Login

समर्पण भाग २

समर्पण... करता आलं पाहिजे

सुमेधा एकाग्रतेने वक्त्यांचे भाषण ऐकत होती.अचानक तिच्या डोळ्यातून अश्रु वाहायला लागले. अरे आपण या प्रशिक्षणात कशासाठी आलो, आणि काय करणार होतो... आपण तर या गोष्टीतल्या गाईप्रमाणे खरंच भरकटत होतो. वाट चुकत चाललेलो होतो.
अचानक तिच्या मनाने निर्धार केला.
मन लावून अभ्यास केल्यामुळे तिने प्रशिक्षण पूर्ण करून तिला शिक्षिकेची नोकरी लगेच मिळाली. तिच्या घरी सर्वांना आनंद झाला. मोठ्या भावाने तिला दिलेल्या प्रोत्साहनामुळे व घरच्यांच्या सहकार्यामुळे तिच्या मनाने आणखी उभारी घेतली.
तिचं शिक्षिकेचं नवीन पर्व सुरू झालं.
छोट्या मुलांना शिकविण्यात ती तल्लीन व्हायला लागली. ती त्यांच्यासाठी नवीन नवीन बालगीतं तयार करू लागली.
ती ज्या शाळेतअध्यापन करत होती, त्या शाळेतील मुलांचे पालक व गावकरी तिच्यावर भरभरून प्रेम करीत होते. यामुळे त्या शाळेला खूप फायदा झाला. मुख्याध्यापकांनी तिच्या या गुणांचं चीज करायचं ठरविलं.
त्यांनी तिला शाळेत नवनवीन उपक्रम राबविण्यास खूप प्रोत्साहन दिलं. पालकांच्या व गावकऱ्यांच्या मदतीने सुमेधाने अनेक उपक्रम राबविण्यात हिरीरीने भाग घेतला.
लहान लहान बालकांसाठी तर ती जीव की प्राण होती. नवीन नवीन बाल चारोळ्या बनविणे हा तिचा छंद होता.
छोट्या छोट्या बाल चारोळ्या ती बनवायची.
बालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद तिला सुखावून जायचा.
एक होतं गाव
गावात होती माणसं
बाजारात जाऊन
घेत होती कणसं
बाजार भरला मोठा
माणसांना नाही तोटा
कणसं आणली घरी
भाजून घेतली सारी
परातीत घेतले वाण
खायला लागले खूप छान
एक होता पक्षी
पक्षी होता रंगीत
काय बरे होते, त्याच्या लांब लांब चोचीत
चोचीत होता मासा
मासा खाण्यात तो होता दंग
भराआता या पक्षाच्या चोचीत रंग
अशा वेगवेगळ्या बाल चारोळ्या करून बालकांना ती हसवायची. त्यात तिचा वेळ कसा जायचा हे तिला कळायचं सुद्धा नाही.
एकदा तिने बालकांना आई विषयी सांगायला बोलतं केलं. आपल्या आई विषयी बालकांना काय वाटतं हे तिला जाणून घ्यायचं होतं.
मुले निरागस असतात. मुलांची मनं पाण्यासारखी निर्मळ असतात. मुले त्यांच्या आई विषयी भरभरून व्यक्त झाले त.
बालकेच ती. आई विषयी काय सांगू आणि काय नाही, असं त्यांना झालं.
एका मुलीने तिच्या भाषेत सांगितलं, बाई! "माई माय, माया लाडच करीत नाही.मले लय काम सांगते."असं म्हणत ती रडायला लागली. सुमेधाचं मन कासाविस झालं. तिने त्या बालिकेला आईची माया दिली. प्रेम दिलं. तिच्यासाठी ती रोज खाऊ आणायला लागली.
कुंभार मडकी घडविताना एकाग्रचित्त असतो. तेव्हाच मडकी सुबक आणि सुंदर घडतात. तसंच शिक्षकाने सुद्धा एकाग्रचित्त होऊन मुलांना घडविणे, हे पक्की आणि सुबक मडकी घडविण्यासारखंच असतं, नाही का!
सुमेधा मनाने खूपच संवेदनशील होती. तशीच कणखर सुद्धा होती. ती तालुक्याच्या गावावरून शाळेत आपल्या दुचाकीने यायची. तिच्या संवेदनशील मनाला रस्त्यावरच्या कडेला असलेल्या शेतातील पशुपक्षी, शेतात डोलणारी पिके पाहून खूप आनंद व्हायचा.
शेतात डोलणारी पिके पाहून ती खूपभारावून जायची. शेतात असणारे मोठ्या मोठ्या फणसाने लडबदलेल्या झाडांना पाहून खूप खुश व्हायची. निरनिराळे रंगीबेरंगी पक्षी पाहून तिचे कवी मन उचंबळून यायचे.
शाळेत आल्यावर इतर सहकाऱ्यांशी ती या विषयावर भरभरून बोलायची.
कधीकधी गाभूळलेल्या चिंचेवरती चारोळी करायची.
चिंचेच्या झाडाखाली,
मुली घालिती गोंधळ सारा.
गाभूळलेल्या चिंचेचा हा,
असतो हा स्वादच न्यारा.
आणि स्वतःच खळखळून हसायची. तिच्या सहकाऱ्यांना तिच्या असण्याने, तिच्या हसण्याने खूप आनंद व्हायचा. शाळेतील वातावरण अगदी प्रफुल्लित व्हायचे. त्यामुळे इतर शिक्षक सुद्धा जोमाने अनेक उपक्रमात सहभागी व्हायचे.
डोक्यावरचा रिकामा हंडा डच मळतो.
जो भरलेला असतो, तो कधीच डचमळत नाही.
सुमेधाच्या डोक्यावरचा हंडा अनेक गुणांनी भरलेला होता. तिने त्याला कधीच डचमळू दिले नाही.
झाडावरून पडलेली ताजी बकुळ फुले ओंजळीत घेऊन त्यात त्यांचा सुगंध घेताना मन कसं प्रफुल्लित होत असते. त्याचप्रमाणे ती नेहमी इतरांमधील चांगले विचार, त्यांचे सद्गुण वेचायची. स्वतःचं मन प्रफुल्लित करायची.
एकदा तिच्या शाळेतील लांबून येणारी आदिवासी पाड्यातील छोटी मुलगी खूप आजारी पडली. ती बरेच दिवस झाले तरी शाळेत का आली नाही, हे तिच्या संवेदनशील मनाला खूप जाणवत होते. शाळा संपल्यावर सायंकाळी तिने सोबत एका मोठ्या मुलीला घेतलं. त्या आदिवासी पाड्यावर ती दुचाकी वर त्या मुलीला घेऊन निघाली. पाड्यावर पोचल्यावर तिने त्या मुलीची भेट घेतली. डॉक्टरांकडे नेण्यास सांगून आर्थिक मदत सुद्धा केली. येताना अंधार पडला. आणि दुचाकी मध्येच बंद पडली.
कशीबशी दोघींनी ती मुख्य रस्त्यावर आणली. आणि त्या पायी निघाल्या. तिच्यासोबतच ही मुलगी तर पार गर्भगळीत झाली. आता कसं होणार? त्या मुलीला प्रश्न पडला. रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नव्हतं. तिच्यासोबत ची मुलगी म्हणाली, "मॅडम आपण फोन करू या."
पण फोनची बॅटरी पण कमी झालेली होती. फोन पण बंद पडला. आता काय करायचं? दोघीही विचारात पडल्या.
जेव्हा जेव्हा आपण अडचणीत सापडतो, तेव्हा तेव्हा आपल्या मनातल्या एका कप्प्यात सतत वाटत असतं की काहीतरी सकारात्मक निश्चित घडेल. कुठेतरी मार्ग निश्चित सापडेल. सुमेधाच मन तर सकारात्मक विचारांनी पुरेपूर भरलेलं असायचं.
तसंच झालं. मुख्य रस्त्यावरून एक एसटी महामंडळाची प्रवासी बस दुरून येत होती. या दोघींनी तिला थांबविण्याचा प्रयत्न केला. बस हळूहळू जवळ आली. बसच्या ड्रायव्हरला लाईटच्या प्रकाशात या दोघी दिसल्या.
दुचाकी बंद पडलेली आणि या दोघी थकलेल्या, केविलवाण्या ड्रायव्हरला दिसल्या.
ड्रायव्हरने बस थांबविली. कंडक्टर व ड्रायव्हर दोघेही बसच्या खाली उतरले. आणि समस्या जाणून घेतली. आता काय करायचे?
दुचाकी कुठे ठेवू शकत नाही. चोरी जायची भीती. बस कंडक्टर ने प्रवाशांच्या मदतीने दुचाकी बसमध्ये चढविली. दोघींनाही बस मध्ये बसवून घेतले.
असं कधी होतं का? बसमध्ये दुचाकी कोणी चढवून घेतो का?
त्या बस ड्रायव्हर मध्ये, ही माणसाने माणसाशी माणुसकीने वागण्याची जागृतता कुठून आली?
माणूस मनाने सकारात्मक असला की काही अनाकलनीय गोष्टीही चांगल्या घडून जातात.
सुमेधा ने मुलीला सोबत घेऊन तालुक्याला नेलं दोघी ही सुखरूप घरी पोहोचल्या.
तिच्या आईचा म्हणजे नीलिमा ताईंचा जीव भांड्यात पडला. सुमेदाने आईला व भावांना ही घडलेली हकीकत कथन केली. सर्वांनी तिच्या अशा धाडसाचं कौतुक केले. नीलिमाताईंनी सुमेधाच्या डोक्यावर हात फिरवून म्हटले, "बाळा, आता तुझे दोनाचे चार हात करायला हवेत." परंतु ती लग्नाला नकार देतच राहिली.
नीलिमा ताईंना सतत वाटायचे की तिचे लग्न व्हायला हवे. आपल्याला जबाबदारीतून मोकळे व्हायचे आहे.
सुमेधा लग्न करणार की नकार देणार पाहूया पुढच्या भागात भाग ३ मध्ये
©®छाया राऊत

0

🎭 Series Post

View all