Jan 26, 2022
नारीवादी

समर्थांची लेक १

Read Later
समर्थांची लेक १
समर्थांची लेक भाग १
नावः अक्षता श्रीरंग समर्थ
वयः वीस ते पंचवीसच्या दरम्यान
शिक्षण: एम.बी.ए.
नोकरी: इंटरनॅशनल जाहिरात एजन्सी
रूपः चारचौघीत उठून दिसेल अशी.

हे वाचून डोळ्यासमोर एका मॉडर्न, थोडी टेचात राहणारी अशा मुलीचे चित्र उभे केले असेल तर चुकलात.. अक्षता अजिबात तशी नाही. हो हो , हि तीच \"ती आणि \"ती\" \" या कथेतील अक्षता आहे..अक्षता श्रीरंग समर्थ..
श्रीरंग दामोदर समर्थ. एका छोट्याशा गावातील पुजारी. त्यांच्या घराण्यात पिढ्यानपिढ्या चालत आलेली दत्तभक्ती होती. त्यांच्या पूर्वजांनी बांधलेले एक दत्त मंदिर होते. मंदिरात दत्ताची सुंदर मूर्ती होती. बांधकाम एवढे पक्के होते कि इतक्या शतकानंतरही ते कुठेही मोडकळीला आले नव्हते. त्यामुळे भक्तांची तिथे सदैव रीघ लागलेली असे. श्रीरंगपंत दर गुरूवारी संध्याकाळी आरती नंतर कोणाची जर काही कसली अडचण असेल तर सोडवत असत. ही सुद्धा पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या गोष्टींपैकी एक गोष्ट होती. मंदिराच्या बाजूलाच समर्थांचे छोटेसे टुमदार घर होते. त्यांची स्वतःची जमिन होती , त्यामुळे देवळातून आलेले उत्पन्न ते सगळे दान करित असत. गरजूंना मदत करणे हाच जणू त्यांचा धर्म होता.
समर्थ कुटुंबाचे अजून एक वैशिष्ट्य होते, प्रत्येक पिढीत फक्त एक मुलगा व एक मुलगीच असे. पण आधीपासूनच दोघांवरही संस्कार मात्र समान होत असत. एवढेच काय दोघांचे शिक्षणही समान असे, वेदाध्यनापासून ,शालेय अभ्यासापर्यंत. सत्शील चारित्र्य आणि प्रचंड देवभक्ती यांमुळे समर्थ कुटुंबियांकडे काही दैवी शक्ती आहेत असा गावकऱ्यांचा विश्वास होता. आणि त्यांच्या वागण्यातून तो नेहमीच वाढायचा. दामोदर समर्थ हे फार नावाजलेले ज्योतिषी होते. त्यांनी श्रीरंग यांना लग्नाच्या आधीच सांगितले होते, आपल्या कुटुंबात फक्त तुलाच एकच कन्यारत्न असेल आणि तेच आपल्या कुळाचा उरलासुरला उद्धार करेल.त्याच श्रीरंगपंत आणि मालतीताईंची मुलगी अक्षता. लहानपणापासूनच अक्षता अतिशय चुणचुणीत आणि धाडसी होती. तिचे सहावे इंद्रिय अतिशय जागृत होते. त्याची प्रचिती श्रीरंगपंत आणि मालतीताईंना ती लहान असतानाच आली होती. खरेतर अक्षता लहान असतानाच तिच्या आजोबांचा रहस्यमय रितीने मृत्यू झाला होता. तो धक्का सहन न होऊन तिची आजी सुद्धा काही दिवसांतच वारली होती. त्यामुळे आजीआजोबांचे प्रेम तिला कधी लाभलेच नाही. मालतीताई दिवसभर घरकामात , आल्यागेल्यामध्ये गुंतलेल्या, तर श्रीरंगपंत मंदिर आणि शेतीच्या कामात. त्यामुळे छोट्या अक्षताकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळच नसायचा. तरिही पाच वर्षांची अक्षता जेव्हा रामरक्षा, शिवमहिम्न स्तोत्र एकदा दिवेलागणीच्या वेळेस खणखणीत आवाजात म्हणायला लागली तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले.
मालतीताईंनी अक्षताला जवळ घेऊन विचारले," बाळा , आपण तर रोज छोटी छोटी स्तोत्रे म्हणतो, हि तुला कोणी आणि कधी शिकवली?"
"अग आई, ते आजोबा नाही का आपल्या घरात झोपाळ्यावर अधूनमधून बसलेले असतात त्यांनी. आणि तुला माहित आहे का तिथे ना एक आजी पण असतात. मला बघून गोड हसतात. पण ते दोघेही ना मला जवळ घेतात ना मला त्यांच्याजवळ येऊ देतात." अक्षता निरागसपणे सांगत होती.
हे ऐकून दोघेही दचकले. कारण त्या दोघांनाही त्यांचे अस्तित्व जाणवले होते पण एवढ्या प्रखरपणे नाही.
"अजून काही बोलले का ग ते तुझ्याशी?" पंतांनी विचारले.
" हो, ते खूप बोलतात. ते ना मला रोज नवीन नवीन गोष्टी शिकवतात. ते म्हणाले होते कि आईला म्हणावं कितीही उपवास केलेस तरी अक्षताला भावंड काही येणार नाही." मी विसरले आईला निरोप द्यायला अक्षता अपराधी स्वरात म्हणाली.
हे ऐकून मालतीताई गोर्‍यामोर्या झाल्या , कारण हे त्यांनी कोणालाच सांगितले नव्हते. त्यांना असे वाटत होते कि मामंजींची भविष्यवाणी खोटी सुद्धा ठरू शकते. आणि एकाला एक मूल असावे म्हणून त्यांनी काही व्रत सुरू केले होते. श्रीरंगपंत मात्र थोडे विचलित झाले होते. मालतीताईंच्या उपवासाने नाहीतर आपल्या वडिलांनी आपल्याशी संपर्क साधला नाही कि त्यांना संपर्क साधता आला नाही म्हणून....

समर्थांच्या घरात सर्व दत्तभक्त असल्याने दत्तजयंतीचा उत्सव तर जोरात असायचा. महाप्रसादाला अख्खे गाव लोटायचं. गुरूचरित्राचे पारायण रात्र रात्र चालायचे. जमेल तेव्हा पौर्णिमेस गिरनारवारी ती नाही जमली तर अक्कलकोट, गाणगापूरदर्शन असायचेच..वरील घटनेनंतर श्रीरंगपंत गाणगापूरला एकटेच गेले असता, एक नाथपंथीय त्यांच्याकडे टक लावून पाहत असल्याचे त्यांना जाणवले. त्याच्याकडे जायचे तर गर्दीमधून वाट काढत जाणे जरा अशक्य होते. आरतीनंतर पाहू असा त्यांनी विचार केला.
सुरू झालेल्या आरतीत ते एवढे हरवून गेले कि तो बैरागी कधी त्यांच्या बाजूला येऊन उभा राहिला, त्याना कळलेच नाही. " चल मेरे साथ" तो बैरागी पंतांना म्हणाला. ते खेचल्यासारखे त्याच्या पाठी जाऊ लागले. तो त्यांना संगमावर घेऊन गेला.
" बैठ" त्याने आज्ञावजा आवाजात सांगितले.
पंत समोरच्या दगडावर बसले.
"अपने बाबा का अधुरा काम करेगा?"
त्याने विचारले.
" हो, पण मला त्यांनी कधीच माहिती दिली नाही, " पंत विषण्ण होऊन म्हणाले.
" उसको उतना वक्तही नहीं मिला."
" पण हे सगळे तुम्हाला कसे माहित?"
" गुरू अपने चेले कि हर खबर रखता हैं बेटे. पर मैंभी एक जगह अटका हुआ था, इसिलिए उसकी मदद ना कर सका, बहोत बुरा लगा मुझे उसके बारेमें जानकर.."
" मग तुम्ही मला भेटायला का नाही आलात? मला थोडीशी मदत झाली असती तुमची."
" बेटा, अगर कोई तकलीफ में हैं तो ही हम किसीके घर जाते है, नहींतो यहां महाराज के यहां उसकी राह तकते हैं. तू याद कर तू खुद कितनी बार महाराज के दर्शन के लिए आया?"
पंत आठवायचा प्रयत्न करायला लागले. त्यांना आठवले कि खरेच दामोदरपंत गेल्यानंतर सगळेच अंगावर पडल्यामुळे त्यांना कुठेच जाता आले नव्हते. अक्षताचा प्रसंग झाला नसता तर आजही ते इथे आले असते का हि त्यांनाच शंका होती.
"मला रोजची साधना करायला मिळत नाही म्हणून बाबा माझ्याशी संपर्क करू शकत नाही का?"
" कुछ ऐसाही है."
"मग तुम्ही कराल माझी मदत?"
" यही तो मेरा काम है, बेटा."
" आज यही तू मेरा गंडा बांध ले. तेरे पिता को मैने पहले हि बोला था , कि वक्त का क्या भरोसा. पहलेसे हि तुझे तयार करना चाहिए था. पण जाऊ दे जे झाले ते झाले."
इतका वेळ हिंदीत बोलणार्‍या महाराजांनी अस्खलित मराठीत सुरुवात केल्यावर पंत थक्कच झाले.
"तुम्ही म्हणाल तसे महाराज. " पंतांनी हात जोडले.
बैराग्याने पंतांना गंडा बांधला आणि हृदयाशी धरले. " एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, आपण जे काही करतो ते मानवजातीच्या कल्याणासाठीच आहे. जे करशील त्यातून चांगलेच निष्पन्न होईल. तुझ्या सांसारिक चिंता सोडून दे. एक काम कर आपले नवनाथांची जी स्थाने आहेत तिथे सगळीकडे जाउन ये, मग आपण तुझे प्रशिक्षण सुरू करू."
गुरूंनी सांगितल्याप्रमाणे पंत एकटेच गिरनार, पीठापूर, त्र्यंबकेश्वर, नर्मदा परिक्रमा करून आले. जाण्याआधी त्यांनी आपल्या मोठ्या बहिणीला राधाताईंना मालतीताईंच्या मदतीसाठी जायला सांगितले. त्याही पंतांइतक्याच मंदिर वगैरे सांभाळण्यास समर्थ होत्या. त्या जर असतील तर कसलीच चिंता करायची पंतांना गरज नव्हती.
या परिक्रमा झाल्यानंतर पंतांच्या कडक साधनेला सुरुवात झाली. पहाटे सूर्योदयाच्या आधी उठून गार पाण्याने स्नान, त्यानंतर ध्यानधारणा, हलकासा फलाहार , शारिरीक कसरत दुपारी जेवण आणि त्यानंतर सुरू व्हायचे मुख्य प्रशिक्षण.. वेगवेगळ्या जुन्या ग्रंथांचे, वेदांचे,ऋचांचे...
साधारण एक वर्ष हे चालू राहिले, वर्षभरात एकदाही त्यांनी घरच्यांशी संपर्क साधला नाही. तो ही त्यांच्या शिक्षणाचा एक भाग होता. या सगळ्या खडतर प्रशिक्षणाचे फल म्हणून त्यांचे कणखर व्यक्तीमत्व फुलून आले होते. वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांच्या गुरूने त्यांना बोलावले, " कसे वाटते आता?"
" जणू हा माझा पुर्नजन्म असावा असे वाटते आहे. आता माझ्यासाठी काय आदेश आहे,?"
" इतके दिवस तू मंदिरात जी अडल्या नडलेल्यांना मदत करत होतास, ती क्षुल्लक वाटेल असे तुला काम करायचे आहे. जिवंत माणसे दिसतात, त्यांच्या व्याधी कळतात, कठीण असते ते न दिसणाऱ्यांची मदत करणे."
"मी समजलो नाही, गुरूजी."
"असे अनेक जीव असतात, जे जाणता अजाणता मृत्यूच्या फेऱ्यात अडकलेले असतात. काहींना फक्त मुक्ती हवी असते तर काहींना दुसर्‍यांवर सूड उगवायला आवडते. अशांना मुक्त करण्याची जबाबदारी तुमच्या घराण्यावर आहे.तुमच्या घरातील प्रत्येक स्त्रीपुरूषाला या प्रशिक्षणातून जावे लागते. फक्त तुझ्याच बाबतीत थोडा उशीर झाला. असो महाराजांची इच्छा..ठरलेल्या वेळी ठरलेले गुरू तुम्हाला भेटतात आणि प्रवासाची सुरुवात होते.तुझे इथले काम संपले आहे पण तुला अजून एक महत्त्वाचे काम करायचे आहे. "
" जशी आज्ञा".
" घरी गेल्यावर तुझ्या मुलीची हळूहळू तयारी करून घ्यायला सुरुवात कर. थोडी थोडी तिला सवय लाव. एकदा ती मोठी झाली कि तिचे गुरू तिची काळजी घेतीलच. पण तुझ्या वडिलांसारखे तू चुकू नकोस."
"जशी आज्ञा, गुरूजी."
"अलख निरंजन"
नमस्कार केलेली मान पंतांनी वर केली तर त्यांचे गुरूजी तिथे नव्हतेच.
पुढच्या भागात वाचूया कि पंत घरी गेल्यावर काय होते ते..हि कथा काल्पनिक आहे. कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला चालना देत नाही.
कथा कशी वाटली ते सांगायला विसरू नका.


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now