सुमेधाला एक जिवश्च् कंठश्च मैत्रीण होती. तिचे नाव जान्हवी. दोघींची खूप घनिष्ठ मैत्री होती. त्यांची मैत्री म्हणजे दुधाची घट्ट बासुंदीच जणू.
सुमेधा आणि जान्हवी या दोघींची प्रशिक्षणा दरम्यान घट्ट मैत्री झालेली होती. दोघीही समविचारांच्या, साहित्यात रमणाऱ्या, कवितांचा आस्वाद घेणाऱ्या, अतिशय संवेदनशील, बालमन जपणाऱ्या. दोघींनाही जवळ जवळच्या शाळांमध्ये अध्यापन करण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांच्या मैत्रीला पौर्णिमेच्या चंद्राची झळाळी मिळाली.
ती नेहमी म्हणायची, आपण आपलं आयुष्य सुंदरपणे जगायचं. बालकांच्या सुंदर निरागस मनातच देव असतो.
ज्याप्रमाणे छोट्या प्रल्हादाला त्याच्या वडिलांनी हिरण्यकश्यपू ने विचारले ,की सांग तुझा नारायण कुठे आहे? प्रल्हादाने म्हटले की माझा नारायण प्रत्येकाच्या मनात आहे. निर्जीव वस्तूंमध्ये सुद्धा तो आहे. ज्याप्रमाणे निर्जीव सागरालाही पौर्णिमेला भरती येते, अमावस्येला ओहोटी येते, त्याचप्रमाणे निर्जीव व सजीव दोघांच्याही मनात माझा नारायण वास करीत असतो.
अशी निरागस बालके सुमेधाला खूपच आवडायची. तिची मैत्रीण जान्हवी व ती दोघीही फावल्या वेळात तासनतास गप्पा करीत बसायच्या. त्यांच्या मनाला लग्नाचा विचार कधीही शिवला नाही.
परंतु नियती दोघींच्याही मैत्रीला पूर्णविराम द्यायचे ठरविते की काय असं वाटायला लागलं.
जान्हवी च्या घरच्यांनी तिच लग्न करण्याचं ठरविलं. तिच्या घरच्यांनी तिच्या लग्नासाठी खूपच तगादा लावला.
त्यांना असं वाटायचं की सुमेधाच्या विचारांमुळेच आपली मुलगी लग्नाला नकार देत आहे. जान्हवीच्या मनात सुद्धा लग्न हा विषय गौण होता.
अशातच तिच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरविलं. तिच्या मनात सुमेधा विषयी नकारात्मक गोष्टी भरविल्या. तिच्या आई, बाबा, जावई, बहिणी या सर्वांना असं वाटायचं, की सुमेधाच तिला लग्नाला नकार द्यायला सांगत आहे.
अक्षरांच्या ओळीसारखी माणसांची नाती असतात. गिरविली तर अधिक लक्षात राहतात. वाचली तर अधिक समजतात.
याचा प्रत्यय सुमेधाला तेव्हा आला, जेव्हा तिला समजलं, की जान्हवी च्या घरची मंडळी तिलाच जबाबदार ठरवीत आहेत.
त्या क्षणी सुमेधाने त्या मैत्रीला पूर्णविराम दिला.
अशी दोघींची निखळ मैत्री असूनही घरच्यांच्या गैरसमजामुळे त्या मैत्रीला तिला निरोप द्यावा लागला.
आपले मन कितीही शुद्ध असलं तरी समाज तसा नसतो. हा प्रत्यय हा अनुभव त्यानिमित्ताने तिला आला.
तिचे संवेदनशील मन बालकांभोवतीच फिरत होते. तिला शाळेत, अध्यापन करताना अनेक बालके अतिशय गरीब, घरात अठरा विश्व दारिद्र्य असलेली, केविलवाणी दिसत होती.
ती सतत अशा बालकांच्या चेहऱ्यावरचे कारुण्य टिपायची. ते कारुण्य पाहून तर तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहायचे. तिच्या डोळ्यातील अश्रूच तिच्या मनात त्या लेकरांविषयी कणव निर्माण करीत.
इवलासा अश्रू
ओलावा तू किती
अमित पिकती सौजन्याचे मळे
इवलासा अश्रू, परी त्याच्या पोटी
कोट्यावधी गोष्टी साठलेल्या
इवलासा अश्रू, परी बोले किती
देवी सरस्वती, तेथे मूक
अश्रू हा लहान, अश्रू हा महान
अश्रू नारायण आहे माझा
असा ती नेहमी बालकांच्या हृदयात तिचा नारायण शोधत असे.
जेव्हा तिने अशी सर्व बालके आदिवासी वस्ती पाड्यांवर पाहिली, तेव्हा तिच्या मनाने निर्धार केला की या बालकांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे. या विचारां मुळे तिचे मन तिला स्वस्थ बसू देईना.
त्यासाठी तिने एका सामाजिक संस्थेची मदत घेतली. त्या सामाजिक संस्थेने सुद्धा तिला लागेल ती मदत देऊ केली. त्या संस्थेच्या मदतीने तिने दीर्घ सुट्टीच्या कालावधीत तालुक्यातील अनेक वस्त्या, पाड्यांवर जाऊन अशी बालके गोळा केली, की जे अतिशय दारिद्र्यात जगत आहेत. सकाळी त्यांचे पालक कामावर गेले की लहान लहान बालकांना त्यांची च लहान बहिण भाऊ सांभाळत असत. त्यांना शिक्षणाचा गंधही नव्हता. पालकांनी दिलेला भाकर तुकडा खाऊन जगणं, सगळीकडे अस्वच्छता, अंगावर कपडे नसणे. जसा दिवस येईल तसा ढकलणे. या लेकरांचं भविष्य काय?
हे पाहून तिच्या मनाला खूप वेदना होत. तिला वाटे, कशाला हे लोक या मुलांना जन्माला घालण्याचं पातक करतात.
रात्रंदिवस तिच्या मनात हेच विचार घोळत असे. त्यामुळे ती खूप अस्वस्थ राहायची.
घरच्यांनी तर तिच्या लग्नाचा विचार सोडून दिला होता. कारण याबाबतीत तिच्या घरच्यांना नेहमी तिचा नकारच मिळे.
मनुष्य नुसत्या भाकरीवर जगत नसतो. खाण्यासाठी जगणं, ही भावना सुद्धा मनुष्याकडे नसावी.
आर्थिक उन्नती सुद्धा पर्याप्त नसते. इतर गोष्टी सुद्धा आपल्याला जगण्यात समाविष्ट असाव्या लागतात. असं ती नेहमी म्हणायची. तिच्या या अशा बोलण्यातून, तिची विचारांची प्रगल्भता लक्षात यायची.
असं म्हणतात की खुरट्या झाडांना लवकरच फुले येतात. याचप्रमाणे तिचं झालं.
तिच्या तरुणपणातच तिचं ती बालपण जपत गेली.
ती तिच्या सहकाऱ्यांसोबत भरभरून बोलायची. तेव्हा तिच्या सहकाऱ्यांनी तिला सल्ला दिला, की ताईआपण अशा आदिवासी पाड्यावरच्या सर्व मुलांसाठी एक बालगृह काढूया.
सर्व सहकाऱ्यांनी मिळून ही योजना अमलात आणण्याचे ठरविले.
जिल्हास्तरावरून परवानगी मिळवून ती तालुकास्तरावर सादर करण्यात आली.
आता सुमेधाच्या विचारांना पुढे एक नवीन दिशा मिळाली. तिच्या शाळेतील शिक्षकांनी तिला संपूर्ण सहकार्य करण्याचे ठरवले.
खरोखर, "नुसतं स्वतःच स्वतःच्या परीघात जगण्यापेक्षा परिघा बाहेर सुद्धा जगून बघावं. दुसऱ्याच्या डोळ्यातील आसवं पुसताना त्यात आपलं प्रतिबिंब शोधावं".
असे विचार इतर शिक्षकांमध्ये सुद्धा बिंबविण्यात ती यशस्वी झाली. त्याचमुळे बालगृह निर्माण करण्याचा मार्ग हळूहळू सुकर होत गेला.
सर्व बालकांना एकत्र आणण्यासाठी आणि बालगृहात ठेवण्यासाठी त्यांच्या पालकांची परवानगी मिळवणं अत्यावश्यक होतं. आणि कठीण सुद्धा होतं
सहजासहजी पालक आपल्या पाल्यांना स्वतःपासून दूर करू शकत नाहीत. कितीही दारिद्र्य असलं तरी त्यांना त्या दारिद्र्यात राहण्याची सवय लागलेली असते. ती च लेकरे पुढे त्यांना त्यांच्या मिळकतीसाठी उपयोगी पडतात. हे पालक त्यांच्या लहान बालकांना पैसे कमावण्यासाठी प्रवृत्त करतात.
एकदा डोंबारी व त्याची लहान बालके, तिच्या दृष्टीस पडली. डोंबारी लहान मुलांना घेऊन दोरीवरच्या कसरती त्यांच्याकडून करवून घेत होता. ती मुले सुद्धा अतिशय चिकाटीने व एकाग्रतेने कसरती करीत होती. कारण तो त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न होता. तो खेळ पाहण्यासाठी गर्दी जमली. गर्दीच्या पुढे ढोल वाजवत तो डोंबारी त्या लहान मुलांकडून खेळ करवून घेत होता. खेळ पूर्णझाल्यानंतर ती लहान मुले गर्दी समोर पैशाची भीक मागत फिरत होती.
हे पाहून संवेदनशील सुमेधाला राहावल्या गेलं नाही. तिने तात्काळ तेथील पोलीस स्टेशनला फोन करून त्या बालकांना त्या डोंगऱ्यांपासून मुक्त केले.
परंतु तो खेळ पाहणाऱ्यांची मने त्या लहान मुलांना पाहून द्रवले नाही. एकाही व्यक्तीने डोंबाऱ्याला त्या खेळापासून परावृत्त केले नाही.
तिने विचार केला, "आजचं वर्तमान फारच भीषण आहे. सगळीकडे दुर्बलांचं शोषण आहे. त्यांच्या कष्टाची ना कुणाला जाण माणसांचा स्वार्थ माणसांना छळतो आहे."
बालगृह तयार करण्यासाठी शिक्षकांनी सामाजिक संस्थांची मदत घेऊन छानसे बालगृह तयार केले.
बालगृहाला नाव दिल्या गेले "माऊली".
कारण सुमेधा या सर्व बालकांची माऊली बनण्यास तयार झालेली होती.
ती आपल्या शाळेतील अध्यापना व्यतिरिक्त आपला अतिरिक्त वेळ या बालगृहाला देऊ लागली.
हळूहळू हे बालगृह बाळसं धरू लागलं.
पुढे हे बालगृह कसं आकार घेतं, पाहूया पुढील भागात.
©®छाया राऊत
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा