Jan 26, 2022
नारीवादी

समर्थांची लेक भाग ३

Read Later
समर्थांची लेक भाग ३
समर्थांची लेक भाग ३

 मागील भागात आपण पाहिले कि अक्षताचे बाबा श्रीरंगपंत आपल्या वडिलांचे काम सुरू ठेवणार आहेत. बाजूच्या गावातील लोक त्यांच्या इथे असलेल्या मुंज्याची अडचण घेऊन पंतांकडे येतात.. आता पुढे पाहू..
   "नमस्कार पंत", दुसर्‍या गावचे सरपंच म्हणाले.त्यांनी आपल्या सोबत आलेल्या माणसांची ओळख करून दिली.
  " जय गुरुदेव, बोला सरपंच." 
  " पंत ताकाला जाऊन भांडे का लपवू? तुम्ही आमच्या गावांबद्दल ऐकले आहे कि नाही माहित नाही. आमच्या गावात एक नवीन कारखाना उभारण्याचा विचार सुरू आहे. तशी योग्य जागा आहे, पाणी आहे. सगळेच आहे." बोलता बोलता सरपंच मध्येच थांबले आणि त्यांनी पाटलांना बोलायचा इशारा केला.
ते ओळखून पाटलांनी सुरूवात केली, " त्याचे काय आहे पंत , ती जागा ओसाड आहे. इतके वर्ष कोणालाच गरज पडली नाही. त्यातून गावात असलेल्या वेगवेगळ्या वावड्या.पण आता हि चांगली चालत आलेली संधी सोडवत नाहीये. बर्‍याच लोकांना रोजगार उपलब्ध होईल."
"हो , पण मी इथे काय करू शकणार आहे?" पंतांनी विचारले.
"तुम्हीच आमची मदत करू शकता. तुमच्या वडिलांनी सुद्धा अनेकजणांची मदत केली आहे. कृष्णजन्माच्या वेळी तुम्ही काय केले ते आम्ही ऐकले आहे. तुम्हीच सोडवा आता आम्हाला यातून."
" हो पण, कसे ते तर सांगा?"
 "ती जी जागा आहे, तिथे एक पडके घर आहे. घराच्या आसपास एक विहीर आहे. आधीच्या लोकांना वाईट अनुभव आले असावेत कदाचित म्हणूनच तिथे कोणीच फिरकत नव्हते. तसेही आमचे गाव बरेच मोठे आहे आणि नवीन पिढी थेट शहरात जात असल्यामुळे आम्हाला कोणालाच त्या जागेची गरज भासली नाही. आता त्या कंपनीला या जागेबद्दल कसे कळले ते आम्हाला माहीत नाही. पण एके दिवशी त्या कंपनीचे काही अधिकारी पंचायतकार्यालयात चौकशीसाठी आले. आम्हाला सुद्धा तिथे जाण्याची उत्सुकता होती म्हणून आम्ही दहापंधरा जण त्यांच्या सोबत निघालो. पण त्या जागेत प्रवेश केल्याबरोबर काहीतरी वेगळे असल्याची जाणीव झाली. अक्षरशः जंगल माजले होते सगळीकडे, मधूनच येणारे घुबडाचे आवाज. गाडी सुद्धा जाऊ शकत नव्हती. शेवटी पायी निघालो. काहीच अंतर चालून गेलो असू पण सतत कोणी तरी मागे मागे येत आहे असे वाटत होते. आम्ही सगळे घाबरलो. परत यायला निघालो पण ते शहरी अधिकारी काही ऐकेना. तेवढ्यात तिथे साप, साळिंदर असे काही काही प्राणी येताना दिसले. आम्ही परत फिरलो पण ते अधिकारी तोपर्यंत त्या विहिरीपाशी पोचले होते. आता डोळ्यासमोर होते आणि दुसर्‍याच क्षणी विहिरीतल्या पाण्यात. वाचवा वाचवा असे ओरडायला लागले. कसेबसे जीवावर उदार होऊन तिथपर्यंत पोचलो तर ते दोघेही पाण्यावर तरंगत होते आणि कोणीतरी त्यांच्या अंगावर पाणी उडवत होते. तुम्हाला सांगतो पंत अख्खया आयुष्यात हे सगळे पहिल्यांदा पाहिले. त्या दोघांना पटकन बाहेर काढले आणि पळत सुटलो. पाठीमागून ते साप , साळिंदर सगळे येत होते. आणि लहान मुल जसे हसते तसा हसण्याचा आवाज येत होता."
सरपंचा सूत्रे परत आपल्या हाती घेत म्हणाले," अजूनही तो आवाज कानात घुमत आहे. काही दिवसानंतर त्या कंपनीचे पत्र आले कि तुम्ही ती जागा सर्व प्रकारे मोकळी करून दिली तरच तिथे कारखाना उभा राहिल."
"पण आमची अडचण वेगळीच आहे. हि घटना ऐकून गावातील काही अती उत्साही तरूण तिथे जायला लागले आहेत. तिथे जाऊन हातपाय मोडून घेतले आहेत. काही नुसते वेड्यासारखे करत आहेत. आम्हाला त्यांची जास्त काळजी वाटत आहे."
"तुम्हीच आता यातून सोडवू शकाल." सगळे गावकरी उठून हात जोडून पंतांना विनंती करत म्हणाले. 
      हे सगळे बोलणे अक्षता आणि मालतीताई दरवाजातून ऐकत होत्या. पंतांनी होकार देताच छोट्या अक्षताच्या चेहरा आनंदाने फुलून निघाला. पंतांनी दुसर्‍या दिवशीच तिथे जाण्याचा निर्णय घेतला. रात्रभर जागून त्यांनी सगळ्या मंत्रांची उजळणी केली, नंतर ध्यान लावून बसले. छोटी अक्षताही न झोपता हे सगळे पहात होती. "बाबा मी येऊ, तुमच्यासोबत?" तिने विचारले. 
 "मला आवडले असते, पण तू आता थोडीशीच लहान आहेस. थोडी मोठी झालीस कि नक्की आपण सोबत जाऊ."
 सकाळ होताच पंत देवाला नमस्कार करून घराबाहेर पडले. आज त्यांनी फक्त पहाणी करायचे ठरवले होते. ते तिथे जाताच त्यांना कुजबुजल्यासारखे आवाज यायला लागले. झाडांमागून कोणीतरी पाहते आहे हे जाणवायला लागले. पण कोण आहे हे जाणून घेतल्याशिवाय ते पुढे जाणार नव्हते. ते गावात आले आणि त्यांनी सरपंचांकडे गावातील ज्येष्ठ व्यक्तींची तसेच ती जागा आधी कोणाची होती याची काही माहिती आहे का हे विचारले.
" हो पंत, आम्ही तुमच्या कडून आल्यानंतर याच कामाला लागलो होतो. ती जागा सुभानराव नावाच्या माणसाच्या नावावर आहे. हि नोंदही जवळपास शंभर वर्षांपूर्वीची आहे. त्याच्या कोणत्याच वारसदाराचे नाव इथेनाही किंवा कोणीच या जागेवर हक्क दाखवायला आले नाही. " सरपंच म्हणाले. 
" बरे मला गावातल्या एखाद्या जुन्याजाणत्या व्यक्तीची भेट घालून दिलीत तर बरे होईल," पंत म्हणाले.
" माझे आजोबा आहेत, ते नेहमीच गावातल्या वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतात पण आम्ही लक्ष देत नाही," त्यांचे बोलणे ऐकत असलेले गावचे गुरूजी म्हणाले.
" चला तर मग लगेच," असे म्हणत पंत निघाले.
गुरूजींच्या घरी पोचल्यावर त्यांनी पंतांना चहापाण्याचे विचारले.
" मला माफ करा, माझे काही नेम असल्याने मी आज पाणी ही घेउ शकत नाही," पंत म्हणाले.
"तुम्ही कुठे आमची माफी मागताय, तुमचे पाय आमच्या घराला लागले हेच आमचे भाग्य. "
"चला आजोबांना भेटूया का?"
"ते आत असतात. "
"आजोबा, हे श्रीरंगपंत. तुमच्याकडे यांचे थोडे काम आहे."
"श्रीरंगपंत, म्हणजे तुम्ही दामोदरपंतांचे कोणी लागता का?"
"हो मी त्यांचा मुलगा."
"असे होय, बोला काय मदत हवी आहे? त्यांनी बऱ्याच वेळा माझी मदत केली आहे."
" आजोबा, तुम्ही सुभानरावांबद्दल काही ऐकले आहे का?"
" का रे बाबा , जुन्या आठवणी काढताय? त्याच्या तर अजिबातच नको."
"तुम्ही आजोबांना काहिच नाही का सांगितले?", पंतांनी गुरुजींना विचारले.
" आम्हाला तेवढा वेळच मिळाला नाही. काल आल्यापासून सरपंचांनी कामाला जुंपले होते." हे ऐकून पंतांनी थोडक्यात आजोबांना माहिती दिली.
"आधीच सांगायचे ना. हे बघा या गोष्टी मला माझ्या वडिलांनी सांगितल्या आहेत, त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत. आम्ही विश्वास ठेवला हो. नाहीतर आजच्या पिढीचा कुठे विश्वास बसणार? असो, तर हा सुभानराव अगदी उलट्या काळजाचा माणूस म्हणून कुप्रसिद्ध होता. त्यात पैशाचा प्रचंड लोभी. त्याला गुप्तधनाचे फार वेड होते. त्यासाठी कोणा ना कोणा तांत्रिकाकडे पळत असायचा. गावातील लोक तर होतीच पण त्याच्या घरचे सुद्धा त्याच्यापासून चार हात लांब राहायचे. त्याची थेर पाहून त्याच्या वडिलांनीच त्याला वेगळे घर आणि जमीन दिली होती. मग काय आधीच मर्कट त्यात मद्य प्यायलेले अशी त्याची अवस्था झाली. लग्न न झाल्यामुळे एका स्त्रीचे आयुष्य वाचले असेच सर्व म्हणायचे. वेगळे झाल्यानंतर त्याचे गुप्तधनाचे वेड प्रचंड वाढले. त्यात त्याला तो तांत्रिक भेटला. त्याने त्याच्या डोक्यात नरबळीचे खूळ भरवले. आणि त्याला ते पटले. त्याने कुठूनतरी एका मुंजाला पळवून आणले. त्याचे घर लांब असल्यामुळे गावातल्या लोकांना त्याची खबरबात उशीरा कळायची. त्यामुळे गावकरी त्या मुलाला सोडवायला जाईपर्यंत तो मुंजा गायब झाला होता. आणि सुभानराव कोणत्यातरी तंद्रीत होता. आपल्याला काहीतरी चुकीची माहिती मिळाली असे समजून गावकरी परत आले. पण काही दिवसांतच सुभानराव मरण पावल्याची बातमी गावात आली. त्याचे दिवस कार्य झाल्यानंतर त्याचे भाऊबंद त्या जागी राहायला गेले पण कोणीच एक रात्र सुद्धा तिथे राहू शकले नाही. आता तिथे सुभानराव आहे कि तो मुंजा कोणाला माहित. कालांतराने अतिशय अप्रिय गोष्ट विसरावी तशी हि गोष्ट विसरायचा प्रयत्न गावाने केला, सुभानरावाचे नातेवाईकही गाव सोडून गेले. पण आमच्यासारखेच काहीजण हि माहिती देण्याचा प्रयत्न करत राहतात." आजोबांना एवढे बोलून धाप लागली. हे पाहून पंत म्हणाले," आजोबा, तुमच्या माहितीचा खूप उपयोग होईल मला, खूप खूप धन्यवाद. "असे म्हणून ते तिथून निघाले.  
           पंत परत त्या जागी आले. पहिल्यांदाच हे सगळे करत असल्याने मनात थोडीशी भिती होती. तेवढ्यात त्यांच्या कानात हवाहवासा आवाज आला,"गुरू की सीख पे भरोसा है, तो हो जा शुरू"...
पुढील भागात पाहू त्या जागेत नक्की कोण आहे मुंजा कि सुभानराव?

हि कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. हिचा उद्देश फक्त मनोरंजन हाच आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा कुठेही हेतू नाही.

कथा कशी वाटली ते सांगायला विसरू नका..
सारिका कंदलगांवकर
 दादर मुंबई
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now