीचे पैंजण आणि सोन्याची साखळी घेऊन येत होता. निघताना तसे फोन करून सांगितले होते. पण रस्त्यात कोणत्या दोन चोरांनी अडवले बहुतेक त्याला. त्यांच्याशी त्याची झटापट झाली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. त्या चोरांनी पैशापायी जीव घेतला हो त्याचा, फक्त त्याचाच नाही आमच्या सर्वांचाच... फक्त या पोरीसाठी जगतो आहोत आम्ही. पण तिला ना बापाचे प्रेम ना आईचा सहवास मिळतो. आमची सून सकाळी घराबाहेर पडते ते थेट रात्री येते. फक्त एक दिवस दिसणार्‍या आईला ती पोर तरी काय ओळखणार? अहो त्याचा ह्या पोरीवर एवढा जीव कि मरताना सुद्धा मुठीत तिचा फोटो होता. त्याच्या गळ्यात पेंडण्ट म्हणून सुनेने घातलेला. हातावर भली मोठी जखम होती."
हे ऐकून पंतांचा जीव कळवळला, "जे झाले ते झाले, पण आता इथून पुढे तुमचे सगळे चांगलेच होणार, विश्वास ठेवा माझ्यावर, फक्त मला तुमचा एखादा फोटो देता आला तर बघा." आणि पंत तिथून निघाले.

पुढच्या भागात पाहू अविनाशचे नक्की काय होते ते..
हि कथा पूर्ण पणे काल्पनिक आहे. निव्वळ मनोरंजन हाच हेतू आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात उद्देश नाही..
कथा कशी वाटली, हे सांगायला विसरू नका.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now