Jan 26, 2022
नारीवादी

समर्थांची लेक भाग २

Read Later
समर्थांची लेक भाग २
समर्थांची लेक भाग २


मागील भागात आपण पाहिले कि आपले प्रशिक्षण संपवून पंत म्हणजेच अक्षताचे बाबा घरी यायला निघाले आहेत. आता बघूया ते घरी गेल्यावर काय होते..
  


        गुरूंना नमस्कार करून जवळपास वर्षानंतर पंत घरी निघाले. गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांनी वर्षभर सांसारिक विचार केला नव्हता , कोणाशीही कसलाच संपर्क ठेवला नव्हता .पण आता घरची ओढ जाणवू लागली होती. अचानक निघाल्यामुळे छोट्या अक्षताचा निरोपही घेता आला नव्हता, ती चिडली असेल का? ताईला वर्षभर घरी राहायला मिळाले असेल का? ताई जर गेली असेल तर मालतीला घर, मंदिर आणि अक्षता हे सगळे एकटीला सांभाळता आले असेल का? हे आणि असे अनेक विचार त्यांच्या मनात येत होते. या विचारांच्या नादात ते कधी घरी पोचले हे त्यांना कळलेच नाही.
          समोर मंदिर अगदी जसेच्या तसे होते. हातपाय धुवून आधी दर्शन घ्यावे म्हणून ते विहिरीवर जाणार इतक्यात समोर अक्षता उभी होती.
" बाबा , किती उशीर केलात? आम्ही सकाळपासून तुमची वाट पहात आहोत. "
"अग, पण तुम्हाला कोणी सांगितले मी आज येणार म्हणून?" आश्चर्यचकित झालेल्या पंतांनी तिला विचारले.
त्यांना विहिरीतून पाणी काढून देताना अक्षता म्हणाली," बाबा, असे काय हो तुम्ही? कालच आजोबांनी मला तुम्ही येणार म्हणून मला सांगितल, मी आईला आणि आईने आत्याला. आईने तर तुमच्या आवडीचा स्वयंपाक पण केला आहे."
" काय ग, मी तुला जाताना भेटलो नाही, तुला राग नाही का आला?" पंतांनी हळूच विचारले.
"खरं सांगू?"
"आपण नेहमी खरंच बोलतो बाबा."
"मला ना आधी तुमचा खूप राग आला होता. मी खूप रडले पण. मग आजोबा, आजी आणि आत्याने मला खूप समजावले. तुम्ही शाळेत गेला होता, बाप्पाच्या. हो का?" अक्षता विचारत होती. खूप दिवसांनी भेटलेल्या बाबांना काय सांगू आणि काय नको असे तिला झाले होते.
      "अक्षू, बाबांना घरात येऊ देशील कि विहीरीवरच उभं करणार आहेस?" आत्याचा आवाज आला. दोघांनीही पाहिले तर आत्या आणि मालतीताई दोघीही मंदिराच्या दरवाजात उभ्या होत्या. पटकन हातपाय धुवून पंत मंदिरात गेले. दर्शन घेताना दत्तांच्या चेहर्‍याकडे बघताना त्यांना त्याचे आपल्या गुरूंच्या चेहर्‍याशी असलेले साम्य जाणवायला लागले. त्यांच्या कानात "आता तरी तुला समजले का?" हे शब्द ऐकू आले.. आणि आपण वर्षभर कोणाच्या सहवासात होतो हे जाणवून त्यांना भरून आले.
ताई त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या, "चल आवर लवकर. आम्हा सगळ्यांना तुझ्याशी बोलायचे आहे. आणि हो उद्या मी निघते आहे."
" हे काय ताई, मी आज आलो आणि तू लगेच उद्या जाणार."पंत थोडे नाराज झाले. त्यांना आपल्या गुरूंबद्दल, बाबांबद्दल ताईंशी एकांतात बोलायचे होते."
" रंगा, अरे वर्षभर माझे घर सोडून मी इथे राहिले महाराजांसाठी. मला नको का सासरची कर्तव्य पार पाडायला? आणि मी तुझ्यापासून लांब थोडीच असणार आहे? हवे तेव्हा बोलू शकतो आपण. पण आता आवर ,गप्पा नंतर मारू. स्वयंपाक थंड होईल. आम्ही तिघी थांबलो आहोत तुझ्यासाठी."
यावेळेस पंतांनी तुम्हाला वेळ कोणी सांगितली हे विचारले नाही कारण उत्तर त्यांना कळले होते.
        कपडे वगैरे बदलून पंत जेव्हा जेवायला बसले तेव्हा त्यांना जाणवले कि आपण वर्षभर हे काहीच खाल्ले नाही. फक्त कंदमुळे आणि फळे हाच आहार होता. त्यामुळे ते थोडेसे कृश दिसत असतील पण शक्ती मात्र वाढलेली होती. जेवताना अक्षताची अखंड बडबड चालू होती. ताई आणि मालतीताई काय हवं नको ते पहात होत्या. जेवण झाल्यावर अक्षता झोपून गेली. पंत बाहेर झोपाळ्यावर बसून विचार करत होते. ताई आणि मालतीताई स्वयंपाकघर आवरून गप्पा मारायला बाहेर आल्या. पंत त्यांना आपली दिनचर्या, केलेला अभ्यास सांगत होते. ते ऐकून ताईंच्या चेहर्‍यावर समाधान तर मालतीताईंच्या चेहर्‍यावर आश्चर्य होते. सगळे सांगून झाल्यावर पंत मालतीताईंना म्हणाले," मालती तुझी हरकत नसेल तर मला ताईशी जरा बोलायचे आहे."
मालतीताई यावर काही बोलणार इतक्यात ताईच म्हणाल्या, "रंगा,तुला जे काही बोलायचे आहे ते हिच्या समोरच बोल. इतके दिवस तूच अंधारात होतास, म्हणून मी हि हिला काहीच बोलले नाही. पण आता तिला सांगायला हरकत नाही. आईला सुद्धा हे सगळे माहित होते. आणि तू नसताना मी वहिनीला थोडीफार कल्पना दिली आहे. आणि अक्षताला सुद्धा काही गोष्टी शिकवल्या आहेत."

" ठिक आहे. ताई तुला जर सगळे माहित होते, तर मला का नाही आधी सांगितलेस ? आणि तुझेही हे सगळे प्रशिक्षण झाले आहे? मग मला का आठवत नाही?"
"रंगा, तुला आठवत असेल तर लहानपणी एकदा तू खूप आजारी पडला होतास. तुला हवापालटाची फार गरज होती म्हणून आई तुला घेऊन जवळ जवळ वर्ष दिड वर्ष आपल्या आजोळी राहिली होती. तेव्हा मी एकदा बाबांसोबत गाणगापूरला गेले असता, महाराज भेटले आणि तिथूनच माझ्या शिक्षणाला सुरुवात झाली. नंतर कधी विषयच निघाला नाही. आणि तुझी तब्येत थोडी तोळामासा असल्यामुळे आईबाबांनी महाराजांना विनंती करून तुझे शिक्षण पुढे ढकलायला सांगितले. तुझे शिक्षण झाले नसल्यामुळे बाकी तुला काही सांगायचा प्रश्नच उद्भवत नव्हता. असो झाले गेले गंगेला मिळाले. आता मात्र तू महाराजांच्या आज्ञेकडे लक्ष दे. ते कधी कोणत्या स्वरूपात येऊन इशारा देतील , कळणार नाही जर तू साधना चालू ठेवली नाहीस तर."
 "ताई तुलाही महाराज आज्ञा देतात?"
 "त्याशिवाय का मी इथे आहे?"
"तू ही बाबांचे काम करतेस?"
"हो पण , वेगळ्या पद्धतीने.असो. सोड तो विषय आता. आणि अजून एक गोष्ट महाराजांनी तुला निरोप दिला आहे, यापुढे जे काही करशील ते दैनंदिनी मध्ये लिहून ठेवत जा. ते सगळे एका जागी सुरक्षित ठेव. ती जागा वहिनीला दाखवून ठेव. आणि आता आराम कर, दमला असशील."
        एवढे बोलून ताई तिथून निघून गेल्या.मालतीताईहि त्यांच्या पाठोपाठ मदतीसाठी गेल्या. दुसर्‍या दिवशी ताई सासरी निघून गेल्या. पण लग्नानंतर पहिल्यांदाच एवढे दिवस माहेरी राहिल्यामुळे तसेच अक्षताचा खूपच लळा लागल्यामुळे त्यांचा पायच निघत नव्हता. अक्षताहि रडत होती. शेवटी तुला जेव्हा वाटेल तेव्हा मला बोलव जशी असेन तशी येईन, असे म्हणून त्या निघाल्या. ताई गेल्यानंतर प्रत्येकजण उदासपणे आपापल्या कामाला लागले. मालतीताईंना ताईंचा फारच आधार वाटत होता. त्यांच्याकडून अनेक गोष्टी समजून घेता आल्या होत्या. अक्षताला तर उठताबसता आत्या हवी असायची. श्रीरंगपंत तर नुकतेच आले होते त्यांचीही अजून घडी बसायची होती. 
       पंतांनी शेतीची ,बाहेरची सर्व कामे आता कुळांवर सोपवली होती. मंदिर आणि साधना यांत स्वतःला गुंतवून घेतले होते. मालतीताईहि त्यांना त्यांच्यापरीने मदत करत होत्याच. एका बाजूला अक्षताचीहि थोडी थोडी तयारी करणे चालू होते. 
 दुसरीकडे बाबांचे काम कसे चालू ठेवायचे हा विचार सुरू होता.
       मंदिरात पंत नसताना सुद्धा ताईंनी गुरुवारचा आरतीनंतरचा प्रघात सुरू ठेवला होता. त्यातून काही मार्ग निघतो का हे पंत चाचपून पहात होते. आणि तो त्यांना मिळाला. कृष्णजन्म जवळ आला होता. खरेतर हा विधी त्यांचे वडील घरातल्या घरात करायचे. हिच गोष्ट सार्वजनिक रित्या करायची त्यांनी ठरवली. त्यांनी तयारी सुरू केली. मंदिरात प्रत्येक सण साजरा केला जाईच, पण यावेळेस सर्वच वेगळे होते. मंदिर , पाळणा छान सजवले होते. पण मध्यभागी मोकळी जागा रिकामी ठेवली होती. बसायला आजूबाजूला जागा ठेवली होती. कृष्णजन्म झाला, कृष्णाला पाळण्यात घालून झाले, पाळणा झाला. आणि पंतांनी सुरुवात केली. विधी अतिशय साधा आणि सोपा होता. त्यांनी देवाला धूप दाखवला, कानीफनाथांची काठी घेतली, ती त्या धूपावरून फिरवून एकेकाच्या अंगावरून फिरवली. हातात नाडा बांधला. 
        हे झाल्यानंतर काही दिवसांतच बर्‍याच जणांना प्रचिती आली. ज्या काही छोट्यामोठ्या अडचणी त्यांच्या आयुष्यात होत्या त्यातून बाहेर पडायची मनशक्ती त्यांना मिळत होती . पंतांनी केलेली हि गोष्ट पंचक्रोशीत पसरायला वेळ लागला नाही. अशाच एका गुरूवारी बाजूच्या एका गावातील माणसे त्यांना भेटायला आली होती. आणि त्यांनी पंतांना सांगितले त्यांच्या गावाला होणाऱ्या त्रासाबद्दल...'एका मुंजाबद्दल'सदर कथा हि पुर्णपणे काल्पनिक आहे. निव्वळ मनोरंजन हाच हेतू आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा उद्देश नाही.
  कथा कशी वाटली हे सांगायला विसरू नका.
 सारिका कंदलगांवकर 
दादर मुंबई
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now