समर्पण-एक प्रेमकथा भाग ५२

एक अनोखी प्रेमकथा
समर्पण-एक प्रेमकथा भाग ५२

मागील भागाचा सारांश: मुक्ता घरी येणार असल्याने नीरजा स्नेहाचा निरोप घेऊन आपल्या घरी आली होती. तिने शालिनी ताईंना मुक्ता येणार असल्याचे सांगितले. नीरव सुद्धा हॉस्पिटल मधून लवकर घरी आला होता. नीरजाची भेट घेण्यासाठी तो तिच्या रूममध्ये गेला, तर तो तिच्याकडे बघण्यात हरवून गेला होता.

आता बघूया पुढे….

नीरवच्या डोळयात नीरजाला तिच्याबद्दल जे भाव दिसत होते, ते तिला खूप भारी वाटत होते. पोटात फुलपाखरू नाचत आहेत अस काहीसं तिला जाणवत होतं. नीरवच्या एकटक बघण्यामुळे तिच्या गालावर लाली चढली होती. त्या क्षणी ती सगळं विसरली होती. मुक्ता, स्नेहा, शिवानी सगळं काही विसरून गेली होती.

नीरजाच्या मोबाईलची रिंग वाजल्याने दोघांची नजरबंदी तुटली. मोबाईलची रिंग वाजत असल्याने नीरजा मोबाईल इकडे तिकडे शोधू लागली. तिचा वेंधळेपणा बघून त्याला हसायला आले.

"नीरजा, जो मोबाईल तू इकडे तिकडे शोधत आहेस ना, तो तुझ्या हातात आहे."

नीरजाने हातातील मोबाईल कडे बघितले आणि स्वतःच्या डोक्याला हात मारून घेतला. स्क्रीनवर मुक्ताचे नाव बघून तिने नीरवकडे बघतच फोन रिसिव्ह केला. गेटवरील सिक्युरिटी गार्ड त्यांना आत सोडत नसल्याने मुक्ताने नीरजाला फोन केला होता. नीरजाने सिक्युरिटी गार्डला त्यांना आत येऊ दयायला सांगितले.

"तुमचं माझ्याकडे काही काम होत का?" नीरजाने नीरवकडे बघून विचारले.

"होत, पण आता ते आठवत नाहीये." नीरव अगदी सहजपणे बोलून गेला.

"मुक्ता आता येईलच. आपल्याला जायला हवं." नीरजा म्हणाली.

नीरवने होकारार्थी मान हलवली, पण तो तिथेच उभा होता. आज त्याला नीरजाचे डोळे काही सांगू पाहत होते. नीरवचं तिच्याकडे बघणं तिला आवडत होतं, पण अवघडल्यासारखेही वाटत होते.

"नीरव, आपल्याला खाली जायला हवं." नीरजा थोडं मोठ्याने बोलल्याने तो तंद्रीतून बाहेर आला.

"तू पुढे जा. मी जरा रूममध्ये जाऊन आलोच." नीरव बोलून पटकन आपल्या रूममध्ये निघून गेला.

नीरजा गालातल्या गालात हसून खाली गेली. नीरव आपल्या रूममध्ये जाऊन बेडवर बसला. बाजूला असलेल्या टेबलवरील पाण्याची बाटली तोंडाला लावून तो घटघट पाणी प्यायला.

'नीरव, आज तुला काय झालंय? नीरजाच्या डोळयात इतकं का हरवला होतास? नीरजाला मी पहिल्यांदा बघत नाहीये. आज तिच्याशी बोलताना ततपप का होत होतं? का तिच्यासमोर बोलायला सुचत नव्हतं?' नीरव शांतपणे बसून विचार करत होता.

नीरजा खाली गेली तर हॉलच्या मेन दरवाजातून मुक्ता व तिच्या सोबत अजून एक मुलगी(ज्योती) आता येताना तिच्या नजरेस पडल्या. नीरजा त्यांच्या दिशेने जाऊन म्हणाली,
"या ना, बसा." नीरजा सोप्याकडे हात दाखवत म्हणाली. नीरजाने त्यांचे हसून स्वागत केले.

मुक्ता व ज्योती घराकडे इकडे तिकडे बघत सोप्यावर बसल्या.
"हाय, मी नीरजा." नीरजा हात ज्योती पुढे करत आपली ओळख करून दिली.

ज्योतीने स्माईल देऊन तिच्या हाताला धरून शेकहॅन्ड केला.

सरस्वती तेवढ्यात पाणी घेऊन आली.

"पत्ता सापडायला उशीर झाला नाही ना?" नीरजाला खरंतर काय बोलावे हेच सुचत नव्हते.

"नाही, गुगल मॅप असल्याने कोणताही पत्ता लगेच सापडतो." मुक्ताने उत्तर दिले.

"तुम्ही जॉब करता का?" नीरजाने ज्योती कडे बघून विचारले.

"हो. माझं एम बी ए इन फायनान्स झालेलं आहे. मी एका मल्टिनॅशनल कंपनीत अकाऊंट डिपार्टमेंटला जॉब करतेय." ज्योतीने सविस्तर माहिती दिली.

"दादा अजून आला नाहीये का?" मुक्ताने तिला पडलेला प्रश्न विचारला.

"काही वेळापूर्वी ते आलेत. फ्रेश होत असतील. येतीलच ते." नीरजाने त्याच्या रूमकडे बघून उत्तर दिले.

शालिनी ताई आणि नीरव दोघेही हॉलमध्ये अजून आले कसे नाही? हा विचार नीरजाच्या डोक्यात सुरू होता.

"सरस्वती ताई, आईंना त्यांच्या रूममध्ये जाऊन पाहुणे आल्याचं सांगून या." नीरजाने सरस्वतीला आवाज देऊन सांगितले.

नीरवला मोबाईल वरून मिस्डकॉल दिला. मुक्ताला व नीरजाला काय बोलावे हेच कळत नव्हते. ज्योती पण खाली मान घालून बसली होती. तेवढ्यात शालिनी ताई रूममधून बाहेर येऊन नीरजाच्या बाजूला बसल्या.

"आई, ही मुक्ता आणि ह्या ज्योती ताई." नीरजाने त्यांची एकमेकींसोबत ओळख करून दिली.

शालिनी ताई व मुक्ता दोघींना अवघडल्यासारखे झाले होते, त्यांनी चेहऱ्यावर बळजबरी हसू आणले होते. नीरजाला दोघींकडे बघून त्यांच्यातील अवघडलेपणा स्पष्टपणे जाणवत होता.

"सॉरी, मला यायला थोडा उशीर झाला." नीरव एका खुर्चीत बसत बोलला.

मुक्ता व ज्योती दोघींनी त्याच्याकडे बघितले, पण त्या तिघांच्या चेहऱ्यावर स्माईल नव्हते.

"आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मुक्ता. तू त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये आली होतीस. मी आधीच वेगळ्या टेन्शनमध्ये होतो आणि तो राग तुझ्यावर निघाला. माझा तुझ्यावर चिडण्याचा काहीच अधिकार नव्हता." नीरव अतिशय शांतपणे म्हणाला.

एरवी कोणाचीही पटकन माफी न मागणारा मुलगा इतक्या पटकन मुक्ताची माफी कसा काय मागू शकतो हा प्रश्न शालिनी ताईंना पडला होता. नीरजाला सुद्धा त्याच्या अश्या बोलण्याचे आश्चर्य वाटले होते.

"तुमच्या बोलण्याने मुक्ता त्या दिवशी खूप दुखावली गेली होती. तुम्ही तिचे भाऊ आहात म्हणून ती तुमच्याकडे मदत मागायला आली होती. मुक्ता त्या रात्री नीट जेवली आणि झोपली सुद्धा नव्हती. मुक्ता वयाने आपल्यापेक्षा वयाने लहान आहे, हा विचार बोलताना एकदातरी तुम्ही करायला हवा होता." ज्योतीच्या डोळयात नीरव बद्दल असणारा राग दिसून येत होता.

नीरव चिडेल या भीतीने नीरजा मध्येच म्हणाली,
"मी काय म्हणते ज्योती ताई, आता जे झालं ते सोडून देऊयात ना. मुक्ताला तिच्या भावाला भेटून त्यांच्या आईने दिलेली चिठ्ठी पोहोच करायची आहे, ते करुदेत. मला तुमचा राग समजतोय पण त्या दोघी बहीण-भावांमध्ये आपल्याला पडण्याची गरज नाहीये, अस मला वाटतं."

"मी काय म्हणतो, आता तसेही आठ वाजले आहेत. आपण सगळे जेवण करून घेऊ आणि मग ज्याला जे बोलायचं आहे त्याने ते बोला. आज रात्री तुम्ही इकडेच थांबा." नीरव म्हणाला.

मुक्ता व ज्योतीने एकमेकींकडे बघितले, त्यांच्या डोळ्यात ऑकवर्डनेस दिसत होता, ते नीरवच्या लक्षात आल्यावर तो मुक्ताकडे बघून म्हणाला,
"मुक्ता, त्या दिवशी हक्काने भावाकडे मदत मागायला आली होतीस ना? मग त्याच हक्काने भावाकडे जेवायला आणि रहायला काय प्रॉब्लेम आहे? भावाच आणि बहिणीच घर एकच असत ना?"

नीरवच बोलणं ऐकल्यावर मुक्ता म्हणाली,
"ज्योती ताई, दादा म्हणतो ते बरोबर आहे. आपण आता जेवण करुयात. तसंही आपलं बोलणं इतक्यात संपणार नाही. आधीच बोलत बसलो, तर मग जेवणही जाणार नाही. कारण आईने त्या चिठ्ठीत काय लिहिलं असेल हेही सांगता येत नाही. ती चिठ्ठी सहा ते सात पानांची आहे."

"पण ती चिठ्ठी तर फक्त नीरवसाठी आहे ना, मग त्यात काय लिहिलंय हे आपल्याला कळणारही नाही." ज्योतीने तिच्या मनातील शंका बोलून दाखवली.

"आईने अस सांगितलं होतं की, ही चिठ्ठी तुम्ही दोघे मिळून वाचा. तुम्हाला ज्या गोष्टी माहीत नाही, त्या तुम्हाला कळणार आहेत आणि ही चिठ्ठी वाचून तुझा दादा तुझी मदत करेलच याची मला खात्री आहे." मुक्ताने सांगितले.

"तुम्ही हात धुवून या, आपण जेवायला बसूयात." नीरजा बेसिनच्या दिशेने हात दाखवत म्हणाली.

सगळेजण डायनिंग टेबलच्या इथे जाऊन बसले. शालिनी ताई मात्र गप्प होत्या, त्यांना काय आणि कसे बोलावे हेच कळत नव्हते. नीरजाचे लक्ष मुक्ता आणि ज्योती या दोघींकडे होते. सरस्वतीने सगळ्यांना जेवायला वाढले.

"मुक्ता, जेवण आवडेल ना? मला तुमच्या दोघींची आवड माहीत नसल्याने तुमच्यासाठी स्पेशल काही करायला सांगता आलं नाही." नीरजाने जेवणाच्या
ताटाकडे बघत विचारले.

"जेवणामध्ये शेवयाची खीर सोबतीला असेल तर मग मुक्ताला काही दिलं नाही तरी चालतं." ज्योती हसून म्हणाली.

"म्हणजे तुलापण शेवयाची खीर एवढी आवडते का?" शालिनी ताईंनी मुक्ताकडे बघून विचारले.

"हो, मला शेवयाची खीर खूप आवडते, पण अजून कोणाला शेवयाची खीर आवडते?" मुक्ताला प्रश्न पडला होता.

"शेवयाची खीर नीरवची जीव की प्राण आहे." शालिनी ताईंनी सांगितले.

"चला निदान एकतरी आवड दोघा बहीण भावाची सारखी निघाली." नीरजा हसून म्हणाली.

इकडच्या तिकडच्या गप्पा मारत त्यांचे जेवण सुरू होते. शालिनी ताई त्यांच्या सोबत बोलण्यात फारसा रस घेत नव्हत्या. नीरजा ज्योती व मुक्ताला बोलत करून कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न करत होती.

क्रमशः

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all