समर्पण-एक प्रेमकथा भाग ५१

एक अनोखी प्रेमकथा
समर्पण-एक प्रेमकथा भाग ५१

मागील भागाचा सारांश: शिवानीचा भाचा पडला होता, त्याला बरीच दुखापत झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार होते. नीरजाला सांगून शिवानी पटकन तिकडे गेली. स्नेहाने तिची सगळी व्यथा, मनातील दुःख नीरजाला सांगितले. नीरजाने तिला समजावून सांगितले.

आता बघूया पुढे….

स्नेहाच्या घरातून बाहेर पडताना नीरजाने वेळ बघितली, तर घड्याळात सहा वाजले होते. बिल्डिंगच्या गेट मधून ती बाहेर पडत असताना तिला पाटील काकू दिसल्या. काकूंनी हलकीशी स्माईल दिल्याने ती त्यांच्या जवळ थांबून म्हणाली,
"कश्या आहात काकू?"

"मी मस्त. तू लग्नाला मला बोलावलं नाही. तुझं लग्न झाल्याचं मला स्नेहा कडून समजलं." पाटील काकू म्हणाल्या.

"काकू, लग्न अगदी मोजक्या लोकांमध्ये केलं, म्हणून तुम्हाला बोलावलं नाही." नीरजाने सांगितले.

"सासरचे सगळे व्यवस्थित आहेत ना?" पाटील काकूंनी त्यांची खाणेसुमारी सुरू केली हे नीरजाच्या लक्षात आले होते, म्हणून ती पुढे म्हणाली,
"काकू, मी निघते आता. मला घरी जायला उशीर होत आहे."

पाटील काकू काही बोलण्याच्या आता नीरजा तेथून निघून गेली होती. ती कॅबमध्ये बसून घरी गेली. घरी पोहोचल्यावर बाहेरूनच तिने मुक्ताला फोन केला. मुक्ताने अर्ध्या तासात पोहोचू असे तिला सांगितले. सगळ्या गडबडीत नीरजा सरस्वतीला स्वयंपाक करायचं सांगायला विसरली होती. घरात आल्यावर समोर सरस्वतीला बघून तिला आठवले.

सरस्वती शालिनी ताईंसोबत हॉलमध्ये काहीतरी बोलत होती. नीरजा घाईघाईने त्यांच्या जवळ जाऊन म्हणाली,
"सरस्वती ताई, सॉरी मी तुम्हाला सांगायला विसरले. आज आपल्याकडे दोन पाहुण्या येणार आहेत, त्यांच्यासाठी एक्स्ट्रा स्वयंपाक करावा लागेल."

"नीरजा, आपल्या घरात जास्तीचा स्वयंपाक असतोच. अजून काही स्वयंपाक बाकी असेन, तर सरस्वती थोडा जास्त करेल. पाहुण्या कोणी स्पेशल आहेत का?" शालिनी ताईंनी विचारले.

"हो. स्पेशलच म्हणाव्या लागतील." सरस्वती कडे बघून नीरजाने शालिनी ताईंकडे बघून उत्तर दिले.

सरस्वती तिथेच उभी असल्याने नीरजाला व्यवस्थित बोलता येत नाहीये, हे शालिनी ताईंना जाणवल्याने त्या सरस्वती कडे बघून म्हणाल्या,
"सरस्वती, एक काम कर. तू भाजी पोळी, वरण भात करशीलच पण त्याच बरोबर गोड पदार्थ म्हणून शेवयाची खीर कर. नीरवला शेवयाची खीर खूप आवडते तोही खुश होईल."

सरस्वती किचनच्या दिशेने निघून गेली. नीरजा शालिनी ताईंशेजारी बसली.

"आता सांग कोण येणार आहे?" शालिनी ताईंनी विचारले.

"नीरवची बहीण मुक्ता व तिची मावस बहीण ज्योती. मुक्ताला नीरव सोबत बोलायचे आहे. मी तिला बोलले की, रात्री उशीर झाल्यावर इथेच रहा म्हणून." नीरजाने सांगितले.

"ते बर केलंस. आता ती अजून काय निरोप घेऊन येईल काय माहीत? तू फ्रेश होऊन घे. चेहऱ्यावरुन बरीच थकलेली दिसत आहेस. त्या आल्यावर तू इथे असलेली बर होईल." शालिनी ताई म्हणाल्या.

नीरजाने मान हलवून होकार दर्शवला व ती रूममध्ये निघून गेली. रूममध्ये गेल्यावर नीरजाने आरशात स्वतःला बघितले तर तिचा चेहरा खरच खूप थकलेला दिसत होता. डोक्यातील विचारांचा स्ट्रेस तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

मुक्ता कडून अजून बरच काही ऐकायचं असल्याने तिने अंघोळ करून फ्रेश होण्याचा विचार केला. ती बाथरूम मध्ये अंघोळ करण्यासाठी निघून गेली.
—---------------------------------------------------

"सर, आत येऊ का?" आवाज आल्यावर नीरवने मान वर करून बघितले तर दरवाजात शिवानी उभी होती.

"हो ये ना, बस." नीरव आपल्या समोरील खुर्चीकडे बोट दाखवत म्हणाला.

शिवानी खुर्चीत येऊन बसली. तिला असलेलं टेन्शन तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होते.

"शिवानी, काही बोलायचं होत का?" ती काहीच बोलत नसल्याने नीरवने विचारले.

"सर, तो माझा भाचा शुद्धीत कधी येईल?" शिवानीच्या आवाजात काळजी जाणवत होती.

"शिवानी, त्याच्या मेंदूला मार लागला आहे. आपण त्याच्यावर बेस्ट उपचार करत आहोत. आता त्याच शरीर आपल्या प्रयत्नांना कशी साथ देईल त्यावर ते अवलंबून असेल. आपल्याला नक्कीच यश मिळेल." नीरव अतिशय शांतपणे म्हणाला.

"सर, खूप टेन्शन आले आहे. तो एवढासा जीव निपचित पडला आहे. अस त्याला शांत बघण्याची सवय नाहीये." शिवानीच्या डोळयात पाणी आले होते.

"हे बघ शिवानी, तू आधी तुझ रडणं थांबव. मला एक सांग, तो पडला कसा? आपल्या हॉस्पिटलचा नियम आहे की, कोणताही पेशंट इथे आल्यावर त्याला काय आणि कसे झाले, याची पहिल्यांदा विचारणा केली जाते.

तो तुझा भाचा असल्याने कोणीच त्याकडे लक्ष दिले नाही. पण आता नेमकं हे सगळं कसं झालं हे सांगशील का?" नीरवने विचारले.

यावर शिवानी म्हणाली,
"सर, नक्की कस झालं हेही मला ठाऊक नाही. फक्त दादा आणि वहिनी मध्ये भांडण सुरू असताना त्याला लागलं हे मला कळालं. दादा व वहिनीची अवस्था ठीक नसल्याने मी त्यांना जास्त काही विचारलं नाही."

"ओके, काही हरकत नाही. मला माहिती असावी म्हणून मी विचारलं होत. तू दादा-वहिनीला तस हळूवार विचारुन ठेव. आपल्या हॉस्पिटल मधील बेस्ट डॉक्टर्स त्याच्यावर उपचार करत आहे. तो लवकर शुद्धीत यावा म्हणून देवाकडे प्रार्थना कर.

घरी पाहुणे येणार असल्याने मला घरी जावं लागणार आहे. इथे सगळे आहेतच, तरीही तुला काही लागलं तर मला किंवा नीरजाला फोन कर." नीरव आपल्या जागेवरुन उठताना म्हणाला.

शिवानी होकारार्थी मान हलवून केबिनच्या बाहेर पडली. नीरव सुद्धा तिच्या पाठोपाठ केबिन मधून बाहेर पडला. गाडीत बसून तो घराच्या दिशेने मार्गस्थ झाला.

नीरव घरात गेला तर शालिनी ताई सोप्यावर बसलेल्या होत्या.

"आई, नीरजा घरी आली का?" नीरवने घरात जाताना दरवाजातूनच विचारले.

"हो, ती फ्रेश होण्यासाठी तिच्या रूममध्ये गेली आहे." शालिनी ताईंनी उत्तर दिले.

नीरवने घरात आल्या आल्या नीरजाची चौकशी केली, म्हणून शालिनी ताईंना नीरवचे आश्चर्य वाटले आणि त्यासोबत त्यांना छान वाटले. नीरव व नीरजा मध्ये सगळं काही अलबेल होईल याची खात्री त्यांना झाली.

नीरव शालिनी ताईंकडे न बघता आपल्या रूममध्ये गेला. तो पटकन फ्रेश झाला. मुक्ता आल्यावर ती आपल्याशी काय बोलेल आणि तिच्याकडे आईने काय निरोप दिला असेल? हे दोन विचार त्याच्या डोक्यात घोळत होते. अचानक त्याच्या डोक्यात नीरजाचा विचार आला. तो उठून नीरजाच्या रूमकडे गेला. त्याने दरवाजावर नॉक केलं, तेव्हा दरवाजा उघडा असल्याचे त्याच्या लक्षात आले. दोन मिनिटे नीरजा येण्याची वाट बघत तो तिथेच उभा राहिला.

नीरजा दरवाजा उघडायला येत नसल्याने तो दरवाजा उघडून रूममध्ये गेला, तर नीरजा कुठेच नव्हती. त्याने त्याची नजर रूममध्ये सगळीकडे फिरवली. तो मागे फिरणार इतक्यात बाथरूमचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि तो त्या दिशेने बघायला लागला.

नीरजा हातात टॉवेल घेऊन बाहेर आली. नीरव दरवाजात उभा आहे, याकडे तिचे लक्ष गेले नव्हते. ती आपल्याच विचारात मग्न होती. नीरजाने ब्ल्यू कलरचा कुर्ता व व्हाईट लेगीन घातलेली होती. कपडे एकदम साधे असले तरी ती त्यात खुलून दिसत होती. नीरजा केस कधीच मोकळे सोडत नसल्याने नीरवने तिला कधीच मोकळ्या केसात बघितले नव्हते. नीरव नकळतपणे तिच्याकडे बघत तिच्या हालचालींच निरीक्षण करत होता. त्याची नजर तिच्यावरून हटत नव्हती.

नीरजा आरशा समोर उभ राहून गाणं गुणगुणत होती. ती एकदम हळू आवाजात गाणं गुणगुणत असल्याने नीरवला ते गाणं कळलं नव्हतं, तरीही तो त्या गाण्यात हरवला होता. नीरजाने चेहऱ्याला सर्वप्रथम एक क्रीम लावली. मग त्यावर पावडर लावली आणि कपाळाला छोटीशी टिकली लावली.

केसांमधील गुंता काढल्यावर तिने एका क्लचच्या साहाय्याने केस घट्ट बांधले. एकदा पुन्हा आरशा जवळ जाऊन सगळं काही ठीक आहे की नाही हे तिने चेक केलं. नीरव एकटक तिच्याकडे बघत होता. नीरजा जिथे जाईल तिथे नीरवची नजर तिचा पाठलाग करत होती. सगळं आवरुन झालंय याची खात्री झाल्यावर एका हातात मोबाईल घेऊन नीरजा दरवाजाकडे वळली, तर दरवाजात उभ्या असणाऱ्या नीरव वर तिची नजर पडली.

नीरव आपल्याकडे एकटक बघतोय हे तिच्या लक्षात आले होते. त्याची नजर, त्याच बघणं तिला हवंहवंसं वाटत होतं. ती हळुवार चालत त्याच्या पुढे जाऊन उभी राहिली, तरी त्याच्या लक्षात आले नव्हते. त्याची पापणी सुद्धा लवत नाहीये हे बघून नीरजा गालातल्या गालात हसून लाजली.

'तिचे सोज्वळ रूप तो डोळयात साठवत होता,
त्याचे डोळे तिला निरागस जाणवत होते,
दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवून गेले होते,
एकमेकांच्या नजरेत जे भाव होते, ते प्रेम होतं का?'

क्रमशः

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all