Jan 26, 2022
नारीवादी

समर्थांची लेक भाग ४

Read Later
समर्थांची लेक भाग ४
समर्थांची लेक भाग ४

मागच्या भागात आपण पाहिले कि पंत त्या ओसाड जागेची माहिती मिळवायला जातात.आता बघूया तिथे नक्की कोण आहे मुंजा कि सुभानराव.."हो जा शुरू" हे आपल्या गुरूचे आश्वासक शब्द कानावर आल्यावर पंतांचा चेहरा उजळला. त्यांनी डोळे मिटून गुरूंचे स्मरण केले. आपल्यावर रोखलेले डोळे त्यांना जाणवत होते. आपल्या खांद्याला असलेल्या पिशवीतून दोन गोष्टी काढल्या एक नुकताच विकत घेतलेला रंगीत चेंडू आणि दुसरी सोन्याची नेहमी सोबत ठेवत असलेली सोन्याची मोहर. अचानक कुठूनतरी खूप सारे साप त्या चेंडूपाशी गोळा झाले. ती मोहर अशीच धूळ खात पडली होती. पंत स्वतःशीच हसले. ती मोहर उचलून त्यांनी परत पिशवीत ठेवायचा प्रयत्न केला, थोडी जड झाली होती. पण उचलता आली,\" हे ही आहे का?\" त्यांनी मनात विचार केला.
" बाळा, आहेस का तू इथे?" पंतांनी प्रेमळ आवाजात साद घातली. अचानक समोरच्या झुडपात खूप हालचाल झाली. "मी तुला मदत करायला आलो आहे. येतोस का बाहेर?" पंतांनी परत आवाज दिला. हळू हळू समोर एक लहान आकृती दिसायला लागली. " तुम्ही कोण आहात? तुम्ही कसली मदत करणार मला?" ती आकृती बोलायला लागली." हा चेंडू माझ्यासाठी आहे?"
"हो तुझ्याचसाठी आहे. मदत म्हणशील तर तू हा जो काही इथे अडकला आहेस ना तिथून मी तुला सोडवून पुढे पाठवणार."
"नाही तुम्ही पण खोटे बोलाल, त्या त्या माणसाने पण असेच खोटे बोलून मला फसवले."
" तो काय खोटे बोलला ते सांगशील?"
" हो" त्या बाल आकृतीचा निरागस आवाज आला. त्याने सांगायला सुरुवात केली.
मी ना त्या खूप दूरच्या गावात रहात होतो. घरी आईबाबा , आजी आजोबा, ताई सगळे एकत्र रहात होतो. माझी ना मुंज होणार होती. माझे खूप लाड चालू होते. मुंजीला दोनच दिवस बाकी होते, मी माझ्या मित्रांसोबत खेळत होतो. एक माणूस माझ्याकडे आला ,आणि म्हणाला ,"अरे तू इथे आहेस का? तुझ्या घरचे तुला शोधत आहेत. मला पाठवले आहे तुला घ्यायला. आपल्या सगळ्यांनाच मुंबईला जायचे आहे."
" पण तुम्ही कोण ? मी तर तुम्हाला कधीच पाहिले नाही. आणि अचानक का जायचे आहे?"
"अरे, असे काय करतोस? त्या दिवशी मी घरी आलो होतो ना तुझ्या. तुझ्या मुंबईच्या आत्याचा दिर. कोणीतरी तिथे म्हणाले कि मुंबईला जाऊन तुझ्यासाठी दागिना करायचा आहे."

सध्या घरात एवढी माणसे येत होती ना कि मला काहीच आठवत नव्हते. पण मुंबईची आत्या हे माहित होते. म्हणून मी माझ्या मित्रांना सांगून निघालो. पण तो दुसर्‍याच रस्त्याने निघाला. मी त्याला सांगितले सुद्धा. पण तो म्हणाला कि हा मुंबईचा रस्ता आहे. आपल्याला सर्व्हिस मोटार पकडायची आहे. घरातले सगळे तिथे गेले आहेत. मलाही मोटारीत बसायचे होतेच. मी निघालो त्याच्या सोबत. तिथे मोटार होती पण आईबाबा नव्हते. कोणीतरी वेगळी माणसे होती. त्यांनी माझ्या तोंडावर रुमाल ठेवला. मी जेव्हा जागा झालो तेव्हा समोर एक होमकुंड पेटवले होते. आणि मला पुढचे काहिच आठवत नाही. नंतर मला आठवत आहे तसा मी इथेच आहे. इथे मला हे मित्रही मिळाले आहेत. आम्ही मस्त खेळत असतो. पण दुसर्‍या कोणाला इथे घेत नाही.
ते सगळे मला त्या दुष्ट माणसासारखे दिसतात.
"पण मग त्या माणसांचे काय झाले?" पंतांनी विचारले.
"त्यांना मी हकलले इथून," ती आकृती हसत म्हणाली जणू ते सगळे तिला परत आठवत होते." मी ना, त्यांच्या अंगावर थंडगार पाणी ओतायचो, त्यांनी भरपूर कुंकू आणले होते तेच ते जेवायला लागले कि त्यात टाकायचो. पळून गेले ते भूत भूत म्हणत. "आणि तो सुभानराव ? आणि सोबत एक तांत्रिक पण होता ना?"
"होते ना. सतत मला धन दाखव, धन दाखव म्हणत होते. मग मी त्यांना एक जागा दाखवली. त्यांनी खणायला सुरुवात केली. त्या तांत्रिकाला काही तरी संशय आला म्हणून तो पळाला. पण तो सुभानराव नाही. तो खणतच राहिला. पण तिथे धन नाही निघाले तिथे निघाले फक्त साप. तो ही एक दिवस बेशुद्ध झाला आणि तिथे जाऊन लपला.मग आम्ही त्याला कोंडून ठेवले तिथे."
" तिथे कुठे?"
"त्या विहिरीच्या इथे."
"अच्छा. बरे मला सांग, तुला अजून किती दिवस इथे राहायचे आहे? तुला नाही का वाटत इथून निघून जावे. हे सगळे सोडून मुक्त व्हावे."
" मुक्त म्हणजे काय?" एक क्षणभर पंतांना त्या अश्राप जीवाची दया आली, स्वतःची काहीच चूक नसताना त्याला या फेऱ्यात अडकायला लागले होते. तेवढाच राग त्यांना त्या सुभानरावाचा आला. आपल्या वेडापायी त्याने त्या मुलाला हे सगळे भोगायला लावले होते. "स्वतःला अलिप्त ठेव. आजच तुझी सुरुवात झाली आहे, असे प्रत्येकाच्या रागलोभात तू गुंतत गेलास तर कसे होणार तुझे." परत गुरूंचा आवाज आला. "कसे अलिप्त ठेवू महाराज यातून स्वतःला?" पंतांचे मन आक्रंदले.
"मुक्ती , म्हणजे हे सगळे सोडून ईश्वर चरणी जायचे."
" का? कशासाठी? मला नाही कुठे जायचे. इथे माझे सगळे मित्र आहेत. आम्हाला हवे तेव्हा आम्ही खेळतो. मस्ती करतो. इथे कोणाला कोणालाच येउ देत नाही. तुम्ही सुद्धा जा आता इथून." आणि ती आकृती वळली.
"थांब," पंत म्हणाले.
तो कितीही काही म्हणाला तरिही त्याला गती तर द्यायचीच होती.
"थांबवून तर पहा" तो खदखदून हसायला लागला.
तो थांबला तर नाहीच, पण पंतांच्या आसपास भरपूर साप गोळा झाले.
पंतांनी स्वतःभोवती वेळ न दवडता भस्माचे रिंगण काढले. आणि पिशवीतले मूठभर तांदूळ काढून ते
अभिमंत्रित केले. ते त्या सापांवर टाकताच साप तिथून गायब झाले. हे पाहून तो थांबला. पंतांनी पिशवीतले गंगाजल काढून त्याच्यावर शिंपडायला सुरुवात केली. ती आकृती फक्त नाही नाही म्हणत होती. तिथे वावटळ उठल्यासारखी झाली होती. नुसती धूळ, सुकलेली पाने इथून तिथे उडत होती. यात पंत शांतपणे मंत्र म्हणत उभे होते.
ते अजून काही करणार इतक्यात त्यांचे गुरूदेवच तिथे आले. त्यांनी पुढे जाऊन त्या छोट्या आकृतीच्या डोक्यावर हात ठेवला न ठेवला तिथे एक सोनेरी ज्योत आली आणि गुरूदेवांमध्ये सामावून गेली. गुरूजी पंतांकडे वळले, म्हणाले "त्या सुभानरावांबद्दल राग नको ठेवूस, त्याला आधीच त्याच्या दुष्कृत्याची शिक्षा मिळाली आहे. जा सोडव त्याला."
पंत काही न बोलता विहिरीच्या दिशेने गेले. खांद्यावरची मोहर हळू हळू जड व्हायला लागली. तिथेच त्यांना मातीचा ढिगारा दिसला. तो बाजूला केल्यावर तिथे एक पेटी होती ,त्या पेटीत सोनेनाणे होते. पंतांनी हातात गंगाजल घेतले आणि मंत्र म्हणायला सुरुवात केली. ते गंगाजल त्या पेटीवर टाकून म्हणाले, " सुभानराव तुझ्या एका मूर्खपणामुळे तू स्वतःही त्रास भोगतो आहेस आणि त्या मुलालाही भोगायला लावलास. खरेतर तू या पात्र नाहीस, तरिही मी तुला एक संधी देतो मुक्त होण्याची. आता तरी या धनाची हाव सोड." हे म्हणताच खांद्यावरची मोहर हलकी झालेली त्यांना जाणवली , समोरची पेटी माती होऊन गेली. सुभानरावाला मुक्ती मिळाली हे त्यांना कळाले.
त्यांच्या खांद्यावर हात ठेवून गुरुदेव म्हणाले, " जा थेट घरी जा आता, थकला असशील, मी भेटीन तुला लवकरच.."
तोपर्यंत त्या जागेच्या बाहेर गावचे सरपंच, पाटील , गुरूजी अशी काही मंडळी जमली होती.
"तुमचे काम पूर्ण झाले आहे. काही दिवसातच पूजा करून ती जागा वापरायला सुरुवात करा. आणि आता परत कोणत्याही जीवावर तुमच्याकडून अन्याय होणार नाही याची काळजी घ्या," एवढे बोलून पंत तिथून कोणालाही बोलायची सुद्धा संधी न देता निघाले.
थकलेले पंत घरी आले. मालतीताई आणि अक्षता वाटच पहात होत्या त्यांची. काही न बोलता पंत न्हाणीघरात गेले. शुचिर्भूत होऊन, देवाला नमस्कार करून बाहेर आले तर झोपाळ्यावर बसलेले दामोदरपंत त्यांना दिसले, बाजूलाच आई उभी होती. दोघेही आनंदात दिसत होते.
"शेवटी तू आमचा वसा पुढे चालू ठेवलास," असे म्हणून ते दिसेनासे झाले.
तेवढ्यात पाठून धावत येऊन अक्षता म्हणाली ," बाबा आज तुम्ही एकटे गेलात, पुढच्या वेळेस मला नेणार ना?
पुढच्या भागात बघूया पंत अक्षताला मोहिमेसाठी स्वतःसोबत नेतात का?


हि कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. याचा अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात हेतू नाही. निखळ मनोरंजन हाच हेतू आहे.कथा कशी वाटली ते सांगायला विसरू नका..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now