समर्पण-एक प्रेमकथा भाग ९०

एक अनोखी प्रेमकथा
समर्पण-एक प्रेमकथा भाग ९०

मागील भागाचा सारांश: नीरव व नीरजाला आश्रमात बघून शालिनी ताईंना आश्चर्य वाटले होते. अंजली बद्दल नीरजाने शालिनी ताईंकडे चौकशी केली. एकदा संगिता सोबत बोलून तुमच्या डोक्यात असणारे विचार सॉर्ट करा असा सल्ला नीरजाने शालिनी ताईंना दिला. ज्योतीने केलेला मॅसेज वाचून मुक्ताला टेन्शन आले होते.

आता बघूया पुढे….

ज्योतीने केलेला मॅसेज नीरजाने वाचायला सुरुवात केली,
“हाय मुक्ता, तू बऱ्याच वेळेस मला लग्नाबद्दल विचारलं होतं, पण दरवेळी मी तो विषय टाळत होते. मला तुझ्यापासून काही लपवायच नव्हतं, पण तुला सगळं खरं सांगण्याची हिंमत माझ्यात नव्हती. आजवर तू माझ्यापासून काहीच लपवल नाहीस, पण मी मात्र सगळं खरं तुला कधी सांगूच शकले नाही. हे वाचून तुला माझा राग येईल, पण प्लिज माझी बाजू समजून घे.

जवळपास तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. मी नवीनच कंपनीत जॉईन झाले होते, तेव्हा विनोद सर प्रोजेक्ट मॅनेजर होते. विनोद सरांनी मला सगळ्या कामात ट्रेन केलं. आम्ही एका प्रोजेक्टवर सहा महिने एकत्र काम करत होतो. एकत्र काम करत असल्याने आमच्या दोघांमध्ये मैत्री झाली होती.

प्रोजेक्ट संपल्यावर सरांची ट्रान्सफर बंगलोरला झाली. आमच्यात अधून मधून फोन सुरूच होते. आम्ही एकमेकांमध्ये अडकत गेलो आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात कसे झाले हे आम्हालाही कळले नाही. पुढील सहा महिन्यांनी विनोद सर पुण्यात परत आले.

आपण लग्न करुयात का? हा प्रश्न विनोद सरांनी त्यावेळी मला विचारला होता, तेव्हा मी त्यांच्या कडून वेळ मागून घेतला. कारण ज्या व्यक्ती सोबत मला आयुष्य घालवायच आहे, त्या व्यक्तीला पूर्णपणे समजून घेणे मला आवश्यक वाटले होते.

प्रोजेक्टच्या निमित्ताने ते पुण्यातून बाहेर ये जा करत होतेच. आम्ही दोघे या काळात मनाने आणि शरीराने जवळ आलो होतो. सर जाऊन ते माझ्यासाठी फक्त विनोद झाले होते. जवळपास सलग तीन महिने आम्ही लिव्ह इन मध्ये पण राहिलो होतो.

विनोद सोबत असले की मी खूप रिलॅक्स फिल करायचे. ते सोबत असले की कसलच टेन्शन भासत नव्हतं. त्यावेळीच मी त्यांच्या सोबत लग्न करायचा निर्णय घेतला. नेमकं त्याच काळात त्यांना सिंगापूरला एका प्रोजेक्ट साठी जावं लागणार होतं. एक वर्ष प्रोजेक्ट चालेल असा अंदाज असल्याने तेव्हा आम्ही रजिस्टर मॅरेज करून घेतलं.

विनोदची कास्ट वेगळी असल्याने घरी आमचं लग्न कधीच मान्य करणार नाही, याची कल्पना होतीच. एकदा असंच आई-बाबांना कंपनीत एक मुलगा आहे त्याने मला लग्नासाठी विचारलंय अस सांगितलं, त्यावर त्या दोघांची अशी प्रतिक्रिया होती की मला पुढे काही सांगण्याची हिंमतच झाली नाही.

मी सगळ्यांपासून खूप मोठी गोष्ट लपवली हे मला मान्य आहे, पण तू एक विचार करून बघ. आता लांबच कोणाच उदाहरण देण्यापेक्षा नीरव आणि नीरजा कडे बघ. नीरजा नीरवच्या प्रेमात आहे, पण तो तिच्यावर प्रेम करत नाही. नीरजाच्याही काही अपेक्षा असतीलच ना.

समजा आई बाबांच्या इच्छेखातर मी एखाद्या मुलाशी लग्न केलं असत आणि तो नीरव सारखा निघाला असता तर मग मी काय केलं असतं?

हा मॅसेज मी तुला एअरपोर्टवरून केला आहे. मी विनोद सोबत सिंगापूरला चालले आहे. त्यांनी तिकडेच दुसरी कंपनी जॉईन केली आहे. मी पण आता तिकडेच नोकरी शोधेल. मी घरी मॅसेज करून सगळं सांगितलं आहेच. फोन करण्याची हिंमत माझ्यात नव्हती.

तुला आईकडून कळलं असत तर तुझा माझ्या वरचा विश्वास उडाला असता. आपली भेट कधी होईल ते माहीत नाही. माझा मेल आय डी तुझ्याकडे आहेच, काही मदत लागली तर त्यावर मेल कर.

नीरजा व नीरव तुला उभं रहायला मदत करतीलच. एखादा कोर्स करून नोकरी शोध, स्वतःच्या पायावर उभी रहा. तुला आवडेल त्याच मुलाशी लग्न कर. तुझ्या या ज्योती ताईला समजून घे.”

मॅसेज वाचून झाल्यावर नीरजाने मुक्ताकडे बघितलं.

“वहिनी, ज्योती ताईने इतकी मोठी गोष्ट लपवून ठेवली होती. माझा तर या सगळ्यावर विश्वासच बसत नाहीये.” मुक्ताच्या डोळ्यात पाणी होते.

नीरजा तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली,
“मुक्ता, ज्योती ताईंनी त्यांच्या मनाने हा निर्णय घेतला आहे. त्या इतक्या मॅच्युअर आहेत की, त्यांना त्यांचं चांगलं वाईट कळतंय. आता त्यांनी ते तुम्हाला सांगायला पाहिजे होत, पण त्यांना नाही सांगावं वाटलं तर त्याला आपण काही करू शकत नाही. मी तर देवाकडे एकच प्रार्थना करेल की, ज्योती ताईंनी जो विश्वास विनोद वर टाकला आहे तो त्यांनी सार्थ करून दाखवावा.

मुक्ता, तुला धक्का बसणे स्वाभाविक आहे. ज्योती ताई खुश असतील हे समजून ते डोक्यातून काढून टाक. थोडे दिवस जाऊदेत, मग आपण त्यांना मेल वरून कॉन्टॅक्ट करून बघू.”

“हो चालेल. मला हे सगळं पचायला थोडं जड जाईल. आईला ही बातमी लगेच सांगत नाही. ती आधीच वेगळ्या मनस्थितीत आहे, अजून तिच्या डोक्याला ताण द्यायचा नाहीये. आई मावशीचा जास्त विचार करत बसेल.” मुक्ता म्हणाली.

यावर नीरजा म्हणाली,
“शालिनी आई व संगिता आईंमध्ये एकदा बोलणं झालं की त्या दोघींच्या मनातील गिल्ट कमी होईल. ज्योती ताईंबद्दल त्यांना लगेच न सांगणेच योग्य ठरेल. तू पण ज्योती ताईंचा जास्त विचार करू नकोस.”

“हम्मम. मी जरावेळ रूममध्ये जाऊन बसते.” मुक्ता उठून आत निघून गेली.

मुक्ता निघून गेल्यावर नीरव तिथे येऊन बसला.

“ही लगेच अशी का निघून गेली? तिचा चेहरा नाराज का होता?” नीरवने नीरजाकडे बघून विचारले.

नीरजाने ज्योती बद्दल नीरवला सगळं काही सांगितलं.

“बरं, पण मग या सगळ्याने मुक्ता का हर्ट झाली? ज्योतीला जे योग्य वाटले ते तिने केले.” नीरवला प्रश्न पडला होता.

“गौरव सर तुमचे फक्त मित्र होते, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होत नव्हता, तर तुम्ही नाराज आहातच ना. तुम्हाला त्यांचा राग आलेला आहेच ना. इथे तर ज्योती ताई आणि मुक्ता ह्या बहिणी आहेत. लहाणपणापासून त्या एकत्र वाढल्या आहेत. आपल्या बहिणीने इतकी मोठी गोष्ट आपल्यापासून लपवल्याचा त्रास तर त्यांना होईलच ना.” नीरजा म्हणाली.

“अरे हो, मी या बाजूने विचार केलाच नव्हता. हॉस्पिटल मधून फोन आला होता. मी त्याच विचारात होतो.” नीरव म्हणाला.

“काही टेन्शन आहे का?” नीरजाने विचारले.

“एक कॉम्प्लिकेटेड केस होती, पण गौरवने व्यवस्थित हँडल केली.” नीरवने उत्तर दिले.

“मग गौरव सरांना फोन करून थँक्स म्हणा.” नीरजाने सुचवले.

“थँक्स कशासाठी? तो हॉस्पिटलमध्ये जॉब करतो, त्याच काम आहे ते. आपण त्याला त्याच्या कामाचा पगार देतो.” नीरव म्हणाला.

“थँक्स नका म्हणू, पण निदान त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक तर करा. स्टाफच कौतुक केलं की तेवढेच ते अधिक जोमाने काम करतात. हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये.” नीरजा म्हणाली.

“हो, मी उद्या समक्ष भेटून त्याने केलेल्या कामाचं कौतुक करेल.” नीरव म्हणाला.

नीरजा आपल्या जागेवरुन उठत म्हणाली,
“बराचवेळ इथे बसून आहे. मी गीता ताईंची भेट घेते. अंजली सोबत बोलावं लागेल. तुम्ही रूममध्ये जाऊन आराम करा. तुम्हाला कधीतरीच असा आराम करायला मिळतो. मी आलेच.”

नीरजा निघून गेल्यावर नीरव एकटा विचार करत तिथेच बसून होता. विचार केल्यावर त्याने गौरवला फोन लावला. चार ते पाच रिंग गेल्यावर गौरवने फोन उचलला.

“हॅलो, बोला सर.” गौरव.

“हॅलो, डॉ गौरव. तुम्ही इमर्जन्सी केस प्रॉपर हँडल केलीत हे कळलं. वेल डन.” नीरव.

“थँक् यू सर. इट्स माय ड्युटी. मी जनरल वॉर्डमध्ये आहे, मला पेशंट चेक करायचे आहेत. बाय सर. एन्जॉय युअर हॉलिडेज.” एवढं बोलून गौरवने फोन कट केला.

नीरव रूममध्ये आराम करण्यासाठी निघून गेला.

क्रमशः

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all