असे प्रबोधन केल्यामुळे सर्व शिक्षक व इतर लोक सुमेधाचा आदर करू लागले.
बालगृहातील लोक तिला आऊ म्हणत.
आऊने रघुनाथ काकांची काळजी घेऊन व सुश्रुषा करून त्यांना बरे केले. त्यांचा एक हात अधु झाला तरी त्यांनी बालगृहातील छोटी मोठी कामं करण्या त स्वतःला झोकून दिले.
तिने आईची सुद्धा खूप काळजी घेतली. बालगृहातील सर्व लहान बालके स्वतःचं घर समजून तिथे लहान माझी मोठी होत होती.
एकदा दुचाकीने एका महत्त्वाच्या कामासाठी सुमेधा जात असताना, तिच्या समोरच एक अपघात झाला.
कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक बसली. दुचाकी वर एक दांपत्य एका छोट्या मुलाला घेऊन रस्त्यावरून जात असताना मागून येणाऱ्या एका चार चाकी ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक एवढी मोठी होती की ते दांपत्य रस्त्यावर पडले. आणि त्यांचा पाच वर्षाचा मुलगा दूर जाऊन पडला. रस्त्यावर ये जा करणाऱ्या मंडळींनी त्या दोघांनाही उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये नेत असताना मेंदूला मार लागल्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला.
तो चार वर्षाचा बालक दैवी चमत्कार झाल्यासारखा आश्चर्यकारक रीतीने वाचला. तो हा अपघात पाहून प्रचंड घाबरला होता. तोखूप जोरात रडायला लागला.
तेव्हा सुमेधा गर्दीतून वाट काढत्या मुला पर्यंत पोहोचली. त्याला पाणी पाजून शांत केलं.
तिने स्वतःचे महत्त्वाचे काम सोडून त्याला आपल्या बालगृहात नेलं.
त्याच्या बाल मनावर मोठा आघात झाला होता. तो आई... आई... करीत खूप रडत होता. आता तीच त्या मुलाची आई बनली. तिने त्या मुलाचं बालमन जाणलं. त्याचं मन सर्व प्रकारे जाणून घेऊन त्याला आईची माया दिली. तो मुलगा सुद्धा बालगृहात चांगलाच रमला....
त्याला लहान लहान त्याच्या वयाचे सवंगडी मिळाल्यामुळे तो तेथे खेळण्यात दंग होत असे. त्याला तिने आईच्या ममतेने वाढविल्यामुळे तो सुद्धा आऊआऊ म्हणत तिच्या मागेच राहायचा.
तिला त्या छोट्या मुलाचा चांगलाच लळा लागला. त्याचे नाव अनुप होते.
अनुप आता तिच्याशिवाय राहत नसे.
तिने जिल्हास्तरावरील बालकल्याण समितीच्या मदतीने कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून अनुकूल आपल्या बालगृहातच ठेवले.
तिने त्याला दत्तक घेण्याची मनीषा आईजवळ बोलून दाखवली. आईने सुद्धा कोणतेही आढेवेढे न घेता तिला परवानगी दिली. कारण नीलिमा ताईंना सुद्धा आता कळून चुकले होते की आपल्या मुलीला आता आधाराची गरज आहे. कारण त्या सुद्धा एक आई च होत्या. त्यांचे मन सुमेधात च होते.
तिने स्वतःचं असं छान वलय प्राप्त केलं होतं. तिच्या हुशारीमुळे तिला समाजात मानसन्मान होता. आदर होता.
तिने अनुपच्या नातेवाईकांची परवानगी घेतली. सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले. आणि अनुपला स्वतःचं नाव दिलं.
अनुप आता तिला आई म्हणू लागला.
काळ माणसाच्या आयुष्याच्या भूतकाळातील आठवणी विसरण्यासाठी खरोखर एक औषधच आहे.
आता तर तिला स्वतःचं बाळ मिळालं होतं. तिच्या अंगात नवचैतन्य संचारले. नव्या उमेदीने ती बालगृहातील मुलांची काळजी घेत होती. त्यांना स्वतःच्या मुलांप्रमाणे माया देत होती.
"चैतन्याने बहरलेली फुलं आपण तोडतो. आणि अचेतन मूर्तीवर वाहतो. आपल्याला सरळ सरळ चैतन्याची पूजाच करता येत नाही".
तिच्यासमोर सरळ सरळ चैतन्याने बहरलेली जिवंत परमेश्वराची रूपं होती. ते चैतन्य ती अनुभवायची. आणि तृप्त व्हायची.
जिकडे तिकडे देखे उभा! अवघा चैतन्याचा गाभा!
अनुप बालगृहातच लहानाचा मोठा झाला. तिथे सर्व मुलांचे वाढदिवस साजरे करण्यात येत असत. प्रत्येक मुले हे परमेश्वराचे समजून
ज्या दिवशी त्या बालका चा वाढदिवस असेल त्या दिवशी प्रत्येक जण त्या बालकांसाठी संपूर्ण बालगृह सजवित. फुग्यांचे गुच्छ, फुलांच्या माळा इत्यादी साहित्याने संपूर्ण परिसराची सजावट करीत.
रघुनाथ काका सुद्धा हिरीरीने भाग घेऊन वाढदिवसाची तयारी करीत. प्रत्येक मूल त्या बालकाला शुभेच्छा देऊन वातावरण आनंदी बनवीत असे.
असा प्रत्येकाचा वाढदिवस खूप छान पद्धतीने साजरा होत असे.
अनुप सुद्धा आपल्या आईचा वाढदिवस असाच, परंतु वेगळ्या पद्धतीने साजरा करीत असे.
तिला आईस्क्रीम खूप आवडायचे. ती प्रत्येकाच्या वाढदिवसाला आईस्क्रीम बोलवायची. गारेगार आईस्क्रीम सर्व बालक बालिका खात, आणि तृप्त होत.
तसेच तिला मोगऱ्याची फुलं खूपच आवडायची. ओंजळीभर मोगऱ्याची फुले हातात घेऊन ती त्या फुलांचा सुवास घेऊन खूप आनंदी व्हायची.
तिने त्या बालगृहात मोगऱ्याची बाग फुलविली होती. मोगऱ्याचा मंद सुगंध संपूर्ण परिसर दरवळून टाकत असे.
ती सर्व बालकांवर स्व कष्टाचे महत्त्व कटाक्षाने बिंबवित असे.
ती त्यांना रामायण महाभारतातील गोष्टी सांगून त्यांच्यावर योग्य संस्कार झाले पाहिजेत याकडे तिचे कटाक्षाने लक्ष असे.
एकदा तिने सर्व मुलांना कष्टाचे महत्त्व सांगितले. कारण सर्व बालके आता मोठी होत होती. त्यांच्यावर संस्कार होणे गरजेचे होते.
रामायणातील एक लहानशी गोष्ट तिने मुलांना सांगितली.
प्रभू रामचंद्र जेव्हा शबरीला भेटावयास गेले, त्यावेळचा प्रसंग तिने मुलांना सांगितला.
ज्या वनात राम बसले होते, त्या वनात सर्वत्र फुले फुललेली होती. त्या फुलांचा सुगंध सगळीकडे पसरलेला होता. ती फुले कोमेजत नसत. सुकत नसत. सदैव मधुर गंध त्यांचा पसरलेला असे. जेव्हा रामाने याचे कारण शबरीला विचारले, तेव्हा शबरीने मतंग ऋषीची गोष्ट रामाला सांगितली.
एकदा मातंग ऋषीनीं आश्रमा त इंधन नव्हते, म्हणून आश्रमातील सर्व मुलांना मोठ्या मोळ्या करून आणावयास सांगितल्या.
आश्रमात दूर दूरचे ऋषीमुनी सुद्धा येऊन राहत. पावसाळ्यासाठी जळणाची तरतूद करून ठेवणे आवश्यक असल्यामुळे इंधन जमा करून ठेवणे आवश्यक होते.
वैशाखातील उन्हाच्या झळा तीव्र असल्यामुळे, कुणी ही विद्यार्थीआश्रमाच्या बाहेर पडला नाही.
त्यामुळे मातंग ऋषी स्वतः खांद्यावर कुऱ्हाड घेऊन बाहेर पडले. हे पाहून सर्व विद्यार्थी त्यांच्या मागे चालायला लागले. आश्रमातील इतर पाहुणे सुद्धा त्यांच्या मागे गेले.
सर्वांनी लाकडाच्या मोळ्या बांधल्या. उन्हामुळे प्रत्येकाच्या अंगातून घामाचे थेंब जमिनीवर पडत होते. प्रत्येकाच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या.
सर्वजण आश्रमात परत आले.
दुसऱ्या दिवशी सर्वजण पहाटे नदीवर स्नानासाठी निघाले. तेव्हा त्यांना सर्वत्र सुगंध पसरलेला दिसला. सुगंध कुठून येत आहे हे पाहण्यासाठी, त्यांनी विद्यार्थ्यांना पाठविले.
मुले, हरीणासारखी पळत सुगंध कुठून येत आहे, याचा शोध घेऊ लागली.
पाहतात तो काय! ज्या ज्या ठिकाणी घाम गळला होता, त्या त्या ठिकाणी एक एक सुगंधी फुल उमलले होते.
त्या फुलांचा सुगंध सगळीकडे दरवळत होता.
सुमेधाने सांगितले, की तुम्ही सुद्धा तुमच्या पुढील आयुष्यात असा कष्टाचा सुगंध सगळीकडे पसरवा.
हे सांगत असताना प्रत्येक मूल कसं तल्लीन होऊन ऐकत होतं. अभिनेता
अनुप सुद्धा असाच तल्लीन होऊन त्याच्या आईचा शब्द न शब्द कानात साठवितहोता.
अनुप नेहमी आईच्या वाढदिवसाला मोगऱ्याची ओंजळीभर फुलं आणि आईस्क्रीम आणायचा. ती फुलं तिच्या ओंजळीत देऊन आईस्क्रीम तिच्या हातात द्यायचा. तेव्हा सुमेधाचंमन भरून यायचं.
अनुप आता मोठा झाला होता. नीलिमाताई ने सुद्धा नातवाला खूप जिव्हाळा लावला.
तिने अनुपला जवळच्या शाळेत शिकायला टाकलं.
तिचा तोआता एकमेव आधार होता. ती आता निश्चिंत झाली होती. तिने तिच्या ध्येयाला जिद्दीने गवसणी घातली होती.
परंतु नियतीच्या मना त वेगळंच काही होतं. सर्व कसं सुरळीत चालू असताना, सुमेधाच्या आयुष्यात मोठं चक्रीवादळ आलं. त्या वादळाने तिला खूप मोठा धक्का दिला. ती यावादळातून अजिबात सावरू शकली नाही. नियती समोर तिला हात टेकावे लागले.
एकदा अनुप बाजारातून बालगृहात स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी रघुनाथ काकांसोबत बाजारात गेला. येताना हातात खूप सामान असल्यामुळे त्या दोघांनी ऑटो रिक्षा केली. रिक्षात सामान ठेवलं. आणि बालगृहाच्या दिशेने निघाले..
तेवढ्यात एका मोठ्या ट्रकने रस्त्याच्या चौफुलीवर रिक्षाला मोठी धडक दिली. रघुनाथ काका व अनुपला अचानक काय झालं ते समजलं नाही. अनुप रिक्षातून खाली पडला. डोक्याला खूप मार लागला. रघुनाथ काकांना हातापायांना जखमा झाल्यात.
रिक्षा चालक सुद्धा गंभीर जखमी झाला. घटनास्थळावरून ट्रक दिसेनासा झाला.
रस्त्यावरील लोकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले. परंतु हाय रे दैवा! अनुपचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
रघुनाथ काकांवर योग्य उपचार झाल्यामुळे ते वाचले.
सुमेधाला हे कळल्यानंतर तिच्यावर आभाळच कोसळलं. हाती तोंडी आलेला घास नियतीने हिरावून घेतला.
हे पाहून सुमेधा स्तब्ध झाली. तिचे अश्रू सुद्धा कोरडे झाले. हृदयाला काटेरी झुडूपा ने रक्तबंबाळ केलं.
बालगृहातील मुलांचा मोठा दादा काळाने हिरावून घेतला.
लहानपणीच अनुप चेआई-बाबा अपघातात गेले. त्यांचा सुद्धा असाच अपघात नियतीने घडविला होता. खरोखर याला काय म्हणावे..... नियती की नशीब....
हे पाहून सर्व लोक हळहळले.
प्रत्येक जण तिचं सांत्वन करण्यासाठी येत होता.
नीलिमाताई तर पार खचून गेल्या. मुलीच्या आयुष्याची अशी वाताहत झालेली त्यांना बघवत नव्हती. शेवटी नियतीच्या पुढे काही चालत नाही....
खळखळून हसणारी, इतरांना खळखळून हसविणारी, ती आता मूक झाली होती.
एवढा मोठा आघात सहन करून ती पुन्हा बालगृहातल्या लहान बालकांची काळजी घेऊ लागली. तिने ठरविलं. आपला मुलगा गेला, तरी इतर मुलंही आपलीच आहेत की.
आपण या बालकांना असेच आईचे प्रेम देत राहू. असा ती नेहमी विचार करायची.
दिवस पुढे पुढे सरकत होते. बालगृह पुन्हा हसरं खेळतं होत होतं. सर्वांचे वाढदिवस साजरे होत होते. बालकांसाठी ती जगत होती. परंतु आता आतून पार खंगून गेली होती. सतत आजारी राहत असल्यामुळे तिची कार्यक्षमता सुद्धा कमी व्हायला लागली.
वर्ष सरलं. तिचा वाढदिवस सुद्धा आला.
या दिवशी तर तिचं मन फार उदास झालं.
तिचं कशातच मन लागेना. ती तशीच उदास बसून होती.
रघुनाथ काकाने मनाशी काहीतरी ठरविले.
ते तसेच उठले. फुलांच्या दुकानात गेले. तिथून ओंजळीभर मोगऱ्याची फुलं आणली. येताना आईस्क्रीम सुद्धा आणलं.
त्यांनी ती फुलं नीलिमाताईंच्या हातात दिली. नीलिमाताईंनी ती ताजी ताजी मोगऱ्याची फुलं तिच्या ओंजळीत टाकली. त्या फुलांनी तिची संपूर्ण ओंजळ भरली. तिने त्या फुलांचा सुगंध घेतला. तेव्हाच रघुनाथ काकांनी तिच्या हातात आईस्क्रीम ठेवलं.
आणि ते तिला म्हणाले, बेटा! तुझ्या वाढदिवसाला अनुप नेहमी फुलं आणि आईस्क्रीम द्यायचा.
आम्ही सुद्धा तुझी मुलंच आहोत की.
तू आमची तुझ्या मुलाप्रमाणे काळजी घेतेस. तू आता अनुपला आमच्यातच पहा.
सुमेधा लगेच दोघांच्याही पाया पडली. तिचा तो दिवस खूपच उत्साहात गेला.
अनेक दिवसांपासून तिच्याअंगात तापाने आपलं घर केलं होतं. कोणत्याही शरीरात ताप तसा राहत नसतो. शरीरात कुठेतरी बिघाड झाल्यामुळे तिला सतत ताप येत होता. त्यामुळे ती मनाने आणि शरीराने पार खचून गेली होती. दवाखान्यात उपचारादरम्यान कळलं, की तिला ब्रेन ट्युमर आहे.
तिला नेहमी अस्वस्थ वाटायचं. मनाने सुद्धा ती कमकुवत झाल्यामुळे आजारी पडली.
नीलिमा ताईंना या वयात असं मुलीचं आजारपण झेपत नव्हतं. त्यांनी मुलांना बोलविले. तिच्यावर उपचार झालेत. परंतु तिच्या शरीराने तिची साथ सोडली.
अचानक सुमेधा सुद्धा अनंताच्या प्रवासाला निघून गेली.
सर्व गाव, तालुका, जिल्हास्तरावरून नावाजलेली मंडळी तिच्या अंत्यदर्शनासाठी आलीत.
तिचं कर्तृत्व, तिने तळागाळातल्या बालकांसाठी स्वतःची दिलेली आहुती!
सर्व लोक तिचं गुणगान करीत होते.
बालगृहातल्या बालकांची आऊ गेली. त्यांची माऊली, त्यांची आई परमेश्वराने हिरावून घेतली. सर्व बालके अनाथ झालीत.
आता या बालकांवर कोण संस्कार करणार!
त्यांना आता कोण छान छान गोष्टी आणि कविता सांगणार!
हे सर्व आठवून लहान बालकांना सुद्धा अश्रू आवरत नव्हते. प्रत्येक जण तिच्यासाठी अश्रू ढाळत होता.
रघुनाथ काकांना सुद्धा हे दुःख पेलवलं नाही. परंतु बालकांच्या पुढील आयुष्याकडे पाहून त्यांना खंबीर बनावे लागले.
नीलिमा ताईंना या म्हातार वयात आपल्या मुलीचं असं जाणं सहन होत नव्हतं.
पण काय करणार,त्या तिच्या आठवणीत आपलं उरलेलं आयुष्य कसंतरी जगत होत्या.
आता बालगृहाची माऊली नसल्यामुळे तिच्या भावांनी रघुनाथ काकांच्या मार्गदर्शनात तिचे कार्य पुढे नेण्याचं ठरविले.
दिसे हे विश्व सारे नाशवंत
सर्व मायेचा नाश हाच अंत
आनंदाचा प्रवास केव्हा तरी...
****************
समाप्त
©®छाया राऊत..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा