Feb 28, 2024
प्रेम

समर्पण- एक प्रेमकथा भाग ५०

Read Later
समर्पण- एक प्रेमकथा भाग ५०
समर्पण-एक प्रेमकथा भाग ५०

मागील भागाचा सारांश: स्नेहा नीरजाला तिच्या घरची व्यथा सांगत होती. नीरजाला शिवानीचा फोन आल्याने दोघींचं बोलणं अर्धवट राहिलं.

आता बघूया पुढे….

नीरजा गाडी जवळ गेली, तर शिवानीच्या डोळयात पाणी होते, ते बघून नीरजा म्हणाली,
"शिवानी, काय झालंय?"

"मॅडम, माझा भाचा पडलाय. कुठे, कसा माहीत नाही, पण त्याच्या डोक्यातून रक्त येत आहे आणि तो बेशुद्ध पडलाय. एवढं मला वहिनीने सांगितले. मी त्यांना त्याला घेऊन हॉस्पिटलला यायला सांगितले." शिवानीला भरून येत असल्याने तिला पुढे काही बोलताच आले नव्हते.

नीरजा शिवानीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली,
"हे बघ शिवानी, तू काही काळजी करू नकोस. मी नीरवला फोन करून सांगते. तू हॉस्पिटलला जा. काही मदत लागली तर नीरवला सांग. दादा-वहिनीला आधाराची गरज आहे. तू अशी रडत बसली तर त्यांना आधार कोण देईल? तू भरपूर संकट बघितली आहे, त्यापुढे हे संकट मोठे नाहीये. जरा धीराने घे आणि यावेळी आम्ही तुझ्यासोबत आहोत."

आपल्या डोळ्यातील पाणी पुसून शिवानी म्हणाली,
"मॅडम, मी हॉस्पिटलला जाते, पण तुम्ही कशाने घरी जाल?"

"याही परिस्थितीत तुला तुझ्या ड्युटीची पडली आहे. मी कॅब करून जाईल. तू त्याबद्दल विचार करू नकोस. आता पटकन हॉस्पिटलला जा, पण गाडी जपून चालव." नीरजा म्हणाली.

शिवानीने मान हलवून होकार दर्शवला. ती गाडी सुरू करून निघून गेली. ती जाईपर्यंत नीरजा तिथेच उभी होती. नीरजाने फोन करून नीरवला सगळं काही सांगितलं व शिवानीची मदत करायला सांगितले. शिवानी निघून गेल्यावर नीरजा पुन्हा स्नेहाच्या घरात गेली.

"शिवानीला काय इमर्जन्सी आली होती ग?" स्नेहाने तिला काळजीने विचारले.

"तिचा भाचा पडलाय, त्याला बऱ्यापैकी लागलंय. त्याला हॉस्पिटलला घेऊन येत आहेत, म्हणून तिलाही जावं लागलं. तिचा विषय आता बाजूला राहूदेत. तू तुझं बोलणं कँटीन्यू कर." नीरजाने सांगितले.

स्नेहाने पुढे बोलायला सुरुवात केली,
"माझा मेडीकलला नंबर लागल्याने मी घरातून बाहेर पडले. घरातून बाहेर पडल्यावर हे जग किती सुंदर आणि शांत आहे, याचा अंदाज आला. शिक्षण घेताना एकच विचार केला होता की, काही झालं तरी आता कायमच घरी रहायला जायचं नाही.

आपल्याला सुखी व्हायचं असेल, तर जिद्दीने अभ्यास करून पुढे जावं लागेल. हा एकच विचार डोक्यात ठेवून त्याप्रमाणे आयुष्य जगत होते. अचानक ताई व माझी भेट झाली होती, तेव्हा ती स्वतःहून माझ्याशी बोलली. माझ्या मनात ताईबद्दल राग होताच, पण तिच्या चेहऱ्यावर आनंद बघून मला बर वाटल, कारण तो आनंद ती घरी असताना तिच्या चेहऱ्यावर कधीच दिसला नव्हता.

माझ्याकडे ताईचा फोन नंबर आहे, पण मी तिला स्वतःहून कधीच फोन करत नाही. तिचा मात्र अधूनमधून फोन येत असतो. ती लांब राहून का होईना बहिणीचे कर्तव्य निभावत आहे. मी ताईशी बोलते, हे घरी कोणालाच माहीत नाही.

कॉलेजला सुट्टी असताना घरी गेल की, दादा व बाबांच नेहमीच भांडण ऐकावं लागायचं. मी कोणाचीच बाजू घेत नव्हते, कारण दोघेही चुकत होते. घरात समाधान, शांती असावी असं त्यांना कधी वाटलंच नाही. मी आईला बोलायचे की, तू दोघांना समजावून सांगत जा. मी सुट्टीला म्हणून चार दिवस घरी येते, तर घरात शांतता ठेवत जा, पण आईने कधीच त्यांना टोकल नाही.

ताईच्या आयुष्यात तिचा लाईफ पार्टनर आल्याने ती कधीच एकटी पडली नाही, पण माझ्या आयुष्यात अस कोणी आलंच नाही. मीच कोणाला येऊ दिलं नाही असही म्हणायला काही हरकत नाही. मला वाटलं होतं की, माझं कॉलेज झाल्यावर बाबा लग्नाचं मनावर घेतील, पण त्यांच्या डोक्यात तो विषय दिसतच नाही. आमच्या सगळ्या नातेवाईकांमध्ये बाबांच्या स्वभावाची ख्याती पसरली असल्याने कोणीच आमच्या घराशी संबंध जोडायला तयार होत नाही.

एक महिन्यापूर्वी ताईने सुचवल्याप्रमाणे मी मॅट्रीमोनी साईटवर माझं नाव नोंदवल. दोन-तीन स्थळ आवडले, त्यांच्या सोबत बोलणं झाल्यावर बाबांना सांगितलं तर बाबाच माझ्यावर चिडले. त्यांचं म्हणणं होतं की, ते जिवंत असताना मी स्थळ शोधायची काय गरज आहे? मी तिथेच तो नाद सोडला.

नीरजा, मी पैसे कमावते आहे. माझ्या पायावर उभी आहे, पण एकटेपणा जाणवतो ना ग. त्याच काय करू? माझ्या जवळपास सगळ्या मैत्रिणींची लग्न झाली आहेत. सगळ्या त्यांच्या आयुष्यात बिजी झाल्या आहेत. त्या मला वेळ देऊ शकत नाही, यात त्यांची काहीच चुकी नाहीये, पण मग माझी चिडचिड होते.

एकटी राहत असल्याने अलीकडे मला डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं वाटतंय. ताई मला तिच्याकडे काही दिवस राहण्यासाठी बोलावते आहे, पण मला तिच्याकडे जाऊन रहायला अनकम्फर्टेबल वाटत आहे. घरी चार-पाच दिवस सुखाने राहता येईल म्हटल तर घरात घुसल्यापासून दादा व बाबांचा दंगा सुरू होता.

काल त्यांना माझी मनस्थिती सांगायला गेले तर मलाच नको ते ऐकावं लागलं. आईला सुद्धा माझं म्हणणं कळलं नाही. आई उलट मलाच ओरडली, तुला बाबांशी या भाषेत बोलण्याची काय गरज होती. तुला लग्नाची एवढी घाई झाली आहे का म्हणून. तुझ्यात सहनशक्ती नाहीये. बाहेरच्या जगाची हवा लागली वगैरे. खूप काही बडबड केली.

नीरजा, इतक्या दिवस मी माझ्या आईचा विचार करून सगळं संयमाने हाताळत होते. ती आई आहे ना तरी तिला माझं मन कळत नाही. नेहमी मीच सगळ्यांसमोर नमत का घ्यायचं? ती जशी सहनशील बनून राहिली तशीच मी रहावी ही तिची अपेक्षा का? मी पहिल्यांदा आई सोबत खूप वाईट भाषेत बोलले. आज सकाळी निघाल्यावर कोणीच मला अडवलं नाही. आई सुद्धा काहीच बोलली नाही.

मला खूप वाईट वाटलं. आपल्यावर प्रेम करणार आपल्या आयुष्यात कोणीच नाही, ही भावना मनाला त्रास देऊन गेली."

स्नेहाच्या डोळयात पाणी आलं होतं. नीरजाने तिला मिठी मारली.

"डोक्यात इतकं काही घेऊन फिरत होतीस, पण मला एकदाही तुला हे सगळं सांगावं वाटलं नाही. स्नेहा, मी तुझ्या घरच्यांपैकी कोणालाही भेटले नाही सो त्यांच्या बद्दल न बोललेलं बरं.

प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळ्या प्रकारचा गोंधळ असतो. माझ्याही आयुष्यात सध्या बरच काही सुरू आहे, ते सगळं तुला निवांत नंतर कधीतरी सांगेल. लग्नाचं म्हणशील तर तुझ्या नशिबात जेव्हा लग्न लिहिलेलं असेल ते तेव्हाच होईल. आता कितीही त्रागा केला तरी काही उपयोग होणार नाही. तुझ्यावर प्रेम करणार माणूस नक्कीच तुझ्या आयुष्यात येईल.

तुला घरी जाऊन मनस्ताप होत असेल, तर काही दिवस तिकडे जाऊ नकोस. आईचा राग शांत झाल्यावर ती स्वतःहून तुला कॉल करेल. आईचा फोन आल्यावर तिलाच इकडे बोलावून घे. कदाचित आई इकडे आल्यावर तुमच्यातील नातं बदलेल.

ताई आग्रह करते आहे, तर एक दिवस तरी तिच्याकडे जाऊन ये. तिलाही बर वाटेल आणि तुलाही. अशीही सध्या तुला सुट्टी आहेच ना. तुला एकटं वाटतंय हे मला कळत आहे. हा एकटेपणा घालवण्यासाठी एखादा ऍक्टिव्हिटी क्लास जॉईन कर, डान्स क्लास, योगा क्लास. तुला जे आवडत असेल ते कर. या निमित्ताने तुला वेगळे लोक भेटतील. तुझं मन रमेल.

सगळ्या गोष्टींचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा समोर जे आयुष्य आहे ते जगून घे. प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते आणि ते त्याचवेळी घडेल." नीरजाने स्नेहाला समजावून सांगितले.

"थँक् यू नीरजा. तुझ्याशी बोलून जरा बर वाटतंय ग. मनात साचलेलं सगळं बाहेर पडल." स्नेहा हसून म्हणाली.

"मैत्रीण म्हणतेस आणि आभार मानत आहेस. तुझ्या चेहऱ्यावर हे हसू आलं ना बस्स, मला एवढंच हवं होतं. मी तुझ्यासाठी ज्यूस आणि नारळपाणी आणलं आहे, ते पिऊन घेशील.

माझी कितीही इच्छा असेल तरी मी तुला तुझ्या मनाप्रमाणे वेळ देऊ शकत नाही. तुला काही सांगायचं असेल तर मॅसेज करून ठेवत जा. मला जमेल तसं रिप्लाय देत जाईल. मला आता घरी जावं लागेल. संध्याकाळी घरी पाहुणे येणार आहेत. मी निघते." नीरजाने जाताना एकदा स्नेहाला पुन्हा मिठी मारली.

स्नेहाच्या चेहऱ्यावरील हसू बघून तिला बर वाटलं.

क्रमशः

©®Dr Supriya Dighe

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//